Skip to main content

नात्यातील घुसमट

        नेहमीप्रमाणे लेक्चर संपवून स्टाफरूममध्ये येऊन बसलो होतो. लेक्चर म्हंटले की ताण येतोच! त्यातही वर्ग जर फुल भरलेला असेल तर ताण येतोच येतो पण अध्यापन करायलाही मजा येते. तसा माझ्या लेक्चरला वर्ग नेहमीच भरलेला असतो. फार कमी शिक्षकांच्या नशिबी आजकाल हे सुख असते. त्याअर्थी स्वतःला नशीबवान म्हणायला हरकत नाही. त्यात कंपनी कायदा, मॅथेमॅटिक्स आणि अकाऊंटसारखे  रटाळ प्रवृत्तीचे विषय शिकवायचे म्हणजे मुलांना भावेल आणि आवडेल अश्या पद्धतीने शिकविणे हेच कौशल्य असते आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर निसर्गाने ते मला बहालही केले आहे असे वाटते. त्याअर्थाने मी स्वतःला सुदैवी आणि समाधानीही समजतो.  विद्यार्थ्यांना (यात मुले आणि मुली दोघेही आले) त्यांच्या पातळीवर जाऊन शिकविल्याशिवाय आणि त्यांच्या भावनांना हात घातल्याशिवाय विद्यार्थी आपल्याशी मोकळेपणाने बोलत नाहीत हा अनुभव गाठीशी होता. वर्गात शिकवीत असताना मी ते करतोही.  त्यामुळेच बरेच विद्यार्थी मनमोकळे बोलतातही, अगदी मुलीसुद्धा!
                  तर झाले असे की, मी स्टाफरूममध्ये येऊन खुर्चीवर टेकतो ना टेकतो तोच एक मुलगी रडत रडतच आली. मला लगेच आठवले की, मी या मुलीसह अनेकांची आत्ताच वर्गात सभ्य शब्दांत खरडपट्टी काढली होती, कारण त्यांनी त्यांची माझ्या विषयाची  प्रात्यक्षिके वेळेत पूर्ण केली नव्हती आणि सत्रांत परीक्षेत ही ती मुलगी अनुपस्थित होती. मी तिला अगोदर पूर्ण रडू दिले. ते संपल्यावर तिला विचारले, "तुला शिकायची इच्छा आहे का?" त्यावर तिने अगदी तळमळीने 'हो' सांगितले. तिचे बोलणे विश्वासार्ह वाटल्यानंतर मी तिला बसायला सांगितले आणि तिला तिची समस्या विचारली. तिने सांगायला सुरुवात केली. 'यावर्षीच्या उन्हाळ्यातच तिचे लग्न झाले होते. म्हणजे प्रथम वर्षाला ती आमच्या महाविद्यालयात नव्हती. तिच्या माहेरी होती आणि तिच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत ती प्रथम आली होती. घरची परिस्थिती  बेताचीच असल्याने आणि पालक अशिक्षित असल्याने हे स्थळ आले की तिची शिकायची इच्छा असतानाही तिचे लग्न जमवून टाकले. सगळा समाजच शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने तिची बाजू मांडणारे कोणीच नव्हते. तिच्या नवऱ्याला ती आवडली होती आणि त्याने तिची अपेक्षाही तिला विचारली होती. ही तिच्या दृष्टीने एकमेव जमेची बाजू होती. तिनेही उत्साहाने फक्त "लग्नानंतर मला पुढे शिकायचे आहे!" एवढीच मागणी केली होती आणि त्यानेही ती मान्य केली होती. त्याप्रमाणे  तो वागलाही होता. लग्न झाल्यानंतर इकडे प्रवेश घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या खटपटी-लटपटी त्यानेच केल्या होत्या. त्याचीही आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती तरीही घरच्यांच्या नकळत त्याने उधार-पाधार करून तिची सगळी प्रवेश फी भरली होती. तिच्या रोज कॉलेजला येण्यालाही त्याची हरकत नव्हती. पण त्यांनी परस्पर घेतलेला हा निर्णय त्यांच्या घरात विशेषतः तिच्या सासूबाईंना अजिबात मान्य नव्हता. सुनेने फक्त घर आणि घरातील माणसे सांभाळली पाहिजेत असे त्यांना वाटत होते आणि शिक्षणावर होणारा खर्चही त्यांना वायफळ वाटत होता. त्यामुळे अगोदर त्यांचा तिच्याशी आणि नंतर मुलाशीही वाद व्हायला लागला. मग त्यावर उपाय म्हणून ती पहाटे पाच वाजता उठून स्वयंपाक, धुणीभांडी आणि सगळे घरकाम उरकून कॉलेजला यायला लागली पण सासूबाईना तेही पसंत पडेना. सुनेने घर सोडले नाही पाहिजे! असा हेकाच त्यांनी धरला. त्यातून तिच्या माहेरच्या माणसांना पण सासूबाईंचे म्हणणे रास्त वाटले. लेकीचा संसार टिकवायचा असेल तर सासरची माणसे म्हणतील ते ऐकले पाहिजे यावर तिच्या परस्पर निर्णय झाला. तरीही तिचा नवरा तिच्या बाजूने होता आणि कॉलेजला न जाता तिने घरीच अभ्यास करून परिक्षा द्यावी असे त्यांनी गुपचूप ठरविले. त्याने तिला सगळी पुस्तके आणि कुठून तरी जुन्या नोट्सही आणून दिल्या. दिवसभराचीसगळी कामे आटोपली की, ती रात्रीची गुपचूप अभ्यास करायची. सकाळी सगळे उठायच्या आत सगळी पुस्तके पुन्हा पेटीत जायची. पण एक दिवस पुस्तके चुकून वर राहिली आणि सासूबाईंनी ती पहिली. त्यावर घरात परत रामायण सुरू झाले. त्याचा इतका त्रास तिला व्हायला लागला की, अभ्यासात लक्षच लागेनासे झाले आणि ती मागे पडत गेली. इतकी की थेट सत्रांत परीक्षेत नापासच झाली. स्वयंपाक चुकायला लागला. तिखट-मीठ कमी जास्त व्हायला लागले. त्यावरूनही सासू-सासऱ्यांचे बोलणे ऐकून घ्यावे लागले. त्याचा सगळा राग मग नवऱ्यावर निघायला लागला. नवरा या विषयावर पडती भूमिका घेतो. घरातल्या माणसांना बोलताना विशेषतः आई चुकत आहे हे माहीत असूनही कच खातो याविषयावरून दोघांचे वाद व्हायला लागले. एक दिवस हा वाद इतका वाढला की ती नवऱ्याचे मन मोडून माहेरी निघून गेली. परत सासर-माहेरच्या बैठका, चर्चांची गुऱ्हाळे आणि समजूत घालून सासरी परत रवानगी झाली. ती सासरी आली पण 'मला कॉलेजला पाठविणार असाल तरच मी येईन' या अटीवर. ती शेवटी नवऱ्याने आणि सासऱ्याने सासूच्या विरोधात जाऊन मान्य केली. पण हा सगळा तमाशा होईपर्यंत सत्रांत परीक्षा होऊन गेली होती. अभ्यास काही झाला नव्हता त्यामुळे व्हायचे तेच झाले. सगळ्या विषयात नापास झाली'.
              तिचे बोलून झाल्यावर मी तिला विचारले, "ठीक आहे, गेलेले विषय परत काढता येतील. शिवाय वार्षिक परीक्षेत सगळ्या विषयात ४०%पेक्षा जास्त गुण मिळाले तर पुन्हा सत्रांत परीक्षा द्यायची गरज पडणार नाही.  पण आता अभ्यास करावा असे वातावरण आहे का घरात?" "आजिबात नाही!" माझे वाक्य पूर्ण होताच ती म्हणाली. पण सासरे आणि नवरा यांनी मान्य केले असताना आता काय अडचण आहे", मी विचारले. "माझ्या सासूबाई कोणाचे काही ऐकून घेत नाहीत. सासऱ्यानाही त्या जुमानत नाहीत. सासरे आणि मुलगा दोघांनाही रोज सकाळी संध्याकाळी शिव्यांची लाखोली वाहत असतात", ती हतबल होत म्हणाली.  मग मी तिला धीर देत विचारले, "मी तुझ्या नवऱ्याशी बोललो तर तुला आणि त्याला चालेल का?" ती म्हणाली, "मला तर चालेलच, पण त्यांनाही काही वाटणार नाही. ते तुम्हांला ओळखतात!". "ठीक आहे, उद्या येताना घेऊन ये त्याला, काही तरी मार्ग काढू", मी म्हणालो आणि ती डोळे पुसत हसतमुखाने निघून गेली.
              रात्री बरेच वेळ आता प्रकरणाचे काय करायचे? यावर विचार करून मला एक उपाय सुचला होता. म्हटलं बघू चर्चेनंतर तो काम करतो का? नेहमीप्रमाणे सकाळी कॉलेजला गेल्यावर सगळे लेक्चर आटोपुन मी स्टाफरूमला आलो तर जोडी माझी वाट बघत बसली होती. "तुम्ही पुढे जाऊन कॅन्टीनमध्ये बसा, मी जरा फ्रेश होतो. मग आपण तिथे बोलू", मी पुस्तके आणि डस्टर कपाटात ठेवत म्हणालो. ते 'होय' म्हणाले आणि पुढे निघाले. मी ही लगेच कॅन्टीनला गेलो. एक कोपऱ्यातील टेबल आम्ही धरला आणि चहाची ऑर्डर दिली. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर मला आठवले की, ह्या महोदयांना आपण शिकवायला नव्हतो पण परीक्षेत पर्यवेक्षण करताना याची कॉपी पकडली होती आणि बाहेर हाकलले होते. मला हे आठवल्याचे त्याच्याही लक्षात आले आणि मी काही बोलायच्या आत त्याने बायकोला त्याचा पराक्रम एकदमात बायकोला सांगून टाकला. अरे मग पदवी पूर्ण केली की नाही असे विचारल्यावर तो म्हणाला, "नाही सर चार-पाच वेळा प्रयत्न केला पण एडिशनल इंग्लिश काही निघाला नाही. मग कॉलेज सोडून जॉब धरला. मग पगार वैगरे मिळतो का व्यवस्थित? तर म्हणाला, पहिलं भागत होतं सगळं पण आता जरा ओढाताण होते. अरे मग बायको शिकली तर कुठेतरी नोकरी मिळेल आणि संसाराला हातभारच लागेल ना तुझ्या, मी विषयाला हात घालत म्हणालो. हो सर मला ही तसेच वाटते म्हणून तर तिने शिकावे म्हणून मी धडपडतोय पण.......
पण काय? त्याचे वाक्य तोडत मी म्हणालो. 'सर घरात काही असे वातावरण नाही. आई अजिबातच ऍडजस्ट करायला तयार नाही. खूप समजावून सांगितले. शिकलेल्या आणि कर्तृत्ववान मुलींची उदाहरणे दिली. पण ती काही ऐकायला तयार नाही. तिचे माझ्यावर खूप प्रेमही आहे आणि माझेही तिच्यावर, पण आता माझीही चिडचिड होते. तिचा रागही यायला लागलाय अधूनमधून. सासरचे लोक म्हणतात वेगळे रहा', तो हतबल होत म्हणाला.  मग तुला काय वाटते काय करावे म्हणून? तेच तर कळत नाही. काय करावे आणि कसे करावे ते? तू जर वेगळा राहिला तर काय होईल? हे कसे शक्य आहे सर? एकतर मी घरात थोरला आहे. लहान भाऊ आहे तो ही शिकला नाही, काम धंदा करत नाही. कोणाकडे शब्द टाकून कामाला लावला तर टिकत ही नाही. लगेच भांडणं काढून काम सोडतो. वडिलांनी साठी गाठलीय तरी अजून कष्ट करावे लागतात. माझ्या तुटपुंज्या पगारात सगळं भागत नाही. आईलाही मग अधूनमधून मजुरीला जावे लागते. मुळात तिला शिकलेली सून नकोच होती. शिकलेली मुलगी घरात आली तर कामधंदा करणार नाही, आपल्या ऐकण्यात राहणार नाही आणि त्यातली त्यात ती घर फोडेल असे तिचे म्हणणे होते. पण ते न ऐकता व तिला जुमानता शिकलेली मुलगी बायको म्हणून घरात आली तर पुढची पिढी तरी चांगली शिकेल म्हणून शिकलेली आणि शिक्षणची आवड असलेली मुलगी केली. आई अशी का वागते याचा तू विचार केलाय का कधी? हो सर, एक तर ती पूर्ण अडाणी आहे. अजिबातच शाळेत गेलेली नाही. तिच्या माहेरी आजही फार कोणी शिकलेले नाही. चौथी पाचवीच्या पुढे कोणी जातच नाही. अश्या परिस्थितीत तिला शिक्षणाचे महत्व माहीत नाही. तिला या टप्प्यावर ते कळणारही नाही.  शिवाय ती खटल्याच्या घरात राहिलेली थोरली सून आहे. सासू म्हणजे माझी आजी अत्यंत खाष्ट होती. तिने कुठल्याच सुनेला कधी प्रेमाने आणि आदराने वागविले नाही. फार जाच होता तिचा. त्यामुळे चुलता चुलती फटकून निघाले. सगळा पै पाहुण्यांचा भार आमच्यावर पडला. अगदी दोन वर्षांपूर्वी आजी वारली. तोपर्यत आईने सगळं सहन केलं. वडिलांनी कधीच तिची बाजू न घेतल्याने बहुदा सुनेशी असेच वागायचे असते अशी तिची मानसिकता असावी असे वाटते. तिला झालेला त्रास बघून आम्ही तिचे प्रत्येक बोलणे प्रमाण म्हणायचो. त्याचाही तिला आता त्रास होत असणार . आत्ता कुठे सगळा कारभार हातात आल्या होता तर मुलगा सुनेमुळे आपल्या ऐकण्यात राहणार नाही अशी भीतीही त्यामागे आहे असे वाटते.
               हे बघ तू शिकला नसला तरी पुरेसा समजदार वाटतोस. तुझ्या आईच्या वाट्याला जे वाईट दिवस आले त्यातून तिच्या वागण्यात हा बदल झालेला आहे आणि या वयात त्याच्यात काही बदल होईल अशी अपेक्षा करणे मुळातच चूक आहे. आज तुझ्या मनात तिच्याबद्दल चीड आणि रागाची भावना निर्माण होऊ लागली आहे. हे असेच सुरू राहीले तर भविष्यात प्रेमाची जागा द्वेष घेऊ शकतो आणि सासू सुनेच्या नात्याबरोबरच माय लेकराचे नातेही कायमचे तुटू शकते.
              तुमचे म्हणणे पटतेय मला पण यातून काय मार्गच दिसत नाही दुसरा.
             त्यासाठीच तर बोलावलंय तुला. हे बघ तुझी बायकोला शिकवायची मनापासूनची इच्छा आहे हे गृहीत धरून मी बोलतो. पर्याय काठीण आहे. स्वीकारायला जड जाईल. लोकांच्या टीकेचा सामानही करावा लागेल पण हे सगळे स्वीकारून पुढे जायला लागेल.
             मला समजले नाही तुम्हांला काय म्हणायचे आहे ते/
सांगतो ना!(त्याच्या बायकोला लेडीज कॉमन रूममध्ये जायला सांगून मी त्याला एकट्याला पर्याय सांगायला सुरुवात केली) तू सरळ वेगळा रहा आणि गावातही राहू नकोस. सरळ बारामतीला जा. पुढच्या वर्षी तेथील महाविध्यालात ऍडमिशन घे बायकोचे. कॉलेजवळच एखादी साधी खोली किंवा घर भाड्याने घे. गरज पडली तर अँडमिशनसाठी व्यवस्था आणि मदत करता येईल. त्यामुळे बायकोला घरकाम उरकून कॉलेज करता येईल आणि अभ्यासाला वेळी देता येईल. तुझे येण्याजण्याचे पैसे वाचतील त्यातून घरभाडे देता येईल. गरज पडल्यास जास्तवेळ काम करता येईल त्यातून अधिकचे अर्थार्जनही करता येईल.
           पण सर आई वडिलांचे काय?
मी तुला त्यांना सोडून दे असे म्हणत नाही. घरात लागणारे पैसे तर द्यावे लागतीलच, पण गरजेला धावूनही यावे लागेल.आई रागवेल, भांडण करील, शिव्या देईल पण हळूहळू तीही ते स्वीकारेल. विशेष म्हणजे भाऊही घरच्या जबाबदाऱ्या घ्यायला शिकेल.
        पण सर समाज नावे ठेवेल?
समाजाच्या विचार अश्या ठिकाणी करायचा नसतो. उद्या या भांडणाला कंटाळून बायको कायमची घर सोडून गेली तरी समाज नावेच ठेवणार आहे, कौतुक करणार नाही. पण तू येऊन जाऊन राहिलास तर सगळे हळूहळू  ते मान्य करतील. कधी कधी लांब राहिले की नात्यांचे महत्व लक्षात येऊन ते अधिक घट्ट होते.  शिवाय आणखी एक, जीवन जगताना नेहमी नवनिर्मितीला प्राधान्य द्यायचे असते. आई वडिलांचे जगून झाले आहे, त्यात फार काही बदल व्हायची शक्यता नाही. पण नवीन पिढीला म्हणजे तुझ्या मुलांना आत्मसन्मान मिळवून द्यायचा असेल तर हे करावेच लागेल.
          तो काहीच बोलला नाही. बघतो, विचार करतो एवढंच म्हणाला. बायकोला फोनकरून बोलावले आणि येतो म्हणून निघून गेला तो थेट दोन वर्षांनी बारामतीमध्ये भेटला भररस्त्यात. मला बघून स्वतःहून भेटायला आला. सोबत बायकोही होती. दोघांच्या राहणीमानात बराच फरक जाणवत होता. रस्त्यात चर्चेचे गुऱ्हाळ घालायला नको म्हणून आम्ही शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन बसलो. नाश्त्याची ऑर्डर देऊन आम्ही गप्पा मारायला बसलो. त्याने सांगायला सुरुवात केली. सर, दोन वर्षांत भेटायलो आलो नाही त्याबद्दल माफी मागतो. पण पर्याय यशस्वी झाला तर भेटू असे ठरविले होते.
      मी पण काही रागवलेलो नाही. कालांतराने मीही कामाच्या गडबडीत हे विसरूनच गेलो होतो. पण मधल्या काळात ही कॉलेजला येताना दिसली नाही मला वाटले आपला उपाय फसला की काय?
          नाही सर, उलट तो चांगलाच यशस्वी झालाय.  तुमच्याशी चर्चा करून गेल्यानंतर आम्ही आठ दिवस विचार केला. मग आई, वडील, भाऊ आणि लग्न झालेली बहीण  यांना आमचा विचार सांगितला. सगळे तयार झाले पण आईने खूप विरोध आणि त्रागा केला. पण निर्णय पक्का होता. महिन्याभरातच आम्ही बारामतीला रहायला गेलो. हिने घरी राहून अभ्यास केला जरा स्थिरस्थावर झाल्यावर  तिने एक रिटेल स्टोअर मध्ये पार्ट टाइम जॉब सुरू केला. त्याच्याही हातभार लागला. अधूनमधून दोघेही गावी जायला लागलो. गरजेला थोडेफार पैसेही देऊ लागलो. हळूहळू आईचा राग कमी झाला. द्वितीय वर्षाला पास झाल्यावर तिला बारामतीतील महाविध्यालात प्रवेश घेतला. तृतीय वर्षाला असताना तिने टायपिंग आणि टॅलीचा कोर्स केला. आता त्याच रिटेल स्टोअरमध्ये ती कॅशिअर कम अकाउंटंट म्हणून काम करते. चांगला पगार मिळतो. आईला आता सुनेचे कौतुक वाटते. सगळ्यांना सांगते माझी सून नोकरीवली आहे म्हणून. अधूनमधून बारामतीला येते. सून कामावरून आली की तिला घरकामात मदतही करते. त्यामूळे आता सगळं झंझट कमी झाले आहे. फक्त तुम्हांला भेटून हे सांगायचे होते पण त्याअगोदरच तुम्ही भेटलात.
       ठीक आहे. मला सांगितले नाही म्हणून माझी काही तक्रार नाही. पण उपाय कामी आला याचे मात्र समाधान आहे. असे म्हणून मी वेटरला बिल विचारले तर म्हणाला, आज बिल मी देणार आहे. तुम्ही दिले तरी तो घेणार नाही. आणि खरोखरच आग्रह करूनही वेटरने माझ्याकडून बिल घेतले नाही. त्याने बिल दिले आणि आम्ही बाहेर आलो. घरी चला म्हणाला पण परत नक्की येईन असे सांगून मी आनंदाने माझ्या गाडीला किक मारली आणि घराकडे परतलो.
प्रा. के. राहुल
९०९६२४२४५२
बारामती.

Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review

  The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review.                                                                                                                         ©Dr.K.Rahul, 9096242452 Abstract: This working paper presents a detailed biographical and critical examination of Hiralal Gandhi (1888–1948), the eldest son of Mahatma Gandhi. Unlike his illustrious father, Hiralal led a tumultuous life, often marked by rebellion, estrangement, and personal struggles. This study delves into his life events chronologically and thematically, exploring his education, family relationships, perspective on India’s indepen...