Skip to main content

मा.‘शाहीर अमर शेख

 मा.‘शाहीर अमर शेख ’ मूळ नाव - मेहबूब हुसेन पटेल
(२० ऑक्टोबर १९१६ - २९ ऑगस्ट १९६९)
ख्यातनाम मराठी लोकशाहीर.
यांना त्यांच्या जन्मदिनानिम्मित विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा ..!

मा.शाहीर अमर शेख यांचा जीवन परिचय
आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह (१९४७) झाला.स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते,लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. मा. प्र. के. अत्रे, मा. मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनता जनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला.
लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे (२००७).

मा.अमर शेख (१९१६-१९६९) हे महाराष्ट्रातील एक नामवंत शाहीर होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

मा.शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. त्यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती. सामान्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली प्रतिभा वेचली.
मराठी कवी आणि लेखिका मल्लिका अमर शेख ह्या अमर शेख यांच्या कन्या होत.

मा.शाहीर अमर शेख यांची काही ध्वनिमुद्रित गीते
काय सामना करू तुझ्याशी
डोंगरी शेत माझं गं
बर्फ पेटला हिमालयाला
रागारागाने गेलाय्‌ निघून
सुटला वादळी वारा

मा.लोकशाहीर अमर शेख यांच्याविषयी लिहिलेली पुस्तके
अण्णा भाऊ साठे आणि अमर शेख -
एक आकलन (लेखक - डॉ. बाबुराव अंभोरे)
जनतेचा महान कलावंत कॉ. शाहीर अमर शेख (लेखक - तानाजी ठोंबरे)
मा.लोकशाहीर अमर शेख यांचे पोवाडे (लेखक - अजीज नदाफ)

मा. शाहीर अमर शेख पुरस्कार
*बार्शीच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून दर वर्षी 'शाहीर अमर शेख' यांच्या नावाचा पुरस्काार दिला जातो. आजवार हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती/पुस्तके :-आर्त अनावर (वैचारिक व लालित्यपूर्ण पुस्तक; लेखक - आशुतोष अडोणी)
*पुण्याच्या फुले, शाहु, आंबेडकर विचार मंचातर्फे दिला जाणारा
शाहीर अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-अ‍ॅड. आयुब शेख
*इंदापूर येथील भीमा-नीरा विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-सांगलीचे शाहीर यशवंत पवार
*पुणे महानगरपालिकेचा अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-मा.गफूर शेख

काँम्रेड अमर शेख हे कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ,लाल बावटा कलापथकाचे शाहीर काँम्रेड अण्णा भाऊ साठे व काँम्रेड दत्ता गव्हाणकरां सोबतचे प्रमूख शाहीर होते.लाल बावटा पथकाचा पहिला जाहीर कार्यक्रम त्यांनी १९४४ साली टिटवाळा येथे भरलेल्या महाराष्ट्र किसान सभेच्या स्थापना अधिवेशनात केला.किसान सभेच्या त्या ऐतिहासिक अधिवेशनासाठी काँ.अमर शेखांनी , किसान सभा शेतकऱ्याची माऊली... हे बोल असलेले,किसान सभेचे गौरव गीत खास लिहिले व आपल्या पहाडी आवाजात गायले होते.ते उत्कृष्ट कलावंतही होते,त्यांनी आचार्य अत्रे निर्मित महात्मा फुले, प्रपंच आदी.मराठी चित्रपटात गाजलेल्या भुमिका केल्या होत्या, ज्यासाठी त्यांना उत्कृष्ट कलावंत म्हणून पारितोषिकेही मिळालीत.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये राजकीय नेत्यांसोबतच शाहिर काँ.अमर शेख,काँ.अण्णा भाऊ साठे व काँ.दत्ता. न.गव्हाणकर व लाल बावटा कला पथकातील शाहीरांचे खूप मोलाचे योगदान राहिले आहे. पण खेदाने म्हणावेसे वाटते की त्यांच्या चळवळीतीत कार्याची योग्य दखल संयुक्त महाराष्ट्र नवनिर्मिती नंतर सत्तेवर आलेल्या सरकारने व मराठी माणसाच्या नावे गळे काढणार्या पक्षाने वा नेत्यांनीही घेतली नाही आणि पुरोगामी चळवळही त्यांच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कर्तृत्वाची ठळकपणे नोंद करण्यात कमी पडली.काँम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा वापर केवळ एका विशिष्ट जातीचे प्रतिक म्हणून राज्यकर्त्यांनी वापरले आणि त्यांच्या गाण्यातील,साहित्यातील क्रांतिकारक विचार मात्र मारून टाकला. काँ.अमर शेख व काँ.दत्ता गव्हाणकरांच्या वाट्याला मात्र कायम उपेक्षाच आली.या महाराष्ट्रत पु.ल.देशपांडे नावाने, कुसुमाग्रजांच्या नावे शासन अकादम्या,प्रतिष्ठान, उभ्या राहतात, त्यांच्या नावे भाषा दिन साजरे होतात व आठवडाभर सांस्कृतिक महोत्सव भरविले जातात,तथाकथित शास्त्रीय संगीताच्या मैफली भरविल्या जातात. पण ज्यांच्या गाण्यातून,पोवाडे, लावण्या,लोकनाट्यातून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, त्या वरील खर्या शोषित-कष्टकर्यांच्या लोक कलावंतांचे मात्र संपूर्ण महाराष्ट्रात एकही भव्य स्मारक नाही ही खरी शोकांतिका आहे.काँ.अमर शेख,काँ.दत्ता गव्हाणकर,काँ.अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी, स्मृती शताब्दी  वर्षे येतात व जातात.त्याची राज्यकर्त्यांना वा कुणाला ना दखल ना खंत..वरील तीनही प्रमुख शाहीर सत्तरीच्या दशकाच्या प्रारंभीच अकाली निधन पावले..आणि नंतर जे जय जय ,महाराष्ट्र माझा.. हे गाणं म्हणत जे शाहीर आले त्यानाच सत्ताधार्यांनी मोठे शाहीर म्हणून गौरविले.वरील तीन लोकशाहीरांच्या वाट्याला जी उपेक्षा आली त्याचे प्रमुख कारण म्हणजे ते कम्युनिस्ट होते व चळवळीशी त्यांनी कधी गद्दारी केली नाही वा कधी राज्यकर्त्यांच्या आमिषांना बळी पडले.ते जरी कम्युनिस्ट पक्षा पासुन दूर गेले असले तरी त्यांनी कम्युनिस्ट विचारांची व चळवळीशी जुळलेली नाळ अखेरपर्यंत तोडली नाही. 

----_-------------------

*शाहीर अमर शेख*
संयुक्त महाराष्ट्रासाठीची दिल्लीतली जाहीर सभा संपल्यानंतर आचार्य अत्रे अमर शेख यांना म्हणाले होते की, ‘शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर ‘शाब्बास शाहिर’ अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं....’
अमरशेख धर्माने मुस्लीम पण त्यांनी ना कधी जात बघितली, ना कधी धर्म बघितला. आयुष्याची सुरुवात पाणक्या म्हणून, गाडीचा क्लिनर म्हणून, नंतर गिरणी कामगार म्हणून, नंतर गिरणी कामगारांचा पुढारी म्हणून आणि पहाडी आवाजाच्या देणगीमुळे ते महाराष्ट्रात प्रसिद्ध तर झालेच पण लोकप्रियही झाले. शेख आडनावाच्या शाहिराची ही रसरशीत चित्तरकथा .... 

‘महाराष्ट्र शाहिर’ म्हणून विख्यात असलेले अमर शेख विस्मृतीत जाणं हा कृतघ्नपणा ठरेल. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत सामान्य मराठी जनतेचा त्याग हा तसा सगळयात मोठा आहे. आचार्य अत्रे, डांगे, एस. एम. जोशी, उद्धवराव, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील अशा थोर नेत्यांच्या घणाघातामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचली हे खरे असले तरी हे वातावरण तयार करण्यात शाहिर अमर शेख यांचे फार मोठे योगदान आहे. अमरशेख यांच्या बरोबरीने त्यांचे सहकारीआत्माराम पाटलांसह सर्वच शाहिरांनी यात मोलाचे काम केलेलं.  

सद्यकाळात कुणास खरी वाटणार नाही अशी अमरशेखांची दास्तान आहे. 
त्या काळी ग्रामीण भागात वीज नव्हती. साहजिकच माईक नव्हते. तरीदेखील लाख-लाख लोकांच्या सभा फळीवर कुठे तरी खडूने जाहिरात करून जमत होत्या. 
या प्रचंड सभांचा प्रारंभ अमर शेख यांच्या शाहिरीने व्हायचा. 
जे कुणी सभेचे दिग्गज वक्ते असत ते रात्री कधीतरी उशिरा पोहोचत. कारण त्या काळात दहा वाजेपर्यंतच सभा आटोपली पाहिजे, असा नियम नव्हता.

एकेका रात्री चार-चार सभा असत आणि सर्व सभा मागे-पुढे होत. 
अमर शेख यांनी आपल्या पहाडी आवाजाने सभा सुरू करून द्यायची आणि अत्रे, डांगे, एस. एम, उद्धवराव, क्रांतिसिंह हे पांडव सभेला पोहोचले की अमर शेख यांनी पुढच्या सभेला जायचे. 
सभांची संख्या आणि रोजचे रुटीन पाहू जाता दूसरा एखादा शाहिर रक्त ओकला असता. 
 
या सभांना फारसा जामानिमा नसे. 
व्यासपीठावर तीन-चार कंदील असत. गावात पेट्रोमॅक्स असली तरी ती काँग्रेसवाल्याकडे असे. त्यामुळे ती मिळायची नाही आणि मग कंदिलावर सभा संपन्न व्हायची. 
सभेच्या शेवटच्या माणसाला व्यासपीठावरील माणसं दिसायचीच नाहीत. 
पण अमर शेख यांचा पहाडी आवाज शेवटपर्यंत पोहोचायचा.. 
आसमंतात  सर्वत्र निरव शांतता असायची आणि डफावर थाप पडली की अमर शेख यांच्या मुखातून ते धगधगते शब्द निखारा होऊन बाहेर पडायचे..
‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती 
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती
गोव्याच्या फिरंग्याला चारूनी खडे
माय मराठी बोली चालली पुढे 
एक भाषकांची होय संगती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती..’

अमर शेखपाठोपाठ आत्माराम पाटील हातात डफ घ्यायचे आणि त्यांच्या शाहिरीने एक जोश निर्माण व्हायचा..
‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा
खुशाल कोंबडं झाकून धरा..’

महाराष्ट्र अक्षरश: पेटून उठलेला होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी जे काय हवं ते करायची तयारी मराठी माणसानं दाखवलेली होती आणि मग या शाहिरांच्या तोंडून ते शब्द लोक अक्षरश: झेलत होते..

बेल्लारी बेळगांव । 
पंढरी पारगाव। 
बोरी उंबरगाव । 
राहुरी जळगाव। 
सिन्नरी ठाणगांव। 
परभणी नांदगाव। 
व-हाडी वडगांव। 
शिरीचा बस्तार। 
भंडारा चांदा। 
सातारा सांगली। 
कारवार डांग। 
अन् मुंबई माऊली।
जागृत झालाय दख्खनपुरा.. खुशाल कोंबडं झाकून धरा..

सारी सभा या शाहिरांच्या आवाक्यात यायची. मुख्य व्यक्त्यांना सभेला यायला दोन दोन-तीन तीन तास उशीर व्हायचा.. आणि एवढा वेळ सभेला मंत्रमुग्ध करून ठेवणे हे सोपे काम नव्हते. 
हे बुलंद आवाजाचे काम होते आणि हे शाहिर रक्ताचं पाणी करून दोन दोन-तीन तीन तास आपल्या ताब्यात सभा ठेवत होते. 
त्यांचा डफ, त्यांचे तुणतुणे, त्यांची ढोलकी नि त्यांच्या पोवाड्यांची उत्तुंग गायकी! याने सारी सभा मोहरून जात होती. 

संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण तयार करण्यात या लोकशाहिरांचे योगदान फार फार मोठे आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश कोणी आणला त्यावर पुढे वाद झाला. 
पण तो मराठी जनतेने आणला. आचार्य अत्रे यांच्या वाणीने आणि ‘मराठा’तील लेखणीने आणला. याचबरोबर महाराष्ट्रातील या दमदार शाहिरांनी छत्रपतींच्या काळातील शाहिरीचे अस्त्र अमोघ शस्त्रासारखंं या चळवळीत वापरलं.

संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीची जनमानसाची उत्कट इच्छानिर्मिती करण्याची  जबाबदारी या शाहिरांनी पार पाडली, असा इतिहास महाराष्ट्राला लिहावाच लागला. 
असे असूनही या शाहिरांना काहीही मिळालेले नाही. 
कोणतेही मानधन त्यांनी घेतलेले नाही. प्रवास खर्च कोणी दिला असेल तर ठीक पण एसटीची लाल गाडी आणि साध्या युनियनची उपलब्ध असतील ती वाहने यातून प्रवास करून सारा महाराष्ट्र पिंजून काढणारे हे शाहीर आणि त्यांचे नायक शाहीर अमर शेख यांना विसरणे अपराध ठरेल.  

संयुक्त महाराष्ट्रातील लढयाचे दोन-तीन मोठे टप्पे होते. 
पैकी प्रतापगडचा मोर्चा हा एक टप्पा होता. 
मुंबई महापालिकेच्या निवडणुका समितीने जिंकणे हा मोठा टप्पा होता.
त्याचप्रमाणे दिल्लीवर धडकलेला समितीचा विराट मोर्चा हाही फार मोठा टप्पा मानला जातो. 

दिल्लीच्या या मोर्चात अग्रभागी एक ट्रक होता. 
त्या ट्रकवर उभं राहून शाहीर अमर शेख यांची डफावर थाप पडली ती सकाळी दहा वाजता.
मोर्चा दुपारी चार वाजेपर्यंत चालला. 
दहा ते चार असे सहा तास शाहिर अमर शेख गात होते.

दिल्लीच्या रस्त्यावरील सरदारजीसह बाकी अन्यभाषिक मंडळी तोंडात बोटं घालून या शाहिराकडे पाहत होते. 
गगनभेदी स्वर होते ते!
अमर शेख यांचा आवाज दिल्ली भेदून जात होता. एका पाठोपाठ एक पोवाडे, गीते ते गात होते -  
‘जाग मराठा.. आम जमाना बदलेगा..’
त्या रणरणत्या उन्हांत इतक्या वेळासाठी त्वेषाने गाताना अन्य कुठला शाहीर श्रमाने धराशायी झाला असता. 

अमर शेख यांच्यासोबत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे असायचे. त्यांचा उल्लेख न करणं अत्यंत कृतघ्नपणा होईल.    
अण्णा भाऊंनी गीतं लिहायची आणि अमर शेख यांनी ती गायची असा जणू दस्तूरच होऊन गेला होता.  

‘माझ्या जिवाची होतीया काहिली ही अण्णाभाऊंनी लिहिलेली छक्कड लावणी अमर शेख यांनी गावागावात पोहोचवली.

"या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची
मढयावर पडावी मूठभर माती, तशी गत झाली आमची
ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणारांची, मरणारांची, शेंडीची, दाढीची
हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची
बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी, हिरव्या माडीची
पैदास इथं भलतीच चोरांची, ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची,
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, पर्वा केली नाही उन्हाची थंडीची, पावसाची,
पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची
त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एकभाषिक राज्याची
चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बिनीवरची
कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची
उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष
गोळी डमडमची छातीवर साहिली,
माझ्या जिवाची होतीया काहिली..
 
त्याचवेळी कवी नारायण सुर्वे यांची एक कविता अमर शेख यांच्या गायकीच्या माध्यमातून लोकांच्या मनात रूजली, ती कविता होती - 
"डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरिस राबून मी मरावं किती?

कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?.. "

दिल्लीचा मोर्चा संपल्यानंतर जाहीर सभा झाली. तेव्हा आचार्य अत्रे अमर शेख यांना म्हणाले, ‘शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर ‘शाब्बास शाहीर’ अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं.

अमर शेख हे नुसतेच शाहिर नव्हते तर ते गीतकारही होते. ‘अमर गीत’, धरती माता, कलश, हे त्यांचे काव्यसंग्रह त्यांच्यातील साम्यवादी कवीची साक्ष पटवायला पुरेसे आहेत. ‘कलश’ या काव्यसंग्रहाला आचार्य अत्रे यांनी साठ पानांची प्रस्तावना लिहिली आणि ‘कलश’चे महत्त्व त्यामुळे मराठी मनात घराघरात पोहोचले.

याच ‘कलश’मध्ये अमर शेख यांनी कोकीळच्या संगीतावर एक कविता लिहिली आहे. जगाला या कोकीळ आवाजाची मोहिनी अनेक वर्षे आहे. पण साम्यवादी कवीला या संगीतापेक्षाही गरीब माणसाच्या पोटातील भूक अस्वस्थ करीत आहे आणि म्हणून अमर शेख लिहून जातात..
कोकीळं गाऊ नको तव गीत
जाळीत सुटले मानवी हृदया..
जे भेसूर संगीत 
भूक येई?पायात माझी बघ
होई जीवाची तगमग तगमग
काय मला तारील तुझे संगीत
कोकीळं गाऊ नको तव गीत.....

शेख अमर / अमर शेख हे त्यांचे टोपण नाव होते. त्यांची कारकिर्द २० ऑक्टोबर १९१६ ते २९ ऑगस्ट १९६९ इतकी राहिली. 
मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेफळ या गावी अमर शेख यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षी ते आईसोबत बार्शी येथे आजोळी गेले आणि तिथून पुढे त्यांची कारकीर्द बार्शीत बहरली
गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. 
गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. 

गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. 
तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. 
पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. 
येथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे ‘अमर शेख’ असे नामकरण केले. 
राष्ट्रीय चळवळीत ते 1930 - 32 च्या सुमारास सामील झाले. 
पुढे 1947 साली ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. 
आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. 
स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. 

गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. 
चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. 
उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. 
त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. 
जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. 
त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. 
प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. 
त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. 
कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. 
रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. 

त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. 
ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. 
त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. 
प्र.के. अत्रे, मं.वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. 
अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्हस्की ’ म्हणत. 
त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर! कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.

'कलश' आणि 'धरतीमाता' हे त्यांचे काव्यसंग्रह, 'अमरगीत' हा गीतसंग्रह आणि 'पहिला बळी' हे त्यांनी लिहिलेले नाटक. 
त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. 
'युगदीप' व 'वख्त की आवाज' ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. 
'प्रपंच' आणि 'महात्मा ज्योतिबा फुले' ह्या चित्रपटांतून तसेच 'झगडा' या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. 
'महात्मा फुले’ हा चित्रपट तर आचार्य अत्रे यांचीच निर्मिती होय. अत्रे तेव्हा म्हणाले होते, अमर शेख म्हणजे धग, रग, आग यांची बेरीज होय.... 
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला.

त्यांच्या मरणोपरांत लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्धिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले हीच काय ती अल्पशा समाधानाची बाब होय! 

या महान शाहिराची आज जयंती आहे. 
सद्यकाळात मुसलमान असणं हे घाऊकदृष्ट्या तिरस्काराची आणि हेटाळणीची बाब होऊन बसली आहे, शिवाय मुसलमान म्हणजे देशद्रोहीच असला पाहिजे अशी विखारी समीकरणे जाणीवपूर्वक लोकांच्या मनात दृढ केली जाताहेत त्यामुळेच एके काळी अमर शेख नावाच्या मुस्लिम शाहिराने रक्ताचे पाणी करून विद्रोहाचा आवाज बुलंद केला होता हे हेतुतः मांडावे लागते. 

शाहीर अमर शेख यांना त्रिवार अभिवादन.....

- समीर गायकवाड.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...