कथा : ओढ
"सिस्टर काही झालं तरी प्रियाची डिलव्हरी व्यवस्थीत व्हायला हवी; कारण तिला बरीच बॉडी कॉम्पलेक्शन्स आहेत. होणारे बाळ आईच्या मायेला किंवा आई बाळाला पारखी होऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्नांची शर्थ करायला लागेल. गेली दहा वर्षे ती माझ्याकडे ट्रिटमेंट घेत आलीय. एक दिवस काही तिला मनासारखे जगता आले नाही. सततची ती इंजेक्शन्स् , गोळ्या आणि औषधे!", डॉ. सुलभा काळजीच्या स्वरात नर्सला सांगत होत्या.
खरे तर रोहितचा कधीच ‘मुल’ असलेच पाहिजे असा आग्रह किंवा अट्टाहास नव्हता. शिवाय सासरे देव माणुस! सासूला देवाज्ञा होऊन किमान २५ वर्षे झाली होती त्यामूळे तिला तसा सासूरवास काहीच नाही. पण मध्यमवर्गीय आणि तिशीच्या आसपास असलेल्या स्त्रीची मानसिकता तशी फारच विचीञ असते. आपल्याला मुल होत नाही याची तिला सतत खंत वाटायची. शिवाय आज जरी रोहितचे आपल्यावर कितीही प्रेम असले तरी आणि आज जरी तो ‘मुल’ नसले तरी चालेल असे म्हणत असला तरी भविष्यात त्याचे मन पालटले आणि त्याने काही उलटसुलट निर्णय घेतला तर काय? अशी अनामिक भिती तिला सतत वाटायची. त्यातच मुलासाठी आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाचा किंवा टेस्टट्यूब बेबीचा प्रयोग करायला रोहित अजिबात राजी नव्हता. पण मूल हवेच! यावर निर्णयावर ठाम असलेली प्रिया दवाखान्याचा कितीही ञास झाला तरी तो सहन करायला तयार होती. शेवटी सतत दहा वर्षे न चुकता ट्रिटमेंट घेतल्यावर तिला पॉंजेटिव्ह रिझल्ट मिळाला होता. पण अतिऔषधे, सततची इंजेक्शन्स् आणि सततच्या सोनोग्राफीमूळे नाही म्हटले तरी शरीरावर परिणाम झाला होताच. त्यातच तिला आता थोडा बी.पी.चाही ञास अधूनमधून जाणवू लागला होता. तिची ही अवस्था लक्षात घेता त्याचा तिच्यावर किंवा होणाऱ्या बाळावर काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून तिला सक्तीची विश्रांती देण्यात आली होती. सक्तीच्या विश्रांतीमुळे शरीराची अजिबात हालचाल नाही, त्यात बी.पी.चा त्रास! त्यामूळे तिचे नक्की सिझेरियन होणार, हे त्या जाणून होत्या आणि म्हणुनच तिची व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार होती. आता तिचे दिवसही भरत आले होते. डॉ. सुलभा या विचारात असतानाच त्यांच्या टेबलवरील फोन खणखणला. त्यांनी रिसिव्हर उचलून कानाला लावला तर फोन रोहितचाच होता. "प्रियाच्या पोटात दुखतंय तिला घेऊन लगेच येतोय हॉस्पिटलला", रोहित त्याची कार सुरू करत म्हणाला. "हळूच ये, गाडी जोरात चालवू नको, रस्ता खराब आहे. मी सगळी तयारी करून ठेवते", असे म्हणून डॉ. सुलभा यांनी फोन ठेवला.
रोहितला तर आपण ये म्हणून सांगितले आहे पण आज पनवेलला आपल्याला अर्जंट कॉल आहे आणि तेही पेशंट तितकंच महत्वाचं आहे हे त्या जाणून होत्या. इकडे पोटच्या मुलीसारखी प्रिया आणि तिकडे आपली देवदूतासारखी वाट पाहणारे सामान्य लोक! दोन्हीकडे आपली जबाबदारी सारखीच आहे. आपण पनवेलचा कॉल अडेंट केला नाही तर आणि त्या पेशंटचे काही बरे वाईट झाले तर ती आपल्या कर्तव्याशी प्रतारणा ठरेल त्यामुळे तिकडे गेलेच पाहिजे असा विचार करत डॉ. सुलभा यांनी घड्याळाकडे पाहिले. दुपारचे दोन वाजता आले होते. अर्ध्या तासात पनवेलला जायला निघायला हवे होते. रस्त्यातील ट्राफिक लक्षात घेता पाच वाजताचा कॉल अडेंट करायचा तर आत्ताच निघणे आवश्यक आहे. पण एकदा प्रियाची परिस्थिती पाहू आणि मग निघू अश्या विचारात त्या असतानाच रोहितची कार हॉस्पिटलमध्ये शिरताना त्यांनी पाहिली आणि त्या बाहेर आल्या. वॉर्डबॉयंनी तिला अलगद स्ट्रेचरवर टाकले आणि तात्काळ तपासणीसाठी आत घेतले. डॉ. सुलभानी तिला तपासले. लगेच डिलिव्हरी होणार नाही याची खात्री केली. नर्स आणि ट्रेनी डॉक्टरांना योग्य त्या सूचना देऊन प्रियाला स्पेशल वॉर्डला शिफ्ट करायला सांगितले. रोहितला त्यांनी धीर दिला. डिलिव्हरीसाठी अजून दोन दिवस लागतील. पण आता तिला हॉस्पिटलमध्येच ठेवू. काळजीचे काही कारण नाही मी रात्री नऊ वाजण्याच्या आत परत येते असे रोहितला सांगून त्या आपल्या कारने पनवेलकडे रवाना झाल्या.
डॉ. सुलभा पुण्यातील एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि संवेदनशील महिला डॉक्टर म्हणुन प्रसिद्ध होत्या. मनमिळाऊ, प्रेमळ आणि पैश्यापेक्षा माणुसकीला जास्त महत्त्व देणाऱ्या म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. त्यामूळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटशी जिव्हाळ्याचे संबंध जोडून त्यांना आपलेसे करणाऱ्या डॉ. सुलभा सगळ्या पेशंट्सला हव्याहव्याश्या वाटत. लहानपणापासून स्वतः अनाथ आश्रमात वाढल्यामुळे त्यांना गरिबांची आणि विशेषतः पोरकेपणाची दुःखे चांगलीच ठाऊक होती. अभ्यासात हुशार असल्याने आपण डॉक्टर होऊन गरिबांची सेवा करायची, हे त्यांनी खूप लहानपणी ठरवले होते. आपल्या या सेवाव्रतात खंड पडू नये म्हणून त्यांनी विवाहही केला नव्हता. त्यातच प्रियाही त्याच अनाथाश्रमात वाढली असल्याने प्रियाशी त्यांचे विशेष ऋणानुबंध जुळले होते. शिवाय प्रिया कुणीही तिच्या सहज प्रेमात पडावे अशीच होती.
आपले आई वडील कोण? हे न सांगता येणाऱ्या वयात प्रिया अनाथाश्रमात दाखल झाली होती. अनाथाश्रमातील वातावरण तसे चांगले पण फुलण्याच्या वयात आवश्यक असणारा मायेचा ओलावा तिथे थोडाच मिळणार तिला. त्यामुळे या अनाथ मुलाची आई होऊन त्यांना जपणाऱ्या डॉ. सुलभा यांच्या कुशीत प्रिया अलगद विसावली. अभ्यासातही चांगली हुशार निघाली. भरपूर शिकली आणि आपल्या मानलेल्या आईप्रमाणे असलेल्या डॉ.सुलभाप्रमाणे तीही डॉक्टर झाली आणि स्त्रीरोग तज्ञ म्हणून डॉ. सुलभाच्या हाताखाली अगोदर इंटर्न डॉक्टर म्हणून आणि नंतर सहकारी डॉक्टर काम करू लागली. होती.
याच हॉस्पिटलमध्ये
तिची अन् रोहितची ओळख झाली. रोहितपण होतकरू, हुशार, कर्तॄत्ववान अन् तितकाच प्रगल्भ. पहिल्या भेटीतच तो प्रियाच्या प्रेमात पडला. रोहितने थेट सुलभा मॅडमला मध्यस्थी घातले. अनाथ मुलगी म्हणून विचारात पडलेल्या त्याच्या बाबांनीपण नंतर मुलाच्या सुखाकरिता फार खळखळ केली नाही. पण प्रियाला अपेक्षा होती की आपल्याला आर्इ नाही तर नाही, किमान आर्इचे प्रेम देणारी सासू तरी मिळावी. पण इथेही तिचे दुदैव आडवे आले. रोहितचा जन्म होत असतानाच त्याच्या आर्इलाही बाळंतपणातील अतिरक्तस्त्रावामूळे आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर सावत्र आई रोहितला प्रेम देऊ शकणार नाही हा विचार करून त्याच्या वडिलांनी दुसरा विवाह करायचे टाळले आणि आश्रमातील समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. त्यामूळे लहानपणापासून त्याचेही आश्रमात येणे जाणे चालूच होते. त्यातूनच मातॄप्रेमाला पारखा झालेला रोहितही अलगद त्यांच्या पंखाखाली आलेला.
प्रिया आणि रोहितच्या प्रेमळ आईची आणि सासूची दुहेरी जबाबदारी नाही म्हटले तरी त्याच पार पाडत होत्या. प्रियाच्या शेजारी बसल्या बसल्या आपल्या आयुष्याचा सगळा जीवनपट आठवून हरविलेला रोहित प्रियाच्या अचानक ओरडण्याचा आवाज ऐकून त्या तंद्रीतून बाहेर आला. प्रियाला जोरदार प्रसव कळा चालू झाल्या होत्या. रात्रीचे आठ वाजून गेले होते. डॉ.सुलभा अजून आलेल्या नव्हत्या. तसा त्यांना उशीरच होणार होता. प्रियाच्या वेदना पाहून रोहितने इंटर्न डॉक्टर आणि हेडनर्सला बोलावून घेतले. त्यांनी प्रियाला तपासले आणि धावत केबिनमध्ये जाऊन डॉ. सुलभा यांना फोन लावला. "डॉक्टर प्रियाला खूप वेदना होताहेत शिवाय तिचा बी.पी. लो झालाय, बाळाच्या नाडीचे ठोकेही मंदावलेले आहेत. आपल्याला पेशंट लगेच ऑपरेशनला घ्यावे लागेल नाहीतर बाळाच्या आणि आईच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो", इंटर्न डॉ. सुलभा यांना सांगत होत्या. डॉ. सुलभा पनवेलवरून पुण्याकडे यायला निघाल्या होत्या पण त्यांना बराच वेळ लागणार होता. प्रियाला खूप त्रास होतोय काहीही करून पेशंट ओटीत घ्यावे लागेल, असे फोनवरून सांगितल्यावर त्यांनी, "ऑपरेशनची तयारी करा, पेशंट ओटीला शिफ्ट करा. मी लवकरच पोहचते," असे सांगून कॉल कट केला आणि वेगाने कार घेऊन पुण्याकडे निघाल्या.
काही केले तरी एक तासात पोहचायला हवे असे म्हणत त्यांनी आपल्या गाडीचा स्पीड कमालीचा वाढवला आणि त्या वेगाने पुण्याच्या दिशेने निघाल्या. इकडे त्यांच्या स्टाफने त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशनची सर्व तयारी केली. प्रियाला ओटीला शिफ्ट करून सगळे डॉक्टरांच्या येण्याची वाट पाहु लागले. रोहित चिंतातूर होऊन बाहेर येरझाऱ्या घालत होता. प्रिया वेदनेने कळवळत होती. इंटर्न डॉक्टर तिला "पुश" करायला सांगत होते. त्यामुळे तिच्या त्रासात आणखीच भर पडत होती. या सगळ्या वेदना असह्य होऊन शेवटी प्रिया बेशुद्ध झाली होती. तिचा बी.पी. ही सारखा कमी जास्त होत होता. पर्यायी डॉक्टर उपलब्ध नसल्याने जोखीम वाढली होती. इंटर्न आणि हेडनर्सही घाबरल्या होत्या. प्रिया बेशुद्ध झाल्याने तिला श्वास घ्यायला ञास होऊ नये म्हणुन ऑक्सिजन लावले होते.
प्रियाचे काही बरे वाईट झाले तर आपले होणारे अपत्यही आपल्यासारखेच मातॄप्रेमाला किंवा बाळाला काही झाल्यास आपणही अपत्य प्रेमाला पारखे होते की काय? अशी भिती रोहितला राहुन राहुन वाटत होती. एक तास होत आला तरी डॉक्टर अजून आल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या मनात वाईट विचारांचे काहूर माजले होते. तेवढ्यात त्याला हॉस्पिटलच्या गेटमधून डॉक्टर आत येताना दिसल्या. रोहितच्या आणि सगळ्या स्टाफच्या जिवात जीव आला. पण डॉक्टरांच्या कपडयावर रक्ताचे डाग होते डोक्याला मोठी जखम होती. सगळ्यांनी घाबरून काय झाले? काय झाले? म्हणून त्यांच्या बाजूला एकच गर्दी केली. "माझ्या गाडीला खंडाळयाजवळ छोटा अपघात झालाय, पण मी ठीक आहे. मला काहीही झालेले नाही. अगोदर प्रियाचे ऑपरेशन होऊ दे मग माझे बघु," असे म्हणुन त्या तडक ओटीमध्ये गेल्या आणि दरवाजा बंद झाला. रोहित बाहेर बसून ऑपरेशन संपण्याची वाट पाहू लागला. बराच वेळ झाले तरी ऑपरेशन चालले होते.
एक जागेवर बसवेना म्हणून रोहित इकडे तिकडे येरझाऱ्या घालत होता. अचानक बाहेर मोठा सायरन वाजवत एक रुग्णवाहिका येऊन थांबली. आतमध्ये बसलेल्या दोन वॉर्डबॉयंनी स्ट्रेचरवर एका महिला पेशंटला झोपविले आणि आत घेऊन येऊ लागले. अंगावर बरेच रक्त सांडलेले आणि डोक्यालाही खूप मार लागलेला दिसत होता. बहुतेक अपघात झाला असावा. पण हे तर स्त्रीरोग रुग्णालय आहे. मग हे पेशंट इकडे का आणले असावे? असे कुतूहल मनात आल्याने त्या ताणतणावातही ते कोण आहे हे पाहण्यासाठी तो जवळ गेला. रोहितने स्ट्रेचरवरचे पेशंट पाहिले अन् त्याला धक्काच बसला. तो ओरडतच मागे सरकला. आजूबाजूचे लोक आणि इतर पेशंटचे नातेवाईकही तिथे गोळा झाले. रोहित त्या गर्दीतून वाट काढत ओटीकडे पळाला आणि ओ.टी.च्या दरवाज्यावर जोरजोरात थाप मारू लागला. डॉक्टरांनी सिस्टरांना दार उघडायला सांगितले. सिस्टरांनी दार उघडले अन् रोहितने कपाळावरील घाम पुसत त्यांना विचारले, "डॉक्टर कुठे आहेत?" सिस्टर म्हणाल्या ̧ "आत आहेत!, अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालेय. तुम्ही निश्चिंत रहा. बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत. तुम्हांला एक गोड मुलगी झालीय."
ऑपरेशन कोणी केले? रोहितने विचारले.
अर्थातच डॉ. सुलभा यांनी!, सिस्टर म्हणाल्या.
कसं शक्य आहे हे?, स्ट्रेचरवरचे पेशंट सिस्टरांना दाखवत रोहित म्हणाला.
स्ट्रेचरवर अपघातात मुत्यूमुखी पडलेल्या डॉ. सुलभांचे शव बघून धक्का बसलेल्या सिस्टर धावतच ओटीमध्ये गेल्या आणि त्यांनी जोरात किंकाळी फोडली. त्यांचा आवाज ऐकून रोहित धावतच आत पळत गेला. आतमध्ये कोणीच नव्हते हे पाहून सिस्टर ओरडून बेशुद्ध पडल्या होत्या. प्रिया शुद्धीवर येत होती अन् त्याचे छोटे गोंडस बाळ रोहितकडे बघुन गोड हसत होते. इकडे टि.व्ही. वर माञ बातमी झळकत होती; पुण्याच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुलभा यांचे पुणे- मुंबर्इद्रुतगती महामार्गावर अपघाती निधन!
---–----------------------------------------
समाप्त
-------------------------------------------------
Comments
Post a Comment