Skip to main content

माकडीचा माळ: भटक्या विमुक्तांच्या दुःखानुभवाचे भेदक चित्रण

भटक्या विमुक्तांचे दुःखानुभव चित्रित करणारी कादंबरी: माकडीचा माळ!
प्रा. डॉ. राहुल सदाशिव खरात,
वाणिज्य विभाग, मु.सा.काकडे, महाविद्यालय,
सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे.
मो. ९०९६२४२४५२, ई मेल: srass229@gmail.com

प्रस्तावना:
       मराठी साहित्य विश्वातील एक मोठे पण दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे साम्यवादी विचारसारणीचे कामगार नेते, लोकशाहीर, कथा, कादंबरी आणि नाटककार अण्णा भाऊ साठे होत. १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे वालबाई आणि भाऊराव साठे या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या तुकाराम उर्फ आण्णा यांना उणेपूरे ४९ वर्षाचे आयुष्य लाभले. समाजव्यवस्थेने जगणे नाकारलेल्या आणि अस्पृश्य म्हणून गावकुसाबाहेर राहणाऱ्या अठरापगड जातींतील मातंग जातीत अण्णांचा जन्म झाला. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि रोजच्या जगण्याचा संघर्ष असलेल्या या जातीत जन्माला आल्याने घरातील  कोणत्याही सदस्याला शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता. मुळात शिक्षण घ्यायला व्यवस्थेनेच मनाई केल्याने अण्णांचे शिक्षण अजिबातच झाले नाही. असे असले तरी प्रत्येक माणसाच्या अंगी निसर्गाने उपजतच काही गुण बहाल केलेले असतात. तसेच गुण अण्णांच्या अंगी होते. त्यामूळेच एकदाही शाळेचे तोंड न पाहूनही अण्णांमधील चांगला माणूस, साहित्यिक, क्रांतिकारक, देशभक्त आणि साम्यवादी विचारसरणीचा कामगार नेता पश्चिम महाराष्ट्राच्या भूमीत तयार झाला आणि जगभर प्रसिद्धही पावला. पण 'जात' पाहून माणसे पावन करून घेणाऱ्या या व्यवस्थेने अण्णांसारख्या अनेकांचे हे श्रेष्ठत्व आज योगदान जाणीवपूर्वक नाकारले आहे. अनेकांनी याविरुद्ध आवाजही उठवला पण अण्णांनी या विषमतेचा कधी बाऊ केला नाही की त्याअडून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला नाही. हे अण्णांचे मोठेपण!
          असे असले तरी जात व्यवस्थेची दुःखे माणसाला प्रसंगानुरूप सतत  टोचत असतात आणि त्याला कुठे तरी वाट मोकळी करून द्यावी लागते. अण्णांनी ही दुःखे कधीही जाहीरपणे मांडली नाहीत की आपल्या लेखनातून जात व्यवस्थेवर कधीही थेट हल्ला केला नाही. पण अप्रत्यक्षपणे त्यांनी जातव्यवस्थेचे भीषण वास्तव मांडल्याचे दिसून येते. अण्णांचे साहित्य वाचल्यानंतर या विषमतेचे आणि जातव्यवस्थेचे हे भयाण चित्र आपल्या डोळ्यासमोर सहज उभे राहते. 
           साहित्यिक म्हणून अण्णांनी विपुल लेखन केले असून पोवाडे, कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक आणि प्रवासवर्णन यासारख्या साहित्य प्रकारात अण्णांनी भरीव लेखन केले. अण्णांचे १२ कथासंग्रह, १५ कादंबऱ्या, ९ लोकनाट्ये, ३ नाटके, १ प्रवास वर्णन इतकी साहित्य संपदा प्रसिद्ध असून ७ कादंबऱ्यावर मराठी भाषेत चित्रपटही आले आहेत.  
         अण्णांचे संपूर्ण बालपण वाटेगावात गेलेले असल्याने कथा आणि कादंबऱ्यातील कथानके, त्यातील नायक, नायिका आणि खलपात्रे ही आपल्याला सांगली आणि कोल्हापूर परिसरातील विशेषतः वारणा नदीच्या खोऱ्यातील असल्याचे दिसते. वारणेच्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य शब्दबद्ध करताना खोऱ्यातील रांगडी माणसे, त्यांच्यातील हिंमत, कावेबाजपणा, दगलबाज प्रवृत्ती आणि विविध गावातील आणि परिसरातील संस्कृती याचबरोबर व्यवस्थेने खालच्या पायरीवरचे म्हणून हिनवलेल्या समाजातील रूपवान, गुणवान स्त्रिया आणि त्यांच्यावरील वर्चस्वावरून झालेले दलित-सवर्ण संघर्ष हे अण्णांच्या कथा आणि कादंबऱ्यांचे मुख्य विषय. आपल्या शैलीतून, अभ्यासातून आणि निरीक्षण शक्तीतून अण्णांनी अत्यंत समर्थपणे आणि अचूक टिपले आहेत. म्हणूनच लेखकाने या लेखात अण्णांच्या "माकडीचा माळ" या कादंबरीतील  या संघर्षांचा अभ्यास केला आहे.

उद्देश:
१. "माकडीचा माळ" या कादंबरीतील जाती व्यवस्थेचा               अभ्यास करणे.
२. "माकडीचा  माळ" या कादंबरीतील  भटक्या विमुक्त              जातीतील अंतर्गत संघर्षांचा अभ्यास करणे.
३. "माकडीचा माळ" या कादंबरीतील लिंगभेदाचा अभ्यास         करणे.

माहिती संकलन आणि विश्लेषण:
         लेखकाने प्रस्तुत लेखामध्ये अण्णांच्या 'माकडीचा माळ' या कादंबरीतील जात वास्तव आणि भटक्या विमुक्त जातींवर होणारा अन्याय आणि त्यांच्यातील अंतर्गत संघर्षावर प्रकाश टाकला असून त्यासाठी प्राथमिक माहिती स्त्रोत म्हणून 'माकडीचा माळ'  या कादंबरीचा तर दुय्यम माहिती स्रोत म्हणून याच कादंबरीवर आधारित 'डोंगरची मैना' या चित्रपटाबरोबरच इतर लेखकांनी लिहिलेले लेख आणि समीक्षा साहित्यही विचारात घेतले आहे.
         "माकडीचा माळ" या कादंबरीत अण्णांनी भटक्या जातीतील 'माकडवाले' समाजाची व्यथा मांडली असून अठराविश्व दारिद्रय पाचवीला पुजलेला हा समाज आजही पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करत असतो. ज्या भागात आपल्याला दोनवेळचे पोटभर अन्न मिळेल त्या भागात हा समाज त्या त्या काळासाठी तळ ठोकतो. त्यांच्याप्रमाणेच दरवेशी, डवरी, डोंबारी, सापगारुडी, गोसावी, फासेपारधी, नंदिवाले यासारखे अनेक भटक्या जातीतील लोक पोटापाण्यासाठी भटकंती करत असतात.  वारणेच्या खोऱ्यात आणि सांगली, कोल्हापूर परिसरात जिथे सुगीचे दिवस येतील तिथे एखाद्या गावाच्या बाहेर या लोकांचा दरवर्षी तळ पडतो. त्यामुळे सगळ्यांचे एकमेकांना भेटणे होत असते आणि त्यातूनच त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंधाबरोबरच वादाचेही प्रसंग घडत असतात. त्यातून वाद विकोपाला गेल्यावर सशस्त्र संघर्ष घडून ते एखाद्याच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यातच हा समाज पिढ्यानपिढ्या अशिक्षित असल्याने जीवन जगण्यात शिस्त हा प्रकार नसतो तसेच कमावलेले काहीच नसल्याने गमविण्यासारखेही काहीच नसते त्यामुळे जीवाचे आणि जीविताचेही मोल शून्यच असते. व्यसनाधीनता जास्त असल्यामुळे त्यातून येणारा हिंस्त्रपणाही असतो. त्याचा ते ज्या गावाच्याजवळ तळ टाकतील त्या गावाला आणि गावातील लोकांनाही त्रास होत असतो. अशीच परिस्थिती या कादंबरीतील काळगाव गावाची झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गावातील लोक या भटक्या लोकांना भुताची उपमा देतात तर ज्या माळावर ते राहतात त्यालाही भुताचा माळ असे म्हणतात. या जमातींचे राहणीमान, वर्तणूक, त्यांच्यातील धारदार  संघर्ष आणि संघर्षांची कारणे लक्षात घेतल्यावर "भुताचा माळ" ही उपमा रास्त  वाटते.
        कादंबरीत उल्लेख झालेल्या सर्व जाती भटक्या म्हणजे व्यवस्थेनुसार सगळे एकाच स्तरावर आहेत परंतु तरीही त्यांच्यात एक सुप्त संघर्ष आणि श्रेष्ठत्वाची भावना आहे कारण सगळ्यांचे संसार उघड्यावर असले तरी प्रत्येकजण आपल्या जमातीतच राहतो आहे. म्हणजे सगळे माकडवाले एकाच ठिकाणी, सगळे डवरी एक ठिकाणी असे जातींचे वेगवेगळे गट त्या माळावर दिसून येतात. ज्या ज्या गावात  ते वास्तव्याला जातील त्या गावात हेच चित्र दिसते तर या सगळ्यांचा तारणहार म्हणजे ज्या गावाच्या हद्दीत जातील त्या गावचा पाटील! सगळ्या भटक्या जमातीतील लोकांनी त्याला आपला मालक म्हणून वाकून मुजरा करायचा आणि आपली बाजू चूक असो, बरोबर असो की आपल्यावर अन्याय होवो; त्याच्याशी आणि गावातील प्रत्येकाशी अदबीने वागायचे आणि नमून रहायचे.
         कथानकाची सुरुवात यंकू या मनमिळाऊ आणि कुटुंबवत्सल माकडवाल्यापासून होते. तो, त्याची बायको काशी आणि मुलगी दुर्गा असे त्रिकोणी कुटूंब असून एका गाढवाच्या पाठीवर सहज मावेल इतकाच त्यांचा संसार आहे. मुलगी दुर्गा ११ वर्षांची असतानाच काशीचा अकाली मृत्यू झाला आहे त्यामुळे यंकू दुःखी असून दुर्गा आईच्या मायेला पोरकी झाली आहे. यंकू अंगापिंडाने धिप्पाड असून धाडसी आणि ताकदवान आहे. त्याच्या तोडीचे संपूर्ण माळावर कोणीच नाही. पण म्हणून आपल्या ताकदीचा दुरुपयोग करून इतरांवर अन्याय करण्याची त्याची प्रवृत्ती नाही. त्यामुळे सगळ्या जमातीचे लोक त्याचे मित्र आहेत. नेमकी हीच बाब पर्बती डवऱ्याला खटकत असते. त्यामुळे तो यंकुचा दुस्वास करत असतो. त्यातच हिकम्या गरुड्याचा साप आणि पाऱ्याचं पिसाळलेलं कुत्रं यंकुकडून मारलं जातं आणि पाऱ्या आणि यंकू यांच्यातील संघर्ष पेटतो. सर्व गारुडयांबरोबरच सर्व डवरी समाज पाऱ्याच्या बरोबर असूनही एकटा यंकू सगळ्यांना पुरून उरतो तेव्हा पाऱ्या काळगावातील गल्या आणि बल्या या फरारी गुंडांना हाताशी धरून यंकूचा खून करून दुर्गाचे अपहरण करण्याचा कट करतो. दुर्गाचे अपहरण करून तिला एखाद्या कोठ्यावर विकून तिच्या पायात चाळ बांधले म्हणजे आपला सूड पूर्ण होईल असा पाऱ्याचा कुटील डाव असून त्यासाठी तो गल्या आणि बल्या या काळगावातील फरार गुंडांना हाताशी धरतो. त्यांना खुष करण्यासाठी आपल्या दोन मुली त्यांच्या उपभोगासाठी देतो.  पण यंकुचे चांगुलपण आणि त्याला नाथा पाटील यांनी दिलेली साथ यामुळे गल्या आणि बल्या पकडले जातात आणि आपल्याला पकडण्यासाठी पाऱ्यानेच नाथा पाटलाला मदत केली या गैरसमजुतीतुन बल्याकडूनच पाऱ्याला आपला एक पाय गमवावा लागतो. त्यामुळे पाऱ्या अधिकच चिडतो आणि त्याच्या मुलीच्या दुर्गाच्या जीवावर उठतो. त्यामुळे यंकूला दुर्गाच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट होईल याची सतत भीती वाटत असते.
              वयाने लहान असलेली दुर्गा जेव्हा वयात येते तेव्हा मात्र यंकूच्या काळजीत आणखीच भर पडते कारण जेव्हा दुर्गा लहान होती तेव्हा फक्त तिच्या अपहरणाची त्याला भीती होती पण आता वयात आलेली दुर्गा दिसायला देखणी आहे आणि  तिला आरसपानी सौंदर्याची नैसर्गिक देणगी लाभलेली आहे. फाटक्या कपड्यातही ती अत्यंत सुंदर दिसते आणि सहज कोणाचेही लक्ष तिच्याकडे जाते. पाहणाऱ्या प्रत्येक पुरुषाला ती हवीहवीशी वाटू लागते. प्रत्येक गावातील प्रस्थापित मंडळी तिला आपल्या अंगाखाली घेण्यासाठी धडपडू लागतात.  त्यामुळे तिच्या अब्रूलाही धोका निर्माण होतो. त्यातून तिची आणि स्वतःचीही सुटका करावयाची असेल तर लवकरात लवकर तिचे लग्न करून द्यावे असे यंकुला सतत वाटत राहते कारण काशी मरताना यंकूने तिला तसे वचन दिलेले असते.
           यंकूची ही भीती तेव्हा रास्त ठरते जेव्हा राधानगरीच्या माळावर पाऱ्याची आणि त्याची पुन्हा भेट होते. यंकूमुळे पाय आणि स्वाभिमान गमवावा लागलेल्या पाऱ्याला दुर्गा अजून सहीसलामत आहे आणि यांच्यामुळे आपल्या एका मुलीचे नाक कापले गेले तर दुर्गा इतकी सूंदर दिसते हे सहन होत नाही. काहीही करून यंकूला धडा शिकविण्यासाठी तो राधानगरीचा पाटील विलास इनामदार याला खोटेनाटे सांगून यंकूबाबत त्याचे मत कलुषित करतो. दुर्गा अजून बाटलेली नसून तिला तुमच्या हवाली करतो असा सौदा तो इनामदाराशी करतो. त्यामुळे दुर्गाच्या जीवाला आणखी धोका निर्माण होतो. विलास इनामदाराची दुर्गावर वाईट नजर असतेच पण त्याचबरोबर राधानगरीचा पोलीस पाटील रंगराव पाटील (काळगावचे पाटील नाथा पाटील यांचा जावई) याचाही दुर्गावर डोळा आहे. पाऱ्या त्याच्याशीही संधान बांधून काहीही करून यंकुवर सूड उगवू पाहतो. त्यामुळे इनामदारबरोबरच रंगरावकडूनही दुर्गाला धोका निर्माण होतो.
          काहीही करून हा धोका टाळण्यासाठी यंकू सखाराम माकडवाल्याचा पोरगा यमुशी दुर्गाचे लग्न ठरवून टाकतो. यमु यंकू सारखाच धाडसी आणि उमदा तरुण आहे.  यमु आणि दुर्गा लहानपणापासूनच एकत्र वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांची मने लगेच जुळतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. दुर्गाचे लग्न जमले आहे ही बातमी ऐकून इनामदार आणि रंगराव बिथरतात. त्यांना काहीही करून दुर्गा हवी असते पण यंकू सतत दुर्गाबरोबर असल्याने आणि रोज माकडांचा खेळ करण्यासाठी यंकू व दुर्गा,  गंग्या आणि रंगी या माकडांबरोबर गावातच येत असल्याने दुर्गा त्याला एकटी सापडत नसते. म्हणून इनामदार आपल्या कामवाल्या बाईला दुसरीकडे पाठवून घरातल्या आंधळ्या म्हातारीच्या देखभालीचे निमित्त पुढे करून दुर्गाला चार पाच दिवस वाड्यावर पाठवायला सांगतो. त्या अगोदर तो यंकुशी गोड बोलून यंकूला फुकट तांदूळ देऊन, आवश्यक ती मदत करून आणि शिवारात शिकार करायची परवानगी देऊन त्याचा विश्वासही संपादन करतो. इनामदाराच्या या मदतीमुळे यंकू त्याचा मिंधा होतो. त्यामूळे इनामदाराकडून दुर्गाला धोका आहे हे माहीत असूनही यंकुचा नाईलाज होतो आणि दुर्गाला इनामदाराच्या वाड्यावर जावे लागते. दुर्गा वाड्यावर जायला लागल्यावर इनामदार तिला काहीच करत नाही पण त्याची भेदक नजर तिला सतत अस्वस्थ करत राहते. दुर्गा वाड्यावर गेली की त्याचा जीव टांगणीला लागतो. तो सतत इनामदाराच्या वाड्याच्या आजूबाजूला घुटमळत राहतो. अधूनमधून गंग्या माकडालाही वाड्यावर पाठवून दुर्गा सुखरुप आहे याची खात्री करत राहतो. पण पाऱ्या मात्र इनामदाराने दुर्गाला बाटविली असल्याचा माळावर आणि गावात बोभाटा करतो. त्यामुळे दुर्गाची आणि यंकूची गावभर बदनामी होते. यमुचा बाप सख्या माकडवाला दुर्गाच्या चारित्र्यावर संशय घेऊ पाहतो. ती बाटली नसेल तर तिने उकळत्या तेलात हात घालून परीक्षा द्यावी असे जायपंचायतीसमोर म्हणणे मांडतो. नाईलाजाने दुर्गा त्याला तयार होते. पण यमु मात्र खंबीरपणे दुर्गाच्या पाठीमागे उभा राहतो. त्यातून एक चांगली गोष्ट घडते ते म्हणजे इनामदाराच्या वाड्यावर जाण्यापासून दुर्गाची सुटका होते आणि तिच्या लग्नाची तयारी सुरू होते.
       एकदा दुर्गाचे लग्न झाले तर दुर्गा आपल्या हाती लागणार नाही. शिवाय आपल्याला कोणीही न बाटवलेली दुर्गा हवी आहे आणि दुर्गा यंकुसारख्याच धाडसी आणि धाकड यमुची बायको झाली तर पुन्हा ती आपल्याला कधीच मिळणार नाही. त्यामुळेच  लग्न लागण्याअगोदरच आदल्यादिवशी रात्री रातोरात गल्या आणि बल्याला हाताशी धरून  तिला पळवून रंगरावच्या वाड्यावर आणले जाते.  पण नाथा पाटील नेमके आपल्या मुलीला भेटायला येतात आणि आपल्या मुलीकडून त्यांना रंगरावची कृष्णकृत्ये समजतात तेव्हा ते स्वतः दुर्गाची सुटका करून तिला यमुच्या हवाली करतात. आपल्या सासऱ्यामूळे दुर्गा पुन्हा आपल्या तावडीतून निसटली हे कळताच रंगराव आपल्या माणसांना त्यांच्या मागावर पाठवितो. दुर्गा हाती लागेपर्यंत कोणीही माळ सोडून जाऊ नये असे फर्मान इनामदाराकडून काढले जाते. पण यमु आणि दुर्गा त्यांच्यावर मात करून वारणा नदी रातोरात पार करून राधनागरीतुन बाहेर पडतात. पण यासाठी निर्णायक ठरलेल्या अंतिम संघर्षात यंकुला आपल्या जीव गमवावा लागतो. यंकू आपल्यात नाही या दुःखाने गंग्यासारखा मुका प्राणी माकड असूनही दगडावर उडी घेऊन जीव देतो तर त्याच्या विरहाने त्याची जोडीदारीन रंगी माकडीनही आपले प्राण सोडते. त्यामुळे राधनागरीचा हा माळ माकडीचा माळ म्हणून ओळखला जातो. ज्या दुर्गासाठी यंकूने इतक्या खस्ता खाल्ल्या त्या दुर्गाचा संसार पाहायला मात्र यंकू जिवंत नाही, ही हुरहूर मनाला लावत कादंबरीचा शेवट होतो.

अनुमान:
१. भटक्या विमुक्त जाती या शिक्षण आणि इतर संधीपासून दूर असल्याने त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक विकास झालेला नाही. त्यामूळे त्यांना  विकासाच्या संधीच उपलब्ध नाहीत.
२. जगण्यात भटकंती असली तरी प्रत्येक जात आपल्या अस्मिता जपून असल्याने आणि वर्चस्ववादाची भावना कायम असल्याने त्यांच्यात अंतर्गत संघर्ष घडून येतात. 
३. सामाजिक स्तर आणि राहणीमान खालच्या दर्जाचे असल्याने गावगाड्यातील स्थान शून्य आहे. त्यामुळे स्वतःवर झालेल्या अन्यायबाबत न्याय मिळविण्यासाठी सवर्ण समाजावर अवलंबून रहावे लागते. स्वतःची चूक असो किंवा नसो त्यांनी दिलेला निर्णय हा मुकाट्याने मान्य करावा लागतो.
४. पुरुषांमध्ये कोणत्याही कारणाने संघर्ष झाला तर बळी मात्र स्त्रीचाच जातो. बहुतांश वेळा या संघर्षात स्त्रीचा वापर कळसूत्री बाहुलीसारखा केला जातो.
५. सामाजिक, सांस्कृतिक दर्जा सुधारला नसेल तर स्वतःच्या मनासारखे घडवून आणण्यासाठी पुरुष आपल्याच घरातील स्त्रियांचा सौदा करू शकतात. मग त्यात नवरा, बाप, भाऊ किंवा आणखी कोणीही असू शकतो. यंकुचा बदला घेण्यासाठी पाऱ्या डवरी आपल्या दोन मुली गल्या आणि बल्या या गुंडांना खुष करण्यासाठी त्यांच्या हवाली करतो यातून हेच दिसुन येतो.
६. गावगाड्याबाबत निर्णय घ्यायचा अधिकार असलेल्या किंवा सत्तासुत्रे हातात असलेल्या रंगराव पाटील किंवा इनामदारांसारख्या माणसाकडे विवेक आणि नीतिमत्ता नसेल तर तो असहाय्य आणि आधार नसलेल्या लोकांवर अत्याचार करू शकतो किंवा त्यांच्या महिला-मुलींवर अन्याय अत्याचार करू शकतो.
७. गावच्या पाटलांची सत्ता ही त्याने मागासवर्गीय समाजातील पोसलेल्या गुंडांवरच अवलंबून असते. दुर्गाच्या इज्जतशी खेळू पाहणारा आणि यंकूच्या जीवावर उठलेल्या रंगरावाचा उजवा आणि डावा हात असलेले रावा ढेकणे आणि बंडू तडाखे हे गावातील मागास जातींचे प्रतिनिधित्व करतात. थोडक्यात मागास समाजातील लोकांकडून मागास समाजातील लोकांवर सवर्ण समाजाकडून नियंत्रण ठेवले जाते आणि शारीरिक-मानसिक अत्याचार केले जातात.
८. मागास समाजातील स्त्रिया आणि मुली सूंदर आणि देखण्या असतील तर गावातील सवर्ण समाजातील लोकांडून त्यांना धोका निर्माण होतो. 
९.  भटक्या जातीतील लोक गावाचे नियम पाळत नाहीत म्हणून त्यांना गावातून हाकलून लावण्याची मागणी गावातील प्रतिष्टीत नागरिक करतात. पण त्याचा सामाजिक दर्जा सुधारून त्यांचे जीवन स्थिर करण्याचा प्रयत्न कोणत्याच गावातील लोकांकडून किंवा गावपुढाऱ्यांकडून होत नाही. 
१०. गावचा पाटील किंवा गाव पुढारी जर बाहेरख्याली असेल तर त्याच्या घरातील स्त्रीचेही त्याच्याकडून शारीरिक, मानसिक शोषण होते.

संदर्भ:
१.  "माकडीचा माळ", आण्णा भाऊ साठे समग्र वाङ्मय,        दुसरी आवृत्ती.
२.  अनंत माने, (१९६९), डोंगरची मैना, विलास चित्र.
३. https://www.firstpost.com/long-reads/     dalit-shahirs-of-maharashtra-anna-bhau-sathes-powerful-songs-4485147.html
४. https://www.forwardpress.in/2019/08/
annabhau-sathe-revolutionary-poet-novelist-playwright-and-social-reformer/%3famp
५.
-------------------------------- समाप्त-------------------------

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...