कोरोना एक प्रलय की संधी नवनिर्माणाची..............
निसर्गाने माणसाला नेहमीच भरभरून दिले आहे. बुद्धीची नैसर्गिक देणगी लाभल्याने माणसाने नेहमीच आपल्या गरजेपेक्षा जास्त घेतले आहे. हे करत असताना त्याने कळत नकळतपणे निसर्गाला आव्हान द्यायचाही प्रयत्न केला आहे. त्यात माणसाला बऱ्यापैकी यशही आले पण पर्यावरणाचा मात्र ऱ्हास होत गेला. बदलते ऋतुमान, साथींचे आजार, वादळे, पूर, दुष्काळ यासारख्या संकटांतून निसर्गाने वेळोवेळी माणसाला याची जाणीवही करून दिली आहे, पण स्वार्थ डोळ्यासमोर असला की दुसरे काही दिसत नाही आणि त्यातूनच विषमताही जन्माला येते. निसर्ग स्वतः विषमतेचा पाईक असला तरी एका प्रमाणाच्या बाहेर काही घडू लागले की तो माणसाला त्याची जागा दाखवून देतो. हे वारंवार माणसाने अनुभवले आहे. पण त्यातून फार काही बोध घेतलेला नाही.
पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबरच माणसाने जाणीवपूर्वक माणसामाणसात धर्म, जात, पंथ, लिंग, वर्ण आणि गरीब-श्रीमंत अश्या भिंती उभ्या केल्या आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणजे दिवसेंदिवस ढासळत गेलेले सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि भौगोलिक पर्यावरण होय. निसर्गाने याबाबत वारंवार इशारे देऊनही बुद्धीच्या जोरावर आपण निसर्गाला हरवू शकतो या भ्रमात असलेल्या माणसाने निसर्गाला सतत आव्हान दिले आहे. तरीही माणसाला सुधारण्याची निसर्गाने दिलेली शेवटची संधी म्हणून कोरोनाच्या साथीकडे आपल्याला सकारात्मकतेने पाहता येईल.
माणूस निसर्गतःच समाजशील प्राणी आहे. तो विचार करू शकतो आणि त्याप्रमाणे आचरणही करू शकतो. प्रसंगी सगळे मतभेद आणि स्वार्थ बाजूला सारून तो माणसाच्या हितासाठी आपले प्राणही पणाला लावू शकतो हेही जर आपण इतिहासात डोकावलो तर आपल्याला दिसून येते. आताही माणूस पुन्हा त्याच वाटेने चालला असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगाला विळखा घातला असताना आणि दिवसेंदिवस मृत पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जागतिक सहकार्याची गरज व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या हालचालीही सुरू झाल्या असून भविष्यात वाढणारे साथीच्या आजारांचे धोके लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. एकमेकांवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्वतःला विकसित म्हणून मिरविणाऱ्या अनेक देशांनी आरोग्य आणि शिक्षणासारख्या पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यातून आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकास आणि उपलब्धतेवर येत्या काळात भर दिला जाईल अशी आशा वाटते आहे. त्यासाठी जगातील अनेक देशात समतावादी विचारांची सरकारे आणि व्यवस्था अस्तित्वात येईल अशी आशा निर्मम झाली आहे.
कोरोनाचा प्रभाव सीमित करण्यासाठी केलेल्या 'लॉकडाउन'मध्ये अनेक लोकांचे रोजगार हिरावले गेले. भारतासारख्या विकसनशील देशात हे प्रमाण खूप मोठे आहे. असंघटित क्षेत्रातील अनेक लोक या काळात बेरोजगार असून त्यांची उपासमार होत आहे. याकाळात अपवाद वगळता जात, धर्म, पंथ आणि लिंग असे भेद बाजूला ठेऊन अनेक मदतीचे हात समोर आल्याचे दिसते. येत्या काळात जागतिक पातळीवर भांडवलशाहीने मांडलेला उच्छाद आणि चंगळवादाला लावलेला हातभार यातून माणूस बाहेर येईल आणि जगभरातील अनेक देशात सामाजिक हित आणि सामाजिक न्यायला प्राधान्य देणारे नेतृत्व उदयाला येईल असे वाटते. कारण अशीच माणसे मरत राहिली तर विकास कोणासाठी?आणि कशासाठी करायचा? हाही प्रश्न उरतोच.
अजून किमान दोन महिने तरी जगभरातील 'लॉक डाउन' कायम राहणार असून या काळात जगभरातील उद्योग धंदे ठप्प आहेत आणि राहतील. त्याचा थेट परिणाम अनेक देशांच्या आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यातून सावरण्यासाठी किमान दोन ते कमाल पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. या काळात भांडवलशाही व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडण्याची फार शक्यता आहे. त्यामूळे जगाला विकासासाठी नवीन पर्याय शोधून काढवाच लागेल आणि तो पर्यावरणपूरक आणि समतोल विकास साधणारा असेल यात तिळमात्र शंका नाही. वाहने, कारखाने, हॉटेल्स, मॉल्स बंद असल्याने प्रदूषण पातळीत कमालीची घट झाली आहे. कधी नव्हे ते जलस्त्रोत स्वच्छ दिसत असून १९९५ नंतर प्रथमच पंजाबमधील जालंधरमधून हिमालयाचे दर्शन झाले आहे. पर्यावरण जाणकारांच्या मते ओझोनचा थरही आता दुरूस्त होऊ लागला असून आणखी दोन महिन्यांत तो कमालीचा सुधारेल. त्यामुळे तापमानवाढीच्या समस्येला आपोआप आळा बसेल. शिवाय या काळात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून चांगले जीवन जगण्यासाठी जेवढे आपल्या मनांवर बिंबवले जाते तेवढ्याची गरज नसते हेही माणसांच्या लक्षात येऊ लागले आहे.
याकाळात आणखी एक बाब समोर आली ती म्हणजे संकटकाळी कोणत्याही धर्माचा कोणताच देव धावून येत नाही. अंधश्रद्धेच्या आहारी न जाता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवला आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर केला तर कोणत्याही संकटाला धीराने आणि एकजुटीने तोंड देता येते.
म्हणूनच कोरोनाच्या या संकटाने मानवाची जीवित, वित्त आणि मालमत्तेची हानी तर झालेली आहेच. अजून काही काळ ती होईलही पण हे सगळे नैसर्गिक आहे आणि म्हणूनच आशादायीही आहे. वेगळ्या भाषेत बोलायचे झाले तर याला युगांत म्हणता येईल. कारण एका युगाच्या शेवटातूनच दुसऱ्या युगाची सुरुवात होते आणि येणारे नवे युग हे मानवतेचे आणि म्हणूनच जास्त आश्वासक असेल यात मुळीच शंका वाटत नाही.याकाळात आणखी एक बाब समोर आली ती म्हणजे संकटकाळी कोणत्याही धर्माचा कोणताच देव धावून येत नाही. अंधश्रद्धेच्या आहारी न जाता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवला आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर केला तर कोणत्याही संकटाला धीराने आणि एकजुटीने तोंड देता येते.
---------------------------------/-------/-----------------------
लेखकाचे नाव : श्री. राहुल सदाशिव खरात.
पूर्ण पत्ता : मु. पो. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे, पिन - ४१२ ३०६.
ई मेल : srass229@gmail.com
मोबाईल नंबर : ९०९६२४२४५२.
लेखकाचा अल्प परिचय:
लेखक सध्या वित्त व्यवस्थापन या विषयात एम.बी.ए करत असून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयावर लेखन आणि व्याख्याने देतात. लेखक कथा आणि पटकथा लेखक असून मराठी आणि हिंदी भाषेमध्ये लेखन करतात. लेखकाचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध असून लेखकाने दोन लघुचित्रपटांचे लेखनही केले आहे. लेखकाचा mikharara.blogspot.in या नावाचा ब्लॉगही आहे.
Comments
Post a Comment