Skip to main content

हरविलेल्या आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट......

हरविलेल्या आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट......

      प्रत्येक माणसाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असू शकते का? कोणालाही विचारले तरी या प्रश्नाचे उत्तर 'होय' असेच येईल. त्यामूळे प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या त्या त्या व्यक्तीच्या विचार आचारानुसार आणि स्वभावानुसार वेगळी असते असे ठामपणे म्हणता येते. बऱ्याचवेळा आनंदी राहणे ही स्वार्थाची भावना असू शकते आणि शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्वास्थ्य राखण्यासाठी याबाबतीत स्वार्थी असण्यात काहीही गैर नाही. फक्त त्या स्वार्थात कोणतीही विकृती असता कामा नये. कारण असा आनंद फार काळ टिकत नाही शिवाय ती विकृती उघड झाली की परत आयुष्यात आनंदाचे क्षण येतील की नाही याची काहीच खात्री देता येत नाही.
         मानसशास्त्रातील आनंदाची व्याख्या फारच विस्तृत असली तरी तिला अनेक आयामही आहेत. बऱ्याच जणांना दुसऱ्याला आनंद देण्यात आनंद वाटत असतो. हा आनंदाचा सगळ्यात चांगला आणि सूंदर पैलू आहे. ती दुसरी व्यक्ती परिचीत किंवा अपरिचितही असू शकते. पण व्यक्ती जर परिचित असेल तर बऱ्याचवेळा त्यात प्रेमाचाही भाग तितकाच असतो. आपल्या प्रेमाची व्यक्ती सतत आनंदी, सुखी, समाधानी रहावी आणि यशस्वी व्हावी म्हणून आपल्या आनंदाचा आणि सुखाचा त्याग करण्यात आनंद वाटणाऱ्या अनेक व्यक्ती असतात आणि त्यांनी ते ठरवून केलेले असते.  यात बऱ्याचवेळा त्या व्यक्तीचा वैयक्तिक स्वार्थ नसतो पण त्याबदल्यात संबंधित व्यक्तीने आपला आदर नाही केला तरी चालेल पण अनादर होता कामा नये अशी माफक अपेक्षा असते आणि त्यात गैर काहीच नाही. त्यामुळे इतका समर्पण भाव असताना समोरची व्यक्ती जाणते अजाणतेपणी जेव्हा आपला अनादर किंवा अपमान करते तेव्हा काय होईल हे व्यक्तीपरत्वे सांगणे अवघड असले तरी स्वाभिमानी, खंबीर मनाची आणि सशक्त व्यक्ती मात्र टोकाचा निर्णय घेऊ शकते. याच स्वाभिमानाची आणि खंबीर मनाची गोष्ट सांगणारा आणि तापसी पन्नू  या गुणी अभिनेत्रींच्या दमदार अभिनयाने नटलेला चित्रपट "थप्पड" होय!
       स्वतः सूंदर, गुणवान आणि वेगळे काहीतरी करून दाखविण्याची आणि पाहिजे तसा मुलगा निवडण्याची क्षमता, स्वातंत्र्य असतानाही आई वडीलांची इच्छा मोडायला नको म्हणून त्यांच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न करणारी, नवरा, सासू-सासरा, सासरची इतर माणसे आणि त्यांचे घर हेच आपले घर मानून त्यांच्या सुखात आपले सुख मानणारी, आपल्या नवऱ्याच्या आवडीचा रंग तोच आपला रंग मानून नवऱ्याला कंपनीत मानाचे पद मिळावे म्हणून त्याच्या दासीप्रमाणे त्याच्या सेवेत असणारी, नवऱ्याला बढती मिळाल्यावर स्वतः पुढाकार घेऊन पार्टीचे आयोजन करणारी, नवऱ्याची इच्छा म्हणूनच त्याच्याबरोबर परदेशात जाण्याची स्वप्न पाहणारी स्त्री ते ऐनवेळी आपली बढती रद्द झाली म्हणून भर पार्टीत नवऱ्याने रागाला जाऊन कानाखाली मारल्यानंतर आपल्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची जाणीव झाल्यानंतर तो स्वाभिमान जपण्यासाठी खंबीर भूमिका घेणाऱ्या स्त्रीची भूमिका तापसीने दमदारपणे साकारली आहे.
       नवऱ्याने कानाखाली मारल्यानंतर तिला प्रेमाच्या आणि कर्तृत्वाच्या आडून नवऱ्याने आपला कसा गैरवापर करून घेतला हे प्रत्येक प्रसंगानुरूप तिला जाणवायला लागते. प्रयत्न करूनही विसरणे आणि त्याला माफ करणे शक्य होत नाही तेव्हा ती थेट माहेरी निघून जाते. येईल चार आठ दिवसात परत म्हणून नवरा तिच्या जाण्याची दखलही घेत नाही. इकडे सासू, आई आणि जाणकार स्त्रिया तिला बाईच्या जातीने पडते घ्यायला शिकले पाहिजे तरच संसार होतो असे सांगायचा प्रयत्न करतात. एक कानाखाली मारली म्हणून त्याचा एवढा बाऊ कशाला करायचा असे सांगण्यात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत हेही तिला पदोपदी जाणवत राहते. पुरुष असेच असतात आणि ते बदलणार नाहीत तेव्हा आपणच संसार आणि घर टिकविण्यासाठी सहनशील व्हायला पाहिजे, बदलायला पाहिजे असे सगळे तिला सांगतात पण ती आपल्या विचारावर ठाम राहते. यात तिला नंतर आपल्या वडिलांची खंबीर साथ मिळते आणि ती नवऱ्याला घटस्फोटाची नोटीस पाठवून देते. बायको घरात नसल्याने नवऱ्याची ओढाताण व्हायला लागते, सासू आजारी पडते आणि नवरा नाइलाजाने तिला आणायला जातो तेव्हा ती स्पष्ट शब्दात नकार देते आणि आपल्या घटस्फोटाच्या भूमिकेवर ठाम राहते. नवरा तिला तिनेही त्याच्या कानाखाली मारावी आणि प्रकरण संपवावे अशी ऑफर देतो पण ती नाकारते. वकील महिला असूनही तिला एवढ्या किरकोळ कारणासाठी घटस्फोट मागणे योग्य नसल्याचे आणि न्यायालयही तुझी मागणी मान्य करणार नाही असे सांगते तेव्हा ती म्हणते, "मला आता नवऱ्याबद्दल मुळीच प्रेम आणि आदर वाटत नाही, मग मी त्याच्याबरोबर कशी राहू. कोणतंही नातं टिकवायला ह्या दोन्ही बाबी आवश्यक आहेत." ती असे सांगते तेव्हा रोज सुखाचे आणि दुःखाचे कारण सांगून आपले होणारे शारीरिक मानसिक शोषण आठवून तिची प्रतिष्ठित आणि नामांकित वकिलही अंतर्मुख होते.
      इकडे बायको नांदायला येत नाही म्हणून नवरा तिला नांदायला यायची नोटीस पाठवून देतो आणि "ती सासू सासरे यांचा छळ करते, घरात काम करत नाही, मानसिक रुग्ण आहे, तिला माझ्या संपत्तीत वाटा हवा आहे, आमच्या कुटुंबाची बदनामी करायची आहे म्हणून तिने कोर्टात केस घातली आहे आणि तरीही आम्ही तिला नांदवायला तयार आहे" अशी नोटीस पाठवतो. वकील तिला संपत्तीतील वाटा मागायला सांगते पण ती स्पष्ट शब्दात नकार देते. मला पैसे नको आहेत ते मी माझ्या हिंमतीने मिळवेनच'  पण यातुन मला जे समाधान  आणि स्वाभिमान परत मिळेल त्याची किंमत कशातच करता येणार नाही असे तिचे म्हणणे प्रत्येक कर्तृत्ववान शोषित स्त्रीला बळ देणारे ठरते.
      असे असले तरी थप्पड ही एकट्या अमृताची गोष्ट नाही. ती थोड्याफार फरकाने समाजातील नामांकित आणि प्रतिष्ठित वकील असलेली स्त्री, नवऱ्याने कधीही जिचे म्हणणे डावलले नाही अश्या तिच्या आईची, उद्योगपती नवऱ्यासाठी स्वतःच्या सुखाची तिलांजली देणाऱ्या तिच्या सासूची, स्वतः रोज कष्ट करून दारुड्या नवऱ्याचा रोज न चुकता मार खाणाऱ्या तिच्या मोलकरणीचीही कथा आहेत. या पाचही स्त्रिया दाखविण्यासाठी स्वतंत्र वाटत असल्यातरी त्या शोषित असल्याचेच निदर्शनास येते आणि आर्थिक स्तर कोणताही असला तरी स्त्री शोषणाचे स्वरूप थोड्याफार फरकाने सारखेच आहे हेही पदोपदी जाणवत राहते.
      बाकी हुशार आणि तितक्याच अहंकारी असलेल्या तिच्या नवऱ्याची विक्रमाची भूमिका प्रवेल गुलाटी या नवख्या अभिनेत्याने अत्यंत समजून उमजून साकारली आहे. त्याला माया सराव्ह, नैला गरेवाल, तन्वी आझमी आणि रत्ना पाठक यांनी तितकीच खंबीर साथ दिली आहे. अनुभव सिन्हा सारख्या जाणकार पटकथा लेखकाने आणि दिग्दर्शकाने आपल्याच कथेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे त्यामूळे अमृताला कसा घटस्फोट मिळतो आणि त्यासाठी तिला काय करावे लागते हे समजण्यासाठी "थप्पड" एकदा का होईना पाहणेच योग्य ठरेल.
©के.राहुल, 9096242452
     
        

Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...