"गुरू"
गुरू असावा जिजाऊ सारखा,
शपथ स्वराज्याची शिवबाला अन् घोर शत्रूच्या जीवाला.
गुरू असावा शिवबासारखा,
रयतेला न्याय देणारा अन् मावळ्यांसह शपथ स्वराज्याची घेणारा.
गुरू असावा महात्मा फुल्यांसारखा,
सावित्रीला शिकवणारा अन् मनुवाद्यांना वाकवणारा.
गुरू असावा सावित्रीसारखा,
यशवंताला जपणारा अन् स्त्रीशिक्षणासाठी खपणारा.
गुरू असावा शाहू महाराजांसारखा,
जात-पात, उच्च-नीच याला मूठमाती देणारा अन् गरिबांच्या विकासासाठी राज्य पणाला लावणारा.
गुरू असावा बाबासाहेबांसारखा,
धिक्कार जाती-धर्माचा करणारा अन् समतेचा पाया घालणारा.
गुरू असावा महात्मा गांधीजींसारखा,
मूठभर मीठ उचलणारा अन् ब्रिटिश सत्तेला झुकवणारा.
गुरू असावा कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा,
गरिबांची पोरं शिकवणारा अन् मशाल संघर्षाची पेटविणारा.
गुरू असावा लक्ष्मीबाईंसारखा,
अंगावरचे दागिने मोडणारा, अन् दुसऱ्याची लेकरं जेऊ घालणारा.
गुरू असावा संभाजीसारखा,
वारसा समर्थपणे सांभाळणारा आणि फितुरांना मातीत गाडणारा.
गुरू असावा भगतसिंगसारखा,
स्वप्न स्वातंत्र्याचे पाहणारा, अन् देशासाठी फासावर जाणारा.
गुरू असावा अझीझुन्नीसासारखा,
वारांगना असूनही वीरांगना ठरणारी, शत्रूंशी लढत रणभूमीवर मरणारी.
गुरू असावा कलामांसारखा,
कर्तव्याला जागणारा अन् माणूस म्हणून वागणारा.
गुरू नसावा आसारामसारखा
इज्जतीशी खेळणारा अन् गरिबांना छळणारा.
गुरू नसावा गुलाम,
शत्रूला शरण जाणारा अन् वरून पेन्शन मागणारा.
गुरू नसावा धर्मांध,
जातीभेद करणारा अन् धर्माचे विष पेरणारा.
गुरू नसावा स्वार्थी,
ज्ञानदान तोलणारा अन् धनाची भाषा बोलणारा.
गुरू नसावा पक्षपाती,
अर्जुनाला जवळ धरणारा अन् कर्णाला दूर सारणारा.
गुरू नसावा कपटी,
वर्णभेद करून शिष्यत्व नाकारणारा, अन् एकलव्याचा अंगठा मागणारा.
गुरू असावा एकबाणी, गुरू असावा एकवाणी.
गुरू असावा ज्ञानी, गुरू असावा जानी.
गुरू असावा रोखठोक, गुरू असावा चोख.
गुरू असावा बुद्धासारखा,
वरील सर्वाना दिशा देणारा अन् मानवतेला तारणारा.
©के.राहुल 9096242452
Comments
Post a Comment