कामगारांच्या मुळावरील सुधारणा!
केंद्रसरकारने काल विरोधकांच्या अनुपस्थितिचा आणि राज्यसभेतील कामकाजावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराचा गैरफायदा घेत बराच काळ प्रलंबित असलेली तीन कामगार विधेयके पास करून घेतली. कोणत्याही चर्चेविना विधेयके पास झाली असली तरी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी भाजपचे बिहारमधील माजी खासदार रवींद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार कामगार कायद्यात बदल करण्यात आलेले आहेत. या शिफारशीनुसार वेगवेगळ्या औद्योगिक अस्थापनांसाठी असलेल्या आणि विविध राज्यातील वेगवेगळ्या कायद्यांचे एकत्रीकरण करून सर्व देशभरात हे नवीन तीनच कायदे लागू होतील. हे सुसूत्रीकरण वगळता या तीन कायद्यांनी काही मोजक्या चांगल्या गोष्टी करताना अनेक वाईट कामगार प्रथा पाडण्याचा घाट घातलेला दिसतो. त्यामुळे याचे परिणाम।काय होतील तर पाहणे महत्वाचे आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या विविध २९ कामगार कायद्यांचे १. कार्यालयीन सुरक्षितता, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २. औद्योगिक संबंध संहिता आणि ३. कामगारांची सामाजिक सुरक्षितता संहिता यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. साहजिकच कृषी विकास विधेयके कशी शेतकऱ्यांच्या हिताची आहेत हे सरकार पक्ष सांगतो आहे तसेच कामगार संहिता कश्या कामगारांच्या हिताच्या आहेत हे सांगायला ही सरकार पक्ष कमी पडलेला नाही. राष्ट्रीय कामगार आयोगाचे अध्यक्ष आणि या शिफारशी करणाऱ्या समितीचे अध्यक्ष रवींद्र वर्मा हे झारखंडमधील भाजपच्या बाबूलाल मारांडी सरकारमध्ये कामगार खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. स्वतःला गांधीवादी म्हणवणारे आणि नंतर भाजपच्या कच्छपी लागलेल्या खाणींनी समृद्ध असलेल्या प्रदेशातील धनाढ्य असलेल्या वर्मा यांच्याबाबत काहीही अधिक न बोललेले चांगले. त्यामुळे या संहिताच्या तरतुदींकडे आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांकडे चकित्सकपणे पाहणे आवश्यक आहे.
*१. औद्योगिक संबंध संहिता २०२०:*
यामध्ये औद्योगिक वादविवाद कायदा, १९४७, कामगार संघटना कायदा, १९२६ आणि औद्योगिक रोजगार कायदा १९४६ या तीन कायद्यांचे एकत्रीकरण करण्यात आले असून त्यातील ठळक तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
१. कमीत कमी सात किंवा अधिक कामगार आपली संघटना नोंदणी करू शकतात. कंपनीतील एकूण कामगारांच्या १०% किंवा १०० कामगार यांपैकी जी संख्या कमी असेल ते कामगार एकत्र येऊन आपल्या संघटनेची नोंदणी करू शकतात आणि सरकार त्याला अधिकृत कामगार संघटना म्हणून प्राधान्य देईल. कंपनीत अश्या एकापेक्षा जास्त नोंदणीकृत संघटना असतील तर ज्या संघटनेला ५१% किंवा त्यापेक्षा जास्त कामगारांचा पाठिंबा असेल त्या संघटनेची कंपनी कामगारांच्या प्रश्नांवर वाटाघाटी करेल.
Comments
Post a Comment