गांधीहत्या: सत्य आणि मीमांसा
©के.राहुल, 9096242452
एखादा माणूस चांगला की वाईट हे ठरविण्याच्या अनेक कसोट्या आहेत. त्यांचा वापर करून कोणत्याही माणसांच्या चांगल्या-वाईटपणाची चाचपणी करता येते. असे असले तरी सतत चांगला वागणारा एखादा माणूस अचानक वाईट वागू शकतो किंवा त्या उलट सतत वाईट वागणाऱ्या माणसाकडून कळत नकळत एखादी चांगली कृती होऊ शकते. वाईट माणसाला चांगुलपणाची किंमत कळाली की तो उत्तरोत्तर चांगला होत जातो. अश्या माणसाचे भूतकाळातील विचार आणि वर्तमानकालीन विचार यात खूप तफावत दिसून येते. ही तफावत इतरांच्या मनात वैचारिक गोंधळ निर्माण करू शकते. समोरच्या माणसाला समजून घ्यायची मानसिक आणि बौद्धिक क्षमता नसेल तर सध्या चांगला वागणारा माणूस भूतकाळात कसा नालायक होता याचीच असे लोक अधिक चर्चा करत बसतात. अश्या माणसांबाबत महात्मा गांधी म्हणतात, "एखादा माणूस भूतकाळात कसा वागला आणि भविष्यात कसा वागेल यात फार गुंतून न राहता तो वर्तमानकाळात कसा वागतोय हे पहावे. आता तो चांगला वागत असेल तर तो त्याच्यात झालेला वैचारिक बदल असून त्याचे स्वागत करायला हवे आणि त्याच्या सध्याच्या विचाराला प्रमाण मानायला हवे". महात्मा गांधींचा हा मौलिक विचार लक्षात घेतल्यानंतर एक बाब लक्षात येते ती म्हणजे महात्मा गांधीमधील हा वैचारिक बदल त्यांनी स्वतःतील बदलावरून मांडला आहे.
महात्मा गांधी १९१५ साली भारतात आल्यानंतरचा काळ हा जसा त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या उदयाचा काळ होता तसाच तो टिळकांच्या आणि पर्यायाने काँग्रेसमधील जहाल गटाच्या राजकीय अस्ताचाही काळ होता. जहाल गट हा कर्मठ आणि धर्मांध लोकांचा अड्डा होता आणि महात्मा गांधी हे ही कर्मठ धार्मिक होते पण ते तितकेच राजकारणीही होते. टोकाच्या धर्मांध राजकारणाला भारतीय समाजमनात एक मर्यादेच्या पुढे जागा नाही हे ते जाणून होते त्यामुळे ते मवाळ गटात सामील झाले. साहजिकच स्वातंत्र्य प्राप्तीअगोदर समाज सुधारणा झाल्या पाहिजेत असे मानणाऱ्यांचा गट मवाळात होता. त्याचा महात्मा गांधींवर प्रभाव पडू लागला होता. या मावळ गटाने स्वातंत्र्याबरोबरच समाज सुधारणा झाल्या पाहिजेत. देशातील महिला, दलित आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला विकासाच्या संधींचे अवकाश उपलब्ध करून दिले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली होती. महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांनी यांनी याची पायाभरणी करून ठेवलीच होती आणि त्यांच्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच मार्गाने आपले आश्वासक पाऊले टाकली होती. त्यात त्यांना वाढता पाठींबाही मिळत होता. कुटनीतीचे राजकारण म्हणून का होईना ब्रिटिश सरकारचा या समाज सुधारणांना पाठींबा होताच. बाबासाहेबांच्या अभ्यासू मांडणीमुळे आणि तर्कशुद्ध लढ्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या तर काहींना पाठिंबा दिला होता. साहजिकच काँग्रेसचे प्रधान नेते म्हणून महात्मा गांधींना यांकडे गांभीर्याने पहावे लागले. तरीही साधारणपणे १९३२ पर्यत समाजसुधारणा धर्माच्या चौकटीतच व्हायला हव्यात यावर त्यांचे टिळकांप्रमाणेच मत होते. ते आपल्याला त्यांनी फिरोज गांधींचे धर्मांतर करवून (आजही काही धर्मांध धर्माने पारशी असलेले फिरोज गांधी मुस्लिम असल्याची खोटी आवई उठवतात आणि अर्धशिक्षित धर्मवेडे त्यावर विश्वास ठेवतात) त्यांना दत्तक घेऊन मग त्यांचे इंदिरा गांधी यांच्याशी लग्न लावून दिल्याच्या उदाहरणावरून सहज लक्षात येते.
दलित चळवळीचे नेतृत्व पूर्णपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे अनेक योजना सादर केल्या. ब्रिटिश सरकारबरोबर गोलमेज परिषदांमधून डॉ. आंबेडकरांनी यशस्वीपणे आणि सप्रमाण आपली बाजू मांडली होती. दलित आणि मागास समाजाच्या मागासलेपणाची कारणे आणि त्यावरील उपाययोजना सादर केल्या. स्वातंत्र्य चळवळीचे आणि सामाजिक नेतृत्व काँग्रेसकडे आणि पर्यायाने महात्मा गांधींकडे असल्याने स्वतःच्या कर्मठ धार्मिकपणामुळे आणि काँग्रेसमधील सवर्ण गटाच्या दबावामुळे गांधीजींनी या सुधारणा यशस्वी होऊ दिल्या नाहीत. त्यांनी तिसऱ्या गोलमेज परिषदेला गैरहजर राहून डॉ. आंबेडकरांना शह देण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे त्या दोघात मतभेद निर्माण झाले आणि आंबेडकरांनी त्यांच्यावर कडवट शब्दात टीकाही केली. या टिकेनंतर मात्र महात्मा गांधींनी दलितांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केल्याचे दिसून येते. डॉ. आंबेडकरांची मागणी चुकीची नाही हे त्यांना कळाल्यावर (हे त्यांनी कधीच जाहीरपणे मान्य केले नाही हा त्यांच्या राजकारणाचा भाग) त्यांचे मतपरिवर्तनही झाले पण हे मतपरिवर्तन काही एक दिवसात होत नाही त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि अभ्यासही करावा लागतो. तो महात्मा गांधींनी केला आणि साहजिकच त्यांनी स्वातंत्र्य लढ्याबरोबरच दलितांच्या प्रश्नांवरही लक्ष केंद्रित केले. उत्तरोत्तर त्यात सुधारणा होत गेली. राजकीय आणि सवर्ण वर्चस्वाच्या दबावामुळे त्यात त्रुटीही अनेक राहिल्या पण म्हणून ते थांबले नाहीत. साहजिकच बाबासाहेब त्यांच्या अस्पृश्यता निवारण्याच्या प्रयत्नांवर समाधानी नव्हते. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील या मतभेदला पंडित नेहरू नावाचा तिसरा कोणीही होताच. त्यावर या लेखात प्रकाश टाकणे शक्य नसले तरी १९४० नंतर काँग्रेसचे राजकीय नेतृत्व पूर्णपणे पंडित नेहरूंच्या हातात गेल्यामुळे आणि महात्मा गांधी चळवळी, सक्रिय सहभागाची आंदोलनाने आणि अस्पृश्यता निवारण्याच्या कामात अडकून पडल्यामुळे नेहरूंची काँग्रेस वरील पकड घट्ट झाली. नेहरू कीतीही मावळ असले तरी त्यांनी राजकीय पातळीवर यासाठी काहीही केलेले नाही किंवा त्यांना तितका वेळ मिळाला नाही असे खेदाने म्हणावे लागते. साहजिकच बाबासाहेबांनी वेगळी वाट निवडली आणि धर्मांतराची घोषणा केली. त्यावर महात्मा गांधींनी टीकाही केली पण त्याचाही त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला आणि त्यांनी देशातील दलित, मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. डॉ. आंबेडकरांचे म्हणणे बरोबर आहे हे पटल्यावर (त्यांनी हे जाहीरपणे कधीच मान्य केले नाही हा गांधीजींच्या राजकीय डावपेचांचा भाग असावा कदाचित सामाजिक सुधारणा चळवळीचे नेतृत्व पूर्णपणे डॉ. आंबेडकरांकडे जाऊ नये अशी धोरणी भूमिका त्याच्यामागे असावी) मात्र त्यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांनाही प्राधान्य द्यायला सुरुवात केली. त्यांच्यातील हा बदल त्यांच्या सामाजिक-राजकीय कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात अनुभवास येतो.
महात्मा गांधींची भारतातील सामजिक-राजकीय कारकीर्दीचे दोन टप्पे करता येतील त्यात १९१५ ते १९३२ आणि १९३३ ते १९४८ (निधनापर्यंत) यातील पहिल्या टप्प्यात ते पूर्णपणे राजकारणी असल्याचे लक्षात येते तर दुसऱ्या टप्प्यात ते राजकारणी आणि समाजसुधारक अश्या दुहेरी भूमिकेत दिसतात आणि १९३२ च्या अगोदरचे कर्मठ महात्मा गांधी त्यानंतर मात्र दलित मागासवर्गीय समाजाच्या सामजिक-आर्थिक प्रश्नांवर संवेदनशील आणि आग्रही झालेले दिसतात. ही भावना आणखी पक्की करण्यात १९३५ ला डॉ. आंबेडकर यांनी केलेली धर्मांतराची घोषणा कारणीभूत ठरली. या दुसऱ्या टप्प्यात हिंदू समाज डॉ. आंबेडकर यांच्या मागे जाऊ नये हा राजकीय धोरणीपणाही असणारच (कारण महात्मा गांधी हे उत्तम राजकारणी होते) तसेच त्यांनी केलेले समाजसुधारणेचे प्रयत्नही कदाचित तितके प्रभावी नसतीलही पण ते प्रामाणिक होते. साधी राहणी तर अनुसरली होतीच पण त्यांनी हिंदुत्वाची चौकटीही मोडली होती. अस्पृश्य समाजात त्यांची ऊठबस वाढली होती. त्यांच्या सुख दुःखात ते सहभागी तर होतेच पण त्यांचे प्रश्नही हिरीरीने मांडण्यास सुरुवात केली होती. त्यांनी पुण्यात अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांसाठी मोठा मोर्चाची काढला होता.
याच सुमारास स्वातंत्र्याच्या मागणीनेही जोर धरला होता आणि त्यात फाळणीचीही बीजे रोवली गेली होती. त्यात जितका वाटा जिनांचा होता तितकाच वाटा जहाल गटातुन हिंदू महासभेत गेलेल्यांचाही होता हे इतिहासाची पाने उलगडून पहिल्यास सहज लक्षात येते. त्यामुळे नथुराम गोडसेने महात्मा गांधींनी भारताच्या फाळणीला मान्यता दिली म्हणून त्यांची हत्या केली असे म्हणणे ही धूळफेक आणि हत्येच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. कारण महात्मा गांधींनी ३० जानेवारी १९४८ साली झालेल्या हत्येच्या आगोदर त्यांच्यावर पाच वेळा असे हल्ले झाले होते. त्यांच्या इतिहासात अत्यंत ठळक आणि तटस्थ नोंदी झालेल्या आहेत. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्यांच्यावरील हल्ल्यामध्ये वाढ झाल्याचे आणि त्यांचे विरोधक वाढल्याचेही लक्षात येते. घटनाक्रम लक्षात घेतल्यानंतर गांधी हत्येच्या मूळ कारणाकडे पोहचता येते:
*२५ जून १९३४:*
पुणे महानगरपालिका सभागृहात महात्मा गांधी दलितांच्या प्रश्नांवर भाषण द्यायला चालले होते. त्यांच्या मागे आणि पुढे अश्या दोन चारचाकी गाड्या होत्या. पहिली गाडी रेल्वे रूळ ओलांडून गेल्यानंतर क्रॉसिंग लागल्याने फाटक पडले आणि महात्मा गांधी आणि कस्तुरबा मागे राहिले पण पहिली गाडी सभागृहाच्या फटकाच्या आत आली आणि हिंदुत्ववाद्यांनी गांधीजी गाडीत आहेत असे समजून बॉम्ब फेकला. त्यात दोन पोलिसांसह १० जण जखमी।झाले (संदर्भ: महात्मा गांधींचे सचिव प्यारेलाल यांनी लिहिलेल्या "महात्मा गांधी: शेवटचे पर्व" या पुस्तकातुन).
*जुलै १९४४*
मे १९४४ मध्ये पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये कैदेत असताना गांधीजींना मलेरिया झाला होता. त्यामुळे त्यांना विश्रांतीसाठी पाचगणीला पाठविण्यात आले होते तेव्हा त्यांच्या विश्रामगृहाच्या बाहेर उभे नथुराम गोडसेच्या नेतृत्वाखाली २० जण त्यांच्याविरुद्ध घोषणा देत होते. महात्मा गांधींनी त्यांना चर्चेसाठी आत बोलविल्यानंतर नथुरामने त्याला साफ नकार दिला. संध्याकाळी गांधींजी प्रार्थनेला जात असताना नथुराम हातात खंजीर घेऊन गांधींना मारण्यासाठी धावला होता. तशी कबुली त्याने नंतर कपूर आयोगासमोर दिली.
या सर्व हल्ल्यांमध्ये नथुराम गोडसे आघाडीवर होता आणि नंतर साक्ष देताना जरी त्याने आणि त्याच्या साथीदारने फाळणीचे कारण दिले असले तरी ते पूर्णसत्य नाही कारण फाळणीला हिंदू महासभेचा पाठींबा होता. फाळणीनंतर सगळे मुस्लिम पाकिस्तानात जातील अशी भाबडी आशाही यांना होती. मुस्लिम राजवटीत झालेले सत्ताधारी ब्राह्मणांचे छळ यासाठी कारणीभूत तर होतेच पण त्याहीपेक्षा आंबडेकरांच्या जातीव्यवस्था निर्मूलनाच्या प्रयत्नांना महात्मा गांधीमुळे बळ मिळाले असते आणि चातुर्वण्य व्यवस्थेलाही तडा गेला असता. ते महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांना नको होते म्हणून त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा अनेकवेळा कट रचला आणि तो शेवटी तडीसही नेला.
(ता.क. : गांधी हत्येच्या काटातील एक संशयीत आरोपी विनायक दामोदर सावरकर यांनीही रत्नागिरी जिल्ह्यात अस्पृश्यता निवारणासाठी काम केलेले आहे. पण त्यामागे कदाचित आपल्यावर अस्पृश्यता समर्थकाचा आरोप होऊ नये म्हणून किंवा गांधी हत्येचे थोडेफार पाप धुतले जावे अश्या हेतूने केले असावे अशी दाट शक्यता आहे.)
©के.राहुल, 9096242452.
--////////////-----
*अमोल कोल्हे,*
*तुम्ही कोणत्या भारताचे नागरिक आहात?*
*- संजय आवटे*
नथुराम गोडसेला फासावर दिले गेले, हा न्याय नव्हता. तो अन्यायच होता. नथुराम क्रूरकर्मा होता हे खरे असेलही, पण जो अपराध त्याने केलाच नाही, त्यासाठी त्याला फासावर लटकवले जाणे, हा काही न्याय नाही!
स्वातंत्र्योत्तर भारतातील सगळ्यात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक खटला म्हणजे महात्मा गांधी यांची हत्या. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची दिल्लीतील बिर्ला हाऊस परिसरात हत्या झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास प्रार्थनेसाठी गांधी चाललेले असताना, हिंदू महासभेचा कार्यकर्ता असलेल्या नथुराम गोडसे याने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गांधी यांची हत्या झाल्याची बातमी त्या काळातही जगभर पोहोचली. पुढे खटला चालला आणि नथुराम गोडसे, नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ रोजी अंबाला जेलमध्ये फासावर लटकवले गेले.
पण, मुळात गांधींचा खून झाला, हीच 'अफवा' होती. गांधींच्या हत्येचा हा काही पहिला प्रयत्न नव्हता. यापूर्वी असे प्रयत्न झाले होते. त्यामध्ये गांधींची पाकिस्तानविषयीची भूमिका काय आहे, हेही मुद्दे नव्हते. कारण, पाकिस्तान नावाच्या देशाची कल्पना पुढे येण्यापूर्वीही गांधींच्या खुनाचे प्रयत्न झाले होते. प्रत्येकवेळी गांधी सुखरूप बचावले आणि आपल्या मारेक-यांनाही त्यांनी माफ केले. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधींवर तीन गोळ्या झाडल्या गेल्या. त्यावेळी मात्र नथुराम आणि नारायण यांना फासावर लटकवले गेले. त्यामध्ये गैरसमज असा होता की गांधी मृत्युमुखी पडले. प्रत्यक्षात या हल्ल्यातही गांधी बचावले होते! म्हणून तर गांधींच्या दोन मुलांनी मणिलाल आणि रामदास यांनी सरकारला सांगितले होते की अशा हल्ल्याने गांधी मरत नसतात. पण, पंतप्रधान पंडित नेहरू, गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या दोघांचे ऐकले नाही. 'नथुरामला माफ करावे', असे निवेदन मणिलाल आणि रामदास यांनी दिले होते. मात्र, न्यायालयाने अथवा सरकारने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे बापड्या नथुरामचा 'बळी' गेला. प्रत्यक्षात मात्र या हल्ल्यातूनही गांधी बचावले.
गांधी वाचले नसते, तर आज २०२१ मध्येही त्यांचा खून करण्याचे प्रयत्न का व्हावेत? गांधींचा खून झाला, तेव्हा ते ७८ वर्षांचे होते. आज त्या घटनेला ७३ वर्षे झाली. तरीही १५१ वर्षांचे गांधी मरत नाहीत. ते जिवंतच आहेत.
गांधी जिवंत आहेत, म्हणून तर त्यांना मारण्याचे प्रयत्न पुन्हा पुन्हा करावे लागतात. नथुरामला नायक करणारा सिनेमा सध्या चर्चेत आहे. आज तो सिनेमा प्रसारित होतो आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांची निवडणूक सुरू असताना, हा चित्रपट येणे हा अजिबात योगायोग नाही.
या चित्रपटाचे साधे ट्रेलर पाहिले तरी त्यामागची भूमिका समजेल. गांधींनी या देशाचे कसे आणि किती वाटोळे केले, गांधींच्या अहिंसेने किती अनर्थ घडवले, गांधी कसे मुस्लिमधार्जिणे होते आणि हिंदूद्वेष्टे होते, असे सांगत हा सिनेमा 'इतिहासा'ची मांडणी करतो आहे. या ट्रेलरवर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या पाहिल्या म्हणजे आपल्याला अंदाज येतो की चित्रपटाचा 'मेसेज' काय आहे! गांधी देशाचे वाटोळे करत असताना हा राष्ट्रभक्त नथुराम गोडसे नावाचा तारणहार आला. त्याने हातात शस्त्र घेतले आणि गांधींचा 'वध' केला, असे हा सिनेमा सांगतो.
गांधींचा पुन्हा खून करण्यासाठी हा सिनेमा यावा आणि त्यामध्ये गांधींच्या मारेक-याची, अर्थात नथुरामची भूमिका डॉ. अमोल कोल्हे या आमच्या सन्मित्राने करावी, याला काय म्हणायचे? गांधींचा खून हा गांधींचा खून नसतो. तो भारताच्या कल्पनेचा खून असतो. 'आयडिया ऑफ इंडिया'चा खून असतो. ज्यांना आजचा हा भारतच मान्य नाही, अशा नराधमांचे हे कारस्थान असते.
या कारस्थानाचे वाहक अमोल कोल्हे याने व्हावे, हे सर्वात क्लेशकारक आहे. अमोल हा तरूण अभिनेता. मूळचा डॉक्टर. पुण्यातल्या ख्यातकीर्त अशा बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. झालेला अमोल पुढे अभिनयाकडे वळला. तो काही फार अभिजात अभिनेता वगैरे नव्हे. पण, काही चरित्र भूमिकांमुळे तो लोकप्रिय झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अमोलला राजकारणाचे करीअर आणखी खुणावू लागले. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल हा शिवसेनेचा 'स्टार कॅम्पेनर' होता. पुढे त्याची छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठी मालिका आली. त्या मालिकेने तर अमोल घरा-घरापर्यंत पोहोचला. महाराष्ट्रातले बदललेले राजकीय चित्र आणि मतदारसंघाची गरज लक्षात घेता अमोल राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाला आणि, डॉ. अमोल कोल्हे हे 'जाएंट किलर' ठरले. त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या शिरूरचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांना धूळ चारली. सध्या लाटा खूप चर्चेत आहेत. प्रत्येक लाटेला काहीतरी नाव दिले जाते. तसे, २०१९ च्या दुस-या लाटेला काय म्हणायचे, माहीत नाही. पण, ती लाट होती. शिवसेना तेव्हा भाजपसोबत होती. तरीही, अमोल शिवसेनेला पराभूत करून विजयी झाले आणि खासदार झाले. त्या निवडणुकीत त्यांचे 'छत्रपती संभाजी महाराज' असणे खूप चालले!
या निवडणुकीच्या प्रचारात डॉ. अमोल कोल्हे यांनी घणाघाती भाषणे केली. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधकांची अवस्था फारच वाईट होती. मात्र, त्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे खरेखुरे 'स्टार प्रचारक' होते. त्यांनी विरोधकांची बाजू लावून धरली. लोकशाही मूल्यांसाठीचा हा लढा आहे, असे प्राणपणाने सांगितले. तीच भूमिका त्यांनी पुढे संसदेतही कायम ठेवली. संसदेतली त्यांची भाषणे आजही 'व्हायरल' होत असतात. सत्तेला सवाल करणारा, पुरोगामी आवाज बुलंद करणारा असा तगडा चेहरा आपल्याला मिळाला, असा सूर विरोधी पक्षांचा होता. छत्रपती संभाजी महाराज ज्याप्रमाणे दिल्लीच्या तख्तासमोर झुकले नाहीत. उलटपक्षी, त्यांनी बादशहाला आव्हान दिले आणि जिवाची बाजी लावून रयतेचे राज्य सांभाळले, तशी आठवण मराठी माणसांना व्हावी, असा हा काळ होता.
अमोल हे काही चळवळींतून आलेले नाहीत. महत्त्वाकांक्षी आणि कलावंत हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू आहेत. त्यांना शिवसेनेने राजकीय स्थान दिले, तेच मुळी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी केल्यामुळे. आणि, पुढे लोकांनी खासदार केले, ते छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यात दिसले, म्हणून.
पण, त्याचवेळी डॉ. अमोल कोल्हे भलतेच काही करत होते. २०१७ मध्ये 'संभाजी' घरा-घरात पोहोचत असतानाच डॉ. कोल्हे 'व्हाय आय किल्ड गांधी' हा लघुपट साइन करत होते. त्यात नथुराम गोडसेची मध्यवर्ती भूमिका करत होते. शिवसेनेत आपण आहोत आणि शिवसेना भाजपसोबत आहे, तेव्हा अशी भूमिका करण्यात त्यांना काही गैर वाटले नसावे! तसा विचार ते तेव्हाही करत असतील, तर हे फारच क्लेशकारक आहे. माणसं महत्त्वाकांक्षी असतात. पण, अशी संधीसाधू असतील, तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे.
मुळात पक्ष कोणताही असो, प्रत्येक पक्षाची भूमिका ही गांधींना 'राष्ट्रपिता' मानणारी असते. पंतप्रधान आजही दक्षिण आफ्रिकेत जातात, तेव्हा गांधींनी प्रवास केलेल्या ट्रेनमध्ये बसतात. बाहेर जगात कुठेही जातात, तेव्हा 'गांधींच्या देशातून आलेले' म्हणूनच त्यांचे स्वागत आजही केले जाते.
गांधींना अधिकृतपणे 'प्रातःस्मरणीय' मानतानाच, त्यांना खलनायक म्हणून रंगवण्याचा प्रयत्न सुरू असतो. गांधी, नेहरू आणि आंबेडकरांनी जो 'राष्ट्रवाद' मांडला, तो खोडण्याचा प्रयत्न सुरू असतो. गांधींच्या विरोधात 'कुजबुज कॅम्पेन' चालवून त्यांना ट्रोल करण्याचा उद्योग वर्षानुवर्षे सुरू आहे. गांधीही असे की, त्यांना काही फरक पडत नाही. जो गोळ्यांनी मेला नाही, तो आमचा बाप तुमच्या बदनामीने कसा मरेल? शिवाय, गांधींबद्दल कोणी कितीही अपशब्द वापरले, तरी काही दंगल उसळत नाही. मुळात, या आगीत बापू भस्मसात होत नाहीत आणि शस्त्राने त्यांना गारद करता येत नाही.
'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥'
असा महात्मा आहे तो!
हे लोक नेहरूंना मात्र अधिकृतपणे बदनाम करतात. त्यांचे रोज चारित्र्यहनन करतात. कारण, नेहरूंना थेट विरोध करावा लागतो. धर्मांधता, सांस्कृतिक राष्ट्रवाद, मूलतत्त्ववाद याच्या विरोधात जी भूमिका नेहरूंनी घेतली, ती एवढी स्पष्ट होती की थेट हल्ला चढवल्याशिवाय त्यांच्याकडे इलाज नाही. जो माणूस या देशाचा पहिला पंतप्रधान होता आणि सलग सतरा वर्षे ज्याच्या हातात या देशाची धुरा होती, त्याच्यामुळेच आजचा भारत आहे. शेजारचे देश कोसळले, लष्कराच्या टाचेखाली गेले, धर्मांधांनी लावलेल्या आगीत ध्वस्त झाले. भारत मात्र दिमाखात झेपावला, ते नेहरूंमुळे. नेहरू फक्त बोलले नाहीत. त्यांनी तसे धोरणात्मक बदल केले. कृती केली. संस्था उभ्या केल्या. या संस्थात्मक पायामुळेच तर भारत नावाच्या कल्पनेला धक्का लावता येत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार. बाकी मतभेद कितीही असतील, पण गांधी-नेहरू आणि आंबेडकर यांच्या राष्ट्रवादात मतभेद नाहीत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या अधिष्ठानात एकवाक्यता आहे. डॉ. आंबेडकरांना विरोध करणे अथवा बदनाम करणे सोपे नाही, हे या प्रस्थापितांना समजते. कारण, त्यांना निवडणुकीची गणितं दिसतात. त्यामुळे, थेटपणे हिंदू धर्म सोडणा-या आंबेडकरांवर ते हल्ला चढवत नाहीत. उलट त्यांचं गौरवीकरण करतात. पण, ते करताना बाबासाहेबांच्या विचारांचं टोकच कापून टाकतात. त्यांच्या विचारांचा चुकीचा अन्वय लावतात. बाबासाहेबांनी दिलेला संविधानिक पाया, नेहरूंनी दिलेलं संस्थात्मक अधिष्ठान आणि गांधींनी सांगितलेलं मूल्यभान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करतात.
एकूण काय, 'आयडिया ऑफ इंडिया' ज्यांना नाकारायची आहे, ज्यांना धर्माच्या पायावर देश उभा करायचा आहे, अशांना हे तिघेही नको असतात. आणि, त्यांची अडचण अशी असते की, हे तिघेही काही मरत नाहीत. निवडणुकीच्या रिंगणात भलेही तुम्हाला विजय मिळेल, पण तुमची विचारधारा हा या देशाचा मुख्य प्रवाह होत नाही. देशाचा मुख्य विचारप्रवाह आजही तोच आहे, जो गांधींनी सांगितला. 'ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान' हीच आजही इथल्या सामान्य माणसाची प्रार्थना आहे!
म्हणून, गांधींना मारायचे. पुन्हा पुन्हा मारायचे. नथुराम गोडसेला हुतात्मा आणि नायक करायचे. धर्माच्या आगीत देशाला धुमसत ठेवायचे. 'आम्ही भारताचे लोक' अशी ख्याती असणा-या देशाला पुन्हा जातपितृसत्तेच्या दिशेने घेऊन जायचे. मूठभरांच्या हातात या देशाची सूत्रे देऊन, या देशाचे वैभव असलेले वैविध्यच संपवत न्यायचे. विरोधी सूर संपवून टाकायचे. सगळ्यांना एकाच सुरात बोलायला भाग पाडायचे.
म्हणून यांना नथुराम हवा असतो.
डॉ. अमोल कोल्हेंना हे समजले नसेल का, आपण या कारस्थानाचे वाहक झालो आहोत! आपली शिकार झाली आहे. आपल्याकडून हा गंभीर अपराध झाला आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी ज्या सिनेमामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केली आहे, त्या सिनेमाचे नाव आहे - 'व्हाय आय किल्ड गांधी?' क्रूरकर्मा नथुराम गोडसेच्या आत्मचरित्राचेच हे नाव आहे. हा सिनेमा अवघ्या पंचेचाळीस मिनिटांचा आहे. त्याचे अडीच मिनिटांचे ट्रेलर प्रसारित झाले आहे आणि गांधींच्या पुण्यतिथीला म्हणजे आज संपूर्ण सिनेमा 'लाइमलाइट' नावाच्या 'ओटीटी प्लॅटफॉर्म'वर प्रसारित होणार आहे.
या सिनेमाचे जे ट्रेलर यूट्यूबवर आहे, त्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या म्हणजे मी का संतप्त आणि अस्वस्थ आहे, याचा अंदाज येईल. प्रचंड धार्मिक उन्माद आणि विखार निर्माण करणारा, 'आयडिया ऑफ इंडिया' पायदळी तुडवत गांधींना खलनायक करणारा असा हा भयंकर 'प्रभावी' सिनेमा असणार आहे.
हा कपोलकल्पित सिनेमा नाही. वस्तुनिष्ठ माहिती आणि पुराव्यांवर तो आधारित असल्याचा दावा दिग्दर्शक अशोक त्यागी यांचा आहे. डॉ. अमोल यांना ते माहीत आहे. 'नथुराम हा नायकच होता आणि गांधी खलनायक होता, हे सिद्ध करण्यासाठी हा सिनेमा काढला आहे', असे दिग्दर्शकच सांगतात. आजवर गांधींना विरोध झाला आहे, पण नथुरामला कोणी देशभक्त, विचारवंत, तारणहार वा महानायक वगैरे मानत नव्हते. हा सिनेमा ते करतो. ठरवून करतो. नथुरामला मुख्य प्रवाहाची 'लेजिटेमसी', मान्यता देऊ पाहातो.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर, मुद्दाम ओटीटीवर, मुद्दाम हिंदीमध्ये, अत्यंत बटबटीत असलेला असा हा सिनेमा येणे हा योगायोग नाही. हे पूर्वनियोजित कारस्थान आहे. गांधीहत्येइतकाच अत्यंत भयंकर कट आहे.
शरद पवारांना या विषयाचे गांभीर्य अद्याप समजले नसावे. अन्यथा त्यांनी इतकी 'कॅज्युअल कमेंट' केली नसती. गांधींना नायक मानणा-या सिनेमात कोणीतरी नथुरामचा रोल करणे आणि नथुरामला नायक करण्यासाठी विपर्यस्तपणे इतिहास रंगवून निर्माण केलेल्या कारस्थानाचा वाहक होणे यात फरक आहे. ओटीटीवर तरूणाई मोठ्या संख्येने आहे. तिला चुकीचा इतिहास सांगून, सांस्कृतिक राष्ट्रवादाला मुख्य प्रवाह करण्याचा हा विखारी आणि आत्यंतिक 'प्रभावी' असा प्रयत्न आहे. गांधींविषयीचा द्वेष सर्वदूर पसरवण्याचा डाव आहे. सध्याच्या भवतालात तर हा प्रयत्न म्हणजे आगीत तेल टाकून देशभर दंगली भडकवण्याचे क्रूर कारस्थान आहे. यात कसलीही कला नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हा गुन्हा आहे.
मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, डॉ. अमोल कोल्हे यांनी बिनशर्त माफी मागायला हवी. समर्थन न करता, चूक झाल्याची कबुली द्यायला हवी. मराठी मालिकेतील एका भूमिकेच्या जोरावर खासदार झालेल्या अभिनेत्याला तर हे नीटपणे समजायला हवे. डॉ. अमोल यांनी आजवर अनेकदा ठोस भूमिका घेतली आहे. ते संवादी आहेत. समंजस आहेत. विवेकी आहेत. पण, या मोठ्या कारस्थानाचे आपण वाहक झाल्याचे त्यांनी जाहीरपणे मान्य केले पाहिजे. समर्थन करत बसू नये. तरच, गांधीमार्गाने त्यांना माफ करता येणे शक्य आहे. अन्यथा, शरद पवार तुम्हाला भलेही माफ करतील. महाराष्ट्र करणार नाही.
डॉ. अमोल, आणखी एक लक्षात घ्या. काही झाले, कोणी काही केले, तरी तो महाचिवट गांधी काही मरणार नाही. गांधी आडवा येत राहणारच आहे. पण, उद्याच्या पिढ्या मात्र तुम्हाला आरोपीच्या पिंज-यात उभ्या करणार आहेत!
कारण, हे काही आजच घडलेले नाही. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या एका महिलेने ३० जानेवारी २०१९ ला गांधींचा खून करण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता. त्यांनी गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या होत्या.
असा प्रयत्न पुन्हा पुन्हा करावा लागतो, तरी गांधी मरत नाही. हे काय प्रकरण आहे? गांधींना ना कोणती सुरक्षा व्यवस्था ना खास काही, तरी गांधींना मारता का येत नाही? अनवाणी पायांनी थेट गर्दीत घुसणारा हा लहान चणीचा, उघडा, वयोवृद्ध माणूस खून करण्यासाठी किती सोपा! कोणी यावे आणि त्याच्या विरोधात हवे ते बोलावे. वाटेल तसे वाह्यात जोक्स करावेत. नाटक- सिनेमांतून मस्त बदनाम करावे. एवढे सारे सोपे. तरी तो मरत नाही आणि बदनामही होत नाही. तिकडे नथुराम नाहक फासावर चढला आणि इकडे हा माणूस मात्र महात्मा म्हणून मिरवतोच आहे. पूर्वी 'गांधी जिथे असतील तिथे' अशा पत्त्यावर पत्रं जायची आणि गांधींना ती मिळायची. अवघा देश पिंजून काढणारा हा माणूस आजही देशभर फिरतो आहे. ऐन तारुण्यात फासावर गेलेला नथुराम नाहक मारला जातो आणि इथे हा वयोवृद्ध माणूस तर आणखी ‘तरुण’ होत जगभर भटकताना दिसतो.
असाच एक हल्ला झाल्यावर गांधी म्हणाले होते, ‘मला मारुन कोणाला काय मिळणार आहे ते समजत नाही. पण, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी काही मरणार नाही. मी किमान १२५ वर्षे जगणार आहे.’ आणि, अखेर हे शब्द खरेच झाले तर. १५० वर्षे झाली तरी गांधी आहेतच. ते मरत नाहीत. कितीही हल्ले झाले तरी कोणताही नथुराम गांधींचा खून करू शकत नाही!
गांधी नावाचं हे प्रकरण आहे तरी काय? मला विचाराल तर, गांधी विचार ही काही पोथी वा आज्ञावली नाही, अथवा ती ‘रेडिमेड ब्लू प्रिंट’ही नाही. ती दृष्टी आहे. पण, गांधींना एकरेषीय पद्धतीने सादर करणा-या गांधीवाद्यांनी गांधींचं रुपांतर ‘खडूस म्हाता-या’त करून टाकलं. समकालीन सामान्य माणसांपासून गांधी दुरावले असतीलच, तर ते नथुरामांमुळे नाही. ते श्रेय गांधींची मालकी सांगणा-या अशा गांधीवाद्यांकडे जाते!
आफ्रिकेत वकिली करणारे गांधीजी भारतात आले तेव्हा ४६ वर्षांचे होते. आफ्रिकेतील कामाचे वलय त्यांच्यासोबत होते. तरीही राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व गांधीजींकडे जाणे एवढे सोपे नव्हते. पण महात्मा गांधी या व्यक्तिमत्त्वाची जादूच काही वेगळी होती. गांधीजींपेक्षा अधिक बुद्धिमान, प्रतिभावंत लोक काँग्रेसमध्ये होते. गांधी तसे प्रभावी नव्हते. फर्डे वक्ते तर कधीच नव्हते. तरीही अल्पावधीतच गांधीजींकडे देशाचे नेतृत्व आले. गांधीजींच्या या ‘कम्युनिकेशन’चे आजही सर्वांना आश्चर्य वाटते. तेव्हाचा देश- म्हणजे, त्यात पाकिस्तान आणि बांग्लादेशही होते. एवढा दुर्गम, महाकाय आणि दळणवळणाची साधनं नसलेला देश. अशा देशातील घराघरापर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नव्हती. ‘गांधीजी येऊन गेले’, असं आजही गावागावांतले लोक सांगत असतात. सर्व वयोगटातल्या स्त्री- पुरुषांना गांधीजींनी या लढ्यामध्ये सहभागी करुन घेतलं. त्यांच्यासोबत फाटका माणूस जसा होता, तसे बिर्ला नि टाटाही होते. या सगळ्यांसोबत गांधींनी वेगवेगळ्या आश्रमांचं आणि प्रकल्पांचं देशभर जाळं विणलं. जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम उभं केलं.
आम्ही ‘मास कम्युनिकेशन’चे अभ्यासक गांधींच्या या संवाद शैलीला ‘मासलाइन कम्युनिकेशन’ असं म्हणतो. संवादाची कोणतीही साधनं तेव्हा नव्हती. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सॲप तर सोडाच, पण कोणाला पत्र लिहिलं तर कधी पोहोचेल, पोहोचेलच का, याविषयी खात्री नव्हती. टीव्ही, रेडिओ तर सोडून द्या. हाताच्या बोटावर मोजता येतील अशी वर्तमानपत्रं होती, पण फेसबुकवरच्या एखाद्याच्या फ्रेंड्सलिस्टइतकेही वाचक नसतील त्यांचे. आजच्यासारखी पायाभूत संरचना नसताना गांधीजींनी आपला संदेश नेमकेपणाने देशभर पोहोचवला. एका पत्रकाराने गांधींना विचारले, ‘तुमच्या या ‘कम्युनिकेशन’चे सूत्र काय आहे?’ तेव्हा ते म्हणाले, ‘सामान्य माणसाच्या शहाणपणावर माझा विश्वास आहे.’ सर्वसामान्य माणसाला उपदेशाचे डोस देणाऱ्या इतर नेत्यांपेक्षा गांधीचं वेगळेपण इथं दिसतं. महात्मा गांधी हे स्वत:च सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे प्रवास करणारे प्रवासी असल्याने सामान्य माणसाचे शहाणपण त्यांना नीटपणे ठाऊक होते. त्यामुळेच कोणत्याही अलंकारिक, क्लिष्ट शब्दयोजनेशिवाय सहजपणे लोकांना भिडणारा संवाद ते करु शकले.
सामान्य माणसाच्या शहाणपणावरील विश्वासामुळेच गांधींनी परंपरेची स्पेस वापरली. अनेकदा आधुनिकतेच्या नादात परंपरेचं संचित आपण गमावतो. परंपरेचे हे संचित आपण विसरलो की नको त्या हातात ते जाते. गांधींच्या प्रार्थनेतील राम भलत्याच रथावर आरूढ झाल्यावर काय घडते, हे आपण पाहिले आहे. गांधींच्या आश्रमातील गाय चुकीच्या गोठ्यात गेल्यावर किती हिंसक होते, हेही आपण पाहात आहोत! धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्म, देव अथवा लोकांच्या श्रद्धांची थट्टा करण्याची काहीच गरज नसते. कोणी मंदिरात वा मशिदीत जात असेल, कोणी एकादशीचा उपवास करत असेल अथवा कोणी ‘बायबल’ वाचत असेल, तर त्या उपासनेचे त्याचे स्वातंत्र्य मान्यच करायला हवे. कोणताही धर्म अंतिमतः सत्य, चारित्र्य, अहिंसा हीच शिकवण देत असेल, तर खरे धर्मश्रद्ध लोक नीतीमानच असतात. प्रेम हा संस्कृतीचा सारांश असेल, तर परंपरेतील हा सारांश गांधी अधोरेखित करत असतात. बुद्धाला विष्णूचा अवतार करणारी मंडळी या वारशावर डाका घालण्यासाठी सर्व शक्तीनिशी सज्ज असताना, परंपरेची आणि धर्माची ही स्पेस गांधीजींनी वापरली. कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या हातात हिंदू धर्म त्यामुळेच गेला नाही. तेव्हाच्याही सगळ्या नथुरामांना खरा त्रास होता तो हा!
मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस इथपर्यंत पोहोचला, ते एवढ्या अल्पावधीत, असं समजण्याचं कारण नाही. गांधी हा मुक्काम नाही. गांधी हा प्रवास आहे. गांधी हे अव्याहत ‘Becoming’ आहे. स्वतःवर एवढे प्रयोग करणारा आणि सतत बदलत गेलेला गांधी समजण्यात आपली फसगत होते तीच मुळी आपण गांधींना ‘स्थितप्रज्ञ’ मानतो म्हणून. ‘परिवर्तनवादी’ या शब्दाला आज जो ‘स्थितीवादी’ अर्थ आला आहे, त्या व्याख्येमुळे आपल्याला गांधी परिवर्तनवादी वाटत नाहीत. विद्रोहीही वाटत नाहीत. गांधींचा मठ करुन टाकणारे गांधीवादी तर या 'पर्सेप्शन'ला सर्वात आधी जबाबदार आहेत. प्रत्यक्षात गांधी हे अत्यंत सळसळते, चैतन्यमय असे प्रकरण. बावीस वर्षांनी धाकटे असलेल्या बाबासाहेबांना भेटल्यानंतर, ‘आंतरजातीय लग्नाशिवाय अन्य लग्नाला जाणार नाही’, अशी प्रतिज्ञा करणारे आणि अर्थातच आजन्म ती पाळणारे गांधी.
‘गांधी मजबूरी का नहीं, मजबूती का नाम है!' गांधींना कधीच कोणापेक्षा मोठं व्हायचं नव्हतं. त्यांना सतत 'मोठं' व्हायचं होतं. उंच व्हायचं होतं. मातीत रुतलेले पाय आणि तरीही आकाशाकडे फैलावलेले हात, असा हा माणूस वाढत राहिला. या लहान चणीच्या माणसानं त्यातून असं विलक्षण तेज मिळवलं की नौआखालीत पेटलेल्या दंगलीत तो एकटा उतरला आणि अवतीभवतीच्या ज्वालांची पर्वा न करता निघाला. लॉर्ड माउंटबॅटन यांनी तेव्हा गांधींना पत्र लिहिलं होतं. माउंटबॅटन म्हणतात, ‘प्रिय गांधी, पंजाबात आमच्याकडं ५५ हजार सैनिक आहेत. आणि, तरीही दंगल आटोक्यात येत नाहीए. बंगालमध्ये आमच्या सैन्यात एकच माणूस आहे. आणि, तिथं मात्र दंगल पूर्णपणे शमलेली आहे. या ‘वन मॅन बाउंड्री फोर्स’बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करु शकतो का?’
तेव्हा आग विझवणा-या गांधींना खलनायक मानून कोणी आज आग लावत असेल, तर तुम्ही त्याचे वाहक होणार का, हा खरा प्रश्न आहे. 'गांधींना जन्म देणारा देश' ही भारताची ओळख जगभर आहे. पण, आपल्याला माहीत आहे, 'गांधींचा खून करणारा देश' हीदेखील भारताची ओळख आहे.
मुद्दा आहे, आपण कोणत्या भारताचे नागरिक आहोत?
डॉ. अमोल कोल्हे, तुम्ही कोणत्या भारताचे नागरिक आहात?
---
Comments
Post a Comment