Skip to main content

लालफितीच्या कारभाराची गोष्ट!

 



लालफितीच्या कारभाराची गोष्ट!

आज खुप दिवसांनी तपन सिन्हा दिग्दर्शित "एक डॉक्टर की मौत" हा अत्यंत सकस आणि वास्तवदर्शी सिनेमा पाहिला. हिंदी चित्रपट क्षेत्रातील मैलाचा दगड ठरावा इतका नितांत सुंदर सिनेमा तपन सिन्हा यांच्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून १९९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर अवतरला. हिंदी चित्रपट क्षेत्रातील अत्यंत ताकदीच्या  पटकथाकार आणि दिग्दर्शकांमध्ये तपन सिन्हा यांचा समावेश होतो. रामपद चौधरी यांच्या गाजलेल्या 'अभिमन्यू' या कादंबरीवर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे.  रामपद चौधरी आणि तपन सिन्हा हे दोघेही काळाच्या पुढचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यातही तपन सिन्हा यांचे प्रामुख्याने हिंदी आणि बंगाली चित्रपटात सृष्टीतील योगदान अत्यंत मोलाचे समजले जाते. त्यांच्या या योगदानाचे मोजमाप करताना सत्यजित रे आणि मृणाल सेन यांच्याशी त्यांची तुलना केली जाते यातच सर्वकाही आले.  चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनातील ११ राष्ट्रीय पूरस्कार आणि सर्व मानाचे पुरस्कार नावावर असलेल्या तपन सिन्हा यांना काळाच्या पुढचा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते ते 'एक डॉक्टर की मौत' सारख्या अनेक वास्तवदर्शी सिनेमामुळेच!

"एक डॉक्टर की मौत" हा असाच काळाच्या २५-३० वर्षे पुढे असलेला चित्रपट पाहताना त्यांची दूरदृष्टी आणि समज अधोरेखित होते.  विषयांतर झाले की काय असे वाचकांना वाटू शकेल पण गेले पंधरा दिवस ग्लोबल टीचर्स पुरस्काराने सन्मानित शिक्षक रंजितसिह डीसले यांना संशोधन रजा देण्यावरून महाराष्ट्रात सरकारी पातळीवर सुरू असलेले राजकारण, वरिष्ठ सरकारी अधिकारी, शासन आणि प्रशासन पातळीवरील अनास्था आणि राजकारण, सरकारी अधिकाऱ्यांनी नाचविलेले कागदी घोडे, चौकश्या,  केलेले आरोप आणि त्याला डीसले गुरुजींनी दिलेली उत्तरे आणि खुलासा यातून या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाल्यावर स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी जातीने लक्ष घातल्यावर हे प्रकरण थांबले असे वाटत होते पण ते थांबलेले नाही. यात डिसले गुरुजी बरोबर की चूक आहेत? त्यांची भाषा आणि वागणे योग्य की अयोग्य आहे? यांची वरीष्ठ अधिकारी आणि प्रसार माध्यमे चर्चा करत असताना त्यांनी काय संशोधन केले आहे आणि आता रजा घेऊन ते काय संशोधन करणार आहेत याचे कोणालाच औत्सुक्य राहिलेले नाही असे वाटते. त्यांनी सरकारी अधिकारी आणि प्रशासनाला फार महत्व न दिल्याने सरकारी अधिकारी आणि प्रशासनाचा अहंकार मात्र दुखावला असल्याची दाट शक्यता वाटते.  एक डॉक्टर की मौत याच्या बराच जवळ जाणारा वाटतो. म्हणून त्यावर लिहिणे-बोलणे आवश्यकच!

मुळात वेगळी आवड निवड असलेल्या, वेगळी विचारधारा असलेल्या व्यक्ती असल्या चाकोरीत अडकून राहणे पसंत करत नाहीत किंवा वैचारिक आणि मानसिकदृष्ट्या त्या अलिप्त किंवा तुसड्याही असू शकतात.  'एक डॉक्टर की मौत'  नेमके हेच अधोरेखित करतो. संशोधनात्मक दृष्टी असलेला आणि अत्यंत गरीब घरातून आलेला प्रथम क्रमांकाने वैद्यकीय पदवी घेतलेला एक उमदा युवक आर्थिक गरज म्हणून शासकीय सेवेत डॉक्टर म्हणून रुजू होतो. त्याची हुशारी पाहून त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय रुग्णालयात नियुक्ती दिली जाते. आपल्या रुग्णांना चुटकीसरशी ठीक करणा-या या डॉक्टरला खरी ओढ असते ती वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाची. आपल्या सगळ्या वैद्यकीय जबाबदाऱ्या इमानइतबारे पार पाडून उरलेल्या वेळेत तो संशोधनाला वाहून घेत असतो त्यामुळे साहजिकच तो आपल्या कुटुंबालाही वेळ देऊ शकत नाही. त्याची हुशारी आणि समज पाहून त्याच्या प्रेमात पडलेली आणि नंतर लग्न केलेली त्यांची पत्नीही त्याच्या या संशोधनाला वैतागली आहे. त्याला संशोधनात मदत व्हावी म्हणून आपले करीअरचे स्वप्न बाजूला ठेऊन त्याच्या दिमतीला ती सतत हजर असते. दरम्यानच्या काळात लग्नाला दहा वर्षे होऊन गेलेली असतात. मूलबाळ नाही, नवरा सतत कामात व्यग्र, हॉस्पिटलमध्ये संशोधनाला परवानगी नाही म्हणुन घरातच प्रयोगशाळा मांडलेली असते. त्यातील उंदरांचा, त्याच्या पालनपोषणाचाही तिला प्रचंड त्रास व्हायला लागलेला असतो.  या दहा वर्षात तो आपल्या संशोधनाच्या अगदी जवळ पोहचलेला असतो. उंदरांच्या जनुकीय प्रणालीतून कॅन्सर सारख्या दुर्दम्य आजारावर उपचार होऊ शकतात याची त्याला खात्री पटलेली असते. रात्रंदिवस कष्ट करून त्याने त्यावर एक शोधनिबंधही लिहिलेला असतो. तो त्याला नामांकित परदेशी वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध करायचा असतो. सरकारी सेवेत असल्याने त्यासाठी शासकीय परवानगी आवश्यक असते. त्यासाठी तो अर्ज करतो पण सरकारी सेवेत असताना संशोधन करता येणार नाही, असे कारण देत वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी परवानगी नाकारतात. त्यात त्याचा वरिष्ठांशी वाद होतो. तो वरिष्ठ अधिकारी या डॉक्टरवर 'सरकारी स्रोतांचा आणि वेळेचा खाजगी फायदासाठी वापर केला' असा ठपका त्याच्यावर ठेऊन त्याची चौकशी सुरू करतो. त्याच्या संशोधनाची आणि शोधनिबंधाची सरकारी अधिकारी आणि सहकारी डॉक्टर जाणूनबुजून टिंगलटवाळी करायला लागतात. साहजीकच त्याचा त्याच्या मनावर आणि संशोधनावर परिणाम होतो. त्याचा परिणाम त्याच्या कौटुंबिक स्वास्थ्यावर होऊ लागतो. याच्याशी लग्न करून आपल्या आयुष्याचे मात्रे झाले असे त्याच्या पत्नीला वाटायला लागते. सांसारिक आयुष्य असे पणाला लागलेले असताना त्याचे गुरू आणि ज्येष्ठ शिक्षक त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. त्याच्या परस्पर त्याचे शिक्षक तो शोधनिबंध अमेरिकेतील नामांकित जर्नलला प्रसिद्धीसाठी पाठवून देतात. त्या जर्नलचे संपादक तो शोधनिबंध पाहून प्रभावित होतात आणि अमेरिकेतील नामांकित वृत्तपत्रात त्याची समीक्षा करतात. मग भारत सरकार खडबडून जागे होते. डॉक्टरच्या या संशोधनामुळे कॅन्सरवर तर उपचार शक्य आहे पण व्यंधत्व असलेल्या महिलांना मातृत्व ही प्राप्त होऊ शकते हे निष्कर्ष पाहिल्यावर बायकोला आपल्या नवऱ्याचे आपल्यावर किती प्रेम आहे हे उमगते. घटस्फोटाच्या उंबरठ्यावरून ती माघारी फिरते आणि त्याच्यामागे ठामपणे उभी राहते खरी पण सरकार दरबारी मात्र आरोग्य मंत्र्यापासून सगळे त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावतात. संशोधनात आम्हांला सहयोगी संशोधक म्हणून संधी द्या ते राजीनामा द्या असे अनेक पर्याय या चौकशीतुन सुटका करून घेण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी त्यांच्यासमोर ठेवले जातात. परंतु हा डॉक्टर निडर आणि तितकाच बेदरकार असतो. आपल्या चौकशीला आलेल्या सरकारी अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवून देण्यापासून आरोग्य मंत्र्याचे वस्त्रहरण करण्यात तो काहीच कसूर ठेवत नाही. शासन आणि प्रशासन त्याच्यावर कडक कारवाई करू इच्छित असते पण तोपर्यंत त्याची आंतरराष्ट्रीय ख्याती मात्र वाढलेली असते. त्याला परदेशात संशोधनासाठी निमंत्रण येते. 'आपले स्वप्न सत्यात येणार' असा आशेचा किरण त्याला दिसत असतानाच मंत्री आणि सरकारी अधिकारी यांची एक गुप्त बैठक आयोजित केली जाते. त्यात याला परदेशातील संशोधनासाठी रजा कशी नाकारता येईल यावर चर्चा होते. चर्चेतील फलितानुसार त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला व्हिसा आणि पासपोर्टसाठी परवानगी नाकारली जाते. सरकारी नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेऊन त्याची एका अत्यंत दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली केली जाते. चौकशी पूर्ण झाली नाही याचे कारण देऊन त्याचा राजीनामाही नाकारला जातो. २४ तासाच्या आत त्याने नवीन ठिकाणी रुजू व्हावे असे फर्मान काढले जाते. अत्यंत हताशपणे हा डॉक्टर आपला संसार, बायको आणि संशोधन मागे ठेऊन नविन नोकरीच्या ठिकाणी निघून जातो.

चित्रपटातील संवाद आणि कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची अत्यंत जमेची बाजू आहे. पंकज कपूर यांनी  हुशार पण सनकी आणि नंतर हतबल झालेला होतकरू डॉक्टर अत्यंत ताकदीने साकारला आहे.  त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत त्या शबाना आझमी! प्रत्येक भूमिकेचे सोने करण्याची क्षमता असलेल्या शबाना आझमीनी आपल्या कसदार अभिनयाने बंडखोर बायको, मातृत्वासाठी आसुसलेली स्त्री आणि गरजेच्या वेळी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या संघर्षात ठामपणे उभी राहणारी पत्नीची भुमीका अत्यंत ताकदीने साकारली आहे.  दिवंगत अभिनेते इरफान खान  आणि दीपा साही यांनीही त्यांना समर्पक साथ दिली आहे.

कलाकारांचा अभिनय, कथा, पटकथा दिग्दर्शन आणि डीसले गुरुजी बाबत सुरू असलेला खेळ लक्षात घेता 'एक डॉक्टर की मौत' एकदा पाहायलाच हवा!

© के. राहुल, ९०९६२४२४५२


Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...