Skip to main content

साने गुरुजी यांचे पत्र

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडणाऱ्या वसंताला साने गुरूजींनी लिहलेले अतिशय महत्वाचे पत्र


थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी . जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत.


प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद

दत्तु नावाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलात आला हे वाचून आनंद झाला. जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवायत करून संघातील मुलांची शरीरे दणकट होतील. परंतु शरीरातील मने विषारी होत आहेत. आपल्या संघटनेतील मुलांच्या कानांवर नवीन विचार ते जाऊ देत नाहींत. बौध्दिक गुलामगिरी निर्मिली जात आहे! दुनियेतील सर्व विचारांचा व प्रयोगांचा अभ्यास करून जर कोणी एखादा मार्ग पत्कारला तर ती गोष्ट निराळी, परंतु या जातीय संघटना मुलांची बुध्दीच मारीत आहेत. त्यांच्या आत्म्याचा वध करीत आहेत.


आपल्या हिंदुधर्मात गायत्री मंत्राला आपण अत्यंत पवित्र मानले आहे. का बरे? वेदांत शेकडो मंत्र आहेत. परंतु ह्याच मंत्राला आपण प्राधान्य का दिले? कारण या मंत्रात स्वतंत्र विचारांची देणगी मागितली आहे. सूर्याजवळ प्रार्थना केली आहे की, ‘हे सूर्या, जसा तुझा प्रकाश स्वच्छ आहे, तशी आमची बुद्धी सतेज राहो. आमच्या बुद्धीला चालना दे.


‘गायीगुरे, धनसंपत्ति, संतति वगैरेंची मागणी करणारे वेदामध्ये शेंकडो मंत्र आहेत, परंतु बुध्दिची मागणी करणारा मंत्र आपण पवित्र मानला. ती बुध्दीच आज मारली जात आहे. एका ठराविक साचाचे अहंकारी विषारी खाद्य अशा संघटनांतून दिले जात आहे. या संघटनाचे पुरस्कर्ते आपापल्या संघटनांभोवती भिंती बांधीत आहेत. बाहेरच्या विचारांची त्यांना भीती वाटते. परंतु बाहेरचे विचार आल्याशिवाय राहणार नाहीत. विचारांना कोण अडथळा करणार?


संघटनेला शास्त्रीय  विचार हवा

हिमालयाची उंच शिखरे ओलांडून ते विचार धावत येतील. सप्तसागर ओलांडून ते विचार येतील. तुमच्या भिंती कोलमडून पडतील. नवविचारांची ज्यांना भीती वाटते, त्यांचे तत्वज्ञान कुचकामी आहे. बायबलमध्ये एक वाक्य आहे, ‘तुझे घर खडकावर बांध म्हणजे ते वादळात पडणार नाही, पावसात वाहून जाणार नाही.’ त्याप्रमाणे आपल्या संघटना शास्त्रीय विचारांच्या पायावर उभारल्या पाहिजेत. परंतु शास्त्रीय विचारांची तर या संकुचित मंडळीस भीती वाटते.


वसंता, एखादे लहानसे रोपटे तू उपटून बघ. त्याची मुळे एकाच दिशेला गेलेली दिसतील का? नाही. झाडांची मुळे दशदिशांत जातात. जेथे जेथे ओलावा मिळेल तेथे तेथे जाऊन तो ओलावा घेऊन झाडे उभी राहतात. त्याप्रमाणे आपले जीवन हवे. ज्ञानाचा प्रकाश कोठूनही येवो. त्याचा आपण सत्कार केला पाहिजे. दाही दिशांतून प्रकाश येवो. सर्व खिडक्या मोकळया असू देत. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत काय चालते?


अन्य मतांचा वाराही आपल्या संघातील मुलांच्या कानांवर येऊ नये म्हणून तेथे खटपट केली जाते! मी मागे संगमनेर येथे गेलो होतो. सायंकाळी माझे व्याख्यान आहे असे जाहीर होताच संघचालकांनी एकदम आपली मुले कोठेतरी बाहेर नेण्याचा कार्यक्रम ठरविला. तुला हा अनुभव आहेच. तूच मागे आपल्या पहिल्या भेटीत म्हणाला होतास. ‘आमची कीव करा. आम्हाला दुसरे विचार ऐकूच देत नाहीत.’ ती सत्य गोष्ट आहे. मला या गोष्टींचे फार वाईट वाटते.


शत्रूंचा द्वेष, हेच भांडवल

पलटणीतील लोक असतात ना, त्यांना अज्ञानात ठेवण्यात येत असते. सरकार पसंत करील तिच वर्तमानपत्रे मिळाली तर त्यांना मिळतात. नवाकाळ, लोकमान्य, लोकशक्ति, क्रॉनिकल अशी राष्ट्रीय पत्रे पलटणीत जातील का? पलटणीतील शिपायांना पशूप्रमाणे मारामारीसाठी तयार ठेवण्यात येते! गोळी घाल म्हणताच त्यांनी गोळी घातली पाहिजे. सत्य काय असत्य काय, याचा विचार त्यांनी करायचा नसतो. पलटणीत जसे हे विचारशून्य टॉमी तयार करण्यात येतात तसेच आम्हीही आज टॉमी तयार करीत आहोत!


शत्रूंचा द्वेष ही एकच गोष्ट शिपायास सांगण्यात येते. १७८९ च्या फ्रेंच क्रांतीच्या वेळेस फ्रेंच लोक म्हणजे आग लावणारी माकडे आहेत, अशा प्रसार इंग्लंडमध्ये करण्यात येई. एकदा फ्रेंच कैदी लंडनमधील रस्त्यातूंन नेले जात होते. फ्रेंच माणसास खरोखरीच पाठीमागे शेपटे असतात की काय ते पाहण्यासाठी त्यांचे कोट इंग्रज लोक पाठीमागून गंभीरपणे उचलून बघत! विषारी प्रचाराचा असा परिणाम होत असतो.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणते बौध्दिक खाद्य दिले जाते? वर्तमानपत्रांत मुसलमानांनी केलेले अत्याचार जे येतील, त्यांची कात्रणे म्हणजे यांचे वेद! ‘कृण्वन्तो विश्रमार्यम्’ हे यांचे ब्रीद वाक्य. ‘हिंदुस्थान है हिंदुओं का, नहीं किसी के बाप का.’ हा यांचा महान मंत्र. जर्मनीने ज्यू हद्पार केले. आपणही मुसलमानांना घालवू, हे यांचे स्वप्न. आपली संस्कृती, आपला धर्म किती उच्च!


हे मुसलमान म्हणजे बायका पळवणारे. मुसलमान म्हणजे शुध्द पशु. त्यांना न्याय ना नीती. मुसलमानांना लांडे या शिवाय दुसरा शब्द ते लावणार नाहीत. असा हा मुसलमान द्वेष लहान मुलांच्या मनात ओतण्यात येत आहे. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा दोघांकडून हे पाप होत आहे.


बायबलमध्ये एक वाक्य आहे, ‘माझ्या लहानग्यांना जो बिघडवितो त्याने सर्वांत मोठे पाप केले!’ आज असे पाप आमचे जातीय पुढारी करीत आहेत. त्यांना ना धर्माची ओळख ना संस्कृतीची. एखाद्या जातीचा किंवा धर्माचा द्वेष करणे म्हणजे केवळ मनुष्यद्रोह आहे. भलेबुरे लोक सर्वत्रच आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व लोकांना पशु मानणे म्हणजे बुध्दिचे दिवाळे निघाल्याचे चिन्ह आहे.


१९१४-१८ च्या महायुध्दांत शत्रूकडच्या कैद्यांना सर्वांत चांगल्या रीतीने जर कोणी वागविले असेल तर ते तुर्कस्तानने, असा युरोपिय राष्ट्रांनी निकाल दिला. तुर्की लोक मुसलमान धर्माचेच आहेत. 


हिंदुस्थानांतील मुसलमान हिंदूंतूनच गेलेले असेही आपण म्हणतो. जर हे हिंदी मुसलमान तेवढे वाईट असतील तर आपण हिंदूच वाईट असा त्याचा अर्थ होतो. कारण हे मुसलमान प्रथम हिंदुच होते, असे आपण सांगत असतो. वसंता, पापाचा मक्ता कोणा एका जातीला नाही. हिंदू स्त्रियांना मुसलमान गुंड पळवतात. पुष्कळ वेळा आमच्याच श्रीमंत लोकांना त्या सुंदर स्त्रिया हव्या असतात. मुली किंवा बायका पळविण्याऱ्या टोळया असतात. त्यात हिंदू व मुसलमान दोन्ही प्रकारचे लोक असतात, असे दिसून आले आहे.


मुसलमानांवर टीका करणारे साहेबांबद्दल गप्प

पुष्कळ वेळा हिंदूंच्या रुढीमुळेही हिंदू स्त्रिया अनाथ होतात. जरा वाकडे पाऊल पडले तर त्या स्त्रीला आपण जवळ घेत नाही. जणु आपण सारे पुरुष पुण्यात्मेच असतो! अशा निराधार स्त्रिया मिशनमध्ये जातात किंवा मुसलमान त्यांना जवळ करतात. याचा अर्थ असा नाही की काही मुसलमान गुंड अत्याचार करीत नसतील, परंतु गुंडांना शिक्षा करा. सारे मुसलमान बायका पळविणारे असे म्हणू नका. सबंध जातच्या जात नीच मानू नका. त्यांच्यातही आयाबहिणी आहेत, हे आपण विसरता कामा नये.


जे मुसलमान गुंड असतील त्यांचे शासन होऊ नये असे काँग्रेसने कधीच म्हटले नाही. स्त्रियांवर अत्याचार झाला तर महात्माजी किती संतापतात. मागे मुंबईला ऑस्ट्रेलियन टॉमींनी हिंदी स्त्रियांचा अपमान केला. त्या विरुध्द शेवटी कोणी लेखणी उचलली? उठल्यासूटल्या मुसलमानांच्या काल्पनिक वा अतिशयोक्तीने भरलेल्या अत्याचारांवर टीका करणारे आमचे सारे जातीय हिंदू पुढारी व त्यांची पत्रे मूग गिळून बसली होती.


मुसलमानांवर टीका करतील, परंतु साहेबावर आणि त्यांतल्या त्यांत लढाईच्या काळात डिफेन्स अ‍ॅक्ट चालू असता, कोणी टीका करावी? परंतु महात्माजींनी जळजळीत लेख लिहिला. हिंदी स्त्रियांची अब्रू सांभाळण्यासाठी हाच एक धीरवीर महात्मा उभा राहिला. व्हाइसरॉय का झोपले, सैन्याचे अधिकारी का झोपले, असे त्यांनी विचारले, अणि शेवटी लिहिले, ‘हिंसा वा अहिंसा, स्त्रियांची विटंबना होता कामा नये. हिंदी स्त्रियांच्या अब्रुला धक्का लागता कामा नये. जनतेने तत्क्षणी त्याचा प्रतिकार केला पाहिजे.‘


गुंडांचे पारिपत्य झाले पाहिजे. स्त्रियांच्या अब्रुचे रक्षण केले पाहिजे. परंतु तेवढयासाठी संबंधच्या सबंध मुसलमानांस सारख्या शिव्या देण्याची जरुरी नाही. ‘लांडे असेच !’ असे म्हणण्याची जरूरी नाही. आणि आपणही आपल्या स्त्रियांना अधिक उदारपणे वागविले पाहिजे. 


‘कृण्वन्तो विश्रमार्यम्’ याचा अर्थ काय? सर्वांना का तुमच्या धर्माची दीक्षा देणार? सर्वांना का शेंडया व जानवी देणार? जगात केवळ आर्य जात नाही. या देशांतच द्रविडीयन लोक आहेत. ते का आर्य आहेत? आर्य तेवढे चांगले असा अहंकार भ्रममूल आहे. जगाच्या संस्कृतीत सर्व मानवी वंशांनी भर घातली आहे. आज हिटलर म्हणतो की ‘आर्य तेवढे सर्वश्रेष्ठ. ज्यूंना द्या हाकलून. ‘परंतु आईन्स्टाईन सारखे शास्त्रज्ञ ज्यूंत निर्माण झाले. कोणतीही एक जात, कोणताही एक मानववंश इतरांपेक्षा श्रेष्ठ असे नाही. कोणासही अहंची बाधा व्हायला नको. 


खरंच आपण आर्य आहोत?

‘कृण्वन्तो विश्रकार्यम्’ याचा अर्थ इतकाच की आपण सर्व जगाला उदार व्हायला शिकवूया. आर्य म्हणजे दार-चरित. आपण एक जात मुसलमानांना निंद्य म्हणू तर आपणच अनुदार व अनार्य ठरु. आर्य म्हणवून घेण्यास नालायक ठरू. ‘अरिषु साधु: स आर्य:’ शत्रू जवळही जो प्रेमाने वागतो तो आर्य. असा आर्यपणा आपणाजवळ कोठे आहे? आपण आपल्या शेजारी शेकडो वर्षे राहणाऱ्यांना आज पाण्यात बघत आहात. हा का आर्यपणा?


जर्मनीने काही लाख ज्यू लोकांस बाहेर घालविले. आपण आठ कोटी मुसलमानांस कसे बाहेर घालवणार? ते तर शेकडो वर्षें घरेदारे करुन येथे राहिले. हिंदू मुसलमान नवसंस्कृती निर्मित होते. परस्पर प्रेमभाव शिकत होते. जर्मनीचे अनुकरण करणे म्हणजे वेडेपणा आहे. भारताची परिस्थिती निराळी, भारतीय राष्ट्राची परंपरा निराळी, इतिहास निराळा आणि शेजाऱयांस घालवण्यात पुरुषार्थं नाही. त्यांच्याशी मिळते घेऊन सहकार्य करण्याची पराकाष्टा करणे यात मोठेपणा आहे.


आपण मुसलमानांच्या शेजारी शेकडो वर्षें रहात आहोत. सहा हजार मैलांवरून आलेल्या इंग्रजांचे वाङमय आपण आत्मसात केले. आपण इंग्रजीत बोलू लिहू. इंग्रजी ग्रंथातील उतारे देऊ. पाश्चिमात्य संस्कृती आपण पचनी पाडली. मुसलमानबंधू इतकी वर्ष आपल्याजवळ रहात आहेत. परंतु त्यांची भाषा शिकण्याची, त्यांची संस्कृती अभ्यासण्याची, त्यांच्या धर्मांतील चांगुलपणा पाहण्याची बुध्दी आपणास झाली नाही. एक काळ असा होता की ज्या वेळेस हे आपण करीत होतो. हिंदु मुसलमान एकमेकांचे चांगले घेत होते. एकमेकांची भाषा बोलत होतो. परंतु ब्रिटिश आले आणि आपण परस्परांचे शत्रु बनलो. परसत्तेचे मात्र आपण पाय चाटीत बसलो.


फक्त मुसलमानी धर्मच वाईट?

मुसलमानी धर्म का केवळ वाईट? मुहंमद पैगंबरांचीही आम्ही कधीकधी कुचेष्टा करतो. ज्या थोर पुरुषाने वाळवंटातील लोकांत अशी ज्वाला पेटविली की जी क्षणांत स्पेनपासून चीनपर्यंत पसरली, तो पुरुष का शुद्र? तो पुरुष का रंगीला रसूल? जनता कोणाच्या भजनी लागते? जनता शील व चारित्र्य ओळखते. मुहंमद चारित्र्यहीन असते तर आज पंधराशे वर्षे पंचवीस तीस कोट लोक त्यांच्या नादी का राहते? इंग्लंडमधील विश्वविख्यात इतिहासकार गिबन याने मुहंमदाची स्तुतिस्तोत्रे गायिली. गिबनला का कोणी लाच दिली होती? कार्लाईल या प्रसिध्द पंडिताने मुहंमदांवर स्तुती सुमनांजली वाहिली. कार्लाईलला का कळत नव्हते? 


मुहंमद पैगंबर एक ईश्वरी विभूति होते. त्यांना जेव्हा एकाने विचारले, ‘तुम्ही काही चमत्कार करा.’ तेव्हा ते म्हणाले, ‘वाळवंटात मधूनमधून झरे दिसतात. वाळवंटात गोड खजुरीची झाडे आढळतात. समुद्रावर लहानशा होड्याही डौलाने नाचतात. माणसावरच्या प्रेमाने सायंकाळ होताच त्यांची गाईगुरे घरी परत येतात. असे हे चमत्कार सभोवती भरले आहेत. 


मुहंमदांची राहणी साधी. ते पाणी पीत व कोरडी भाकर खात. एकदा शत्रु त्यांच्या पाठीस लागला होता. मुंहमद थकून झाडाखाली झोपले. तो वैरी तेथे आला. त्याने तलवार उपसली. मुहंमद जागे झाले. त्यांनी वैऱ्याकडे पाहिले. वैऱ्याच्या हातची तलवार एकदम गळली. महंमदांनी ती झटकन उचलली व ते म्हणाले, ‘आता मी तुला मारु शकतो. परंतु मी मारीत नाही. जा. मला मारणाऱ्याला मी प्रेम देतो.’ असे हे मुहंमदाचे अंतरंग.


आपसात का भांडता, दुनियेत जा

धर्मांमध्ये काही भाग अमर असतो. काही त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे असतो. अरब लोक आपसात भांडत होते. त्यांची भांडणे मिटविण्यासाठी मुहंमद म्हणाले, ‘आपसात काय भांडता? दुनियेत जा. जग तुमचे आहे. तुमचा धर्म जगाला द्या.’ आपल्या मराठयांच्या इतिहासात असाच एक प्रसंग आहे.


राजाराम महाराजांच्या वेळेस मराठे आपसात भांडत होते. तेव्हा राजाराम महाराजांनी असे फर्मान काढले, ‘दिल्लीच्या साम्राज्याचा जो जो मुलूख कोणी जिंकून घेईल, तो तो त्याला जहागीर म्हणून देण्यात येईल!’ हे जाहीर होताच आपसात भांडणारे मराठे सरदार हिंदुस्थानभर पसरले. दिल्लीच्या साम्राज्याचे लचके त्यांनी तोडले. 


कुराणात एक ठिकाणी लिहिले आहे, ‘ज्याप्रमाणे मला ईश्वरी ज्ञान झाले आहे, त्याप्रमाणे जगात इतर महात्मासही झाले असेल. अरबांनो, तुम्ही मला मान देता तसा त्यांनाही द्या.’ 

जो दुसऱ्या धर्माची टिंगल करील त्याला धर्म कळलाच नाही. गीतेने सांगितले आहे की ‘जेथे जेथे मोठेपणा दिसेल तेथे तेथे माझा अंश मान! ईश्वराचा मोठेपणा सर्वत्र भरलेला आहे.’ स्वामी विवेकानंद मुहंमदांच्या जन्मतिथीस उपवास करीत, ख्रिस्ताच्या जयंतीस उपवास करीत, ज्याप्रमाणे रामनवमी, गोकुळाष्टमीस ते उपवास करीत. विवेकानंदांना का हिंदुधर्मांचा अभिमान नव्हता? परंतु त्यांचा अभिमान मुहंमद पैगंबरांची पूजा करण्याइतका आर्य होता.


देवदुताचा परमेश्वराशी संवाद

किती सुंदर सुंदर संवाद व वचने मुसलमानी धर्मग्रंथात आहेत. एके ठिकाणी प्रभूचा देवदूतांशी झालेला संवाद आहे. देवदूत परमेश्वराला विचारतात, ‘सर्व जगात बलवान काय?’


देव म्हणाला, ‘लोखंड’

त्यांनी पुन्हा विचारले, ‘लोखंडाहूनहि बलवान काय?’

ते म्हणाले, ‘अग्नि! कारण अग्नि लोखंडाचा रस करतो.’

त्यांनी पुन्हा विचारले, ‘अग्नीहून प्रबल कोण?’

देव म्हणाला, ‘पाणी. कारण पाण्याने अग्नि विझतो.’

पुन्हा त्यांचा प्रश्न आला, ‘पाण्याहून बलवान कोण?’

तो म्हणाला, ‘वारा. कारण वाऱ्यामूळे पाण्यावर लाटा उत्पन्न होतात.’

पुन्हा ते विचारते झाले, ‘वाऱ्याहून प्रबळ काय?’

देव म्हणाला, ‘पर्वत. कारण पर्वत वाऱ्यांना अडवतात.’

शेवटी प्रश्न आला, ‘पर्वताहून प्रबळ कोण?’

देवाने उत्तर दिले, ‘परोपकारी हृदय. ते पाषाणासही पाझर फोडील.’


असे हे संवाद त्या धर्माचा गाभा आहे. ‘तू एकटा खाऊ नकोस. शेजाऱ्याला तुझी भाकर दे.‘ असे कुराण सांगते. सुफी कवी म्हणतात, ‘बाहेरच्या मशिदीचा दगड दुखावला गेला तरी चालेल, परंतु कोणाच्याही दिलाची मशिद दुखवू नकोस!‘


आपण कचऱ्याच्या पेटीजवळ कचरा टाकतो. तेथे धान्याचा अंकुर वर आलेला दिसतो. तो सुंदर अंकुर त्या कचऱ्यांतून का वर आला? नाही. त्या कचऱ्यात धान्याचा एक टपोरा दाणा होता. त्या दाण्यातून तो अंकुर वर आला. कचऱ्यात ती शक्ती नव्हती. जगात जे सत्य आहे त्याचीच वाढ होते. जी काही पुण्याई असते ती फळत असते. ती पुण्याई संपली म्हणजे भाग्य संपते. जगात कोठेही कोणाचाही जो विकास होतो, तो त्याच्या पापांमुळे होत नसतो. काहीतरी सत्अंश त्या पापसंभारांत असतो. तो सत्अंश वाढतो.


चांगलं घेऊन पुढे जाऊ

आणि मी मागेच सांगितले आहे की, पूर्वीच्या इतिहासातून भले ते घेऊन पुढे जाऊ या. वसंता, परवा गाडीत एक गृहस्थ भेटले होते. ते म्हणू लागले, ‘मुसलमानांचे सारे आमच्या उलट. त्यांना धर्मच नाही. हिंदूंच्या उलट करणे म्हणजे जणू त्यांचा धर्म! आम्ही पूर्वेकडे, सूर्याकडे तोंड करू तर त्यांचे पश्चिमेकडे तोंड. आम्ही दाढी काढू तर ते दाढी राखतील. आम्ही अलग अलग जेवू. ते एका थाळीत जेवतील.’ असे त्या गृहस्थांचे व्याख्यान चालू होते.


लहान कोवळया मुलांनाहि या गोष्टी सांगण्यात येतात. परंतु केवळ हिंदूंच्या उलट करणे हा त्यांत हेतु नाही. मक्का पश्चिमेकडे आहे. तिचे स्मरण म्हणून ते पश्चिमेकडे तोंड करतात. आपल्यातही उत्तरेकडे तोंड करुन औषध घेण्याची पध्दत आहे. संध्येच्या वेळी कधी कोणी उत्तरेकडेही तोंड करतात. का बरे? आपण उत्तर ध्रूवाकडून आलो त्याची ती खूण आहे. मुसलमान पश्चिमेकडे पाहतात म्हणून जर त्यांना या देशात स्थान नसेल तर आपण उत्तरेकडे पाहतो म्हणून आपणासही नसावे. मुसलमान बाहेरून येथे आले आणि आपण का येथलेच आहोत? आपणही ध्रूवावरच्या बर्फात पुन्हा मरायला जाऊ या. फक्त द्रविडियन लोकांना येथे राहू दे.


त्या त्या देशांतील परिस्थितीप्रमाणे रीतिरिवाज पडत असतात. अरबस्थानात वाळवंटे आहेत. वाऱ्याने वाळू उडते. दाढीमुळे संरक्षण होते. ती वाळू नाकातोंडात शिरत नाही. अरब लोक एकत्र जेवत. त्यांचे खाणे कढी-आमटीचे नसे. त्यांचा आहार म्हणजे सुका मेवा, किंवा कोरडी भाकर. चादरीवर खजूर पसरीत, एकत्र खात. ती चाल इकडेही आली. इकडे कढीभात ते खाऊ लागले! परंतु एकत्र जेवणाची चाल राहिली. मारवाडात पाणी कमी म्हणून तेथे भांडी कोरडयाच राखेने घासतात. मारवाडी महाराष्ट्रात आले तरी तीच चाल त्यांची राहिली. अशा चाली राहतात. त्या केवळ दुसऱ्यांच्या विरुध्द वागण्यासाठी नसतात.


गायीच्या कुरबानीमागची कथा

मुसलमान गायीची कुरबानी करतात. या चालीचा इतिहासही पाहिला पाहिजे. एक मुसलमान साधू होता. देव व देवदूत यांच्यात चर्चा चालली होती.


देवदूत म्हणाले, ‘देवा, तो काही तुझा खरा भक्त नाही.’ देव म्हणाला, ‘तो साधु माझा खरा भक्त आहे. मी त्याची परीक्षा घेतो.’ देव त्या साधूच्या स्वप्नात आला व म्हणाला, ‘तुझी सर्वांत प्रिय अशी जी वस्तु असेल ती मला अर्पण कर.’ साधु दुस-या दिवशी जागा झाल्यावर विचार करू लागला. त्याची आवडती एक बकरी होती. देवाने ती बकरी का मागितली? त्याने ती आवडती बकरी बळी दिली. परंतु देव पुन्हा स्वप्नांत आला व म्हणाला, ‘त्या बकरीहूनही प्रिय अशी एक वस्तु तुझ्याजवळ आहे ती मला दे.’ साधु सकाळी विचार करू लागला. तो म्हणाला, ‘खरेच. माझा मुलगा मला बकरीहूनही प्रिय आहे.’ त्याने आपल्या मुलाला बळी द्यायचे ठरविले. मुलाला मारण्यासाठी त्याने तलवार वर केली तोच देवाने वरचेवर हात धरला. प्रभु म्हणाला, ‘तू माझ्या कसोटीस उतरलास. तू खरा भक्त आहेस.’ अशी ही गोष्ट आहे.


त्या गोष्टीची स्मृती म्हणून मुसलमान त्या दिवशी कुरबानी करतात. केवळ हिंदूच्या भावना दुखविण्यासाठी नव्हे. परंतु मुसलमानांसही ही रुढी का आली ते माहीत नाही, आपणांसही माहीत नाही. आपण गाईची पूजा करणारे. आपणास वाटले की, मुसलमान मुद्दाम हे करतात. आणि अडाणी मुसलमानांसही वाटले की, बरे आहे हे हिंदूंना चिडविणे!


हिंदुंना तरी गायीचं प्रेम किती?

किती तरी मुसलमानांच्या घरीही गायी असतात. आपण हिंदू प्रेम करतो. त्याप्रमाणे तेही करतात. आणि हिंदूंत तरी गाईवर कितीसे प्रेम आहे? गाईची अवलाद सुधारणे, तिचे दूध वाढविणे, हे सारे दूरच राहिले, गाईला आपण वेळेवर खाऊ घालणार नाही, पाणी पाजणार नाही. आपण स्वत:ला गोपूजक म्हणवितो, परंतु म्हशींची उपासना करतो व त्यांचे दूध पितो!


मुसलमान राजांनी गोवधबंदी केली होती. परंतु गोरे साहेब आले. त्यांना गोमांसाची चटक. त्यांनी ठायी ठायी कत्तलखाने सुरु केले. गोऱ्या साहेबांना व शिपायांना गोमांस पुरविण्यासाठी गायींचा संहार सुरू झाला. सरकारी कत्तलखान्यांतून लाखो गायींचा होणारा संहार हिंदू मुकाटयाने बघतात. मग आपण पूर्वीप्रमाणे गायीची कुरबानी का करु नये, असे मुसलमानांस वाटू लागते. बंद झालेली कुरबानी पुन्हा होऊ लागली. 


परंतु याला उपाय म्हणजे सत्कल्पनांचा प्रसार करणे हाच आहे. त्यांनी गाय मारली म्हणून त्यांना मारणे हा उपाय नव्हे. ते एक पूर्वीची धार्मिक स्मृती म्हणून तरी मारतात, परंतु साहेबाच्या जिव्हालोल्यासाठी होणाऱ्या कत्तलींविरूध्द आपण काय करीत आहोत? ही कत्तल आपण थांबविली तर मुसलमानांसही वाटेल की, खरोखरच गाय हिंदूंस प्राणांहूनही प्यारी आहे.


मग खरा हिंदू ओळखावा कसा?

वसंता, माझे म्हणणे इतकेच की, उगीच द्वेष पसरु नये. गोष्टी कशा रुढ झाल्या ते पहावे. द्वेषाने द्वेष वाढतो. एखाद्या मुलाला नेहमी आपण दगड आहेस असे म्हटले तर खरोखरच तो तसा नसला तरी तसा होईल! त्याप्रमाणे ‘लांडे असेच, मुसलमान म्हणजे वाईटच, बायका पळवणारे’ असे जर आपण नेहमी म्हणूं तर मुसलमान तसे नसले तर तसे होतील. आपल्या सदैव म्हणण्याचा तो परिणाम होईल. म्हणून आपली सत्श्रध्दा दुसऱ्यावर आपण लादीत असावे.


‘तू चांगला होशील. चुकीच्या कल्पनांमुळे तू असा वागत आहेत. तू मुळात वाईट नाहीस.’ असे आपण म्हटले पाहिजे. शास्त्रज्ञ डांबरांतून सुंदर रंग काढतात. डांबरांतून साखर काढतात. माणूस का डांबराहून डामरट आहे? मुसलमान सारे वाईट, ते कधीही चांगल्या रीतीने वागणार नाहीत, असे म्हणणे म्हणजे नास्तिकवाद होय. मी तर परमेश्वरावर - म्हणजेच शेवटी सारे चांगले होईल यावर विश्वास ठेवणारा आहे. ‘अहं ब्रह्मस्मि, तत्वमसि - मी मंगल आहें व तूंहि मंगल आहेस.’ या उपनिषदाच्या वचनावर श्रध्दा ठेवणारा मी खरा हिंदू आहें.


असो. आपण आपली श्रध्दा घेऊन जावे. रवीन्द्रनाथांनी म्हटले. आहे, ‘तुझा दिवा घेऊन तू जा. तुझ्यावर टीका होतील. तुझा दिवा विझवतील. पुन्हा लाव. तुला एकट्यानेच जावे लागेल.’ वसंता, तुला माहीत आहे की नाही मला ठाऊक नाही;  परंतु काही हिंदू महासभेचे लोक मला ‘मुल्ला’ म्हणतात. म्हणोत बिचारे. त्याने मी माझ्या ध्येयाजवळ येतो असेच मला वाटते. मी सर्वांचा आहे. माझा देव सर्वाचा आहे. सर्व विश्वाचा आहे. तू प्रकृतीस जपत जा हो. सर्वांस सप्रेम नमस्कार व आशीर्वाद.


तूझा,

श्याम


साने गुरुजी यांचे दुर्मिळ विचार नियमितपणे मांडणारे हे निस्वार्थ पेज फॉलो करा, शेयर करा, आपणही सहभागी व्हा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2821253614756237&id=1510990029115942

Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review

  The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review.                                                                                                                         ©Dr.K.Rahul, 9096242452 Abstract: This working paper presents a detailed biographical and critical examination of Hiralal Gandhi (1888–1948), the eldest son of Mahatma Gandhi. Unlike his illustrious father, Hiralal led a tumultuous life, often marked by rebellion, estrangement, and personal struggles. This study delves into his life events chronologically and thematically, exploring his education, family relationships, perspective on India’s indepen...