*शूर्पणखा कोण होती?*
महर्षी वाल्मिकी लिखित रामायणाच्या कथेला कलाटणी देणारे व्यक्तित्व म्हणजे *'शूर्पणखा!'*
आजपर्यंत आपल्यासमोर रामायणातला संघर्ष राम विरुद्ध रावण असा आणला गेला; पण वस्तुस्थिती अशी आहे, की रामायणातला मूळ संघर्ष राम विरुद्ध रावण असा नसून 'ब्राह्मणी प्रवाहाचे प्रतिनिधित्व करणारा पुरुषसत्ताक राम विरुद्ध अब्राह्मणी प्रवाहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीसत्ताक गणराज्ञा' असा हा संघर्ष राहीला आहे. या गणराज्ञांत ताटका, अहल्या, परशु, सीता, शूर्पणखा, शबरी, मंदोदरी यांचा समावेश होतो. ही सारी स्त्रीराज्ये रामाने नष्ट केली व अशा स्त्रीसत्ताक राज्यातील तत्कालीन एकमेव उत्पादन साधन म्हणजे शेती ताब्यात घेऊन तिथे पुरुषसत्ताक राज्ये स्थापन केली.
अशीच एक स्त्री राज्यकर्ती अथवा गणराज्ञी होती शूर्पणखा! मी या ठिकाणी 'राज्ञी' असा शब्दप्रयोग केला आहे, 'राणी' हा शब्द मुद्दाम टाळला आहे; कारण, 'राज्ञी' या शब्दाचा अर्थ सर्वेसर्वा, स्वतंत्र, सार्वभौम असा होतो; तर 'राणी' या शब्दाचा अर्थ कोण्यातरी राजाची बायको असा होतो आणि बायको म्हणजे नवऱ्याची दासी.. गुलाम..! गणराज्ञी ही स्वतंत्र होती, सार्वभौम होती. ती कोणत्याही पुरुषाची पत्नी अर्थात, दासी नव्हती! शूर्पणखा ही ह्याच अर्थाने राज्ञी होती. ती जनस्थानची सालंकटकटा अर्थात, साल अथवा साग अथवा तत्सम वृक्षांच्या उपवनाची मातृदेवता होती. ब्राह्मणी पुराणकथाकार, रामायणकार, कीर्तनकार, प्रवचनकार शूर्पणखेचे अत्यंत विकृत, अनैतिहासिक, अतार्किक चित्रण करतात. काय तर म्हणे शूर्पणखा म्हणजे सुपाएव्हढे नखे असलेली, अक्राळविक्राळ, हिडीस रूप असलेली आणि फाळ्याएव्हढे दात असलेली राक्षसी होय! या पोटभरू कथाकारांनी शूर्पणखेचे केलेले हे वर्णन बघून त्यांची कीव करावीशी वाटते; कारण शूर्पणखा ही एका स्वतंत्र राज्याची राज्ञी होती. गोदावरी नदीकिनारी 'नदीवक्त्र' अर्थात, नदीच्या गाळावर केली जाणारी शेती ती कसत असे! तिची स्वतंत्र सेना होती. ज्याअर्थी सेना होती, त्याअर्थी करप्रणाली राबवणारी यंत्रणा होती, कारण सैन्य पोटावर चालते, त्यांना वेतन तर द्यावेच लागेल ना! मग असे प्रबंधन करणारा अर्थविभागही असला पाहिजे! म्हणजे गणाकडून कर किंवा राज्यभाग जमा केला जात होता. जनतेकडून ज्याअर्थी शूर्पणखेच्या गणराज्यात कर वसूल केला जात असेल, त्याअर्थी जनतेला आवश्यक सुखसुविधा देणेही गणराज्य प्रशासनाला भाग होते, म्हणजेच या सर्व क्रियाकलापासाठी आवश्यक यंत्रणेचा विकास तिथे झालेला असला पाहिजे! अर्थात, शूर्पणखेचे जनस्थान गणराज्य बरेच विकसित स्वरूपाचे गणराज्य असले पाहिजे आणि ती साऱ्या जनस्थान राज्याचा कारभार अत्यंत दक्षपणे चालवत असली पाहिजे. रामायणात आपल्याला याचे पुरावे दृष्टोपत्तीस पडतात, मग माझा या पोटभरू कथेकरी बुवांना प्रश्न आहे, की अशा शूर्पणखेला तिच्या बोटांची नखे काढण्याचीही अक्कल असणार नाही काय? पण कथा सांगण्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या मिळकतीकडे डोळा ठेवणाऱ्या पोटार्थी लोकांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? जनस्थानच्या अर्थात, महाराष्ट्राच्या आद्य गणराज्ञीचा किती हा घोर अपमान! निषेध असो अशा स्त्रीद्वेष्ट्या प्रवृत्तीचा आणि तिचे समर्थन करणाऱ्या स्वार्थी मनोवृत्तीचा!
तर मुळात, शूर्पणखा या संस्कृत भाषेतील व्यक्तीनामाचा अर्थ होतो, शूर्प म्हणजे सूप व नखा म्हणजे नखे; अर्थात *'सुपाला नखांवर अलगद पकडून धान्य पाखडणारी (उपणणारी) स्त्री म्हणजेच शूर्पणखा..!'*
शूर्प हा शब्द संस्कृतमध्ये धान्य पाखडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन या अर्थानेच येतो. आजही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आमची मायमाऊली खळ्यावर काढणीचे किंवा अंगणात वाळवत असलेले धान्य पाखडतांना सुपाला अलगत नखांच्या सहाय्यानेच पकडते व वाऱ्याच्या दिशेने पाखडते!
'अर्थाचा अनर्थ करणे' अशा अर्थाचा मराठीत वाक्प्रचार आहे. 'राघोबादादा-आनंदीबाई'रुपी ब्राह्मणी कलमकसायांनी लेखणीरुपी शस्राच्या सहाय्याने असे 'ध'चा 'मा' करणारे अनर्थकारी काम करून इतिहासात असे अनेक 'नारायणराव पेशवे' जाणीवपूर्वक संपवलेले आहेत. इतिहासाचा धांडोळा घेतला, तर आपणास असे दृष्टोत्पत्तीस येईल, की अशा ब्राह्मणी छावणीतील कलमकसायांनी अब्राह्मणी छावणीतील अनेक वीर-वीरांगना एक तर ठार केल्या, बदनाम केल्या, दुर्लक्षित केल्या, दडपून टाकल्या, नेणिवेत ढकलल्या, गडप केल्या आणि इतके करूनही जमलेच नाही, तर त्यांचे विकृतीकरण करून त्यांचे दैवीकरण अथवा राक्षसीकरण केले! महाराष्ट्राची आद्य गणराज्ञी शूर्पणखेच्या वाट्याला या कलमकसायांनी विकृत चरीत्रचित्रण केल्यामुळे बदनामी आली व त्यातही शोकांतिका ही की तिचेच वंशज अज्ञानापोटी तिची राक्षसी म्हणजे अक्राळविक्राळ देहाची म्हणून आजपर्यंत हेटाळणी करत आलेले आहेत! (मुळात राक्षसी शब्दाचा अर्थ रक्षण करणारी असा होतो, हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल! राक्षस = रक्ष + अस्) शूर्पणखेला ही अवहेलना आणखी किती दिवस सहन करावी लागेल, हेच आता पहावयाचे! तिला न्याय मिळावा, हाच या लिखाणाचा प्रधान हेतू आहे!
वास्तव इतिहास असा आहे, की शूर्पणखा ही जनस्थानाची म्हणजेच महाराष्ट्राची आद्य गणराज्ञी होती. तिची आई केकसी हिच्या राज्याची ती वारसदार होती. केकसी ही जनस्थानात स्थलांतरित शेती (shifting cultivation) करत असे. शूर्पणखेने या अविकसित शेतीचे 'नदीवक्त्र' या विकसित शेतीत रूपांतरण केले. नदीवक्त्र म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरील गाळपेरात केली जाणारी शेती! रावण तिचा भाऊ होता, पण स्त्रीसत्ताक राज्यपद्धतीमुळे राज्य आपल्या बहिणीला मिळणार, हे तो जाणून होता, म्हणून राजा बनण्यासाठी त्याने लंकेच्या मंदोदरी या गणराणीशी विवाह केला. लंकेचे राज्य मातृवंशक होते. मातृवंशक समाजपद्धतीमध्ये सत्ता मुलीच्या नवऱ्याला मिळते. उदा. आजही मेघालय राज्यातील खासी जमात व मणिपूर राज्यातील कोम जमात या मातृवंशक आहेत. केरळमधील काही भागांत अजूनही मातृवंशक प्रथा प्रचलनात आहेत..! मातृवंशक समाजपद्धतीत लग्नानंतर मुलगा मुलीच्या घरी येऊन राहतो व वरपक्ष वधूपक्षाला वधुदक्षिणा (हुंडा) देतो..! (सुप्रसिद्ध भारतीय महिला मुष्टियोद्धा मेरी कोम ही 'कोम' याच जमातीतून येते.) मंदोदरी ही लंकेची राज्ञी होती, तद्वत मंदोदरीशी विवाह केल्यामुळे तो लंकेचा राजा झाला! यासंदर्भात ऋग्वेदातील उर्वशी - पुरुरवा यांचा संवाद प्रसिद्ध आहे. पुरुरवा हा बाल्हिक गणराज्याची गणराज्ञी 'इला' हिचा पुत्र होता. इलाचा पुत्र म्हणून त्यास 'ऐल' असे संबोधन ऋग्वेदकर्ते वापरतात. उदा. युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे कुंतीचे पुत्र म्हणून कौंतेय व नकुल व सहदेव हे माद्रीचे पुत्र म्हणून माद्रेय इ.
बाल्हिक गणराज्य हे स्त्रीप्रधान समाजव्यवस्था असलेले गणराज्य होते, त्यामुळे आपण येथे राजपद मिळवू शकत नाही, हे पुरुरव्याला माहीत होते, म्हणून तो मातृवंशक शिरस्ता असलेल्या काशी - कोशल गणराज्यात गेला व त्या स्त्रीराज्याची राणी उर्वशी हिच्याशी त्याने विवाह केला व तेथील राजा झाला. यासंदर्भात ऋग्वेद म्हणते,
*'त्रि:स्माह माह्र: श्नथयो वैतसेन उत स्म मे S व्यत्यै पृनासि ।*
*पुरुरवोSनु ते केतम् आयं राजा मे वीर तन्वस् तद् आसी:'*
(ऋग्वेद १०.९५.५)
अर्थ - उर्वशी पुरुरव्याला म्हणते, 'चार शरद ऋतुभर रोज दिवसातून तीनदा माझ्याशी केलेल्या संभोगाद्वारे तू माझ्या शरीरापासून (या राज्याचा) राजा झालास..!
रावणही मंदोदरीशी विवाह केल्यामुळे लंकेचा राजा झाला होता.
आणि इकडे शूर्पणखेने विद्युत्जिव्हा याच्याशी नैमित्तिक दैवविवाह केला (मी 'नैमित्तिक दैवविवाह' असा शब्दप्रयोग का केला? याचे उत्तर पुढे येईलच). विद्युत्जिव्हा हा कालकेय गणातील गणसदस्य होता. नुकत्याच आलेल्या बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागात या चित्रपटातील व्हिलन कालकेय गणाचाच दाखवला आहे. तो अतिशय हिडीस अवताराचा आणि अनाकलनीय भाषेचा उपयोग करत असलेला दाखवला आणि बाहुबली ज्या साम्राज्याचा राजा दाखवला, ते माहिष्मती साम्राज्य वास्तवात महाभारतकालीन नर्मदेच्या काठावरील एक स्त्रीराज्य होते, जे नकुलाने राजसूय यज्ञाच्या दिग्विजय मोहिमेदरम्यान जिंकले होते, त्यामुळेच बाहुबली चित्रपटात या राज्याचा कारभार शिवगामीदेवी नावाची एक राणी चालवत असलेली दाखवली आहे. सत्याचा अपलाप व विद्रुपीकरण आजही चालू आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण.. असो.
तर शूर्पणखेचा पती विद्युत्जिव्हा याचेही रामयणकारांनी जितके म्हणून विद्रुपीकरण करता येईल, तितके ते करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. त्याला लांबलचक जीभ दाखवली व त्या जिभेला तो विजेच्या वेगाने हलवून शत्रुसैन्य मारतो, असे दाखवले. किती हास्यास्पद आहे. अशी 5 - 10 फुटाची जीभ घेऊन माणसाला चालता तरी येईल काय हो? आणि एव्हढी मोठी जीभ असल्यावर जेवायचे कसे? मुळात विद्युत्जिव्हा या शब्दाचा अर्थ आहे, वादविवादात वा चर्चेत विजेच्या जलद गतीने शब्दफेक करून म्हणजे एका अर्थाने शब्दांचा शस्त्रासारखा वापर करून प्रतिस्पर्ध्यास गारद करणारा. अर्थात हजरजबाबी..! या विद्युत्जिव्हा यास युद्धात रावणाने मारले असे रामायणकार म्हणत असले, तरी सत्य काही वेगळेच असण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील विवेचन पुढे येईलच!
स्त्रीसत्ताक राज्यात राज्याची गणराज्ञी निवडण्याचे काही खास निकष होते. पहिला निकष हा की ती रंगाने काळी असली पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं! गोरी का नाही? तर मूळ भारतीय अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र हे काळ्या रंगालाच सौंदर्याचं प्रतीक मानत होते! त्याचं एक कारण असं होतं, की भारतातील रहिवासी मुळात काळे-सावळेच होते. गोरे आर्य भारतात आल्यानंतर त्यांनी सौंदर्याचं प्रतीक गोरा रंग केला! उदा. आफ्रिका खंडात सौंदर्याचं प्रतिमान काय राहील बरं? गोरा रंग राहील की काळा रंग? अर्थातच, काळा रंग राहील! त्याचप्रमाणे आर्यपूर्व भारतात काळ्या रंगाचेच लोक राहत असल्याने त्या रंगाला सन्मान प्राप्त झाला होता. आपण आजही जमिनीला काळी आईच म्हणतो, कारण शेतीचा शोध ज्या स्त्रीने लावला, तिचं नाव निर्ऋति..! ती सुद्धा रंगाने काळीच होती, म्हणून काळी आई! आणि म्हणून गणराज्ञीही काळ्या रंगाचीच असावी, असा संकेत होता.
दुसरा निकष होता, ती गणातील सर्वात रूपवान स्त्री असली पाहीजे. तिच्याइतकं देखणं रुपडं गणात कोणाचंही नको, असा संकेत होता! 'शूर्पणखा अनुपम सुंदर होती' याची सत्यता रामायणातच प्रमाणित होते!
रामायणातील अरण्यकांडात वर्णन केल्याप्रमाणे स्वतःच्या राज्यात विहार करत असतांना राम-लक्ष्मणाचे मनोहर रूप पाहून मोहित झालेली शूर्पणखा रामाकडे येते आणि प्रेमयाचना करत स्वतःशी लग्न करण्याचा हट्ट करते. तेव्हा राम म्हणतो,
*'स्वेच्छया लक्ष्मणया वाचा स्मितपूर्वमथाब्रवीत।।*
*कृतदारोस्मि भवति भार्येचे दयिता मम्*
*त्वद्विधांना तु नारींणां सुदु:खा ससपत्नता।।*
*अनुजस्त्वेष मे भ्राता शिकवान्प्रियदर्शन:*
*श्रीगान कृतदारश्च लक्ष्मनो नाम वीर्यवान।।*
*अपूर्वी भार्यया चार्थी तरुण: प्रियादर्शन:*
*अनुरूपश्च ते भर्ता रुपस्यास्य भविष्यति।।*
*एनं भज विशालाक्षी भर्तारं भ्रातरं मम*
*असपत्ना वरारोहे मेरुमर्कप्रभा यथा ।।'*
(संदर्भ :- अरण्यकांड : सर्ग १८, श्लोक १, २, ३, ४ व ५)
अर्थ - 'माझा विवाह झाला आहे. ही माझी भार्या आहे. तुझ्यासारख्या स्रियांना सवत असणे फारच दुःखदायक आहे. हा माझा लक्ष्मण नावाचा कनिष्ठ भ्राता सुशील, वीर्यवान, दिसण्यात मनोहर, वैभवशाली आणि 'अविवाहित' आहे. याला आजपर्यंत कधीही पत्नीचे सुख माहीत नाही आणि म्हणूनच पत्नीची याला गरज आहे. तेव्हा तरुण आणि दिसण्यात मनोहारी असल्याने हा तुझ्या रुपाला योग्य असा पती होईल, म्हणून हे विशालाक्षी, हे सुंदरी! मेरू पर्वताची सेवा करणाऱ्या सूर्याच्या प्रभेप्रमाणे सवत नसलेली तू या माझ्या भ्रात्याचा स्वीकार कर.'
या श्लोकांमध्ये राम शूर्पणखेच्या अनुपम सौंदर्याची स्तुती करतांना दिसतो आणि सत्यवचनी राम खोटं बोलतांनाही दिसतो, हे विशेष! लक्ष्मण विवाहित असतांना आणि उर्मीला नावाची त्याची पत्नी जिवंत असतांनाही 'लक्ष्मण अविवाहित आहे', असे राम खोटं सांगत आहे! म्हणजे एकीकडे तो शूर्पणखेच्या सौंदर्याची स्तुती करीत आहे आणि दुसरीकडे खोटं बोलून तिची थट्टाही करत आहे!
तिसरा निकष होता, तिने सर्व प्रजेकडे समतावादी दृष्टीनेच बघितले पाहिजे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी तिने घेतली पाहिजे. गणभूमीचे वाटप करतांना आणि गणधनाचे वाटप करतांना गणातील सर्व प्रजाजनांमध्ये ते समानच वाटले जाईल, असा कटाक्ष होता. हा संकेत भावी गणराज्ञीने पाळणे बंधनकारक होते.
ज्याअर्थी शूर्पणखा जनस्थानची राज्ञी होती, त्याअर्थी वरील सर्व निकष तिने संपादन केलेले होते, असा त्याचा अर्थ आहे.
शूर्पणखा ज्या स्त्रीराज्याची राज्ञी होती, तिथे स्वैरसंभोग हा गणराणीचा अधिकार होता. तोच 'समय' (अर्थात कायदा) होता. तीच त्या काळची जनरीत होती. इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकतांना आजच्या युगाचे चष्मे काढून टाकायला हवेत. प्राच्यविद्यापंडीत व महान दार्शनिक कॉ. शरद पाटील एके ठिकाणी म्हणतात, 'प्रत्येक व्यक्ती ही तिच्या युगाची अपत्य असते. त्या व्यक्तीला तिच्या काळाची बंधने असतात, त्यामुळे इतिहासाकडे बघतांना आजचे निकष बाजूला ठेवायला हवेत.' याच न्यायाने शूर्पणखेकडेही बघायला हवे!कारण शूर्पणखा ही सुद्धा तिच्या काळाची अपत्यच होती आणि तिच्या काळाच्या रीतीप्रमाणे गणराज्ञी ही स्वैराचारीणीच असे, म्हणून शूर्पणखाही स्वैराचारीणीच होती! शेतीत चांगले पीक येण्यासाठी गणराज्ञीचा असा स्वैरसंभोग आवश्यक मानणाऱ्या परंपरेचा भाग असणाऱ्या जनस्थानाची ती राणी होती, हे येथे आपण लक्षात घेतले पाहिजे! स्त्रीराज्याची गणराज्ञी ही दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात (धोंड्याचा महिना) नवीन पुरुषासोबत दैवविवाह करीत असे. हा पुरुष त्या गणातील सर्वात उत्तम अर्थात देखणा, विर्यवान व बलशाली व्यक्ती असे. त्याला ब्रह्मण म्हणत (ब्रह्मण व ब्राह्मण यात फरक आहे. ब्राह्मण म्हणजे ब्रह्माची संतती, एक वर्ण व जात; तर ब्रह्मण म्हणजे पुरुष!). सलग तीन वर्षे ती गणराज्ञी उत्तम संतती निर्माणास्तव त्या ब्रह्मणबरोबर राहत असे. दर तिसऱ्या वर्षानंतरच्या अधिक मासात त्या दैवी पतीचा अर्थात, ब्रह्मणचा पुरुषमेध केला जाई! शेतीमध्ये चांगले उत्पन्न येण्यासाठी हा मायिक विधी आवश्यक मानला जाई. विद्युत्जिव्हा हा तिचा पहिला पती होता. तो युद्धात मारला गेला, असं रामायणकार म्हणत असले, तरी त्याचा पुरुषमेधात बळी दिला असण्याचीच शक्यता अधिक आहे. वाल्मीकीलिखित रामायणाच्या मुळ प्रतीत ही सत्य घटना वर्णन केलेली असू शकते, पण मी सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे रामायण १८व्या शतकापर्यंत लिहिल्या जात होते. त्याचे असे संस्करण करणाऱ्या नंतरच्या कवींना इतिहासलेखनाची कालनिरपेक्ष दृष्टी नसल्यामुळे त्यांनी सत्य इतिहास भ्रष्ट करून त्याला कालसापेक्ष रूप दिलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
थोडक्यात, संततीनिर्मिती (fertility magic) आणि कृषी उत्पादकता (agriculture magic) या निमित्ताने असे दैवविवाह केले जात, म्हणून मी वरती अशा विवाहास 'नैमित्तिक विवाह' असा शब्दप्रयोग केला आहे. कालकेय गणसदस्य विद्युत्जिव्हा याच्याशी झालेला नैमित्तिक व निश्चित कालावधीसाठीचा दैवविवाह संपुष्टात आल्यानंतर पुन्हा दैवविवाह करण्यासाठी नवीन ब्रह्मण अर्थात योग्य पुरुषाच्या शोधात शूर्पणखा फिरत असतांनाच तिला राम-लक्ष्मण नजरेत पडले, असा तर्क करायला हरकत नाही; कारण ती रामाला माझ्यासोबत विवाह कर असं म्हणते. 'माझ्याशी संभोग कर', असं म्हणत नाही. अर्थात, असं म्हणणेही तिच्या संस्कृतीला धरूनच झाले असते, पण ती त्याला दैव विवाहाची गळ घालते, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. विश्वामित्रासोबत राहिल्यामुळे स्त्रीराज्यातील प्रथा-परंपरांची रामाला बरीच माहिती झालेली असली पाहिजे, त्यामुळे आता हिच्याशी लग्न करून चौथ्या वर्षी हुतात्मा होण्याच्या संकटातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठीच ही *खुबसुरत बला* त्याने लक्ष्मणाच्या अंगावर ढकलली असावी आणि त्यामुळेच सत्यवचनी राम खोटं बोलला असावा, असा तर्क करायला बरीच जागा आहे. लक्ष्मणालाही या सर्व परंपरेची माहिती असल्यामुळे त्याने नि:शस्त्र, निर्दोष व निरागस अशा त्या रुपगर्वितेवर शस्र चालवले व तिचे नाक-कान कापून तिला पुरते विद्रुप करून टाकले. आपल्या परंपरेप्रमाणे प्रेमयाचना करणाऱ्या स्त्रीत्वाचा किती हा घोर अपमान!
वस्तुतः रामायणातील संघर्ष उपरोल्लेखित आदीम निवाशांची स्त्रीसत्ता नष्ट करून आर्य-ब्राह्मणांची पुरुषसत्ताक राज्यपद्धती निर्माण करणे आहे व अशा स्त्रीसत्ता नष्ट करून त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन तिथे आर्यांच्या वसाहती स्थापण्याचा संघर्ष रामायणात वर्णन करण्यात आला आहे. आर्यांनी उत्तर भारत व्यापल्यानंतरही अनेक शतके ते दक्षिणेत येऊ शकले नव्हते. यात पहिला अडथळा होता विंध्य पर्वत आणि विंध्य ओलांडल्यानंतर दुसरा अडथळा होता जनस्थानचे शूर्पणखेचे गणराज्य! हे स्त्रीसत्ताक राज्य पादाक्रांत करून आर्यांचा प्रतिनिधी असलेल्या रामाने आर्य-ब्राह्मणी सत्ता गोदावरीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारली.
येथे एक बाब आपण लक्षात घ्यावयास हवी, की प्राचीनतम काळापासून मानव प्रजातींमधील लढा हा भूमीसाठीच्या स्वामीत्व हक्काचाच राहिला आहे. प्रथमपासूनच शोषक वर्ग शासक वर्गाच्या साथीने शोषितांच्या जमिनी हडप करण्याचा उद्योग करत आलेला आहे. त्याचेच आधुनिक रूप म्हणजे SEZ, DMIC, MIDC, समृद्धी महामार्ग, खाणकाम, लवासा इ.इ. अशा तात्कालिक कारणांखाली आर्थिक सर्वहारा अर्थात शेतकरी जाती आणि सामाजिक सर्वहारा अर्थात दलित-आदीवासी यांच्या ताब्यातील जमिनी हडपण्याचा धंदा सध्या वेगाने चालू असल्याचे चित्र आपल्याला ज्ञात आहेच. शोषितांचे उत्पादन साधन ताब्यात घेऊन त्यांना भिकेला लावण्याचे मनसुबे शोषक वर्ग सातत्याने आखत आलेला आहे. यासाठी कालसापेक्ष विविध मार्गांचा अवलंब शोषक वर्ग करत आलेला आहे. रामायण काळातील संघर्षही याच परीप्रेक्षातून बघणे गरजेचे आहे. शूर्पणखेच्या जनस्थानाच्या स्त्रीसत्ताक गणराज्याचा बळी या भूमी स्वामित्व संघर्षाच्या मालिकेचाच एक भाग आहे.
अशा पद्धतीने विषमतावादी पुरुषसत्ताक ब्राह्मणी प्रवाहाने समतावादी स्त्रीसत्ताक अब्राह्मणी प्रवाहाची गणनायिका आणि महाराष्ट्राची आद्य गणराज्ञी शूर्पणखेला अपमानित करून, बेअब्रू करून महाराष्ट्रातून हाकलून दिले व इथले स्त्रीराज्य नष्ट केले.
महाराष्ट्राच्या या आद्यगणराज्ञीला पुन्हा तिचा सन्मान प्राप्त करून देणे, तिचे वारसदार म्हणून आपले प्रधान कर्तव्य आहे. विषमतावादी प्रवाहाने तिचे नाक कापले. तिचे विकृत चरीत्रचित्रण केले. इतिहासात तिची यथेच्छ अवहेलना केली आणि अशा सर्वंकष बदनामीनंतरही जिथे तिचे नाक कापून तिला कायिक व शाब्दिक बदनाम करण्यात आले, त्याच जागेवर कालांतराने या बदनामीचे प्रतीक म्हणून महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून जे नगर वसवण्यात आले, त्या नगराचे नावसुद्धा 'नाशिक' (किंवा नासिका अर्थात नाक कापलेली जागा) असे ठेवण्यात आले. एखाद्या व्यक्तीबाबत असलेल्या अपरिमीत घृणेची किती ही परिसीमा! ही महानगरी आपल्या नावाद्वारे आजही ब्राह्मणी छावणीच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवत आहे. या नाशिक महानगराचे नाव *'शूर्पणखानगरी'* असं परीवर्तीत करून आपण महाराष्ट्राच्या या आद्यगणराज्ञीच्या अर्थात, आपल्या पूर्वजेच्या अपमानाची थोडीशी परतफेड करू शकतो आणि गोदावरीकाठी नदीवक्त्र अर्थात गाळपेराची शेती करून महाराष्ट्राची आद्य वसाहत स्थापण करणाऱ्या या गणनायिकेच्या ऋणातून अंशतः उतराई होऊ शकतो!
शूर्पणखेचा हाच खऱ्या अर्थाने सन्मान असू शकतो, असं मला वाटतं! त्यादृष्टीने किमान विचार करण्यास हे लेखन उत्प्रेरक ठरेल, याच आकांक्षेसह स्वल्पविराम घेतो!
जय भारत!
*- बाळासाहेब गरुड (BG)*
नैऋत गण संघ
*संदर्भ-*
१) रामायण-महाभारतातील वर्णसंघर्ष - कॉ. शरद पाटील
२) वाल्मिकी रामायण (published by Geeta Press Gorakhpur)
३) महाभारत
४) ऋग्वेद
५) The Memories Of Cleopatra - Margaret George
Comments
Post a Comment