कविता: आतला तू!
तू कितीही गायला समतेची गाणी,
तरी भेद तुझ्या मनातला लपणार नाही.
ठाऊक आहे मला,
खालच्या पायरीवरचे कुणी 'आपला' म्हणलेले तुला खपणार नाही.
हातचे राखून तू कोणासाठीही पळत असतोस,
झाले कोणाचे जर आपसूकच भले,
तरी तू आतल्या आत जळत असतोस.
तू किती मनापासून बोलतोय,
सर्व काही कळत असते.
निर्वाणीच्या क्षणी तुझे मन जातीच्या गावा वळत असते.
नुसत्या बाता मारून कधी समता येणार नाही,
दिखावा करून खोटा;
समतेच्या गावी कधी रमता येणार नाही.
वरवरचे बोलून असे फक्त भोळेभाबडे फसतील,
तुझ्या जातीचे आमच्यावर कुत्सितपणे हसतील .
जातीवाद्यांच्या कित्येक पिढ्या तुझ्याच मार्गाने घडतात.
थोर समाजसेवक म्हणून अनेक पुरस्कार पदरी पडतात.
म्हणूनच तुझ्यासारख्या पुरोगाम्यांसमोर कित्येक मुडदे पडतात.
समतेच्या गप्पांचे तुझे गुऱ्हाळ सत्तेला तुझ्या तारक असते,
समतेचे तुझे हे राजकारण माझ्यासारख्याला मारक असते.
©के.राहुल, ९०९६२४२४५२.
Comments
Post a Comment