*लेख पहिला*
*तथागत गौतम बुद्ध*
*प्रस्तावना*
भारताने जगाला अनेक महान गोष्टी दिल्या आहेत, जीवनाच्या विविध बाबींवर नावीन्यपूर्ण भाष्य करणारी माणसं दिली आहेत. आखिल जगाला स्वातंत्र्य, समता अन बंधुतेचा मूलमंत्र देणारे शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे त्यात सर्वोच्च आहेत. डॉ. आ. ह. साळूंखे यांनी 'सर्वोत्तम भूमिपुत्र' या शब्दांत त्यांचे वर्णन केलेले आहे. प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील स्वातंत्र, समता अन बंधुतेचा अग्निस्त्रोत असा बुद्धांचा उलेख करतात. तथागतांच्या आसपासही जाणारे व्यक्तित्व आजवर भारतानेच नाही तर जगाने जन्माला घातलेले नाही असे आचार्य रजनीश म्हणतात. तर गौतम बुद्धांच्या हृदयाचा एक अंशही मला मिळाला तर मी स्वत:ला धन्य समजेन असे महाकरुणिक बुद्धांच्या महतीचे वर्णन स्वामी विवेकानंद करतात.
महामानव हे कुठून आकाशातून कोसळत नसतात किंवा जन्मत:च महामानव म्हणून प्रकट होत नसतात. त्यांच्या महामानव होण्याला तत्कालिन सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संघर्षाची पार्श्वभूमी असते. या संघर्षाचे त्यांच्या जानीवांनी केलेले आकलन, या संघर्षात त्यांनी मानवतेच्या बाजूने पार पाडलेली भूमिका अन या संघर्षातून बाहेर पडत मानवी समाजाला एका नव्या टप्प्यावर घेवून जाण्यासाठी त्यांनी मांडलेले तत्वज्ञान अगर विचार या सगळ्या प्रक्रियेतून जावून एक साधारण व्यक्ती 'महामानव' या उपाधीपर्यंत पोहोंचत असते. म्हणूनच महामानवांचा विचार करीत असताना तो त्यांना तत्कालीन व्यवस्थेपासून तोडून करता येत नाही. ज्याप्रमाणे तत्कालीन व्यवस्थेत मानवाला हितकारी असलेले बदल घडवून आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाचे योगदान असते तद्वतच त्या-त्या व्यवस्थेच्या मर्यादाही महामानवाला लागू पडतात. महामानवांचे दैवतीकरण करणाऱ्यांना ही मांडणी रुचत नसली तरी हेच वास्तव असल्याने अन हे वास्तव खुद्द त्या महामानवांच्या विचारांशी पुरक असल्याने आपण महामानव समजून घेताना ही मूलभूत समज जपली पाहिजे. त्यादृष्टीने आपण बुद्धांच्या जीवन, विचार अन कार्यावर प्रकाश टाकण्याआधी ते ज्या व्यवस्थेत जन्मले अन वाढले ती व्यवस्था समजून घेवू.
*पार्श्वभूमी*
भारतीय समाजाच्या बाबतीत वैदिक-अवैदिक हा वैचारिक संघर्ष, ब्राह्मणी-अब्राह्मणी हा सांस्कृतिक संघर्ष महत्वाचा अन महामानवांना समजून घेण्यासाठी पायाभूत राहिला आहे. वेदांना अपौरुषेय मानने, वेदांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांस पाखंडी ठरविणे ही यातल्या वैचारिक संघर्षाची एक बाजू तर वेदांना अंतीम न मानने, तर्क व विवेकवादाला प्राधान्य देणे ही या संघर्षातील दुसरी बाजू. ब्राह्मणी-अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्षात स्वत:ला जन्मजात श्रेष्ठ तर इतरांना जन्मजात कनिष्ठ समजणे ही पहिली बाजू तर सर्व मानव समान आहेत असा मानवतावाद मांडणारी दुसरी बाजू. या संघर्षात विज्ञानवादी, विवेकवादी आणि मानवतावादी भूमिका घेत त्या-त्या व्यवस्थेतील समाजाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणणारे व्यक्ती महामानव ठरतात.
सिद्धार्थाचा जन्म वर्णव्यवस्थाक दासप्रथा असलेल्या समाजात ई. स. पूर्व ५६३ मध्ये झाला. त्यांचे वडील शुद्धोदन हे शाक्य कुळाचे राजे तर आई महामाया या कोलीय राजा अंजन व राणी यशोधरा यांची कन्या होय. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सात दिवसांतच त्याची आई महामाया हीचे निधन झाले. सिद्धार्थाचे संगोपन प्रजापती गौतमी हीने केले. म्हणून सिद्धार्थाला गौतम असेही म्हंटले जाते.
सिद्धार्थाच्या जन्मापूर्वीच स्त्रीसत्ता ते पुरुषसत्ता हे संक्रमण पार पडले होते. उत्पादनाचे मुख्य साधन असलेल्या शेतीची मालकी स्त्रीयांकडून पुरुषांकडे गेली होती अन जनावरे व दास यांच्याकडून काबाडकष्ट करुन घेवून शेतीचे उत्पन्न पूर्वीच्या स्त्रीसत्ताक समाजापेक्षा कैक पटीने वाढले होते. वेदांना अपौरुषेय म्हणजेच ईश्वरी मानने, वेद व ईश्वर याबद्दल शंका घेणाऱ्यांना पाखंडी ठरवणे, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणे, यज्ञात पशूंचे बळी देणे इत्यादी कर्मकांड चालू होते.
*महाभिनिष्क्रमण*
वर नमुद केलेल्या व्यवस्थेत सिद्धार्थाची वाढ, जडणघडण होत होती. काही लेखकांच्या मते सिद्धार्थाला या बाहेरच्या जगापासून पिता शुद्धोदन यांनी अनभिज्ञच ठेवले होते. पण आपल्या 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाकारतात अन सिद्धार्थाला बाहेरच्या जगातील मानवी दु:खाची जाणीव असण्याची शक्यता व्यक्त करतात. सिद्धार्थाचा पुढील सगळा प्रवास पाहता बाबासाहेबांची मांडणी योग्य वाटते. कारण, जडणघडणीच्या काळात मानवी दु:खाची जाणीव असल्याशिवाय पुढील काळात गृहत्याग करण्याएवढा अन या दु:खमुक्तीच्या मार्ग शोधण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याएवढा मोठा निर्णय घेणे शक्य होत नाही.
वयाच्या १६ व्या वर्षी यशोधरेशी सिद्धार्थाचा विवाह होतो, त्यांना राहुल नावाचा एक मुलगाही होतो. पण जगातील दु:ख पाहून या दु:खातून मानवाला मुक्त करण्याचा मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थ गृहत्याग करतात. या घटनेला महाभिनिष्क्रमण म्हणतात.
*दु:खमुक्तीच्या शोधात*
दु:खमुक्तीच्या शोधात गौतम बुद्ध भटकंती करतात, अनेक अध्यात्मिक पुरुषांच्या संपर्कात येतात. एका राजपूत्राने गृहत्याग केल्याचे कळताच सिद्धार्थ ज्या-ज्या राज्यात जातात, त्या-त्या राज्यातील राजे त्यांना गृहत्यागाचा विचार सोडून राज्य करावे यासाठी मनधरणी करतात पण सिद्धार्थ आपल्या ध्येयावर ठामपणे मार्गक्रमण करतात.
दु:ख मुक्तीचा मार्ग शोधण्याच्या या प्रवासात सिद्धार्थ अनेक निरीक्षणे, चिंतन अन प्रयोग करतात. पारंपारिक अध्यात्मिक पद्धतीने दिलेले उपवास, आत्मक्लेशाचे मार्गही अवलंबतात. पण हे सगळे मार्ग सिद्धार्थाला फोल वाटू लागतात. सततच्या उपवासाने अतिशय दुर्बल झालेले सिद्धार्थ योग्य व पोषक भोजन घेवून आपण केलेल्या निरिक्षणांवर, घेतलेल्या अनुभवांवर चिंतन करण्याचा मार्ग अवलंबू लागतात. अनेक वर्षांची निरिक्षणे, विविध प्रकारचे अनुभव, पारंपारिक अध्यात्मिक पद्धतीत अनुभवलेले दोष, त्यामुळे होणारे मानव जातीचे नुकसान, मानवाचे आपापसातील संबंध, निसर्ग आणि माणूस, समाज आणि माणूस हे अंतर्संबंध अशा अनेक बाबतीत ध्यानपूर्वक चिंतन सिद्धार्थ करु लागतात.
*धम्मचक्रप्रवर्तन*
मानवी जीवनाशी संबंधित सर्व पैलूंवर सखोल व ध्यानपूर्वक चिंतन करुन सिद्धार्थाला मानवी दु:खाच्या व या दु:खातून मुक्ती मिळवण्याच्या मार्गाचे यथार्थ ज्ञान होते. आत्ताच्या बिहारमधील गया येथे झालेल्या ज्ञानप्राप्तीच्या या घटनेनंतर सिद्धार्थ बुद्धत्वाला प्राप्त होतात. 'बुद्ध' होणे म्हणजे आकाशाएवढ्या ज्ञानाची प्राप्ती करणे. ज्ञानप्राप्तीनंतर बुद्ध सारनाथ येथे आपल्या पहिल्या पाच शिष्यांना आपल्या नव्या धम्माची म्हणजेच बौद्ध धम्माची दिक्षा देतात. या घटनेला धम्मचक्रप्रवर्तन असे म्हंटले जाते.
*धम्माचा संदेश*
बौद्ध धम्मात ईश्वर, आत्मा, अवतार तसेच कर्मकांड यांना कसलेही स्थान नाही. बुद्धाकालीन इतर धर्म वास्तविक जीवनाला दुय्यम मानून मृत्यूनंतरच्या जीवनावर अधिक भाष्य करणारे होते. त्यामुळे मानवी जीवनातील वास्तविक दु:खाची सोडवणूक होत नव्हती. बुद्धाने मानवी जीवन दु:खमय आहे हे वास्तव स्विकारले, तृष्णा म्हणजे माणसाच्या अनियंत्रित ईच्छा हे दु:खाचे कारण आहे असे सांगितले, दु:खनिरोध म्हणजेच दु:ख मुक्तीचा मार्ग आहे हे सांगितले अन प्रतिपद् म्हणजेच आर्य आष्टांगिक मार्ग ही आदर्श आचरण पद्धती हा दु:खमुक्तीचा मार्ग असल्याचे सांगितले. धम्माच्या या प्राथमिक संदेशाला 'चार आर्यसत्ये' म्हंटले जाते.
सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति हा दु:खमुक्तीचा आर्य आष्टांगिक मार्ग आहे. प्रज्ञा, शील आणि करुणा याला बुद्धांनी आपल्या धम्मात महत्वाचे स्थान दिले आहे. शील तत्वात सत्य, अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे), अपरिग्रह (संपत्ती संचय न करणे) आणि ब्रह्मचर्य हे पंचशील सांगितले आहे.
बुद्धांनी ग्रंथप्रामाण्य नाकारले. आपल्या पंचेद्रियांना झालेल्या जाणीवेतून, स्वानुभवातून मिळवलेले ज्ञान अंतिम मानले. बुद्धांनी शंका घेण्याला, चर्चा करण्याला, प्रश्न विचारण्याला महत्वाचे मानले. 'तुमचा उद्धार करायला कुणी अवतार जन्माला येणार नाही, तुमच्या दु:खातून तुम्हाला मुक्त व्हायला तुम्हाला कुणीही सहाय्य करणार नाही. तुमच्या ज्ञानज्योती तुम्हीच पेटवा. तुमचे सहाय्य तुम्हीच करा' असा संदेश दिला. बुद्धांचा धम्म हा ज्ञानावर उभा असलेला धम्म आहे. बुद्धाने सर्वप्रथम मानवी जीवनातील ज्ञानाचे महत्व अखंड मानवजातीला पटवून दिले. शिवाय बुद्धांचा धम्म हा कर्मकांडावर नाही तर आचरणावर उभा असलेला धम्म आहे. जगाच्या पाठीवर स्वातंत्र्य, समता अन बंधूतेचे तत्वज्ञान देणारे बुद्ध हे पहिले महानायक आहेत. बुद्धांनी स्त्री, पुरुष तसेच सर्व थरातील लोकांना आपला धम्म देवू केला. प्रत्येक व्यक्तीत 'बुद्ध' व्हायची क्षमता आहे अन हे 'बुद्धत्व' कुणाच्या आशीर्वादाने, कृपेने किंवा कुणाला प्रसन्न केल्याने प्राप्त होणार नाही तर स्वप्रयत्नाने प्राप्त होईल असे बुद्धांनी सांगितले. जगातल्या इतर धर्मात अवतार, ईश्वरदुत, ईश्वराचा पुत्र अशा संकल्पना आढळतात. पण बुद्धाने हे सगळे नाकारत आपण स्वप्रयत्नाने सिद्धार्थाचे बुद्ध झालो असल्याचे सांगितले आणि प्रत्येकाला हे शक्य असल्याचेही सांगितले. बुद्धांचा धम्म हा अशारीतीने प्रयत्नवादी आहे.
बुद्धांनी अनित्यवादाचा, प्रतित्यसमुत्पादाचा सिद्धांत मांडला. जग हे अनित्य, सतत बदलणारे असून उत्पत्ती, विकास अन लय या प्रक्रियेतून बदल घडत असतात हे सांगितले. प्रत्येक घटनेमागे कारण असते असे सांगत 'कार्यकारणभाव' मांडला. निसर्गाच्या नियमांचा अभ्यास करुन मानवाने निसर्ग नियमाविरुद्ध आचरण करु नये असे सांगितले.
बुद्धांनी मानवी मनाचा, चित्तावस्थांचाही बारकाईने अभ्यास केला. माणसाने स्वत:च्या चित्ताचा बोध करुन घेवून चित्ताच्या विविध अवस्था समजून घेत त्यांवर नियंत्रण मिळवून आनंदी, प्रसन्न जीवन जगावे असे सांगितले. अनेक मानवी दु:खांचे कारण मानसिक असल्याने बुद्धांनी स्वत:च्या मनावर नियंत्रण मिळवण्याला आणि मानसिक, बौद्धिक क्षमता वाढवण्याला अनन्यसाधारण महत्व दिले.
बुद्धांनी जीवन व्यतीत करताना 'मध्यम मार्गाचा' अवलंब करायला सांगितले. त्यामुळे त्यांच्या तत्वज्ञानाला 'मध्यमा प्रतिपाद' म्हणतात. कुठल्याही बाबतीत कुठलेही अतिरेकी टोक न गाठता मध्यम मार्गाने जीवन जगावे असे सांगितले. अहिंसेची शिकवण देत असतानाच आत्मसंरक्षणही महत्वाचे असल्याचे सांगितले. त्याग सांगितला पण आत्मक्लेश नाकारला. धम्म दिक्षा घेणाऱ्या सगळ्यांना संन्यास सांगितला नाही तर उपासक आणि भिक्खू असे फरक केले. उपासकांनी संसारात राहूल धम्माचरण करावे तर भिक्खूंनी धम्मप्रचार करावा अशी बांधणी केली.
*संघाची स्थापना आणि बौद्ध धम्माचे योगदान*
बुद्ध हे उत्तम संघटक होते. त्यांच्या हयातीत त्यांनी सलग ४५ वर्षे फिरुन धम्माचा प्रचार-प्रसार केला आणि त्यांचे लाखो अनुयायी झाले. आपल्या पश्चात धम्म वाढावा यासाठी संघाची स्थापना केली. बुद्ध, धम्म अन संघाला शरण जावून विनम्रपणे आदर्श जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सांगितला. बुद्धांनी निर्माण केलेले संघ हे जगातील पहिले आदर्श संघटन आहेत. संघाच्या माध्यमातून विज्ञानवादाचा, विवेकवादाचा अन मानवतावादाचा प्रचार केला जातो. ज्ञान, कला, साहित्य यांची निर्मिती केली जाते. बुद्ध धम्माच्या माध्यमातून जगभर लेण्या, विहार, विविध विषयांवरील साहित्य यांची निर्मिती केली गेली.
बौद्ध भिक्खू धम्म प्रसारासाठी जात तेव्हा इतर धर्मियांकडून त्यांच्यावर हल्ले होत. यातून मार्ग काढण्यासाठी 'कराटे' ही आत्मसंरक्षणाची कला बौद्ध धम्माचीच निर्मिती आहे.
धम्म अन संघाच्या माध्यमातून सर्वगुणसंपन्न, निर्मितीक्षण, संवेदनाशील माणूस घडवण्याची प्रक्रिया सुरु झाली.
बौद्ध धम्मात मुक्त चर्चेला वाव असल्याने शिक्षण क्षेत्रातही आमुलाग्र बदल झाले. शिक्षण विनाअट सर्वांसाठी खुले झाले. लेण्या आणि विहार यातून ज्ञानदान होवू लागले. नालंदा आणि तक्षशिला यांसारखी विश्वविख्यात विद्यापीठे निर्माण झाली.
बौद्ध धम्माचा प्रभाव तत्कालीन राज्यकर्त्यांवरही पडला. धम्माला राजाश्रय मिळाला. सम्राट अशोकाने बौद्ध धम्म स्विकारला अन त्यांच्या साम्राज्यात अमुलाग्र बदल झाले. बौद्ध धम्माने उत्पादनाची वाढ होवून आर्थिक प्रगती होईल अशा बाजूने म्हणजे जुन्या दासप्रथाक व्यवस्थेविरुद्ध नव्या सामंतप्रथाक व्यवस्थेचा पुरस्कार केल्याने बुद्धकाळात समृद्धी निर्माण झाली. सम्राट अशोकाचे साम्राज्य त्यावेळचे जगातील सर्वात बलाढ्य व समृद्ध साम्राज्य होते.
अशारितीने समाज, संस्कृती, अर्थकारण, राजकारण, कला, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात बौद्ध धम्मामुळे चांगले बदल झाले.
*महापरिनिर्वाण आणि बुद्धानंतरचा धम्म*
सलग ४५ वर्ष अखंड धम्मप्रसार अन मानव जातीचे प्रबोधन केल्यानंतर वयाच्या ८० व्या वर्षी गौतम बुद्धांचे कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झाले.
बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 'त्रिपिटका'च्या माध्यमातून बौद्ध धम्माच्या अधिकृत साहित्याची निर्मिती झाली. पुढे धम्मात हिनयान, महायान व वज्रयान असे सांप्रदाय निर्माण झाले. धम्माच्या प्रचार, प्रसारासाठी अधिवेशने/धम्मसंसद घेतल्या जावू लागल्या.
धम्माच्या स्थापनेला हजारो वर्ष लोटले तरी बुद्धांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव आजही जगभर आढळतो. आईनस्टाईनसारख्या वैज्ञानिकाने बुद्ध धम्माच्या विज्ञानवादी, मानवतावादी विचारांचे महत्व विषद केले. भारतातून इतरत्र जगभर धम्म पसरला अन धम्माचे करोडो अनुयायी बनले. कालांतराने धम्मात काही अंधश्रद्धांचा शिरकाव झाला पण बुद्धांचा मूळ विचार प्रमाण माणणारे अनेक अनुयायी आजही जगभर आढळतात.
मध्ययुगातील भारतातल्या भक्ती सांप्रादायवरही बुद्धविचारांचा ठळक प्रभाव दिसून येतो. महाराष्ट्रातील संत त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडूरंगाला बौद्ध मानतात. भारतातल्या अनेक बौद्ध प्रतिकांचे ब्राह्मणीकरण झाले अन बौद्ध धम्माची ठिकाणे, वास्तू व प्रतिके हिंदूंची म्हणून गणली जावू लागली. खुद्द गौतम बुद्ध he विष्णूचा दहावा अवतार असल्याचा खोटा प्रचार केला गेला.
आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंवेडकर यांनी 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथाच्या माध्यमातून धम्मविचार नव्याने उजेडात आणला. बाबासाहेबांनी सन १९५६ साली आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्विकारला. हे सर्व बौद्ध 'नव बौद्ध' म्हणून ओळखले जातात.
*समारोप*
आज जगात अनेक संकटे आ वासून उभी आहेत. संपूर्ण मानव जातच नव्हे तर अखंड जीवसृष्टीसमोर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. या सगळ्याला माणूसच जबाबदार आहे. नैसर्गिक संसाधने आणि मनुष्यबळाची अमानुषपणे लूट होत आहे. यातून विषमता, दारिद्र्य, रोगराई, जागतिक तापमान वाढीसारख्या नैसर्गिक समस्या अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. पाश्चिमात्य जगाने केवळ व्यवस्था बदलण्यासाठीचे तत्वज्ञान निर्माण केले. बुद्धाच्या तत्वज्ञानात माणूस बदलण्यातून व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न झालेला आहे. बुद्धांचा काळ अन आत्ताचा काळ वेगळा असला तरी बुद्धांची मुलभूत शिकवण ही मानव जातीला निरंतरपणे महत्वाची ठरणारी आहे.
आज देशात लोकशाही संपवण्यासाठी, द्वेष पसरवून जाती, धर्माच्या अस्मितेला बळकटी देण्यासाठी काही राजकारणी प्रयत्नशील आहेत. 'धर्म संसद' भरवून त्यात गांधींच्या हत्याऱ्याचे उदात्तीकरण अन हत्येचे समर्थन होत आहे. ज्या गतीने तंत्रज्ञानाची प्रगती झाली त्या गतीने मानवी समज विकसित झालेली नाही. अशा सर्व परिस्थितीत बुद्धविचार मार्गदर्शक ठरणार आहेत. तरुण पिढिने गौतम बुद्ध आणि बुद्धाच्या धम्माचा विचार समजून घेणे ही काळाची गरज झालेली आहे. तो समजून घेत स्वातंत्र्य, समता अन बंधूतेवर आधारित शांततामय सहजीवनाचा संकल्प सर्वांनी करुया.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
Comments
Post a Comment