*जलसा: माणुसकी आडच्या ढोंगांची गोष्ट*
सार्वजनिक जीवनात वावरत असताना माणूस अनेक रूपे घेऊन वावरत असतो. माणूस जितका प्रसिद्ध, यशस्वी आणि महत्वकांक्षी असतो तितकी त्याची जास्त रूपे असू शकतात. काळ, वेळ आणि संधी अनुसार त्यात बदलही होत जातो. काही वेळा ही रूपे अत्यंत अविश्वसनिय आणि अचंभीत करणारी असतात. अश्या वागण्यामागे जसा वर्चस्ववाद असतो तसाच बऱ्याचवेळा आर्थिक गणिते, सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिमा संवर्धन या गोष्टीही प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे ध्येयवादी माणसे आपल्या चुका किंवा गैरकृत्ये लपविताना आपला चांगुलपणाचा बुरखा वापरत राहतात. प्रसिद्ध स्विस मानसशास्त्रज्ञा मॉरीस लुईस वोन फ्रांझ यांनी परीकथांमागील मानसशास्त्राचे विश्लेषण करताना असताना हेच निष्कर्ष मांडले आहेत.
संबंधित लेखाचा विषय हा नसला तरी त्यातून अनुभवास येणाऱ्या सगळ्या मानवी वर्तणुकी मॉरीस लुईस यांच्या संशोधनाच्या जवळ जाणारे आहेत. म्हणून बॉलिवूडच्या चित्रपटनिर्मीतीमध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या बदलांमध्ये मानवी मनाची आणि वर्तणुकीची अत्यंत प्रामाणिक मांडणी काही निर्माता-दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांनी केली आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित आणि हुसेन दलाल व प्रज्वल चंद्रशेखर लिखित जलसा हा चित्रपट अशीच माणुसकी मागच्या ढोंगाची मांडणी अत्यंत प्रभावीपणे करतो.
माया मेनन हे पत्रकारितेतील एक मोठे आणि गाजलेले नाव. देशातल्या बड्या बड्या आसामीना आपल्या talk show मध्ये आणून त्यांची दुसऱ्या काळी बाजु समाजासमोर आणण्यात हातखंडा असलेली माया आपल्या कर्तृत्वाच्या (?) जोरावर संपादक पदाला पोहचलेली आहे. साहजिकच तिचा मालक तिच्यावर जाम खुश आहे किंवा फिदा आहे असेही म्हणता येईल. माया कर्तृत्ववान आहे आणि तिच्या कर्तृत्वामुळे तिचा नवरा तिच्यापासून विभक्त झालेला आहे त्यामुळे आपल्या अपंग मुलाचे आपल्या आईच्या सोबतीने पालन पोषण करत आहे. तिच्या घरी रूकसाना नावाची होतकरू आणि मायाच्या मुलावर आपल्या मुलाइतकेच जीवापाड प्रेम करणारी मोलकरीण आहे. मायाचे हे असे आयुष्य सुरू असताना एकेदिवशी रात्री उशिरा आपल्या गाडीतून घरी परतत असताना ती एका मुलीला उडवते. निर्णय घेताना सतत खंबीर असलेली माया त्यावेळी घाबरते आणि तिला तिथेच टाकून घरी निघून येते. दुसऱ्या दिवशी तिला आपण रात्री ज्या मुलीला उडविले ती आपल्या घरी असलेल्या कामवाल्या बाईची रूकसानाची मुलगी असल्याचे तिला कळते. या अपघाताची वाच्यता कोठे होऊ नये म्हणून माया स्वतः त्या मुलीला सरकारी हॉस्पिटलमधून खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करते. आपली मालकीण किती मोठ्या मनाची आहे. असे वाटून रूकसाना आणि तिचा नवरा दोघेही तिच्यापुढे नतमस्तक होत असतानाच या प्रकरणात पोलीस केस होऊ नये मुलीची बदनामी होईल. आई वडिलांची बदनामी होईल म्हणून पोलीस चौकशी टाळण्यासाठी माया जोमाने प्रयत्न करू लागते.
माया हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात असतानाच मायाच्या ऑफिसमध्ये नलिनी नावाची एक नवीन शिकाऊ पत्रकार येते. माया तिची आदर्श आहे. तिला मायासारखंच मोठं आणि यशस्वी पत्रकार व्हायचे आहे. आपण काहीतरी वेगळं आणि धाडसी केले तर आपल्याला कायमची नोकरी, प्रमोशन आणि चांगला पगार मिळेल म्हणून या प्रकरणाची कुणकुण लागल्यावर ती मायाच्या अपरोक्ष याप्रकरणात अनेक पुरावे गोळा करते. अगदी अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही तिच्या हातात येते आणि मायामधील खल प्रवृत्ती समोर येते. अत्यंत निर्दियी पद्धतीने ती तिला या केसमधून काढता पाय घ्यायला लावते. नलिनीकडून माहिती घेताना तिला मायाला नलिनी रूकसानाला भेटली असल्याचे समजते. नलिनीने रूकसांनाला सगळी माहिती दिली असेल तर आपण दाखविलेल्या माणुसकीचे काय होणार? याविचाराने ती हादरून जाते. इकडे रूकसानाच्या नवऱ्याला त्यांनी पोलिसांना माहिती देऊ नये व आम्हाला केस करायची नाही हे सांगण्यासाठी किती पैसे घेणार याची ऑफर येते. रूकसांनाचा नवरा जेव्हा रूकसांनाला ही बाब सांगतो तेव्हा तिलाही आपल्या मुलीची बदनामी नको असते. शिवाय या ऑफर मध्ये तिला गरिबी दूर करण्याची संधी दिसते. आपली मालकीण सगळा खर्च करत आहे तिला जर याबाबत कळले तर ती दवाखान्याचा खर्च करणार नाही म्हणून रूकसाना मालकिणीला न कळता, प्रसंगी खोटे बोलून मध्यस्थाला 25 लाख रुपयांची ऑफर देते. त्यातून लपवाछपवी आणि दिखाऊ माणुसकीचा एक वेगळाच खेळ सुरू होतो. माया, रूकसांना, नलिनी, निवृत्तीला आलेला आणि निवृतीपूर्वी मोठा हात मारायला मिळाला तर बरे म्हणून या प्रकरणात आपल्या हाती किती घबाड लागेल याची आकडेमोडीतील पोलीस शिपाई, अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अश्लील कृत्य करताना सापडलेला आणखी एक पोलीस आणि त्यामुळे आपले निलंबन होऊ नये म्हणून ही केस दाबली पाहिजे यासाठी स्वतः पोलीस असूनही कसोशीने प्रयत्न करणारा कॉन्स्टेबल यांच्यातील चांगले-वाईटपणाचे आणि दिखाऊ माणुसकीचे अनेक प्रसंग दिग्दर्शकाने अत्यंत वास्तवदर्शी मांडले आहेत आणि खुबीने टिपलेले आहेत. मायाच्या मुलावर जीवापाड प्रेम करणारी, हळवी आई, आपल्या समाजात मुलींना शिकवले जातात नाही म्हणून आपल्या मुलीने चांगले शिकावे यासाठी काबाडकष्ट करणारी, 25 लाख मिळणार म्हणून कावेबाजपणा करणारी आणि आपल्या मुलीला मायानेच उडविले आहे हे कळाल्यावर तिच्या अपंग मुलाला समुद्राच्या पाण्याला भरती आल्यावर त्याला त्या लाटांमध्ये सोडून येणारी रूकसांना शेफाली शाह या अभिनेत्रीने अत्यंत दमदारपणे साकारली आहे. विद्या बालनसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसमोर ती अत्यंत आत्मविश्वासाने वावरली आहे. असे असले तरी संपूर्ण चित्रपट विद्या बालनने खाऊन टाकलेला आहे. तिच्या तोडीची अभिनेत्रीच काय पण अभिनेता आज संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीत नाही ही दुर्दैवी बाब आहे. आई, मुलगी, घटस्फोटित स्त्री, यशस्वी स्त्री संपादक, बॉस बरोबर आपले प्रेमप्रकरण सुरू असतांनाही घटस्फोटित नवऱ्याने दुसरे लग्न केले म्हणून त्याला दूषणे देणारी, अपघातातील गाडी कोणासमोर येऊ नये म्हणून लाच देणारी, रूकसानाला वरवर का होईना आधार देणारी, माणुसकीचा खोटा दिखावा करणारी आणि आपणच रुकसनाच्या मुलीला उडविले आहे हे रूकसानाला समजल्यावर आपल्या मुलाचे ती काही बरे वाईट करेल म्हणून गर्भगळीत झालेली आणि रडणारी माया मेनन विद्याने अत्यंत ताकदीने उभी केली आहे आणि तीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
याच बरोबर मुलीने रात्री अपरात्री घराबाहेर असावे की नाही ? यावरही हा चित्रपट प्रकाश टाकतो. मुलगी घराबाहेर आहे म्हणून ती व्यभिचारी आहे किंवा काही अनैतिक कृत्य करतेच असे नाही यावरही जलसा प्रकाश टाकतो. घुमा आणि मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपटातून समोर आलेला मराठी अभिनेता शरद जाधव याने रूकसांनाच्या नवऱ्याची भूमिका साकारताना कोठेही कमतरता ठेवलेली नाही. शेफाली शाह सारख्या अभिनेत्रीसमोर तो आत्मविश्वासाने वावरला आहे. रोहिणी हट्टंगडीही उत्तम. त्यामुळे माणुसकीचे ढोंग पहायचे असले तर जलसा एकदा पाहायलाच हवा.
©के. राहुल, 9096242452
Comments
Post a Comment