भंगलेल्या स्वप्नांचे दुवे सांधणारी कथा - दो पैसे की धूप, चार आने की बारिश......!
सुख आणि दुःख या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सतत घडणाऱ्या घटना असतात. आयुष्यात दीर्घकाळ फक्त सुखच भोगले आहे किंवा फक्त दुःखच भोगले आहे असा माणूस सापडणे ही फारच दुर्मिळ घटना आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात हे चढउतार सतत येत असतात. सुख आणि दुःख यांच्या कसोट्यावर याचे मोजमाप करायचे झाल्यास काहींच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुखाचे क्षण जरा जास्त असतात तर काहींच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखाचे क्षण जरा जास्त असतात. साहजिकच ज्याच्या आयुष्यात दुःखाचे क्षण जास्त असतात त्या माणसाला इतरांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण पाहून फक्त आपल्याच आयुष्यात दुःख आहे असे वाटत राहते परंतु त्या माणसाच्या जवळ जाऊन हे जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यास त्या माणसाच्या आयुष्यातही दुःख असल्याचे आणि फक्त त्याचे स्वरूप वेगळे असल्याचे लक्षात येते. अशाच सुखदुःखाचे क्षण भोगणाऱ्या दोन वेगळ्या व्यक्तींच्या आयुष्याचे चित्रण आपल्याला "दो पैसे की धूप, चार आने की बारिश" या दीप्ती नवल लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटातून पहायला मिळते. आपल्या जोडीदाराकडून अपेक्षाभंग झालेली दोन माणसे जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये घडून येणारे संवाद, त्यांची एकमेकांशी वर्तणूक आणि एकमेकांबद्दल वाटणारा हेवा, दुस्वास, अविश्वास आणि शेवटी प्रेम याचे अत्यंत प्रभावी चित्रण दीप्ती नवल यांनी आपल्या दिग्दर्शनातून केले आहे. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील अत्यंत सकस आणि हलक्या फुलक्या पण सामान्य माणसाला प्रेम करायला शिकवणाऱ्या अनेक भूमिका दीप्ती नवल यांनी आपल्या देहबोलीतून आणि नैसर्गिक अभिनयातून जिवंत केल्या आहेत. त्यांच्या या सकस अभिनयाचे आणि त्यातून आलेल्या अनुभवाचे अनेक पुरावे आणि प्रभाव या चित्रपटावर असल्याचे प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवत राहते. जुही आणि देबू या दोन वेगळ्या व्यक्तिमत्वाची आणि वेगळ्या विश्वातील दोघांच्या खाजगी आयुष्याशी निगडित घडणाऱ्या अनेक घडामोडी आणि त्यांचा परस्परांच्या खाजगी आयुष्यावर होणारा परिणाम चित्रपट अत्यंत वेगळ्या प्रकारे आणि प्रभावीपणे मांडतो. आपल्या प्रियकराबरोबर पळून मुंबईला येऊन लग्न केलेल्या आणि नंतर जन्माला जन्मलेले अपत्य अपंग आहे हे पाहून आपली बायको आणि मुलाला हॉस्पिटलमध्येच सोडून पळून गेलेल्या प्रियकराची दुर्दैवी पत्नी, हॉस्पिटलचे बिल भरता यावे म्हणून बाळंतपणानंतर चार दिवसातच नाईलाजाने वेश्याव्यवसाय करायला तयार झालेली, अपंग मुलाच्या जबाबदारीचे ओझे वाहत असताना कातावून गेलेली आणि आईपण विसरलेली जुही मनीषा कोइरालाने अत्यंत ताकतीने साकारली आहे. आपल्या वीस वर्षाच्या अभिनय कारकिर्दीमध्ये अकेले हम, अकेले तुम, खामोशी, दिलसे, बॉम्बे, अग्नीसाक्षी आणि कंपनीसारख्या चित्रपटातून प्रभावी भूमिका साकारलेल्या मनीषा कोइरालाच्या कारकिर्दीच्या उतरत्या टप्प्यामधील २००९ साली आलेला हा अत्यंत देखणा चित्रपट ठरावा वेश्याव्यवसाय करत असली तरी सुशिक्षित असल्याने आपल्या व्यवसायाचा दर्जा उच्च आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला उच्च दर मिळाला पाहिजे यासाठी दलालाशी भांडण करणारी, त्याचबरोबर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी स्वतंत्र नोकरानी दिमतीला ठेवणारी, आता आपले वय झाले आहे त्यामुळे सतत आपल्या मागे मागे करणारी गिऱ्हाईके आता तिला टाळत आहेत हे पाहून आतल्या आत खचलेली तरीही आपल्या दराशी तरजोड न करणारी वेश्या तिने अत्यंत दिमाखात साकारली आहे.
दुसऱ्या बाजूला गझलकार आणि गीतकार असलेला परंतु कमाईचे कोणतेही साधन नसलेला आणि घरच्यांनी लग्न ठरविले म्हणून एका टप्प्यावर जोडीदाराने सोडून दिल्यामुळे बेघर झालेला देबु रजित कपूरने अत्यंत समजून उमजून साकारला आहे. राहायला घर आणि खायला पैसेही नसल्याने मिळेल ते काम करायची तयारी असलेला देबू आणि त्याच वेळेस मालकिणीची मिजास असह्य होऊन काम सोडून निघून गेलेली मोलकरीण यामुळे नवीन नोकराणीच्या शोधात असलेल्या जुहीला रात्री उशिरा एका चहाच्या टपरी बाहेर भर पावसात भिजत असलेला देबू दिसतो. ती त्याला आपल्या टॅक्सी मध्ये बसवून लिफ्ट देते. त्यावेळी चर्चेतून तिला एका नोकराणीची गरज असल्याचे समजते आणि तो आपली आर्थिक आणि राहण्याची गरज लक्षात घेऊन मुलाचे सर्व काही करण्याचे आणि घरातील सर्व कामे करण्याचीही जबाबदारी घ्यायला तयार होतो परंतु हाय प्रोफाईल असूनही वेश्या असल्याने तिच्या घरी कोणीच काम करायला तयार होत नाही म्हणून दोन-तीन दिवस वाट पाहून ती नाईलाजानेच देबूला आपल्या मुलाच्या देखरेखीसाठी ठेवून घेते. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असल्याने आणि मुलाला जास्त वेळ न देऊ शकलेली ती आणि सतत 24 तास त्या अपंग मुलाबरोबर असलेला, त्याला काय हवे ते नको पाहणारा, त्याच्याबरोबर मजा मस्ती करणारा, त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणारा तसेच त्याला आईसारखी माया देणारा देबु आणि काकू (सनाज नवल) याच्यात वेगळेच ऋणानुबंध तयार होतात. आपला मुलगा आपल्यापेक्षा एका नोकराला आईच्या जागी मानतो ही गोष्ट असह्य होऊन त्याला घराबाहेर काढणारी, त्याच वेळेस वय वाढल्यामुळे तिच्या नेहमीच्या गिऱ्हाईकांनी झिडकारलेली, आता तू म्हातारी झाली आहे तेव्हा कमी पैशात काम करायला तयार हो, असे सांगणाऱ्या दलालाशी भांडून आता घर कसे चालवायचे या विवंचनेत असलेली ती त्याने घर सोडताच ' तो घरात असायला हवे होते' असे वाटणारी, मुलाला त्यांचा लळा लागलेला पाहून मुलांचा आधार त्याच्यामध्ये शोधणारी आणि त्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरून भर पावसात त्याला शोधत फिरणारी जुही प्रेक्षक म्हणून आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडते.
संपूर्ण चित्रपट जुही आणि देबू या दोन पात्राभोवती फिरत असला तरी चित्रपटातील प्रत्येक दृश्यामध्ये त्या त्या दृश्याचे गांभीर्य आणि गरज लक्षात घेऊन कधी हलक्या सरींनी, कधी मुसळधार तर कधी धो धो पडणारा पाऊस हा चित्रपटाचा तिसरा हिरो आहे. अनेक दृश्यांमध्ये संवाद नसून ही पाऊस तो आणि ती यांच्यामध्ये सकारात्मक संवाद साद्यायला हातभार लावतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ती, तो आणि तिचा मुलगा या तिघांमध्ये एक वेगळेच नाते तयार होत असताना तिला सोडून गेलेला जोडीदार गिऱ्हाईक म्हणून समोर येणे तसेच त्याच्या जोडीदाराने ही मला परत तुझ्याकडे परतायचे आहे असे म्हणून भेटायला बोलविणे दोघांच्याही आयुष्यात एक वादळ घेऊन येते परंतु त्यांची भेट झाल्यानंतर, घडलेल्या घटना आणि त्यातील संवाद यामुळे दोघांच्याही आयुष्यात आणखी नवीन वादळे निर्माण होतात. साहजिकच सुजाण प्रेक्षक म्हणून आपण हळहळल्याशिवाय राहत नाही इतकी व्यथा आणि दुःखे पावसाच्या साक्षीने दिग्दर्शकाने पडद्यावर सादर केली आहेत. उतरत्या वयातही मनीषा कोइराला आणि रजित कपूर यांनी आपल्या तारुण्याचा काळ आणि मध्यमवयीन परिस्थिती यात होत जाणारे बदल अत्यंत चांगले सादर केले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटाला अनेक मानसन्मान लाभले असले तरी (चित्रपटाची थीम बोल्ड असल्याने असेल कदाचित) भारतात मात्र हा चित्रपट दुर्लक्षित राहिला अमेरिकेतील "एरिक अँड विल" या गाजलेल्या दूरचित्रवाणीवरील मालिकेशी साधर्म्य असलेली ही कलाकृती अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये नावाजली गेली आणि अनेक मानसन्मानही प्राप्त झाले. मनीषा कोईराला आणि रजीत कपूर यांच्याबरोबरच तिच्या अपंग मुलाची भूमिका साकारणारा सनाज नवल हा बालकलाकार आपल्या अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी हातभारच लावतो. याचबरोबर उषा जाधव, मकरंद देशपांडे, नासिर अब्दुल्ला, मिलिंद सोमन, अनुप सोनी, सौरभ दुबे आणि राजेंद्र गुप्ता या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून बाहेर पडलेल्या कसलेल्या कलाकारांनी पाहुण्या कलाकारांच्या रुपात लावलेली हजेरी आणि केलेल्या भूमिका लक्षात राहणाऱ्या आहेत. साहजिकच तो, ती आणि पाऊस यांच्या अभिनयाचा हा त्रिवेणी संगम पाहण्यासाठी आणि तिचा आणि त्याचा जोडीदार पुन्हा भेटल्यानंतर काय होते? हे जाणून घेण्यासाठी "दो पैसे की धूप, चार आने की बारिश" हा चित्रपट एकदा पाहिलाच हवा!
© के. राहुल, 9096242452
Comments
Post a Comment