असंतोषाचे कारण 'संतोष'च!
भारतात सध्या एखाद्या सामाजिक विषयावर चित्रपट बनविणे इतके जिकरीचे झाले आहे की त्याचे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय परिणाम काय होतील हे सांगणे अशक्यप्राय होऊन बसलेले आहे आणि त्याहीपेक्षा तो चित्रपट अनेक अडथळ्यांवर मात करून बनवून तयार झाला तर त्याचे यशस्वी प्रदर्शन होईल याची कोणतीही खात्री देता येत नाही. कारण स्वतःला सेंसॉर बोर्डाशी समांतर समजणा-या अनेक जाती आणि धर्मांच्या विविध संघटना त्यावर इतके रान माजवतात की, जणू काही हे वाटच बघत बसलेले आहेत की कधी एखाद्या विषयावर चित्रपट येतो आणि आम्ही त्याला विरोध करून त्याचे प्रदर्शन हाणून पाडतो. हे झाले भारतातील चित्रपटात पुरते मर्यादित. परंतु आता याचे लोन विदेशात तयार झालेल्या चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचलेले आहे आणि त्याचे कारण म्हणजेच भारतात नुकत्याच प्रदर्शनावर बंदी घातलेल्या संतोष या चित्रपटाविषयी!
"संतोष" चित्रपटाची कथा ही भारतावर बेतलेली असली तरी त्याची निर्मिती, दिग्दर्शन, कथा-पटकथा या सर्व बाबी विदेशी मंडळींनी सांभाळलेल्या आहेत. तरीही त्याला विरोध होण्याचे कारण म्हणजे कथा भारतातील ज्वलंत सामाजिक विषयावरती बेतलेली आहे. त्यामुळे बंदी असूनही हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नाही. अर्थात त्यासाठी अनेक कसरती करून हा चित्रपट मिळवावा लागला. चित्रपट पाहिल्यानंतर त्याला भारतातील सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांचा विरोध का आहे हेही लक्षात आले. चित्रपटात हाताळलेली समस्या वरवर साधी असली तरी ती सखोल विचार करतात अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते. चित्रपटाचा हिरो कोणाला बनवायचे याचे खरे कसब असते ते चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडे त्यानुसार तो अगदी घरगड्यालाही हिरो बनवू शकतो किंवा व्यवस्थेतील अत्यंत खालच्या थरात असलेल्या व्यक्तीला ही चित्रपटाचा हिरो बनू शकतो. संतोष ची कथा ही अशीच एका सामान्य कॉन्स्टेबलच्या अवतीभोवती फिरणारी आणि कॉन्स्टेबललाच चित्रपटाचा हिरो म्हणून सादर करणारी आहे. चित्रपटाची कथा भारतातल्याच एका सामाजिक-आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारी आहे आणि त्यासाठी दिग्दर्शकाने चिरागप्रदेश असे या राज्याचे नाव निवडलेले आहे. यावरूनच ही कथा कुठल्या राज्यातील आहे हे सुजाण प्रेक्षकांच्या सहज लक्षात येऊ शकते आणि त्याला होणारा विरोधीही लक्षात येऊ शकतो. संतोषने घरातील सर्वांचा विरोध डावलून प्रेम विवाह केलेला आहे. घरातून अत्यंत सामाजिक-सांस्कृतिक बंधने असतानाही त्या बंधनांना झुगारून केलेला प्रेमविवाह दोन्हीकडील लोकांना मान्य नाही. अशातच चिरागप्रदेश मधील एका धार्मिक दंगलीमध्ये पोलीस असलेल्या जोडीदाराची दंगलखोराकडून निर्घृण हत्या होते आणि परंतु अनुकंपा तत्त्वाच्या आधारे प्रामाणिक जोडीदाराच्या जागी संतोषला पोलीस दलामध्ये सामावून घेतले जाते आणि तिथून खऱ्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.
सेवेत रुजू होण्याच्या दिवशीच संतोषसमोर एक मोठी विचित्र घटना घडते. संतोष ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामाला आहे त्या हद्दीतल्या एका अत्यंत गरीब घरातील अल्पवयीन मुलीचा मृतदेह जवळच्या एका पानवट्यावर आढळून येतो. त्या मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला असतो आणि त्यानंतर तिची हत्या करून तिचे शव दलित लोकवस्ती असलेल्या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले जाते. त्याअगोदर आपली मुलगी बेपत्ता झाली आहे म्हणून त्या मुलीचे वडील अनेकवेळा पोलीसस्टेशनला तक्रार नोंदवायला आलेले असतात परंतु ही तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती. त्यामुळे ती मुलगी ज्या जातीचे प्रतिनिधित्व करते त्या जातीचा मोर्चा पोलीस ठाण्यावरती आलेला असतो आणि त्या लोकांना शांत करण्याची जबाबदारी संतोष वर येऊन पडते. साहजिकच संतोषने ती अत्यंत कौशल्याने हाताळलेली पाहून वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या मुलीच्या केसची तपासाची संपूर्ण जबाबदारी संतोष वर सोपवतात.
वरिष्ठांना आपले काम आवडते आहे याचा मनस्वी आनंद बाळगत संतोषचे चौकशीचे काम सुरु होते आणि चौकशी करत असताना त्या मुलीचा एक मोबाईल संतोषच्या हाताशी लागतो. त्यामध्ये मुलीचे एका मुलाशी फोनवरून बोलणे आणि व्हाट्सअपद्वारे चॅटिंग सुरू असल्याचे लक्षात येते. तो धागा पकडून संतोष त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत तो मुलगा तिथून फरार झाल्याचे समजते. प्रयत्नांची शिकस्त करून संतोष तो मुलगा कुठे लपला आहे याच माहिती मिळवते आणि आपल्या वरिष्ठांना जाऊन सांगते. वरिष्ठ तिच्या या कामगिरीवर ती खुश होतात आणि तिला सोबत घेऊन त्या मुलाला पकडून आणण्यासाठी जातात. ती त्या मुलाला जीवाची बाजी लावून पकडून घेऊन येते आणि तिथेच या प्रकरणाला धार्मिक स्वरूप प्राप्त होते.
मुलगी हिंदू त्यातही मागास जातीतील आहे आणि ती ज्या मुलाच्या संपर्कात आहे तो मुलगा मुस्लिम आहे हे लक्षात आल्याबरोबर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गावातील स्थानिक राजकारणी एकत्र येऊन या प्रकरणाला धार्मिक रंग कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात. संतोषला त्यांच्या या वागण्याबाबत संशय येत राहतो. परंतु ती जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित करते तेव्हा मात्र वरिष्ठांकडून तिला ती एक शुल्लक कॉन्स्टेबल असल्याचे आठवण करून दिली जाते. त्यामुळे साहजिकच तिचा नाइलाज होत जातो. 'मी म्हणेल तसे काम करत राहिली तर तुझी लवकरच प्रगती होईल, त्यामुळे नसते शंका उपस्थित करत बसू नको', असेही तिला वारंवार सुनावले जाते तरीही संतोष आपल्या परीने या प्रकरणाची वेगळ्या अंगाने चौकशी सुरू ठेवते पकडून आणलेला मुलगा मुस्लिम आहे ही बाब सर्वत्र झाल्यानंतर समाजातून त्याच्याबाबत एक तिरस्कारची भावना निर्माण होते आणि सोबतच संतोषच्या कर्तुत्वाची ही वृत्तपत्रातून दखल घेतली जाऊ लागते. आपले नाव मोठे होते आहे ही खरंतर सुख होणारी बाब असूनही संतोषला त्यातून अपेक्षित समाधान आणि सुख प्राप्त होत नाही. आपले वरिष्ठ आपला वेगळ्या पद्धतीने वापर करून घेत आहेत हा तिचा संशय आणखी गडद होत जातो जेव्हा तिला मृत्यूच्या एक दिवस अगोदर ती मुलगी गावातील सरपंचाच्या घरी असलेल्या विहिरीवर पाणी आणायला गेल्याचे जेव्हा त्यात सरपंचाच्या छोट्या मुलीकडून समजते आणि या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जातो आहे ही तिची भावना पक्की होते. वरिष्ठांचा आदेश डावलून आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या प्रकरणाचे सर्व पुरावे गोळा करते. सरपंचाने स्वतःहून 'मीच त्या मुलीचा खून केला आहे याची कबुली दिल्यानंतर तुझ्यासारखी शिल्लक आणि कवडीमोलाची कॉन्स्टेबल माझे काहीच वाकडे करू शकत नाही, तुला जे काय करायचे आहे ते कर! मीच तिचा बलात्कार करून खून केला आहे', असे ऐकवले जाते तेव्हा मात्र संतोष राग, चीड आणि अस्वस्थतेने पण हतबल होऊन आपण काहीच करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर तिथून बाहेर पडते आणि थेट आपल्या वरिष्ठाला जाब विचारायला जाते. परंतु तूच काय मीही या प्रकरणात काहीही वाकडे करू शकत नाही त्यामुळे त्या मुलाला पकडायच्या अगोदर गावच्या सरपंचाने त्या मुलीचा बलात्कार करून खून केला आहे ही बाब मला माहित असूनही मी तुझ्यापासून आनंद ठेवली परंतु या प्रकरणात मुलीच्या जातीतील लोकांकडून दबाव वाढत गेल्याने कोणीतरी आरोपी उभा करायचा म्हणून त्या मुलाला या प्रकरणात मुद्दामून गोवल्याचे वरिष्ठ कबूल करतात.
त्यानंतर मात्र संतोषला आपल्या नोकरीचा आणि आपण दाखवलेल्या कर्तुत्वाचाही उभं यायला लागतो. मोठ्या प्रयासाने मिळालेली नोकरी टिकवायची की राजीनामा देऊन या दलदलीतून बाहेर पडायचे या पेचात अडकलेली संतोष एका क्षणाला योग्य तो निर्णय घेऊन मोकळी होते. तो काय आहे हे पाहायचे असेल तर एकदा संतोष पाहायला हवा सहाना गोस्वामी या गुणी अभिनेत्रीने साकारलेली संतोष नक्कीच पाहण्या आणि ऐकण्यासारखी सुद्धा आहे. बॉम्बे बेगम सारख्या वेबसिरिजमधून दमदार भूमिका साकारणाऱ्या सहानाने केलेला अभिनयही उत्तम आहे. आपला वरिष्ठ आणि त्याचा रिकामटेकडा पोरगा या दोघांची आपल्यावर असलेली वाईट नजर आणिं त्या टाळत आपले काम करणारी संतोष सहानाने ताकदीने उभा केली आहे. संपूर्ण चित्रपट एका शांत आणि संयतपणे पुढे पुढे सरकत राहतो. परंतु चित्रपटातील घटना प्रेक्षकांची चित्रपटावरील पकड सुटू देत नाहीत चित्रपटाला धार्मिक राजकारण आणि धार्मिक तेढ तसेच सवर्ण-दलित संघर्ष आणि नोकरशाहीतील वरिष्ठ-कनिष्ठ यांचे संबंध यांची अत्यंत बोलकी किनार असल्याने सरकारला कदाचित तो आपल्या सामाजिक- राजकीय आणि सांस्कृतिक विचारधारेवर घाला असावा असे वाटले असल्याने कदाचित तो भारतात प्रदर्शित होण्यापूर्वीच सरकारने त्याच्यावर बंदी घातलेली असावी. म्हणून जाणकार प्रेक्षक म्हणून आपण चित्रपट पाहण्याची संधी सोडता कामा नये हे मात्र निश्चित!
© के.राहुल, ९०९६२४२४५२
Comments
Post a Comment