मनुस्मृती दहन : समता, स्वाभिमान आणि मानवी प्रतिष्ठेसाठीचा ऐतिहासिक संघर्ष - डाॅ. राहुल खरात. प्रस्तावना २५ डिसेंबर १९२७ रोजी घडलेले मनुस्मृती दहन हे भारताच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक अत्यंत क्रांतिकारी व प्रतीकात्मक आंदोलन ठरले. या ऐतिहासिक घटनेचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. मनुस्मृती दहन म्हणजे केवळ एका ग्रंथाचे जाळणे नव्हे, तर अन्याय, विषमता आणि अमानुषतेवर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेचा बौद्धिक निषेध होता. शूद्र व अतिशूद्र समाजावर शतकानुशतके लादलेली हीनता, अपमान आणि बहिष्कार यांना धर्मग्रंथांच्या नावाखाली पवित्रतेचे कवच दिले गेले होते. मनुस्मृती हा अशाच अन्यायकारक विचारसरणीचा केंद्रबिंदू असल्याचे डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले. म्हणूनच मनुस्मृती दहन हे सामाजिक समतेच्या स्थापनेसाठीचे ऐतिहासिक पाऊल ठरले. मनुस्मृतीचा ऐतिहासिक संदर्भ मनुस्मृती (मनव धर्मशास्त्र) हा प्राचीन संस्कृत ग्रंथ असून, तो सामाजिक व धार्मिक आचारसंहितेचा आधार मानला गेला. मात्र या ग्रंथात वर्णव्यवस्थेला दैवी अधिष्ठान देऊन ब्राह्मणांना श्रेष्ठ आणि शूद्रांना हीन ठरवण्यात आले आहे. मनुस्मृतीतील क...