“शब्द”
शब्द म्हणजे शब्द,
मनाचे अंतरंग,
जसे बावरलेल्या प्रेयसीच्या प्रेमाचेच रंग.
शब्द बनतो कधी,
जिवाभावाचा सखा,
जसा प्रेयसीच्या गालावर प्रियकराचा मुका.
शब्द बनतात कधी,
श्रावणातील धारा,
जसा प्रेयसीला छेडणारा उनाड वारा.
शब्द असतात कधी,
संवादाचे सोबती,
स्वप्न होऊन शब्द रात्रभर जागती.
शब्द असतो कधी,
मदतीचा हात,
शब्द करतो कधी संकटावर मात.
शब्द बोलतो कधी,
शब्दांचीच भाषा,
भरकटलेल्या जिवाला भविष्याची आशा.
शब्द असतात कधी,
शिंपल्यातील मोती,
शब्द बनतात कधी अव्यक्त प्रिती.
शब्द असतो कधी,
हंबरणारी माय,
भुकेलेल्या वासरासाठी पान्हावलेली गाय.
शब्द असतो कधी,
शब्दांचाच वैरी,
जश्या आपल्याच माणसावर बंदुकीच्या फैरी.
शब्द वाटतात कधी,
शब्दांचेच ओझे,
शब्द करतात कधी शब्दांनाच खुजे.
शब्द शब्द एक होऊन,
गुंफतात संवादाच्या माळा,
शब्द शब्दांसाठी बनतात शब्दांचीच शाळा.
©के.राहुल 9096242452
©के.राहुल 9096242452
Comments
Post a Comment