Skip to main content
*अणकुचीदार खिळा :*

‘असमाधान’ ही स्थितीच फार बुचकळ्यात टाकणारी आहे. खोल पाण्याच्या तळाचा थांग लागत नाही, तसंच असमाधानाचं आहे. मला नेमकं काय हवं, ते किती प्रमाणात हवं आणि ते मिळवून मला काय साध्य करायचं आहे, या तीन गोष्टींची समाधानकारक उत्तरं ज्याच्याकडे असतात, त्याला हा ‘असमाधानाचा खिळा’ टोचत नाही. पण ज्या व्यक्तींना “इतरांनी मला बघून त्यांचे डोळेच दिपून गेले पाहिजेत” असं वाटतं, त्यांना हा असमाधानाचा खिळा वेळी-अवेळी, जागोजागी टोचत राहतो. कधीकधी तर खोलवर घुसतोसुद्धा !

जी माणसं आपल्याला ओळखतही नाहीत, आपणही त्यांना ओळखत नाही, कुणालाही आपल्या श्रीमंतीच्या प्रदर्शनानं, भपकेबाजपणानं, झालंच तर दबंगगिरीनं काहीही फरकच पडणार नाहीय, अशांचाच विचार करून काही माणसं पोकळ शोबाजी करायला लागतात आणि तिथेच नेमका हा खिळा टोचतो आणि त्यांच्या आयुष्यात या खिळ्याचा खेळ सुरू होतो...!

एकदा एका काॅन्फरन्सकरिता म्हैसूरला गेलो होतो. चार दिवस मुक्काम होता. सिल्क उत्तम मिळतं म्हणून तिथल्या एका चांगल्या शोरूममध्ये गेलो. मी साड्या पाहत होतो तर माझ्या शेजारच्या जोडप्याची चर्चा सुरू झाली. चर्चा कसली, भांडणच ते! त्या बाईंना एकही साडी पसंतच पडत नव्हती. त्यांनी रिजेक्ट केलेल्या साड्यांचा एक ढीगच तयार झाला होता. त्यातलीच एक साडी मी पसंत केली. झालं... आता त्या बाईंना अचानकच ती साडी चांगली वाटायला लागली. त्यांनी तीच साडी हवी असा हट्टच धरला. कशाला उगाच वाद, म्हणून मी ती साडी ठेवून दिली. त्याच ढिगातून दुसरी साडी निवडली. ती त्या बाईंनी पाहिली. आता त्यांना तीही साडी हवी होती आणि त्यांनी नवऱ्यापाशी पुन्हा तुणतुणं वाजवायला सुरूवात केली, हे पाहून सेल्समनसकट समस्त उपस्थित जनांस अचंबा जाहला ! दुकानातल्या माणसांना काहीच समजेना. खरी पंचाईत तर त्यांचीच झाली.
मी शांतपणे सोफ्यावर बसून राहिलो.

आधीच पसंत केलेली एक साडी आणि नंतरच्या दोन्ही साड्या अशी चांगली पंचवीस-तीस हजारांची खरेदी बाईंनी केली. समोरचा सेल्समन मला म्हणाला, “दोन तास झाले, त्या बाई ठाण मांडून बसल्या होत्या. पण त्या साड्या घेण्यासाठी आल्याच नव्हत्या. त्या त्यांच्या नवऱ्यासाठी लुंग्या घेण्यासाठी आल्या होत्या. आणि लुंग्या न घेता, स्वत:च तीन साड्या घेऊन गेल्या.” मी त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण त्यानं पुढं जे सांगितलं त्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, “कालही त्या बाई आल्या होत्या. काल त्यांनी दोन साड्या घेतल्या.” असमाधानी, अतृप्त मन!

दोन दिवसांत सहलीचं शाॅपिंग करण्यापोटी जवळपास पन्नास हजार रूपयांच्या भरजरी साड्या  खरेदी करणाऱ्या त्या बाईंची कधीतरी हटकून आठवण होतेच. त्यांच्या असमाधानी आणि काहीशा हावऱ्या स्वभावामुळे त्या माझ्या चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत.

दर महिन्याचा पगार झाला की, नवी वस्तू घरात आणण्याचा जणू नियमच केलेले अनेकजण मी पाहतो. दर दोन-तीन महिन्यांनी नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. माझ्या अत्यंत जवळच्या परिचयातील एकाच कुटुंबात चारच माणसे राहतात पण घरच्या शू रॅक मध्ये पादत्राणांचे सत्तराहून अधिक जोड आहेत. पैशाची मुळीच कमतरता नाही. हौस आणि प्रदर्शन करण्याच्या वृत्तीपोटी घराचं संग्रहालय करून टाकलं आहे. पण, या वस्तू शोकेसमध्ये बंद असतात. घरात परदेशी बनावटीचे डिनर सेट्स आहेत. पण एखादा बाऊल किंवा प्लेट चुकून जरी हातून निसटली आणि पडून फुटली तर हजारो रूपयांचं नुकसान होईल, या भीतीपोटी ते डिनरसेट्स आजतागायत वापरलेच गेलेले नाहीत; घरातले सगळे स्टेनलेस स्टीलच्याच ताटात जेवतात. पण, नव्याने खरेदी करण्याचा सोस अजूनही आहेच. मन अजूनही संतुष्टच झालं नाहीय, असा याचा अर्थ !

पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ॥ ध्रु ॥
हवाच तितुका पाडी पाऊस देवा, वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा, मायमाउली काळी
एका वितीच्या भूकेस पुरते, तळहाताची थाळी ॥ १ ॥
महालमाड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने, जतन कराया काया
गोठवणारा नको कडाका, नको उन्हाची होळी ॥ २ ॥
सोसे तितुके देई, याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दु:ख ईश्वरा, रंक करी वा राजा
अपुरेपणाही नलगे, नलगे पस्तावाची पाळी ॥ ३ ॥

‘प्रपंच’ चित्रपटातलं हे गाणं समाधान आणि संतुष्टतेचा खरा अर्थ काय असतो, हे सांगतं. दुर्दैवानं असमाधानापोटी हव्यासामुळे अनेकांच्या डोळ्यांवर मोठमोठ्या जाडजूड पट्ट्या बसवलेल्या असतात, त्यामुळे त्यांना दुसरं काहीही दिसत नाही आणि कानांमध्ये कापसाचे बोळे कोंबलेले असतात, त्यामुळे कुणी चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्या ऐकूही येत नाहीत.

हव्यासापोटचा मोह माणसाला स्वस्थ बसूच देत नाही. माणूस छाती फुटेस्तोवर सतत धावत कसा राहिल, याची पुरेपूर काळजी मोह करून ठेवतो. वयाच्या पन्नाशीपर्यंत माणसं पायाला भिंगरी लावल्यासारखी फिरत राहतात. जेव्हा इच्छा पूर्ण होतात, तेव्हा उपभोग घेण्यासारखी शरीराची अवस्थाच राहिलेली नसते. अविश्रांत काम करून करून, शरीराला वेळी-अवेळी वाटेल तसं वापरून घेऊन, त्याची क्षमताच संपलेली असते. निरनिराळ्या व्याधी जडलेल्या असतात. अशावेळी हातात काहीच उरलेलं नसतं. हे सगळं उभं करण्याच्या नादात स्वत:ला, कुटुंबियांना आणि इतर नातेवाईकांनाही वेळच दिलेला नसतो. मित्रमंडळी दुरावलेली असतात. सतत फाॅर्मल आणि औपचारिक वागून संवेदना बोथट झालेल्या असतात. प्रतिष्ठेचा ॲनास्थेशिया असा काही बसलेला असतो की, त्यापुढं काहीच जाणवत नाही. हळूहळू माणूस आतून एकटा पडत जातो. आपलं नक्की चुकलं कुठे? या त्याच्या प्रश्नाचं उत्तरच त्याला मिळत नाही. माणूस आतून थकत जातो. त्याच्या थकव्याचं खरं कारण कुणालाच सापडत नाही. तिन्ही त्रिकाळ औषधांचे डोस आयुष्यभरासाठी चिकटतात.

आपलीच असमाधानी वृत्ती आपल्या मुळावर उठली आहे, हे सुशिक्षित माणसांनाही समजत नाही. महागड्या हाॅटेलांमधलं जेवण, महागड्या गाड्या, चकचकीत पाॅश घरं, परदेशी सहली, वीकएन्ड साठी घेतलेलं फार्म हाऊस या गोष्टींनी आपल्याला प्रतिष्ठा दिली, पण समाधानाचं खातं रिकामंच राहिलंय, हे खूप उशिरा समजतं.

असमाधानाचे खिळे आकारानं मोठे आणि जरा जास्तच अणकुचीदार असतात. त्या खिळ्याच्या वाटेला न जाणं हाच उपाय उत्तम. कारण, एकदा हा खिळा घुसला की त्याला उपटून काढणं फार अवघड काम आहे...! या विषाचा उतारा सहजासहजी मिळत नाही हो... मग हात दाखवून अवलक्षण कशाला?
खिळा  : असमाधान आणि असंतुष्टता !

©मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
– ---------------– -----;--------------------
My reply

भारी,
माणसाची प्रत्येक कृती मेंदूकडून नियंत्रित होत असते. हे नियंत्रण सुटले की जे काही घडते त्याला Mental disorder असे म्हटले जाते आणि ते आजारातच गणले जाते. मेंटल disorder चे जे जात सात प्रकार आहेत त्यात या बाईची कृती पहिल्या प्रकारात मोडते जिला मानसशास्त्रात Mood disorder असे म्हणतात. आपण सहज बोलता बोलता म्हणतो. त्याचा किंवा तीचा काही नेम नाही. अचानक वेगळा/वेगळी वागते. थोडया वेळाने किंवा काही उशिराने गाडी पुन्हा रुळावर येते. आपण ही बाब जाणून असतो पण सोयीस्कर दुर्लक्ष करतो. आणि कालांतराने mood disorder ची समस्या गंभीर बनत जाते. लहानपणापासून नकार ऐकायची सवय नसलेले, अती पैसा आणि श्रीमतीमुळे आलेला अहंकार, मी म्हणेन तेच खरे असे आयुष्य दीर्घकाळ वाट्याला आले की mood disorder ची समस्या उदभवते. अश्या व्यक्तींना निर्णय घेणे जमत नाही किंवा घेतलेला निर्णय बरोबर की चुकीचा आहे हे ठरविणे अत्यंत कठीण जाते. त्यातूनच मग अनेकदा चुकीचा किंवा इतरांना न पटणारा निर्णय घेतला जातो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे चुकीचेच!
©के.राहुल 9096242452

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...