Skip to main content

सुपर ३० आणि समाजव्यवस्था:

सुपर ३० आणि समाजव्यवस्था:
              भारतीय चित्रपटसृष्टीचे आणि त्यातही बॉलीवूडचे एक वैशिष्ट्ये राहिलेले आहे. ते म्हणजे बॉलीवूडने नेहमीच आपल्या चित्रपटातून समाजमनाचा आरसा दाखविला आहे. तरीही काही अपवाद वगळता बॉलीवूडने तयार केलेल्या चित्रपटांवर नेहमीच टीका होत राहिली आणि त्यात तथ्यही आहे. बॉलीवूडने वेगवेगळ्या विषयाला हात घालून ते गंभीरपणे मांडले असले तरी त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य राहिलेले आहे कारण त्यामागे असलेली आर्थिक गणिते, बाजारपेठेची मागणी आणि वर्चस्वाचे राजकारण. परंतु इकडून तिकडून विषय उचलून त्याचा विचका करण्यात आघाडीचे निर्माते-दिग्दर्शक धन्यता मानत असतानाही काही निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंत  आर्थिक गणिते आणि वर्चस्वाचे राजकारण याची तमा न बाळगता वेगळे आणि ज्वलंत विषय समर्थपणे हाताळत आहेत. विशेष म्हणजे आशय-विषय चांगला असलेल्या या चित्रपटांना वास्तवातील घटनांची जोड दिल्याने व्यावसायिक यशही मिळाले आहे. गेल्या महिन्यात आलेला "आर्टिकल १५" आणि नुकताच प्रदर्शित झालेला "सुपर ३०" हे दोन्ही चित्रपट ज्वलंत सामाजिक प्रश्न मांडणारे असूनही व्यावसायिक पातळीवरही तेवढेच यशस्वी ठरलेले आहेत.
         तसे पाहिले तर चित्रपट हे कलेचे माध्यम असून दृक-श्राव्य असल्याने इतर कलांपेक्षा समाजमनावर प्रभाव टाकणारे आणि परिणाम करणारे माध्यम म्हणून बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. त्यातही हिंदी चित्रपटांना देशभर प्रेक्षकवर्ग असल्याने त्यांनी हाताळलेले विषय देशभरातील समाजमनावर परिणाम करतात. म्हणून हिंदी चित्रपटांनी  हाताळलेले सामाजिक प्रश्न आणि त्यांचा परिणाम यांची दखल घेणे भाग पडते. "आर्टिकल १५" आणि "सुपर ३०" हे दोन चित्रपट याच पठडीतील आहेत. त्यांच्या प्रदर्शनाची वेळही अत्यंत महत्वाची आहे.
देशातील प्रसारमाध्यमे (वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या) चाचपडत असताना, न्यायव्यवस्था दबावाखाली असताना आणि देश व जनहिताचे प्रश्न मांडणारे विरोधी पक्ष आपल्या कर्माने आणि कर्तृत्वाने गलितगात्र झालेले असताना सामान्यांचे प्रश्न कोण? आणि कसे? मांडणार याची चिंता जाणकारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे. अश्या आणीबाणीसदृश्य वातावरणात या दोन चित्रपटांनी समाजमन मांडत असताना सामान्य, गरीब आणि पिढ्यान् पिढ्या जातिव्यवस्थेचे बळी ठरलेल्या जनतेला भेडसावणारे प्रश्न मांडून देशातील संविधानिक मूल्यांची आणि लोकशाही तत्वांची होणारी पायमल्ली आणि संकोच यावर समर्थपणे भाष्य केले आहे. "आर्टिकल १५" वर या अगोदर बोलून-लिहुन झाले आहे पण "सुपर ३०" च्या व्यावसायिक यशावर बोलले जात असले तरी आशय-विषय आणि वास्तव यावर जास्त लिहिले-बोलले गेले नाही म्हणून त्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. विषय प्रामुख्याने शिक्षण हा असला  तरी "सुपर ३०" देशातील दीन दुबळ्या, पददलित यांच्या घटनादत्त अधिकारांची गळचेपी आणि सवर्ण जातींनी सत्ता आणि आर्थिक पाठबळाच्या जोरावर त्यांच्या विकासाचे मर्यादित केलेले अवकाश यावर भर देतो. याला वेगळ्या भाषेत मानवाधिकारांची आणि राज्यघटनेतील मूलभूत तत्वांची पायपल्ली असे म्हणता येईल. या सगळ्याची परिणीती म्हणजे सर्व क्षमता, कुवत, इच्छा आणि बौद्धिक गुणवत्ता असूनही फक्त खालची जात आणि आर्थिक क्षमता नाही म्हणून नाकारल्या गेलेल्यांच्या कित्येक पिढ्या आजही चाचपडत असल्याचे दिसते.
              त्यातही "सुपर ३०' बिहारसारख्या बिमारु राज्यातील जात आणि वर्ग वास्तव प्रकर्षाने मांडतो. आजच्या घडीला पुरोगामी राज्य म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या महाराष्ट्रातील परिस्थिती इतकी भयावह असताना आपापसात टोळी युद्धे करणारे जमीनदार आणि सरंजामदार यांच्या उत्तरप्रदेश व बिहारबाबत तर आजही कल्पनाही करवत नाही इतकी भयानक परिस्थिती आहे. या राज्यांमध्ये आजही मध्यम वर्ग हा प्रकार अस्तित्वात नाही. खुप श्रीमंत (उच्चवर्णीय) आणि खुप गरीब (दलित) असे दोनच वर्ग या राज्यांमध्ये दिसून येतात. असल्या या वातावरणात ९० च्या दशकात आनंदकुमारसारखा मागासवर्गीय तरुण आपल्या बुद्धीच्या जोरावर यशाची शिखरे सर करत असताना त्याला ऑक्सफर्डला प्रवेश मिळतो पण फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्याला जाता येत नाही. नाही म्हणायला वडील सरकारी नोकरीत तृतीय श्रेणी कर्मचारी आहेत पण त्यांची धाव इतकी मोठी नाही की ते आपल्या मुलाला परदेशी शिक्षणाला पाठवू शकतील. बँका त्यांना याबाबत कोणतीही मदत करत नाहीत. त्याच्या वडिलांच्या खात्यातील वरिष्ठ सवर्ण अधिकारी त्याला कोणतीही मदत न करता मुलाला याच खात्यात तृतीय श्रेणी कर्मचारी म्हणून लावण्याची सूचना करतात आणि मागासवर्गीय लोकांनी मोठी स्वप्ने पहायची नसतात असे सांगतो. त्याचे वडील "आता राजाचा मुलगा राजा व्हायचे दिवस संपले!" असे सांगतात तेव्हा त्या सवर्ण अधिकाऱ्याचे पित्त खवळते. आपल्या पोराला आपण परिस्थितीमुळे चांगले शिक्षण देऊ शकत नाही याची सल त्याच्या वडिलांना आहे.  आनंदला पण याचे खूप दुःख आहे पण त्याला काहीच करता येत नाही. मदत करायचे आश्वासन देणारे सगळेजण हात वर करतात तेव्हा ऑक्सफर्डने पायघड्या घालून बोलावलेल्या या गणितातज्ञाला आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊन रोजची पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार सायकलवर फिरून पापड विकावे लागतात. आपल्या ऑक्सफर्ड मधून आलेल्या प्रवेशनिश्चिती पत्रात पापड बांधून विकताना आणि ज्याने ते विकत घेतले त्याने ते पत्र चुलीत घालून जळताना होणाऱ्या वेदना हृतिकने अत्यंत खुबीने दाखवल्या आहेत.
            पण गुणवत्ता कधीही लपून राहत नाही आणि उशिरा का होईना संधी मिळते या न्यायाने आनंद कुमारच्या हुशारीबद्दल  जानून असलेल्या एका कोचिंग क्लासच्या संचालकाशी त्याची अपघाताने ओळख होते आणि आनंदकुमारचे आयुष्य बदलून जाते. हातात पैसे यायला लागतात. चालण्या-बोलण्यात आणि वागण्यात रुबाब डोकवायला लागतो. त्याच्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने तो एक चांगला आणि जीव तोडून शिकवणारा शिक्षक म्हणून नावारूपास येतो. संपूर्ण पाटणा शहरात आणि युपी बिहारमध्ये त्यांच्या गुणवत्तेचा आणि बुद्धिमत्तेचा डंका वाजायला लागतो.  आपल्या मुलाला IIT त पाठवायचे असेल तर आनंदकुमार शिवाय पर्याय नाही याची पालकांनाही खात्री पटते. त्याचे वलय आणि बुद्धिमत्ता पाहून त्याच्या नावावर क्लासचे संचालक आणि त्यात गुंतवणूक करणारे राजकारणी या क्लासची कॉर्पोरेट इंडस्ट्री देशभर उभारायचे स्वप्न बघतात आणि त्यात गुंतवणूकही करतात. हे सगळे आनंदकुमारमुळे शक्य आहे आणि आपल्याला पैसे कामवायचे असतील तर आनंदकुमारने आपल्याला सोडून देता कामा नये याची खबरदारी क्लासचे संचालक घ्यायला लागतात.  त्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्याचा पगारही दुप्पट केला जातो. आनंद कुमारच्या हातात पैसा, उंची कपडे, दागदागिने आणि घरी कामाला नोकरचाकर, वीकेंड पार्ट्या आणि तोकड्या कपड्यातील मुलींबरोबर मदधुंद नाच या सगळ्यात त्याला गुरफटून टाकण्याचा पुरता बंदोबस्त केला जातो आणि काही काळासाठी आनंद त्यात गुरफटतोही. या सगळ्या थाटामाटामुळे त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सवर्ण मुलीचा आणि कधीकाळी त्याला जातीवरून हिनवणारा उच्च पदस्थ सरकारी अधिकारी बाप नाईलाजाने आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून द्यायला तयार होतो.
आनंद आपल्याला सोडून जाऊ नये या प्रयत्नांचा भाग म्हणून आनंदकुमारला क्लासबाबत सर्व अधिकार दिले जातात. क्लासमध्ये ऍडमिशनसाठी झुंबड उडालेली असतानाच गुणवत्ता आहे पण पुरेसे पैसे नाहीत अश्या अनेक मुलांना माघारी जावे लागतंय ही बाब त्याच्या समोर येते. त्याला याची खंतही वाटतेय पण क्लासचे नियम त्याला काही करू देत नाहीत. त्यामुळे निवांतक्षणी आनंदकुमारला जाणवते की, आपल्याला भरपूर पैसे मिळतायत, नाव, मानसन्मान, इज्जत, प्रेम सगळे मिळाले पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठे तरी एक रितेपण आहे. कारण आपण ज्या वर्गातून आलो त्या वर्गातील कोणालाच यात कसलेच स्थान नाही कारण ज्ञान देणे हाच एक गोरखधंदा होऊन बसला आहे त्यांच्या मुळाशी तुम्ही किती फी देऊ शकता? हाच एक कळीचा मुद्दा आहे. एकेकाळी पैसे नाहीत म्हणून गणितातील सर्वोच्च ज्ञान मिळवायची क्षमता असूनही आपण त्यापासून वंचित राहिलो की बोच त्याला जाणवू लागते आणि त्यातून तो अस्वस्थ होतो. 'आहे रे' वर्गापेक्षा 'नाही रे' वर्गासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव त्याला स्वस्थ बसू देत नाही. हे सगळे चालू असताना त्याच्या आणखी एक बाब लक्षात येते ती म्हणजे आपण आपल्या या क्षमतेचा वापर गरीब घरातील होतकरू आणि गुणवान मुलांना घडवायला लावू शकतो. पण हे करत असताना आपल्या या सगळ्या ऐहिक सुखाला तर मुकावे लागेलच पण जे काही कमावले तेही पणाला लावावे लागेल. पण तरीही तो पक्का निर्णय घेतो. त्याच्या या निर्णयाला अर्थातच घरातून विरोध होतो. मोठ्या प्रयासाने मिळालेल्या प्रेमाला मुकावे लागते पण म्हणून त्याचा निर्णय बदलत नाही.

खूप शिकायची इच्छा आहे पण सोयी सुविधा नाहीत, आर्थिक पाठबळ नाही, गुणवत्ता आहे पण इंग्रजी येत नाही त्यामुळे आत्मविश्वास नाही, शिकायची इच्छा आहे पण कोणताच मार्ग दिसत नाही अशी कित्येक मुले मुली टीचभर पोटासाठी मोलमजुरी करत आहेत. कुणी विटभट्टीवर, बांधकामावर, हमाली, मिठाच्या फॅक्टरीत अश्या अनेक ठिकाणी काम करत आहेत. ही सर्व मुले सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील आहेत. त्यांनी नेहमी असेच आपल्यासाठी राबत राहिले पाहिजे, आपली गुलामी केली पाहिजे अशी विचारधारा बाळगणारा वर्चस्ववादी उच्चवर्णीय  समाज आणि जमीनदार वर्ग यासाठी सतत प्रयत्नशील आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे हा समाज या विषमतेचे सर्मथन करणारा आहे आणि त्यासाठी तो रामायण महाभारतातील विषमतेला प्रमाण मानणारा आहे. "सवर्ण अर्जुन जिंकायला हवा असेल तर कितीही गुणवान आणि बुद्धिमान असला तरी एकलव्य हरला पाहिजे, आणि तो असा हरणार नसेल तर त्याचा अंगठा कापून घेतला पाहिजे" हा जात वर्चस्वाचा विचार त्यामागे आहे. रामायण-महाभारतातील विषमता आणि समरसता हेच अंतिम सत्य असून मागासवर्गीय शिकले तर आपली गुलामी कोना करणार? हलक्या दर्जाची कामे कोण करणार? आपल्याला मजूर मिळणार नाही, हलकी कामे सवर्णांना करावी लागतील म्हणून दलितांना शिकूच ध्यायचे नाही हा शिरस्ता असताना आनंदकुमार आपले सर्व सुखे आणि मिळकत पणाला लावून उच्च गुणवत्ता आणि शिकण्याची आंतरिक ओढ असलेली 30 मुले निवडतो आणि त्यांना विनामूल्य कोचिंग, राहणे आणि खाण्याच्या सुविधेसह IIT entrance चे कोचिंग चालू करतो.
आनंदने हा मार्ग निवडल्याने तो शिकवत असलेला कोचिंग क्लास ओस पडायला लागतो. आनंद कुमार शिकवणार म्हणून लाखो रुपये देऊन प्रवेश घेतलेली ही मुले क्लास सोडायला लागतात. पालक पैसे परत मागायला लागतात. आणि आनंद आणि क्लासचालक यांच्यात एक शीतयुद्ध सुरू होते. अगोदर आनंदला पगार वाढविण्याचे आणि या गरीब मुलांसाठी पण सामाजिक जबाबदारी (CSR) आणि परोपकाराच्या (general philantrophy) नावाखाली साधा शिक्षक देऊन या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आमिष दाखविले जाते. गरिबांची मुले म्हणून सुमार शिक्षकांकडुन त्यांना शिकविले तर त्यांना यश कसे मिळेल? असे प्रश्न उपस्थित करून आनंद ती धुडकावून लावतो आणि सामाजिक जबाबदारी आणि परोपकाराच्या नावाखाली गरिबांचे भले करण्याचे खाजगी कंपन्या आणि श्रीमंतांनी चालवलेले ढोंग आनंदकुमार आपल्या नजरेने मांडतो. आनंदकुमार नमत नाही हे बघुन त्याला त्रास देण्यासाठी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची आर्थिक नाकेबंदी केली जाते, क्लासची वीजही तोडली जाते, त्याला बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकविण्याचाही प्रयत्न केला जातो. पण आनंद कोणाला शरण जात नाही. मग मात्र त्याला जीवे मारण्याची सुपारी दिली जाते. सुपारी घेतलेला त्याला मारायला येतो तेव्हा तो "मला मी हे चांगले काम करतोय म्हणून मारले" हे कोणाला सांगू नकोस,  नाहीतर चांगले काम करणारे लोक त्यापासून परावृत्त होतील असे सांगतो तेव्हा त्या गुंडांचे होणारे मतपरिवर्तन आनंदचा निश्चय आणि पक्का होतो.
आनंद आपल्याला शिकवायला येत नाही म्हणून श्रीमंतांची मुलेही हैराण आहेत. ती त्याला भेटायला येतात आणि आम्ही श्रीमंत आहोत यात आमची चूक काय? असे विचारतात तेव्हा आनंद म्हणतो, यांची लढाई जगण्याची लढाई आहे त्यामुळे मला त्यांना प्राधान्य धायला हवे.
एवढे सगळे करूनही आनंद आपल्याला शरण येत नाही हे पाहिल्यावर आनंद आणि सगळ्या मुलांना मारण्याचा मोठा कट रचला जातो. त्याला आनंद आणि सर्व मुलांनी दिलेले उत्तर आणि केलेला संघर्ष आणि या मुलांना शिकविण्यासाठी आनंदने वापरलेल्या ट्रिक, बिहारमधील जातवास्तव, शिक्षणाचे झालेले बाजारीकरण आणि भांडवलीकरण अनुभवण्यासाठी एकदा थिएटरमध्ये जायलाच हवे.
©के.राहुल 9096242452


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...