Skip to main content

एनडीए, युपीए आणि एनपीए: जागता पहारा

१९५०-६० च्या काळात दक्षिणेतही हिंदी चित्रपट निघायचे. पण त्यात बॉलिवुडचेच कलाकार घेतले जात. एकाच वेळी दक्षिणी भाषेत व हिंदीतले चित्रपट चित्रित केले जायचे. त्यात दोन चित्रसंस्था आघाडीवर होत्या. एक जेमिनी आणि दुसरी एव्हीएम. यापैकी बहुधा एव्हीएमचा कुठला तरी चित्रपट होता आणि त्यात मुक्री व ओमप्रकाश यांच्यातला एक प्रसंग आठवतो. ओमप्रकाश किराणामालाचा दुकानदार आणि मुक्री त्याच्या दुकानात खुप उधारी थकवलेला ग्राहक होता. ओशाळवाणेपणाने आणखी उधारी मागायला आलेल्या मुक्रीला दुकानदार हाकलून देत असतो आणि शिव्याशापही देत असतो. या वादावादीत मुक्री चिडून विचारतो, किती आहे अशी उधारी? त्याला उत्तर मिळते ९५ रुपये. मुक्री म्हणतो एकरकमी देऊन टाकतो., साली कटकट नको. तुला शंभरचीच नोट देतो म्हणजे झाले. समजा तुला शंभर रुपये दिले, तर माघारी किती रुपये देशील. चकित झालेला ओमप्रकाश डोके खाजवत म्हणतो, पाच रुपये तुला परत द्यावे लागतील. मुक्री पुन्हा वि़चारतो, हिशोब जमतो ना? किती द्य़ायचे तू मला? ओमप्रकाश बोटे मोजून पुन्हा सांगतो, अर्थात पाच रुपये. इतका खुंटा बळकट झाल्यावर रुबाबात आवाज चढवून मुक्री म्हणतो, चल माझे पाच रुपये काढ पहिले. पुन्हा डोके खाजवित विचारात पडलेला ओमप्रकाश विचार करू लागतो. पण मुक्री त्याला उसंतच देत नाही आणि पाच रुपयांसाठी मागे तगादा लावतो. बिचारा दुकानदार गल्ल्यात हात घालून त्याला पाच रुपये देऊन टाकतो. मग म्हणतो, माझ्या उधारीचे काय? मुक्री म्हणतो, देईन की तुला शंभर रुपयाची नोट नंतर आणि हसत हसत निघून जातो. नेमके काय झाले याची उजळणी करीत काही वेळाने ओमप्रकाश म्हणातो, ‘फ़िर उल्लू बनाकर निकल गया.’ पन्नास साठ वर्षापुर्वी एका फ़ालतू चित्रपटात हा विनोद होता, मागल्या दोन दशकात त्यालाच भारताची अर्थव्यवस्था वा बॅन्कींग म्हणून प्रतिष्ठा मिळालेली आहे.

कालपरवा पंजाब नॅशनल बॅन्केचा जो नीरव मोदी घोटाळा चव्हाट्यावर आला आहे, त्याचे कथानक या सहा दशके जुन्या चित्रपटातील विनोदी प्रसंगपेक्षा किंचीत तरी वेगळे आहे काय? त्यात एक सामान्य किराणा दुकानदार आहे आणि इथे व्यवस्थापकीय प्रशिक्षण घेतलेले मॅनेजर्स आहेत, एकाहून एक अर्थशास्त्री मंत्री आहेत आणि त्यांच्यावर नजर ठेवायला जगात ख्यातकिर्त असलेले अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार हाकत होता. आणि त्यांच्याच अखत्यारीखाली कारभार करणार्‍या एका बॅन्केमध्ये म्हणे नीरव मोदी नावाच्या जवाहिर्‍याने छदामही जमा केल्याशिवाय नुसते खाते उघडले, असे विद्यमान जाणता राजाच म्हणतात. जगातला खातनाम जवाहिरा म्हणून विविध देशात पेढ्या उघडणारा माणूस म्हणे बॅन्केत नुसते खाते उघडतो आणि त्यात कुठलीही उलाढाल करत नाही. नंतर बघता बघता त्याच्या खात्यातून ११-१२ हजार कोटी रुपये जमा केले जातात आणि तो काढून घेत रहातो. पंतप्रधानापासून बॅन्केच्या कुणा हिशोब तपासनीसालाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. तो बॅन्केतूनच नव्हेतर देशातूनही दिसेनासा झाल्यावर धावपळ सुरू होते. असा नीरव एकटाच खातेदार नाही. शेकड्यांनी असे खातेदार राष्ट्रीकृत म्हणजे सरकारी मालकीच्या बॅन्कांना मागली कित्येक वर्षे चुना लावत आहेत आणि देशाचे राज्यकर्ते त्यांना त्यासाठीच विविध सुविधा उपलब्ध करून देत राहिलेले आहेत. हे कोणत्या रहस्यमय नाटकाचे कथानक आहे? तुमच्या पगाराच्या खात्यातूनही चेकने सही करून दोनपाच हजार रुपये काढताना दहावेळा पुढे मागे सह्या करून घेणारे, किंवा भिंग लावून तपासणारे बॅन्कवाले, अशा माणसाला इतक्या सहजासहजी इतकी मोठी रक्कम हातात देऊ शकतात काय? त्याने छदामही खात्यात जमा केलेला नसताना त्याला इतके कोटी मिळतातच कसे? त्याचे अर्थशास्त्र त्या चित्रपटात मुक्रीने सांगितले तसेच्या तसे आहे. म्हणून मुक्री समजून घेतला पाहिजे.

नीरव मोदी किंवा विजय मल्ल्या हे मुक्रीपेक्षा तसूभर वेगळे वागलेले नाहीत. फ़रक इतकाच होता, की त्याने ओमप्रकाशला हातोहात उल्लू बनवले होते आणि या दोघांनी देशाच्या अर्थमंत्र्याला वा सरकारला विश्वासात घेऊन मुर्ख बनायला भाग पाडलेले आहे. किंबहूना मुक्री जो प्रस्ताव ओमप्रकाशकडे मांडतो, तो प्रस्ताव इथे अर्थमंत्रालयाने मल्ल्या व नीरव समोर मांडलेला आहे. युपीए वा एनडीए ह्या वादाला बाजूला ठेवून देशाच्या बॅन्क व्यवसायाचा एनपीए इतिहास तपासून बघता येईल. या बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण कधी झाले व त्यानंतर महागाई कशाला वेगाने वाढत गेली? झपाट्याने रुपयाची किंमत कशाला घसरत गेली अशा सामान्य जनतेला भोवणार्‍या विषयाला कोणी कशाला हात घालत नाही? १९६९ सालात हे राष्ट्रीयीकरण झाले, तेव्हा मुंबईतल्या बेस्ट बससेवेचे किमान तिकीट अवघे दहा पैसे होते. आज किमान तिकीट आठ रुपये झाले आहे. म्हणजे पन्नास वर्षात रुपयाची किंमत ऐंशी पटीने घसरली आहे. तेव्हा एक रुपयाला जे खरेदी करता येत होते, त्यासाठी आज ८० रुपये मोजायची पाळी आलेली आहे. १९७० सालात कोणी भविष्य निर्वाहनिधीत पगारातले शंभर रुपये जमा केलेले असतील आणि व्याजासकट आज त्याला दहा पटीने पैसे मिळाले तरी हजार रुपये मिळतील. पण महागाई ऐंशी पटीने वाढल्याने शंभराचे आठ हजार रुपये मिळायला हवेत. पण मिळतात हजार म्हणजे त्याच्या सात हजार रुपयांची परस्पर लुट होऊन गेली आहे. ती लूट कुठे गेली? कोणी केली? राष्ट्रीयीकरणातून ज्या प्रकारची बॅन्क व्यवस्था उदयास आणली गेली व चालविली गेली, तिनेच या लुटमारीला कायदेशीर प्रतिष्ठा वा मान्यता मिळवून दिलेली आहे. अशा बॅन्कातून जे व्यवहार झाले ती व्यवस्था केतन पारीख, हर्षद मेहता वा सत्यम राजू यांना खुले रान देणारी होती ना? नीरव मोदी वा विजय मल्ल्या त्याचे पुढल्या पिढीतले खेळाडू आहेत.

राष्ट्रीयीकरणाने बॅन्केच्या अर्थव्यवहारात सरकारी वा राजकीय हस्तक्षेप सरळ व उघड सुरू झाला. कोणीही कर्ज घेतले असेल आणि त्याचे राजकीय निकट संबंध असतील तर त्याला कर्ज फ़ेडण्याची गरज राहिली नाही. त्याच्या कर्जाचे कागदोपत्री व्यवहार असे रंगवण्यात आले आणि बॅन्कांची उलाढाल वाढत विस्तारत गेली. रुपयांचे मूल्य दिवसेदिवस घटत गेले. मोठमोठी कर्जे द्यायची आणि बुडीत गेल्यावर जुन्या उधारी वसुलीच्या सापळ्यात बॅन्केला ढकलून अधिकचे कर्ज देत जायचे. मुळातले कर्ज वसुल होण्याचे नाव नाही आणि आणखी पैसे उधळायला देत जायचे, यालाच बॅन्कींग नाव देण्यात आले. नग ते सत्य लपवण्यासाठी त्याला वेगवेगळी आकर्षक नावे देण्यात आली. कर्जाची फ़ेरमांडणी, खात्याची पुनर्रचना वगैरे. पण प्रत्यक्षात पहिले कर्ज वसुल होण्याचे नामोनिशाण नव्हते. एनपीए म्हणजे निकामी झालेला दिवाळखोर खातेदार. जितक्या कोटीचे कर्ज घेतले त्याचे हप्ते सोडा, व्याजही भरणा करीत नाही तो एनपीए. मग गुंतलेले पैसे परत मिळवण्याचे नाटक सुरू होणार. बुडीत गाळात गेलेला व्यवसाय धंदा नव्याने उभा रहाण्यासाठी त्याला आणखी पैसे द्यायचे आणि आधीच्या कर्जात ते जमा करायचे. अशा रितीने आकडे फ़ुगत गेले आणि १०७० सालात चाळीस हजार कोटीची उलाढाल करणारी बॅन्क आज चार आठ लाख कोटीची उलाढाल करताना कागदावर दाखवले गेले आहे. तिच्या आरंभीच्या कर्जाची मुदलाची कधी वसुलीच झाली नाही. अर्थात हे मोठ्या व संगनमताने केलेल्या अफ़रातफ़रीचे मामले आहेत. तुम्ही आम्ही घरासाठी मोटारसाठी शेतीपंपासाठी घेतलेल्या कर्जाचा त्यात समावेश होऊ शकत नाही. तुमच्या घरावर जप्ती आणली गेली आणि त्यातून सुटण्यासाठी तुम्ही भिका मागूनही ह्प्ते जमा केलेले आहेत. मल्ल्या नीरवची कहाणी भिन्न आहे. त्यांनी नुसते कागद वा फ़ुकाचे शब्द गहाणवट ठेवले आणि कोट्यवधी पळवलेले आहेत.

एका जाणकाराने मला हा विषय समजावताना सोपी कल्पना सांगितली. पंधरा वर्षापुर्वी कोणाला पाच कोटी रुपये कर्ज दिले होते आणि आता तो फ़ेडू शकत नसल्यामुळे त्यात गुंतलेले पैसे बुडू नयेत म्हणून धंदा सावरण्यासाठी आणखी भांडवल म्हणून एक कोटी द्यायचे. म्हणजे खात्यात सहा कोटी नवे कर्ज दिल्याचे दाखवून आधीचे पाच व्याजासह वसुल झाल्याचा कागदोपत्री देखावा उभा करायचा. त्यात दोघांची मिलीभगत असल्यावर एकूण झालेले सहा कोटी फ़ेडायचा विषयच कुठे येतो? त्यानंतर नव्या सहा कोटींची मुदत संपत येईपर्यंत धंदा सावरण्याचा विषयच नसतो. त्याला आठ कोटी देऊन आधीचे सहा वसुल झाल्याच्या कागदोपत्री नोंदी करायच्या. मुदलात पहिले दिलेले पाच कोटी बुडीत गेलेले असतात आणि आणखी तीन कोटी जातात. आठचे दहा कोटी मग त्याचे तेरा कोटी व पुढे सतरा वीस होत होत पंधरा वर्षामध्ये पाच कोटीचे कर्ज चाळीस पन्नास कोटीपर्यत जाऊन पोहोचलेले असते आणि वसुली शून्य असते. अशा रितीने प्रतिवर्षी काही कोटी बुडीत गेल्यावर बॅन्कांचे दिवाळे वाजू शकते ना? मग सरकार त्या बॅन्केला नवी गुंतवणूक म्हणून काही कोटी आपल्या खात्यातून देणार. त्याला फ़्रेरगुंतवणूक म्हणायचे. सरकार म्हणजे राज्यकर्त्यांनी तरी कोणाचा कान पकडायचा? सगळे नियम व सुरक्षा गुंडाळून त्याच राज्यकर्त्यांनी बिनातारण बोगस कर्जे द्यायला लावलेली असतील, तर वसुलीसाठी अधिकार्‍यांचा वा संचालकांचा कान कसा पकडायचा? त्यापेक्षा सरकारी खजिन्यातून वा जनतेच्या खिशातून तितकी रक्कम बॅन्केला जीवदान म्हणून भरायची. पण सरकारने तरी इतके पैसे आणायचे कुठून? अर्थात नोटा छापून! तुट येते तितक्या नव्या नोटा छापा आणि गळती भरून काढा. नोटा वाढत गेल्या आणि रुपयाची बाजारातील खरेदीची किंमत घटत गेली. १९७० सालात रुपयाला जी वस्तु मिळत होती, तिची किंमत अनेक पटीने वाढत गेली.

हा उद्योग आजकालचा नाही. राष्ट्रीयीकरण झाल्यापासून सुरू झालेला आहे. आता साडेचार दशकात म्हणूनच झपाट्याने रुपयाचे बाजार मूल्य घसरत गेले. डॉलरच्या तुलनेत रुपया किती घसरत गेला? सोन्याची किंमत किती भडकत गेली? ती सोने महागल्यामुळे नाही, रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे. १९७५ सालात पाच साडेपाचशे रुपये तोळा असलेले सोने आता ३० हजार रुपयांपर्यंत गेले, याचा अर्थ या चार दशकात रुपयाचे मूल्य ६०-८० पटीने घटले. त्याला असले कागदोपत्री बॅन्क व्यवहार कारण आहेत. हर्षद मेहता वा नीरव मोदी-मल्ल्याचा गाजावाजा होतो. पण त्यांच्यासारखे लहानमोठे हजारो भामटे आजवर आपल्याला गंडवून गेले आहेत. पण तेच तेवढे कोणी भामटे नाहीत. ते दाखवायचे ‘दात’ आहेत. खाल्लेले दात व पचवणारी पोटे वेगळीच आहेत. त्यात राज्यकर्ते राजकारणी अधिकारी नोकरशहा अशा सर्वांचा समावेश होत असतो. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आपणही पंतप्रधान काय बोलले वा काय सांगत होते, त्यापेक्षा रेणूका चौधरी यांच्या रामायणात रमलेले होतो. याच विषयाला मोदींनी हात घातला होता आणि एनपीए युपीएच्या काळात ८० लाख कोटीवर जाऊन पोहोचला असल्याचा गंभीर आरोप केला होता. पण रेणूकेच्या हास्य गडगडाटात रमलेल्यांना ते ऐकायला वा समजून घ्यायला सवड कुठे होती? मोदी लोकसभेत इतके प्रदिर्घ भाषण करताना ८० लाख कोटी एनपीए म्हणतात, त्याचा नेमका अर्थ काय? त्यात युपीएचा हात म्हणजे काय? कुठल्या तरी वाहिनीने त्यावर प्राईम टाईम चर्चा केली काय? यांचा गडगडाट खर्‍याखुर्‍या शूर्पणखेला थक्क करण्याइतका होता. मोदी ज्याचा उल्लेख त्या भाषणात करून गेले त्या ८० लाख कोटीमध्येच नीरव मोदीचे साडे अकरा हजार कोटी येतात. म्ह्णूनच नीरव मोदी केवळ हिमनगाचे टोक आहे. त्सुनामी यायची आहे. युपीएची टायटॅनिक आदळायची आहे अजून!
याची सुरूवात कुठे झाली त्याचा इतिहासही तपासून बघायला हवा. आज जे कोणी गळा काढत आहेत, त्यांनी मुळात बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण झाले त्याचे कोडकौतुक केले होते ना? जनतेचा पैसा जनतेला देण्याच्या गप्पा मारत १९६९ सालात इंदिराजींनी पहिल्या चौदा बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण केले. वास्तविक तो राजकीय सापळा होता. तेव्हा कॉग्रेसमधला सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. त्यात जुने वयोवृद्ध नेते हे भांडवलशाहीचे सिंडीकेट असल्याचा देखावा इंदिराजींना उभा करायचा होता आणि त्यातून डाव्या व पुरोगामी पक्षांना आपल्या मदतीला आयते उभे करायचे होते. त्यांनी एका रात्री अध्यादेश काढून चौदा बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण करून टाकले आणि आणखी एक फ़तवा काढून संस्थानिकांचे तनखे रद्द करून टाकले. मग काय बहुतेक कम्युनिस्ट नेते व विचारवंतांना देशात समाजवाद आल्याचे भास होऊ लागले. कॉग्रेस पक्षाचेच नेते इंदिराजींच्या विरोधात आक्रोश करत होते आणि अनेक समाजवादी व कम्युनिस्ट नेते इंदिराभक्त होऊन गेले. आज मोदींच्र कौतुक करणार्‍यांना ‘भक्त’ म्हणून हिणवणार्‍या तमाम वर्गा्ची तेव्हा इंदिराभक्त म्हणून ओळख झालेली होती. फ़ार कशाला सिंडीकेटला धुळीस मिळवून कॉग्रेसलाच साम्यवादी बनवण्यासाठी अनेक डावे नेते कॉग्रेसमध्ये सामिल होत गेले. बॅरिस्टर रजनी पटेल, कुमारमंगलम, एच आर गोखले अशी डझनभर नावे सांगता येतील. मूळ डाव्या पक्षांनीही दिड वर्ष अल्पमतात आलेल्या इंदिरा सरकारला आपली कुमक देऊन समाजवादाची पहाट साजरी केलेली होती. त्यामुळेच १९७० सालात लोकसभा बरखास्त करून इंदिराजी दोन तृतियांश जागा जिंकून पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्याला आता चार तपे उलटून गेली असली तरी जनतेचा पैसा जनतेच्या हाती आलेला नाही. तो पैसा नीरव मोदी वा मल्ल्याच्या जनानखान्यातील बटीक बनुन गेला आहे. आणि आज नीरव मोदीच्या नावे त्याच डाव्यांचे आजचे वारस गळा काढून रडत आहेत.

आर्थिक व्यवहारात सरकार वा राजकारण्यांना लुडबुड करण्याची मोकळीक ज्या धोरणाने दिली, त्याला हे मुर्ख समाजवाद समजून बसले आणि प्रत्यक्षात आर्थिक सुत्रे सरकारमान्य भांडवलदारांच्या हाती गेली. किंवा राज्यकर्त्यांच्या दलालांनी जनतेचा पैसा लुटण्यासाठी एक नवी भव्यदिव्य अलिबाबाची गुहा निर्माण झाली. मोदी तेव्हा राजकारणातही आलेले नव्हते आणि मल्ल्या वा नीरव यांनी व्यापार भामटेगिरीही आरंभलेली नव्हती. तेव्हा त्यांच्यासाठी भविष्यातल्या पायघड्या घालण्याचा निर्णय डाव्यांनी ढोलताशे वाजवून मिरवणूका काढत साजरा केलेला होता. त्यापुर्वीही राजकारणात अशा घोटाळ्यांची सुरूवात पंडित नेहरूंच्या स्वप्नापासून झालेली होती. आधी हरिदास मुंदडा वा नंतरच्या काळात डॉ. धर्मा तेजा यांना नेहरूंच्या कृपेने असे कर्ज मिळालेले होते. ते अनुदान स्वरूपातले होते. सरकारी अधिकारी तेव्हा आजच्या इतके ‘पुरोगामी’ झालेले नव्हते. म्हणूनच त्यांनी धर्मा तेजाच्या प्रकरणात बिनतारणाची सरकारी मदत देण्याविषयी आक्षेप नोंदवला होता. तरी नेहरूंनी हस्तक्षेप करून त्याला दहावीस कोटी रुपये द्यायला लावले होते. त्या पठ्ठ्याने तेवढ्या पैशात जपानच्या मित्सुबिशी कंपनीकडून चार मालवाहू जहाजे खरेदी केली आणि फ़क्त पहिला हप्ता चुकता केला होता. पुढे तीच जहाजे भारतातील बॅन्कांकडे गहाण टाकून आणखी काही कोटी रुपयांची उचल केली. त्यातून त्याची चैनमौज मल्ल्या वा नीरवसारखीच चाललेली होती. अखेर त्या मित्सुबिशी कंपनीने जहाजाचे पुढले हप्ते मिळाले नाहीत म्हणून तक्रार केली आणि धर्मा तेजा फ़रारी झाला होता. त्याचे पितळ उघडे पडले होते. मजेची गोष्ट अशी, की यातले मुंदडा प्रकरण संसदेत उपस्थित झाल्याने नेहरूंची फ़ार मोठी नाचक्की झाली होती आणि तो गौप्यस्फ़ोट करणार्‍याचा नातू आज मोदींना नीरव प्रकरणी जाब विचारतो आहे. पण आपल्या आजोबाने काय केले ते त्याला ठाऊक नाही.

आजोबा म्हणजे इंदिराजींचे पती फ़िरोज गांधी होय. त्यांनीच लोकसभेत मुंदडा प्रकरणाला वाचा फ़ोडली होती आणि आज त्यांच्याच सुनेच्या इशार्‍यावर चालणार्‍या युपीए सरकारने त्याच पद्धतीने नीरव किंवा मल्ल्या यांना सरकारी बॅन्का लुटू दिल्या. मध्यंतरी कुठल्याशा प्रकरणावर संतप्त प्रतिक्रीया देताना सोनिया म्हणाल्या होत्या, आपण कोणाला घाबरत नाही. आपण इंदिराजींची सुन आहोत. म्हणजे यांना बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण करणार्‍या सासुबाई आठवतात. पण असले आर्थिक घोटाळे चव्हाट्यावर आणणारा सासरा आठवत नाही. हा कॉग्रेसी नेहरू वारसा आहे. कुठलाही नेहरूवादी याचा उल्लेख सहसा करणार नाही आणि अन्य कोणी केला, मग अशा नेहरूभक्तांच्या तळपायाची आग मस्तकात जात असते. यापैकी धर्मा तेजाची ख्याती लक्षात घेण्यासारखी आहे. तात्कालीन जाणत्या पत्रकारांनी लिहून ठेवले आहे, धर्मा तेजा याचे सर्वात मोठे भांडवल, त्याची सुंदर पत्नी हेच होते. असे म्हटले की नेहरूवादी रडकुंडीला येतात. पण अशा घोटाळ्याची मालिका खुप जुनी व सोनिया राहुलना वारश्यात मिळालेली आहे. पण तेव्हा बॅन्केत वा तशा व्यवहारात सरकारला थेट हस्तक्षेप करता येत नव्हता. ती ढवळाढवळ करण्याचा अधिकार इंदिराजींनी डाव्यांची मदत घेऊनच संपादन केला. किंबहूना अशा फ़सवणूकीला उपयुक्त असलेले अधिकार म्हणजेच समाजवाद, असला खुळेपणा या दुष्टचक्राला कारणीभूत झाला आहे. राजकीय व सामाजिक शास्त्रशुद्ध विचार करणारे म्हणून डावे नेहमी मिरवत असतात. मग त्यांच्याकडून असा खुळेपणा कशाला होऊ शकला? त्यापासून त्यांनी काही धडा घेतला आहे काय? ते शक्यच नव्हते. उजव्या किंवा समाजवादी नसलेल्यांचा द्वेष, हे विचारसुत्र झाले मग विवेक रसातळाला जाणार ना? डाव्यांची तीच शोकांतिका आहे आणि त्यातूनच डावे विचार व त्यांच्या संघटना अस्तंगत होत गेल्या आहेत.

स्वतंत्र पक्ष, जनसंघ किंवा हिंदुसभा व सिंडीकेट कॉग्रेस यांचा कमालीचा द्वेष म्हणजे समाजवाद, अशी जी भुरळ तात्कालीन डाव्यांना पडलेलॊ होती. त्याच्याच आहारी गेल्याने त्यांनी पन्नास वर्षापुर्वी इंदिराभक्ती सुरू केली होती. तिचेच हे पर्यवसान आहे. सत्ताच नव्हेतर आर्थिक व औद्योगिक अधिकाराचे केंद्रीकरण म्हणजे समाजवाद असल्या खुळेपणाने सरकारच्या व पर्यायाने राज्यकर्त्यांच्या हाती अधिकाधिक अधिकार केंद्रीत होण्याला मग प्राधान्य मिळत गेले. त्या जागी असलेल्या मुठभर नेते मंडळींना खिशात टाकून कोणीही भामटा कुठलेही उलटेसुलटे व्यवहार करायला मोकळा झाला. त्यातून घोटाळ्यांची एक थोर परंपराच निर्माण झाली. हर्षद मेहता, किरीट पारीख, सत्यम राजू, विजय मल्ल्या, नीरव मोदी हे त्यातले नावाजलेले खेळाडू आहेत. विजय मल्ल्याचा उदय व भरभराट युपीए काळातील असावी, हा निव्वळ योगायोग नाही. पुन्हा मजेची गोष्ट म्हणजे युपीएचे मोठे समर्थक डावी आघाडीच होती. उजव्या किंवा हिंदूत्ववादी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या धोरणातून ही नवी पुरोगामी भूमिका इंदिराजींच्या सुनेलाही तसेच एकाधिकार बहाल करून गेली आणि नवनवे भुरटे भामटे मोठमोठे घोटाळे आरामात करू शकले. मोदी युगात धरपकड सुरू झाली आहे. पण या तमाम घोटाळ्यांची पेरणी वा उभार युपीए काळातला आहे. किंबहूना डाव्यांच्या आशीर्वादाने चाललेल्या मनमोहन सरकारनेच त्याला गती दिली. २००४ सालात भाजपाची सत्ता जाणार हे निकालातून स्पष्ट झाल्यावर नव्या सरकारचा शपथविधी होण्यापुर्वीचा एक प्रसंग आज सगळेच विसरून गेलेले दिसतात. तेव्हा डाव्या आघाडी़च्या पाठींब्याने मनमोहन सिंग पंतप्रधान होणार हे निश्चीत झाले होते. पण शपथ घेतली जाण्यापुर्वीच शेअरबाजार धडाधड कोसळत गेला. तात्काळ सिंग यांनी भावी अर्थमंत्री चिदंबरम यांना मुंबईला पाठवून घडी सावरली होती. आठवते?

डाव्यांच्या तालावर ना़चणारे सरकार म्हणजे भांडवलशाहीलला धोका अशी त्यामाग़ची समजूत होती. पण चिदंबारम यांनी सट्टेबाजांना निश्चींत केले आणि डाव्यांमुळे काही धोका नसल्याची ठाम हमी दिली. पुढल्या काळात नीरव मोदी, मल्ल्या असे एकाहून एक नग उदयास येत गेले. ते बॅन्का लुटण्याचे कार्यक्रम चालवित होते आणि मनमोहन चिदंबरम सरकारच्या अखत्यारीत असलेल्या खाण, स्पेक्ट्रम घोटाळ्यांची कामगिरी बजावत होते. त्यातून मग एनपीए म्हणजे निकामी झालेले कर्ज खातेदार अशी एक नवी संकल्पना पुढे आणली गेली. कर्जबुडव्यांना नव्या कर्जाची हमी देण्याचा सपाटा सुरू झाला आणि दहा वर्षात शेकड्यांनी एनपीए तयार झाले. मोदी सत्तेवर येताच त्याला हात घातला गेला असता, तर काही महिन्यातच देशातल्या सर्व ३० सरकारी बॅन्का दिवाळखोरीत गेल्या असत्या. कारण तेव्हा एनपीए बुडीत कर्जाची एकूण रक्कम ५२ लाख कोटीवर पोहोचली होती आणि प्रत्यक्षात ती ८० लाख कोटीपर्यंत असावी. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी भाषणात मोदींनी त्याचा साफ़ उल्लेख केला होता. समोर बुडवेगिरी दिसत असतानाही मोदी म्हणजे एनडीए सरकारला त्याची लक्तरे काढता येत नव्हती. त्यासाठी आधी बॅन्कांना दिवाळखोरीतून बाहेर काढणे अगत्याचे होते. नोटाबंदीतून बुडीत बॅन्कांना जीवदान मिळाल्याचे आरोप अनेकांनी केले. अगदी कॉग्रेसच्या पंडीतांनीही केले. पण त्या बॅन्का कोणाच्या कर्तृत्वामुळे अशा दिवाळखोरीच्या गर्तेत ओढल्या गेल्या, त्याचा उल्लेख कोणी केला नाही. कसा करणार? आरोपाचा चिखल आपल्याच अंगावर आला असता ना? देशातल्या सर्व सरकारी बॅन्का ८ नोव्हेंबर म्हणजे मोदी सरकारच्या २९ महिन्यात बुडीत झाल्या नव्हत्या. ते कर्तृत्व मनमोहन, चिदंबरम आणि सोनियांचे होते. त्या सर्व काळात रघुराम राजन रिझर्व्ह बॅन्केचे गव्हर्नर म्हणून काय काळजी घेत होते? त्याचाही खुलासा राजनभक्तांनी कधी केला नाही.

म्हणूनच आताही काय गदारोळ चालला आहे तो समजून घेतला पाहिजे. युपीएच्या कालखंडात देशाचे अर्थमंत्री कपील सिब्बल वा रणदीप सुरजेवाला नव्हते. म्ह्णूनच आताही त्यांनी मोदी सरकारवर बेछूट आरोप करण्यापेक्षा चिदंबरम वा मनमोहन यांना पुढे यायला सांगितले पाहिजे. आपल्या दहा वर्षात देशाची आर्थिक परिस्थिती कशी उत्तम व गुटगुटीत होती आणि मोदी सरकार आल्यावरच अर्थकारणाचे कसे दिवाळे वाजले; हे तेच दोघे नेमके सांगू शकतील. पण दोघेही बेपत्ता आहेत. चिदंबरम तर कॅमेरा समोर आला म्हणजे पळ काढतात. नीरव किंवा मल्ल्यविषयी प्रश्न विचारला, मग त्यांची बोबडी कशाला वळत असते? मोदी सरकार चुकले असेल तर त्याचे पोस्टमार्टेम हेच दोन अर्थशास्त्री करू शकतील ना? मग राहुल गांधी त्या दोन तोफ़ा लपवून फ़टाके कशाला उडवत असतात? नीरव मोदी वा विजय मल्ल्याचे व्यवहार आपल्या म्हणजे युपीए कारकिर्दीत कसे लाभदायक होते आणि मोदींनी क्सा विचका केला, त्याचे नेमके तपशील त्यांनाच देता येतील. मोदींना त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी निरूत्तर करू शकणार नाही. पण मल्ल्या व नीरव प्रकरणात दोन्ही अर्थशास्त्री तोंड शिवून बसले आहेत. कारण उद्या यातल्या भानगडी समोर येतील, तेव्हा त्यांच्याच सह्या आणि पत्रे समोर येण्याच्याब भितीने त्यांना पछाडले आहे ना? अर्थमंत्री पदाची शपथ घेण्यापुर्वीच मुंबईला येऊन आपण घसरणारा शेअरबाजार कुठल्या वचनावर थोपवला होता, त्याचाही खुलासा चिदंबरम यांना द्यावा लागेल ना? आता लोकसभेपुर्वी मनमोहन सिंग बोललेल्या विधानाचा अर्थ उलगडू शकतो. मोदी पंतप्रधान झाले तर? या प्रश्नाला उत्तर देताना मनमोहनजी म्हणाले होते, मोदींमुळे आपतीच येईल. ती आपत्ती आता समोर येते आहे. ती सामान्य जनतेवरची आपत्ती नसून युपीएच्या काळात जोपसलेल्या एनपीएची आहे. बुडवेगिरी चव्हाट्यावर येणे हीच ती आपत्ती आहे.

या संदर्भात युपीएचे कृषिमंत्री शरद पवार यांची मुक्ताफ़ळे म्हणूनच केविलवाणी वाटतात. ते कृषिमंत्री होते की नीरव मोदींचे अकौटंट होते असा प्रश्न पडतो. कारण कालपरवाच त्यांनी त्या खात्याची माहिती लोकांना एका मेळाव्यात सांगितली. २०११ साली म्हणे नीरवने फ़क्त बॅन्केत खाते उघडले होते आणि त्यात पैसे आले नव्हते. हे इतक्या खात्रीने फ़क्त नीरवचा अकौंटंटच सांगू शकतो ना? की त्याला एलओयु देणारा गोकुळ शेट्टी साहेबांच्या सल्ल्यानेच तशी हमीपत्रे वितरीत करत होता? आता ताब्यात घेऊन त्या शेट्टीची जबानी घेतली जात असताना तो २००९ पासून तशी हमीपत्रे दिली जात असल्याचे सांगतो. त्याचे खरे मानायचे तर २००९ सालातच मोदी देशाचे पंतप्रधान झालेले असले पाहिजेत. किंवा २००९ पुर्वीच २०११ साल कॅलेन्डरमध्ये येत असले पाहिजे. ही सगळी भानगड युपीए व एनडीए यांचे राजकीय भांडण असल्याचे भासवले जात आहे. पण ते प्रत्यक्षात एनपीए म्हणजे बुडवेगिरी खाते आहे. युनिव्हर्सल पिलफ़रेशन अलायन्स म्हणजे युपीए आणि नॉन डिफ़ेन्सीबल अकौंट म्हणजे एनडीए असे एकूण त्याचे राजकीय स्वरूप आहे. मोदी सरकारने अशा बुडवेगिरीला आणखी कर्ज नाकारण्याचा अट्टाहास केला नसता, तर हा उद्योग असाच चालू राहिला असता. नव्या धोरणांनी बुडीत कर्ज वाचवण्याचे नाटक बंद केल्याने बॅन्केतल्या शुक्राचार्यांना आपणच बाहेर येऊन गुन्हा दाखल करावा लागला आणि सगळे प्रकरण चव्हाट्यावर आलेले आहे. लोकसभेत मोदींनी म्हटल्याप्रमाणे हा घोटाळा दहापंधरा हजार कोटींचा नसून ८० लाख कोटीपर्यंत त्याची मजल जाणार आहे. कारण अजून किमान दोनतीन हजार नीरव मोदी, विजय मल्ल्या समोर यायचे आहेत. आपला चेहरा कॅमेरा समोरून लपवणारे ह्जारो चिदंबरम उघडकीस यायचे आहेत. यह तो सिर्फ़ झांकी है, पुरा तमाशा अभी बाकी है.  

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...