सेक्सच्या विषयात विश्वगुरू होता प्राचीन भारत
कामसूत्रा'ची रचना करणाऱ्या वात्स्यायनांच्याही शेकडो वर्षांपूर्वी युनानी साहित्यामध्ये काम विषयक कल्पनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. 'काम भावना म्हणजे कोणावर तरी अधिकार गाजवण्याची इच्छा असते' असं प्लेटोंचं म्हणणं होतं
'सिम्पोझियम'मध्ये युनानी नाटककार अॅरिस्टोफॅसनेही अशा एका काळाचा उल्लेख केलाय जेव्हा मनुष्य परिपूर्ण होता आणि त्याला दुसऱ्या कोणाचीही गरज भासत नसे.
परिणामी मानवजात अतिशय शक्तीमान झाली आणि देवतांना आव्हान देऊ लागली. पण देवांचा राजा जॉयसने यावर एक तोडगा काढला आणि मानवाची विभागणी स्त्री आणि पुरुष अशा दोन भागांमध्ये केली.रिणामी माणूस सरळ उभा राहून लागला, दोन पायांवर चालू लागला. त्याचं शरीर जणू दोन भागांमध्ये विभागलं गेलं.
प्लॅटोनुसार यामुळे मानवाला दुसऱ्या भागाची ओढ असते. सेक्स म्हणजे माणसाची पूर्णत्वाची ओढ असल्याचं प्लेटो मांडतात.
आपण त्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतो जी आपली नाही. पण नंतर एक काळ असाही आला जेव्हा सेक्स वाईट गोष्ट असून असं करणं पाप असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.
ईसवीसन 325मध्ये कॅथलिक चर्चचे आपले नियम बनवले. यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलं होतं, 'शरीर एक वाईट गोष्ट आहे. शारीरिक सुख व्यर्थ आहे आणि ते मिळवण्याची इच्छा बाळगणं पाप आहे.'
मूल जन्माला घालणं हे सेक्समागचं एकमेव उद्दिष्टं असावं असं त्यांचं मत होतं. जवळपास त्याच काळामध्ये वात्स्यायन ऋषी गंगेच्या तीरावर बसून कामसूत्र लिहीत होते. शारीरिक आनंद ही एक अतिशय चांगली गोष्ट असून ती चांगल्या रीतीने कशाप्रकारे मिळवता येऊ शकते, हे सांगत होते.
सेक्समधला मोकळेपणा
प्राचीन भारतीय वास्तुकलेमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यावरून प्राचीन काळामध्ये शरीर संबंधांविषयी लोकांची विचारसरणी किती खुली होती हे दिसून येतं.
ओडिशामधील कोणार्क येथील सूर्य मंदिरावर नग्न मूर्ती कोरण्यात आल्याचं पहायला मिळतं.
याच प्रकारे बौद्ध धर्माशी निगडीत अंजिठा आणि वेरूळच्या लेण्यांमध्येही तरुणींच्या नग्न मूर्ती आढळतात. अजिंठ्याच्या लेण्यांमधलीही चित्रं ख्रिस्ताच्याही 200 वर्षं पूर्वी रेखाटण्यात आली होती. तर वेरुळच्या लेण्यांमधील कलाकृती या पाचव्या ते दहाव्या शतकादरम्यानच्या असल्याचं सांगितलं जातं.
अशा प्रकारे सेक्सचं खुलं चित्रण मध्य प्रदेशातल्या खजुराहोच्या मंदिरांवरही आहे. ही मंदिरं किमान एक हजार वर्षं जुनी आहेत. चंडेल राजांनी ईसवीसन 950 ते 1050 दरम्यानच्या काळात या मंदिरांची बांधणी करून घेतली होती. अशी एकूण 85 मंदिरं बांधण्यात आली, पण त्यापैकी आता फक्त 22 शिल्लक आहेत.
ही देवळं जागतिक वारसा असल्याचं युनेस्कोने 1986मध्ये जाहीर केलं होतं. या देवळांवर हरतऱ्हेचे यौन संबंध पाहायला मिळतात. भिंतीवर प्रत्येक काम आसन चित्रित करण्यात आलेलं आहे. तीन व्यक्ती एकाच वेळी यौन संबंध करतानाही यात दिसतात.
हा विरोधाभास म्हणायला हवा, कारण एकीकडे ज्या भारतात आतापर्यंत समलैंगिकतेला कायदेशीर अपराध मानलं जात असे त्याच देशातल्या प्राचीन मंदिरांमध्ये समलैंगिकता मूर्तींच्या मदतीने समजवण्यात आलेली आहे.
13व्या शतकात माऊंट अबूच्या जवळ उभारण्यात आलेल्या दिलवाडा मंदिरातही संगमरवरात अशाच मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत.
समलैंगिकतेचा स्वीकार
समलैंगिकतेला जगातल्या इतर देशांमध्ये मान्यता मिळण्यासाठी झगडावं लागलं. पण प्राचीन भारतामध्ये याच समलैंगिकतेला सामाजिक मान्यता देण्यात आली होती.समलैंगिकता आणि 'तिसरं लिंग' हे भारतीय समाजात कायमच अस्तित्त्वात होतं, असं अमर दास विल्हेम यांच्या 'तृतीय प्रकृती : पीपल ऑफ द थर्ड सेक्स : अंडरस्टँडिंग होमोसेक्शुऍलिटी, ट्रान्सजेंडर आयडेंटिटी थ्रू हिंदूइजम' मध्ये म्हटलं आहे. मध्यकाळातील आणि संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
एके काळी समलैंगिक महिलांना 'स्वारानी' म्हटलं जाई, असंही या पुस्तकात कामसूत्राचा दाखला देत म्हटलंय. या महिला दुसऱ्या महिलेशी लग्न करत. त्यांना 'थर्ड जेंडर' आणि सामान्य समाजानेही सहज स्वीकारलं होतं.
याच पुस्तकात समलैंगिक पुरुषांना 'क्लीव' असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या समलैंगिक प्रवृत्तीमुळे महिलांमध्ये रस नसणारे नपुंसक पुरुष असं त्यांचं वर्णन करण्यात आलं आहे.
विवाहबाह्य संबंध
कोणत्याही स्त्री वा पुरुषाने इतर कोणत्या स्त्री वा पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध ठेवणं हा प्राचीन भारतात अपराध मानला जात नसे. आणि याला सामाजिक मान्यताही मिळालेली होती.
समाजातल्या खुलेपणाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राधा-कृष्णाच्या प्रेमाचं वर्णन. प्रेमाचा लाजेशी संबंध जोडला जात नसे.
सूरदासाच्या शब्दांत सांगायचं झालं तर -
"अपनी भुजा स्याम भुज ऊपरि स्याम भुजा अपने उर धरिया।
यों लपटाइ रहे उर-उर ज्यों, मरकत मणि कंचन में जरिया"।
विद्यापतींनीही राधेच्या सौंदर्याचं मोकळेपणाने वर्णन केलंय. राधा-कृष्ण पूजनीय आहेत, आराध्य आहेत हे माहात असूनही त्यांनी एखाद्या सामान्य नायिकेप्रमाणे राधेचं वर्णन केलंय. त्यांच्या काव्यातली राधा म्हणते -
"हँसि हँसि पहु आलिंगन देल
मनमथ अंकुर कुसुमित भेल
जब निवि बन्ध खसाओल कान
तोहर सपथ हम किछु जदि जान."
कृष्णासोबत कधीही त्याच्या पत्नींपैकी कोणाचं चित्र वा मूर्ती आढळत नाही. प्रत्येक ठिकाणी कृष्णासोबत राधाच असते. समाजाने प्रेम स्वीकारल्याचं हे उदाहरण आहे.
जमीन-अस्मानाचा फरक
तसं पहायला गेलं तर प्राचीन भारतामध्ये सेक्सविषयी अनेक ग्रंथ लिहीण्यात आले. पण शारीरिक संबंधांदरम्यान पुरुषाचा आनंद महत्त्वाचा असतो, स्त्रीच्या आनंदाला महत्त्वं नसतं या विचारसरणीला कामसूत्रातून पहिल्यांदा छेद देण्यात आला.
महिलांना 'ऑरगॅझम' म्हणजेच सर्वोच्च सुख मिळवण्यासाठी पुरुषांवर अवलंबून रहावं लागतं असं पूर्वी मानलं जाई. पण हे सुख मिळवण्यासाठी महिलांना पुरुषांची गरजच नाही हे पहिल्यांदा कामसूत्रातून सांगण्यात आलं.
एक प्रेमिक म्हणून पुरुष आणि स्त्रियांमध्ये खूप फरक असतो आणि त्यांच्या 'सेक्शुऍलिटी'च्या स्त्रोतातही जमीन-अस्मानाचं अंतर असतं.
वात्स्यायन म्हणतात, 'पुरुषांची सेक्सची इच्छा ही आगीसारखी असते. ती जननेंद्रियांपासून सुरू होऊन डोक्यापर्यंत जाते. एखाद्या आगीप्रमाणे ती सहजपणे भडकते आणि तितक्याच लवकर विरतेही. याउलट स्त्रीची सेक्सची इच्छा ही पाण्यासारखी असते. ती डोक्यापासून सुरू होऊन खालच्या दिशेने वाहत येते. ही इच्छा निर्माण करण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त वेळ लागतो."
Comments
Post a Comment