प्रजासत्ताकाची वाटचाल आणि पुढील आव्हाने लोकांनी, लोकांच्याकडून लोकांसाठी चलावलेले राज्य म्हणजे लोकशाही! ही लोकशाहीची व्याख्या शालेय जीवनापासुन लिहित वाचत आणि ऐकत आलेलो आहे. शालेय जीवन संपेपर्यंत सहज पाठ होणारी आणि हक्काचे दोन गुण मिळवून देणारी एवढीच तिची उपयुक्तता होती. विद्यार्थी म्हणून त्याचा फायदाही झालाच. परंतु जसजसे मोठे होत गेलो. समज वाढत गेली तसे या व्याखेचे विस्तृत स्वरूप आणि त्यानुसार देशात रुजू पाहत असलेली लोकशाही आणि सामाजिक मूल्ये यावरून तिचे महत्त्व लक्षात यायला लागले. वेगवेगळ्या हुकूमशाही, राजेशाही आणि लष्करी अंमलाखाली असलेल्या देशातील व्यवस्था आणि त्यामुळे झालेली मानवी जीवनाची दुरावस्था पाहिल्यानंतर आपल्या देशातील व्यवस्थेचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. ही व्यवस्था काय आहे याचा विचार करून आणि वाचून समजून घेतल्यावर ही व्यवस्था लोकशाही आणि त्यातही ती प्रजासत्ताक लोकशाही असल्याचे सहज लक्षात येते. जगाच्या पाठीवर अनेक देशात लोकशाही व्यवस्था आहे परंतु त्यातही भारतातील लोकशाही अनेक अर्थाने आणि बाजुंनी वेगळी आहे. साहजिकच जगाला तिचे कौतुक आहे आणि आश्चर्यही वाटते कारण भारतात...