दोघी
सामानाने लादलेल्या हातगाडीबरोबर शांती जेव्हा वस्तीत शिरली, तेव्हा दुपारचे चार वाजले होते. वस्तीला नुकतीच जाग आली होती. काही बाया झोपतून उठल्या होत्या. चहावाल्या पोऱ्याची वाट पाहात दारांशी उभ्या होत्या, तर काही वेणीफणी करत होत्या. घडी केलेली लोखंडी कॉट, दोन खुर्च्या, जाळीचे कपाट, जाडजूड गादी,रंगीबेरंगी चादरी, पत्र्याच्या ट्रंका आणि असे कितीतरी सामान भरलेल्या त्या हातगाडीबरोबर संथ, धिम्या गतीने, हसतमुखाने येणाऱ्या शांतीला पाहायला सर्व बाया आपापल्या झोपड्यांबाहेर येवून उभ्या होत्या. खरं तर दोन आठवड्यांपूर्वी सावित्रीच्या झोपडीशेजारच्या दोन खोल्यांच्या घराची दुरुस्तीचे काम सुरू झाले तेव्हाच शांती एकदा वस्तीत येऊन गेली होती. त्यामुळे शांती त्या वस्तीत राहायला येणार हे सर्वांना माहीत होते. शांतीला ह्य तालुक्याच्या गावात येवून सहा वर्षे होत आली होती. त्यामुळे वस्तीतील बाया तिला ओळखत नव्हत्या असेही नव्हते. तरीही तिचे आगमन म्हणजे काहीतरी विशेष घटना घडत असल्याप्रमाणे सर्व बाया बाहेर आल्या होत्या. ह्याला अपवाद होती सावित्री. शांतीची गाडी जेव्हा कोपऱ्यावरून वस्तीकडे वळली होती, तेव्हा सावित्री बाहेरच केस विंचरत उभी होती. दुरूनच तिने शांतीला पाहिले आणि आत शिरून दार थोडेसे लोटून घेऊन ती खाटेवर आडवी झाली होती.
मागच्या वेळी शांती आली होती, तेव्हा शांती आपणहूनच सावित्रीकडे आली होती. तिच्याशी गप्पा केल्या होत्या. आदल्या दिवशीच शांतीच्या घराबाहेर सावित्रीच्या झोपडीजवळ नगरपालिकावाले नळ लावून गेले होते. त्या नळाचे पाणी सावित्रीने वापरावे असे सांगून शांतीने तिला सकाळी नळ आल्यावर रबरी नळी लावून बॅरलमध्ये पाणी भरून ठेवायलाही सांगितले होते. मग परत जाताना सर्व गल्लीला उद्देशून सावित्री सोडून त्या वस्तीतील कुणीही त्या नळावर पाणी भरायचे नाही, असेही तिने बजावले होते.
सावित्रीने सकाळी उठून पाणी भरून ठेवलं होतं आणि त्यानंतर बांधकामाला पाणी हवे म्हणून ती रोजच भरत राहिली होती. पण आज शांतीला येताना पाहून ती जरा नाराजच झाली होती. शांतीबद्दल एक धूसर अस्पष्ट असमाधानाची भावना तिच्या मनात आकार घेत होती.
तालुक्याच्या ह्या गावाची लोकवस्ती गेल्या सातआठ वर्षांत झपाट्यात बदलली होती. चार मैलांवर साखर कारखाना झाल्यापासून गावाचे रूपच बदलून गेले होते. सारखे बदलत होते. नवी नवी घरे भराभर तयार होत होती. गॅरेजेस, हाॅटेल्स, लाॅजेस्, टपर्यांची दुकाने वाढली होती. माणसांची संख्या वाढली होती आणि गावाबरोबर ह्या वस्तीतील बायांची संख्याही वाढली होती. तशी ही जागा, एस.टी.स्टॅन्डच्या अगदी जवळ, गावाच्या तोंडाशीच, सर्व दृष्टीने मोक्याची. त्यामुळे अनेकांची नजर ह्या जागेवर होती. पण अनेक वर्षांपासून तेथे ठाण मांडून राहिलेल्या ह्या वस्तीला हलवणार तरी कुठे, हा प्रश्न होता. दाटीवाटीत उभ्या असलेल्या ह्या झोपड्यांतील काही बाया आदिवासी, काही महार, तर काही कैकाडी आणि आता ही नवी आलेली शांती. गुजर समाजातून उघडपणे धंद्याला लागलेली ही पहिली आणि एकटीच बाई. पण हे वैशिष्ट्य माहीत नसले तरी, तिच्याकडे लक्ष वेधून घेईल असा वेगळेपणा होता, आणि तो होता तिच्या वागणुकीतील घरदांजपणात. गोल शरीराच्या, गोल चेहऱ्याच्या, गोऱ्यागोमट्या ह्या बाईच्या बोलण्यात, चालण्यात एक भारदस्तपणा होता. ती भारी किंमतीची साडी वापरे, अंगावर दागिनेही असत. पण तिच्या चेहऱ्यावर भडकपणा, वागण्यात छिचोरपणा, खोटा नखरा नव्हता. बाजारात आलेल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर येणारी एक अगतिकता, अपराधीत्वाची भावना असते. हे भाव लपविण्यासाठी त्या कृत्रिम हसतात, मुरकतात. पण तरीही अगतिकता व अपराधीत्वाचे हे भाव लपत नाहीत. शांतीकडे ह्या भावाचा असलेला अभाव हेच तिचे वैशिष्ठ्य होते.
शांती जवळच्या खेड्यातील सधन शेतकऱ्याच्या घरातील लेक व तशाच घराची सूनही होती. परंतु एके दिवशी सासू आणि नवरा दोघेही घरात नाहीत असे पाहून सासऱ्याने तिला आपल्या खाली घेतले होते, आणि त्याला मग ती सवयच लागली होती. कालांतराने बापलेकाची भांडणे होऊ लागली. गावात चर्चा सुरू झाली. मग भानगड जातपंचायतीसमोर गेली होती. शांतीने काहीच लपवले नव्हते, नाकारले नव्हते. तिच्या बापाने सर्वांसमोर तिला बडवून काढले होते. त्यानंतर काही दिवसांनीच शांतीने आपल्या समाजातीलच एका पुढाऱ्याबरोबर शहराची वाट धरली होती. पुढाऱ्याने भाड्याने घेतलेल्या खोलीत ती राहू लागली होती. कदाचित त्या पुढाऱ्याची रखेल म्हणून तिने उभे आयुष्यही काढले असते. पण जातीच्या इज्जतीचे रक्षण करणाचा ठेका घेतलेल्या काही समाजधूरीणांना, जातीच्या बाईने असे जीवन जगावे हे जातीला लांच्छनास्पद आहे असे वाटायला लागले. त्यांनी पुढाऱ्यावर दडपण आणायला सुरूवात केली. काहीजण शांतीलाही भेटले, जातीला बट्टा लावणारे कृत्य केल्याबद्दल तिची निर्भत्सना केल्यावर तिला त्यांनी उपदेशाचे चार डोसही दिले. ह्या समाजसुधारकांना गप्प करण्याचा एकच उपाय शांतीला माहीत होता आणि त्या उपायाने तिने त्यांना गप्प तर केले, पण पुढाऱ्याला लोकनिंदेची दखल घ्यावीच लागली. शिवाय शांतीच्या तीन-चार वर्षांच्या सहवासाने त्याला तृप्तीही आली होती. शेवटी शांती त्या सभ्य वस्तीतील खोली सोडून ह्या वस्तीत आली होती.
सावित्रीला येथे येवून अनेक वर्षे झाली होती. येथे असलेल्या सर्व बायांत जुनी. वस्तीत तिचे घर अगदी टोकाला. वस्तीत शिरलेले गिर्हाईक सर्व झोपड्या पार करून तिच्या झोपडीशी पोचणार. सावित्री दिसायला साधारणच. तारुण्यात तिचा रंग तुकतुकीत आणि उजळ असेलही, पण आता तर तो मलीन काळा झाला होता. पण असे असले तरी वागण्यात, बोलण्यात एक लीनता, एक गरीब भाव होता. कदाचित त्यामुळेच तिला तिच्या गरजा पुऱ्या करण्यापुरती मिळकत होत असे. तिच्या गरजाही कमी होत्या. एका आदिवासी भील सालदाराची ही पोर. लहानपण आपल्या बापाच्या मालकाच्या घराच्या अंगणात आणि गोठ्यात गेले. तारुण्याच्या प्रदेशात प्रवेश केल्यावर तिला आपल्या आईबापाच्या जीवनातील ताणतणाव जाणवायला लागले. आपल्या आईला इतर बायांप्रमाणे रोज मजूरी शोधायला हिंडावे लागत नाही, ह्याबद्दल तिला लहानपणी आनंद वाटे. पण मालकाला आणि आपल्या आईला एका खाटेवर पाहिल्यावर तिच्या मनात रागाचा एक सल सलू लागला होता. आणि एके दिवशी तिच्या आईने, सावित्रीने मालकाच्या पोराला खूष ठेवावे असे सुचवले होते, तेव्हा तिने बापाशी भांडण करून घर सोडले होते.
शांतीने सावित्रीला झोपडीत घुसताना पाहिले होते का नाही कुणास ठाऊक, पण हमालाला सामान घराच्या दाराशी उतरायला लावून ती सावित्रीला हाका देत झोपडीत घुसली. मग सावित्री चांगला अंधार होईपर्यंत शांतीबरोबर तिचे सामान खोल्यांमध्ये नीट लावत होती. शेवटी झाडू मारून शांतीने भिंतीवरील बिटको ग्राईपच्या रामसीतेच्या फ्रेमपुढेअगरबत्त्या पेटवून चहा ठेवला होता आणि तिला चहा पाजून मगच तिची सूटका केली होती.
शांती आपल्याकडून किरकोळ कामं करून घेते, अधिकाराने करून घेते, ह्याचा सावित्रीला राग येत असे. आपल्या झोपडीत चुलीजवळ बसून ती शांतीला शिव्या देत असे. शांतीचे आता एकही काम करायचे नाही असे ठरवत असे पम शांतीची हाक आल्यावर ती मूकाट कामाला जाई. एखादेवेळी सावित्रीने तिच्या हाकेकडे दुर्लक्ष केले तर शांती सरळ सावित्रीच्या झोपडीत घुसत असे. पण मग मात्र सावित्रीला उठावेच लागे. पण तसे पाहिले तर शांतीच्या येण्यामुळे सावित्रीचे काही नुकसान तर होत नव्हते. शांतीकडे जाणारी गिर्हाईके सधन वर्गातील आणि सूदर समाजातील. टपरीवाले, लाॅटरीवाले, हाॅटेल व गराजवाले कामगार शांतीकडे जाणं शक्यच नव्हते. ही गिर्हाईकं आणि वर्षानूवर्षे सांभाळलेली गिर्हाईकं सावित्रीकडेच येणार होती. शांती आल्यामुळे सावित्रीला आता सार्वजनिक नळावर गर्दीत जाऊन पाणी भरण्याची गरज राहिली नव्हती. शांतीने वस्तीत केवळ सावित्रीशीच संबंध ठेवल्यामुळे उलट सावित्रीचे वस्तीतील स्थान उंचावलेच होते. पण तरीही शांतीमुळे सावित्रीची मन:स्थिती बिघडली होती. ती अस्वस्थ झाली होती.
शुाÀवारी संध्याकाळी रंगादादा नेहमीप्रमाणे हप्ता घेण्यासाठी तिच्याकडे आला तेव्हा सावित्रीला जरा बरेच वाटले होते. रंगादादाचा अधिकार ह्या वस्तीने कधीच मान्य केलेला होता. पोलीसांनी त्याची ह्या वस्तीतील मक्तेदारी मान्य केली होती. पोलिसांना नियमितपणे द्यावा लागणारा हप्ता तर रंगादादा गोळा करत असेच, पण ह्या वस्तीत काही भानगडी होणार नाहीत, वाढणार नाहीत ह्याचीही काळजी रंगादादा घेत असे. शिवाय पोलिसांना हव्या असणाऱ्या माणसांवर नजर ठेवून पोलिसांना खबर देण्याचे कामही तो करत असे. रंगादादा जेव्हा कोपऱ्यावरील हाॅ टेलात कामाला आला तेव्हापासून सावित्री त्याला ओळखत होती. दारू चढल्यावर इतरांप्रमाणे तो तिलाही शिव्या देत असे. पण आतापर्यंत त्याने तिच्यावर कधी हात टाकला नव्हता. सावित्रीने करून दिलेला चहा भुरकता भुरकता त्याने तिला सल्ला दिला होता, ''साईतरे, ह्या शांतीबायला खूष ठीव. बड्या बड्या लोकांच्या वळखी आहेत तिच्या. तालूक्यातील सर्व पार्ट्यांचे पुढारी ओळखतात तिला.'' सावित्रीने दिलेल्या नोटा खिशात खुपसून तो झोपडीबाहेर पडला तेव्हा शांती दाराशीच उभी राहून दाताला मिसरी घासत होती. वस्तीत नव्याने आलेल्या बाईवर दादा आपला शारीरिक अधिकार सिद्ध करत असे. शांतीच्या बाबतीत रंगादादाची ही हिंमतनाही हे सावित्रीला माहीत होते. पण पोलिसांचा हप्ता तरी तो शांतीकडून वसूल करेल अशी तिची अपेक्षा होती. पण शांतीला पाहताच रंगादादाने आपले खांदे व डोळे खाली झुकवले आणि तिला सलाम ठोकून काढता पाय घेतला, हे पाहून सावित्रीला रंगादादाचा राग आला होता.
सावित्रीच्या मनातील रंगादादाचा राग तर वितळला होता, पण शांतीबद्दल मात्र तिच्या मनात भीती, असूया आणि चीड ह्या भावना आकारात आल्या होत्या. आपल्या अनेक वर्षांच्या वस्तीतील स्थानाला ह्या गुजर बाईने धक्का दिला आहे असे सावित्रीला वाटायला लागले. खरं तर तिच्या ह्या स्थानाची सावित्रीला पूर्वी कधी जाणीवही झाली नव्हती. पण ही असूया, चीड असूनही शांतीने हाक दिली की, सावित्री हातातील काम सोडून तिच्याकडे जात असे. शांतीने अधिकारवाणीत सांगितलेले काम ती करत असे आणि मग बराच वेळ ती मनातल्या मनात धुमसत राहात असे.
कोपऱ्यावरील पानवाल्याच्या दुकानाशी सावित्रीला गाठून वस्तीतल्या सखूने शांतीला सांगून वस्तीतील घाण पाण्याचे डबके नगरपालिकेकडून बुजवून घ्यावे असे सुचवले तेव्हा तर सावित्री भडकून उठली, '' मला कशाला सांगते. तुला तोंड नाही का? जा सर्व त्या शांतीकडे आणि सांगा तिला, पाया पडा तिच्या!'' असे तिने सखूला खडसावले होते. पण असा ताण त्या दोघींच्या संबंधात असूनही त्यांच्यात एक नातेही आकारात येत होते. अखेर त्या दोघी शेजारणी होत्या. शांती ज्यादिवशी सिनेमाला जात नसे त्यादिवशी सावित्रीकडे येऊन ती तिला आपल्या घरी बोलावून नेत असे.मग विविध भारतीवर गाणी ऐकता ऐकता त्या दोघी गप्पा करत असत. अशावेळी सावित्रीला शांतीविषयी एक आपलेपणा वाटू लागे. पण तरीही शांती आपल्याला सालदाराप्रमाणे राबवते आणि आपण तिची कामे ऐकतो म्हणून सावित्रीच्या मनात शांतीविषयी आणि स्वत:विषयीची चीडही तीव्र होत होती.
आणि मग सावित्रीच्या आयुष्यात अशी घटना घडली की सावित्रीचे जीवनच बदलले, आणि त्यांच्या दुपारच्या ह्या बैठका बंद पडल्या.
तो दिवस सावित्रीला चांगला बरकतीचा गेला होता. रात्री दहा वाजता शेवटच्या गिर्हाईकाला दाराबाहेर काढल्यावर दारामागील भिंतीतील फटीत पैश्यांची पुडी सरकवून, अंडं तळून ती भाकरी खायला बसली होती. बाहेर पावलं वाजून दारावर थाप पडली. नाराजीनेच तिने शेवटचा घास घाईघाईने तोंडात कोंबून दार उघडले. दाराशी आलेला माणुस अनोळखी होता. ती त्याला काही विचारणार त्याआधीच तो आत शिरला होता आणि मग कापऱ्या आवाजात त्यानं सांगितलं होतं, '' मला काही करायचं नाही, फक्त तुझ्याशेजारी झोपायचं आहे रात्रभर''
सावित्रीने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले. त्याच्या बोलण्यावरून आणि कपड्यांवरून तो गुजर समाजातील दिसत होता. सावित्री थकलेली होती. पुरेशी गिर्हाईकं झाल्याने तिला आता गिर्हाईकाची गरज नव्हती. नुसते झोपायचे तर लाॅजमध्ये जा असं सांगायचं तिच्या मनात आले पण त्याऐवजी, ''दहा रुपये लागतील, तयारी असंल तर काढ पैसं, नाहीतर जा दुसरीकडे'' असे सांगून ती चुलीजवळील भाडी आवरायला लागली होती. भांडी आवरल्यावर तिच्या लक्षात आले, हातात दहाची नोट धरून तो तसाच दाराशी अवघडून उभा होता. तिने दार ओढून घेतले, त्याच्याकडे पाहून हसत तिने त्याच्या हातातील नोट काढून उशीखाली सरकावली आणि त्याला झोपण्यासाठी जागा रिकामा सोडून ती खाटेवर आडवी झाली. काहीवेळानं अर्धवट झोपेत असताना, तो तिच्या शेजारी झोपल्याचे आणि तिच्या छातीवर हात टाकून तिला बिलगल्याचे तिला जाणवले पण त्यानंतर तिला गाढ झोप लागली.
पहाटेला सावित्रीला जाग आली. गिरधर पाटील तिच्या कुशीत झोपला होता. तिच्या कमरेवर हात टाकून गाढ झोपला होता. कुशीवर वळून चिमणीच्या मिणमिणत्या प्रकाशात तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. एखाद्या रुसलेल्या मुलासारखा भाव होता त्याच्या चेहऱ्यावर. त्याच्या मिशा, नाक, जिवणी, अजूनही त्याच्या चेहऱ्यावर कोवळेपणा होता. मात्र त्याचे कपाळ आठ्यांनी भरलेलं होते. झोपेतदेखील दोन भुवयांमधील उभ्या रेषा पुसल्या गेल्या नव्हत्या. आपण ह्या माणसाकडून दहा रुपये घेतले पण ह्याला काही दिली नाही ह्या अपराधीत्त्वाच्या भावनेने असेल किंवा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून उदभवलेल्या वात्सल्याच्या भावनेने असेल, तिने हलकेच त्याच्या मानेच्या वरच्या भागावर हात ठेवला आणि ती त्याच्याजवळ सरकली. तिचा हात हळुहळू त्याच्या पाठीवर सरकला. त्याच्या बदललेल्या श्वासोच्छ्वासाच्या गतीवरून तो जागा झाल्याचे तिच्या लक्षात आलं. पण जागा झाला तरी तो तिच्या अंगाला चिकटला नाही. तसाच निश्चल पडून राहिला. त्याचे अंग काहीसे आक्रसले गेले होते. तशी ती अधिकच त्याच्याजवळ सरकली. अगदी हलकेच, संथपणे तिचा हात त्याच्या खांद्यांवरून, पाठीवरून, छातीवरून, पोटावरून फिरत राहिला. बऱ्याच वेळाने तो तिच्याजवळ सरकल्यावर तिच्या लक्षात आले, त्याचे शरीर जागे झाले आहे. मग ती अधिकच त्याच्याजवळ सरकली, त्याला चिकटली होती.
सकाळी तिच्या खांद्यावर डोके ठेवून, हुंदके देत गिरधर पाटलाने तिला सांगितले, आठ वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून आपल्या बायकोबरोबर तो जे करू शकला नव्हता ते त्याने तिच्याबरोबर केले होते. दुसऱ्या रात्रीही तो परत आला होता. रात्रभर राहिला होता. आपल्या गरीब बापाबद्दल, बिनलग्नाच्या दोन बहिणींबद्दल, श्रीमंत बापाच्या घरातील मुलगी असलेल्या आपल्या बायकोबद्दल, आपल्या आयुष्यातील अपयशांबद्दल तो बोलत राहिला होता.
संध्याकाळच्या वेळेस सावित्री वस्तीकडे परतली तेव्हा वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शांतीच्या सेठची जीप उभी होती. गिरधरची भेट होवून चार पाच आठवडे होऊन गेले होते. तिच्या लक्षात आले, गेल्या कित्येक दिवसांत तिची व शांतीची भेटच झाली नव्हती. सर्व दिवस काम करून सावित्री जेव्हा परतत असे तेव्हा शांतीचा दरवाजा बंद असे, आणि सकाळी शांती उठण्याआधीच सावित्री बाहेर पडत असे. जीपला वळसा घालून गिरधरसाठी पान घ्यायला ती पानवाल्याकडे वळली. तिचे खांदे आणि कंबर दुखत होते. स्लॅब टाकण्याच्या कामावर मजूरी करायची म्हणजे क्षणाचीही उसंत मिळत नाही. सारखे हात वर-खाली, वर-खाली. मालाच्या भरलेल्या पाट्या सतत वर देत राह्यच्या. पण काम भारी आहे म्हणून मजूरीही चांगली मिळते. नाहीतर बारा रुपये रोज कोण देईल? पानाची पुडी घेऊन ती मागे वळली, सखूने तिच्या कोपराला स्पर्श करून तिला थांबवले तेव्हा तिच्या लक्षात आले इतका वेळ सखू तिच्याशेजारीच उभी होती.
'' साईतरे, त्यो रंगादादा शिया देत होता तुले. दुपारहून पिऊन राह्यलाय. काय खरं नाहा त्याचं आजला. नायतं असं कर ना, सिनेमा पाहून उशिरालाच ये घराला.''
''माझंच घर, अन् मी कशाला भिवू?'' सावित्रीने एकदम तारस्वरात विचारले तिला, मग स्वत:ला सावरत म्हणाली, '' सखू काय पाहिजे त्या भाड्याला. झोपडीचं भाडं तो बिपीनभाईचा मुनिमजी घेतो. पोलिसांना हप्ताही दिला परवाला. ह्याला दारू प्यायाला पैसंही दिलं. शिया द्यायचं काय काम?''
सखू नुसतीच मान हलवत राहिली, मग म्हणाली, '' बघ बाये, तुले सांगायला इथं हुबी होते. आता तू आन् तो रंगादादा!''
सावित्री सखूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे सरकली. ती झोपडीचा दरवाजा उघडून आत शिरली. गिरधरने चूल पेटवून पाणी चढवले होते चहाचे, पण चूल भकाभका धूर ओकत होती, आणि गिरधरचा चेहरा फुंकून फुंकून लालेलाल झाला होता. त्याच्या हातात पानाची पुडी देवून तिने त्याला बाजूला व्हायला सांगितले आणि आपल्या शरीराचे दु:ख बाजूला सारून ती झपाट्याने कामाला लागली.
बाहेरून आरडा ऐकू आला तेव्हा सावित्रीच्या भाकरी भाजून झाल्या होत्या आणि तिने चूलीवर डाळ ठेवली होती. गुडघ्यांवर हातांचा टेका देवून ती उभी राहिली. झोपडीचा दरवाजा लोटून निघताना तिने एकवार गिरधरकडे हसून पाहिले, अन् त्याला बजावले, ''तुमी चुपचाप राहावा झोपडीतच. बाहेर निंघू नका. मी बघते त्या भाड्याले. ''
कमरेभोवती पदर गुंडाळत ती रंगादादाकडे निघाली. दोन्ही बाजूच्या झोपड्यांतील अरुंद वाटेने झोकांड्या खात तो पुढे येत होता, एकीकडे ओरडत होता, ''साली मादरचोद, कुटे हाए ती साईतरी, साली रांड ती रांड, बसत नाय म्हणते. ह्ये नाय चालायचं. मुकाट धंदा करायचा असंल तर राहा ह्या माझ्या वस्तीत. नायतर''
तिला येताना पाहून रंगादादाला एकदम झटका आला,तो तिच्या अंगावर धावला, तिचे केस पकडून, तिचा हात पिरगळून त्याने तिला खाली पाडले आणि एक लाथ तिच्या कमरेत घातली. क्षणभर तो तिच्यावर ओणवा उभा राहिला, बहुधा त्याची अपेक्षा होती की सावित्री त्याच्या पायांवर पडेल, त्याची माफी मागेल. पण सावित्रीच्या तोंडाचा पट्टा तुफान चालू होता. मग शिव्या देत, स्वत:चा तोल सावरत तोही तिच्यावर तुटून पडला. तिच्या छातीवर, पोटावर, कमरेवर तो लाथा घालत राहिला. ती त्या मारामुळे ओरडू लागली, कळवळू लागली पण तिच्या शिव्या मात्र चालूच होत्या. संधी सापडेल तेव्हा ती त्याच्या अंगाला बिलगत होती, त्याला ओरबाडत होती, चावत होती. सर्व वस्ती त्या दोघांभोवती गोळा झाली होती. बाया ओरडत होत्या, उगाचच इकडे तिकडे धावत होत्या, कुणीतरी चौकातल्या लक्ष्मण हवालदाराला बोलवायला धावली होती. पण कुणाही बाईला मध्ये पडून रंगादादाला आडवायची हिंमत नव्हती. रंगादादाने आंधळेपणी मारलेली लाथ सावित्रीच्या ओटीपोटात वर्मी बसली.ती अंगाचे मुटकुळं करून किंचाळू लागली, विव्हळू लागली. मग रंगादादाला जोरच चढला. तो ताठ उभा राहून सर्वच वस्तीला शिवीगाळ करू लागला. बायांचाही आरडा वाढला.
आणि त्या गडबडीत त्या दोघांच्या भोवती जमलेल्या घोळक्यातून वाट काढीत शांती पुढे आली. रंगादादाच्या शेजारी उभं राहून तिनं कळवळणाऱ्या सावित्रीकडे पाहिले. परत आणखी एक लाथ मारण्याच्या तयारीत असलेल्या रंगादादाच्या खांद्याला धरून शांतीने त्याला मागे खेचले. खांद्यावरील हात झटकून रंगादादा मागे वळला, आणि शांतीनं त्याच्या गालावर एक थप्पड ठेवून दिली, '' मर्दके बच्चे, बाईच्या अंगावर हात टाकतो. शरम नाई वाटत. चल भडवे, निकल यहाॅसे. निकल..''
मग त्याच्याकडे ढुंकूनही न पाहाता शांती सावित्रीकडे वळली. तिच्या हाताचा आधार मिळाल्याबरोबर सावित्री उभी राहिली. संतापाने वेडावलेल्या नजरेने सावित्रीने भोवती पाहिले. पण रंगादादा नाहीसा झाला होता. शांतीने सावित्रीच्या कमरेभोवती हात टाकून तिला हळुहळू झोपडीकडे न्यायला सुरुवात केली. मग तिचे सावित्रीच्या रक्ताळलेल्या चेहऱ्याकडे लक्ष गेले, '' ओ माय् , किती मारलं तुला त्या भाड्यानं ''
सावित्री चालता चालता थांबली, क्षणभर ती शांतीकडे पाहात राहिली. तिचा चेहरा संतापाने फुललेलाच होता, शरीर थरथरत होते, ''काय केलं मी त्या भाड्याला. काय बिघडलं त्याचं... ये ..ये कोन होता है हुकूम देनेवाला? मै धंदा करू या भूकी मरूं... ये क्या मेरा बाप है या नवरा.. नाय बसणार मी. माझी मर्जी..''
सावित्री बोलता बोलता थांबली, काही क्षण उभी राहिली स्तब्ध. मग मुख्य रस्त्याच्या दिशेने वळत म्हणाली, ''मी त्या भाड्याला अशी सोडणार नाही. चल शांते, चल माझ्या संगाती. त्यो फौजदार तुझा पहचानवाला है. मला त्या रंग्यावर फिऱ्याद कराची.''
ती तरातरा चालायला लागली. काही पावलं चालल्यावर तिने मागे वळून पाहिले, अजून जागेवरच उभ्या असलेल्या शांतीला तिने फर्मावले, '' चल, शांते चल'' तिचा आवाज शांत होता, पण त्या आवाजात एक सहज अधिकार होता. शांती तिच्या मागोमाग निघाली.
गल्लीच्या टोकाशी पोचल्यावर शांतीने सावित्रीला थांबवले अन् विचारले, '' सावित्रे, एक विचारते, तू धंदा सोडला, दिवसभर पाट्या उचलते, मजूरी करतेस. का? कशासाठी? हा कोण तुझा?''
सावित्री थांबली, कित्येक क्षण ती शांतीकडे पाहात राहिली, जणू शांतीच्या प्रश्नाचे उत्तर तीही शोधत होती. मग पदराने तिने आपला चेहरा खसाखसा पुसला,
''कशासाठी म्हणजे काय? मजूरी नाय करणार तर त्या गिरधरला खायला काय घालू? मी काय खाऊ? ''
मग तिचा चेहरा हळुहळू उजळत गेला. तिच्या ओठांवर हास्य उमलले, तिचे डोळे चकाकू लागले. आपल्या हनूवटीला झटका देवून मस्तक ताठ करीत ती म्हणाली, ''शांते, ह्या सावित्रीनं, ह्या भील्लाच्या पोरीनं, म्या.. गिरधर पाटलाला ठेवलाय.''
सावित्री पोलीस स्टेशनकडे चालू लागली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शांती काही वेळ पाहातच राहिली आणि मग तीही निघाली सावित्रीबरोबर...
समाप्त
Comments
Post a Comment