प्रजासत्ताकाची वाटचाल आणि पुढील आव्हाने
लोकांनी, लोकांच्याकडून लोकांसाठी चलावलेले राज्य म्हणजे लोकशाही! ही लोकशाहीची व्याख्या शालेय जीवनापासुन लिहित वाचत आणि ऐकत आलेलो आहे. शालेय जीवन संपेपर्यंत सहज पाठ होणारी आणि हक्काचे दोन गुण मिळवून देणारी एवढीच तिची उपयुक्तता होती. विद्यार्थी म्हणून त्याचा फायदाही झालाच. परंतु जसजसे मोठे होत गेलो. समज वाढत गेली तसे या व्याखेचे विस्तृत स्वरूप आणि त्यानुसार देशात रुजू पाहत असलेली लोकशाही आणि सामाजिक मूल्ये यावरून तिचे महत्त्व लक्षात यायला लागले. वेगवेगळ्या हुकूमशाही, राजेशाही आणि लष्करी अंमलाखाली असलेल्या देशातील व्यवस्था आणि त्यामुळे झालेली मानवी जीवनाची दुरावस्था पाहिल्यानंतर आपल्या देशातील व्यवस्थेचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. ही व्यवस्था काय आहे याचा विचार करून आणि वाचून समजून घेतल्यावर ही व्यवस्था लोकशाही आणि त्यातही ती प्रजासत्ताक लोकशाही असल्याचे सहज लक्षात येते. जगाच्या पाठीवर अनेक देशात लोकशाही व्यवस्था आहे परंतु त्यातही भारतातील लोकशाही अनेक अर्थाने आणि बाजुंनी वेगळी आहे. साहजिकच जगाला तिचे कौतुक आहे आणि आश्चर्यही वाटते कारण भारतातील विविध राज्ये आणि प्रांत याची भाषा, संस्कृती आणि राहणीमान वेगळे असून भारतातील अनेक धर्म आणि पंथाचे समाज येथे शतकानुशतके वास्तव्यास असलेले दिसतात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांच्यात वेळोवेळी अनेक धार्मिक, भाषिक, वांशिक आणि प्रांतिक संघर्षही झाले पण त्यामुळे इथल्या लोकशाहीला धक्का लागलेला नाही उलट त्यातूनही ही व्यवस्था तावून सुलाखून निघाल्याचेच लक्षात येते. या सगळ्याची कारणे आपण शोधू पाहिल्यास त्याचे मूळ हे भारतातील लोकशाही ही प्रजासत्ताक लोकशाहीत असल्याचे दिसून येते.
१९४७ पूर्वी साधारण १५०० वर्षे भारतावर विविध परकीय आक्रमकांनी चढाया केल्या आणि भारतात राज्यही केले. त्या काळात त्यांच्याबरोबर अनेक धर्मांचे लोक आले आणि इथेच स्थिरावले. नंतर आलेल्या अनेक आक्रमकांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर या परकीय लोकांना राजाश्रय दिला. हा इथल्या मातीचा गुण. आश्रयाला आलेल्यांना आश्रय देणे, गरजूंना मदत करणे आणि वेळप्रसंगी चुकलेल्या माणसांना माफ करणे त्यांचे अपराध पोटात घालणे हा या मातीनेच पडलेला पायंडा आहे. तो इथे आलेल्या सगळ्या परकीय आक्रमकांना अनिच्छेने का होईना पण पाळावा लागला. यात मुघल, निजाम, कुर्द, फ़्रेंच, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश असे सगळेच आले. त्यांनी भारतावर राज्य केले असले तरी इथल्या मातीचा हा गुण त्यांना मोडता आला नाही. हा गुण काय नक्की काय आहे? हे लक्षात घेतल्यावर विश्लेषणांती आपण 'हे लोकांचे राज्य आहे' याच निष्कर्षापर्यंत येऊन पोहचतो. त्यामुळे या लोकशाही व्यवस्थेला अधूनमधून जात, धर्म पंथ आणि वर्णभेदाच्या आधारावर धक्के देण्याचे प्रयत्न अनेक आक्रमकांनी करुन पहिले पण त्यांना मिळालेले यश एका मर्यादेच्या पलीकडे कधीही जाऊ शकले नाही. जेव्हा जेव्हा हुकुमशाही आणि सरंजामशाही व्यवस्थेने असे प्रयत्न केले तेव्हा या समाजातील सामान्यतुनच असामान्य व्यक्तिमत्त्व पुढे आल्याचे दिसते. यात राजा महाराजपासुन, साधु संत, आणि सामान्य लोकांमधुन अनेकांनी यावर यशस्वी मात केल्याचे दिसून येते.
Comments
Post a Comment