बिरबल कथा: घोडचूक
रविवारचा दिवस म्हणजे राजदरबाराला सुट्टी होती. सकाळी सकाळी अकबर आणि बेगमसाहिबा बदामाचा शिरा खात बसले होते. दिवस कसा घालवावा या विवंचनेत असलेल्या अकबरला अचानक एक युक्ती सुचली. त्याने एका सैनिकाला फर्मान सोडले आणि "आताच्या आत्ता दरबारात हजर व्हा!" असे सांगून बिरबलाला घेऊन ये! सैनिक निघणार तेवढयात बिरबलच महाराजांच्या महालात हजर झाला. महाराजांना मुजरा करत म्हणाला, "महाराज, आदेश द्या आपला हा सेवक हजर आहे!" बदामाच्या शिऱ्याची एक प्लेट त्याच्याकडे सरकवत अकबर म्हणाला, "बिरबला आज तुला एक कथा सांगणार आहे. त्याचे तू बरोबर आणि समर्पक उत्तर दिले नाही तर तू शिक्षेला पात्र ठरशील".
महाराज मंजूर आहे.
मग ऐक, 'एक आटपाटनगर असते. तेथील जनता आपल्या राजावर अजिबात खुश नसते. राजा भ्रष्टाचारी आहे, त्याला विकास करता येत नाही. त्याच्याकडे निर्णय क्षमता नाही, तो आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाही. शिवाय तो दिर्घकाळ सत्तेत आहे म्हणून तो आता थकला आहे. आजूबाजूची अनेक राज्ये आपल्या पुढे निघून गेली तरी आपण मागेच आहोत, याला हा राजाच जबाबदार आहे. तेव्हा त्याला बदलला पाहिजे आणि नवीन राजा आणला पाहिजे असा विचार करून तेथील जनता निवडणुकीत नवीन राजाकडे सत्ता सुपुर्द करते. नवा राजा आपल्याला नोकरी देईल, रोजगार निर्मिती करेल, अन्नधान्य स्वस्त करेल, उद्योगधंदे उभारेल, शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, भ्रष्टाचार समूळ नष्ट करेल, राज्याची भरभराट होईल, राजाच्या भीतीने राज्याचे शत्रू स्वतःच आत्महत्या करतील, सामान्य जनतेचे राज्य येईल. राजाने दिलेल्या मोठ्या अश्वासनांवर विश्वास ठेवून आशेने सर्वजण त्याला निवडून देतात. सत्ता हातात येताच नवा राजा आपल्या तिजोरीच्या चाव्या आपल्या राणीसाहेबांकडे सुपुर्द करतो. अर्थकारणात फारच सुमार असलेल्या आणि सतत देवधर्मात मग्न असलेल्या राणीसाहेब सगळा पैसा उधळपट्टी करून खर्चून टाकतात. राजाचे राणीवर आतोनात प्रेम असते. तिजोरी रिकामी झाल्यावर राजा राणीच्या प्रेमापोटी अगोदरच्या राजाने उभे केलेले उद्योग आणि संस्था विकायला काढतो. जनतेला सगळे कळत असते पण नवा राजा काहीतरी वेगळे करील, या आशेवर त्याकडे दुर्लक्ष करते. पण हळूूूहळू राजा अगोदरच्या राजाने उभे केलेले सर्व उद्योग धंदे, कंपन्या आणि मालमत्ता विकून टाकतो. पण हा राजा एकदम भारी आहे आणि ही त्याच्या कामाची पद्धतच आहे असे समजून जनता गप्पच असते.
एकेदिवशी सगळे पैसे संपल्यावर राजा विचारात पडतो. सगळे विकून झाले, आता विकायचे तरी काय? आणि पैसे जमवायचे तरी कसे? राजा या विवंचनेत असतानाच राणीसाहेब येतात आणि राजाच्या विवंचनेवर उपाय सुचवितात. त्यांचा उपाय ऐकून राजा खुश होतो. राणी किती हुशार आहे! या विचाराने अभिमानाने त्याचा ऊर भरून येतो. राणीसाहेब आपला निर्णय जाहीर करून टाकतात. जनतेने राजाकडे आपल्या काबाडकष्टातून जमा केलेले किडुकमिडुक गरजेला उपयोगी पडेल, चोराचिलटापासून सुरक्षित राहिल शिवाय राजा त्यावर समाधानकारक परतावाही देईल म्हणून विश्वासाने आपली आयुष्यभराची पुंजी गरीब जनतेने राजाकडे ठेवायला दिलेली असते. राणीचा त्याच्यावरच डोळा आहे आणि राजाची त्याला मूक संमती आहे हे जनतेच्या लक्षात आल्यावर मात्र जनता चुळबूळ करायला लागते. राजाचे गुप्तहेर राजाला जनतेची अस्वस्थता सांगतात शिवाय त्याचा येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला फटका बसू शकतो असा अहवाल देतात तेव्हा सत्ता गेली तर काय करणार? जनतेच्या ठेवी पुढच्या निवडणुकीनंतर लुबाडू असे म्हणून राणीला खोटेच दटावतो. राणीही 'नजरचुकीने झाले हो माझ्याकडून!' असे म्हणत आपला निर्णय मागे घेते. जनताही राजा आणि राणी आपली किती काळजी करतात म्हणून खुश होते'.
बिरबला आता जी गोष्ट सांगितली त्याचे तात्पर्य सांग. नाहीतर शिक्षेला तयार रहा.
सोपं आहे महाराज जनतेने विश्वासाने राजाकडे सत्ता सोपविली ती चूक आणि राजाने राणीकडे तिजोरीच्या चाव्या दिल्या ही घोडचूक.
बिरबलाचे उत्तर ऐकून 'सगळे पुरुष मेले एकजात सारखेच!' असे म्हणत बेगम फणका-याने आपल्या महालात निघून गेल्या आणि बादशहाने हसत हसत बिरबलाच्या प्लेटमध्ये अजून थोडा शिरा टाकला.
©के.राहुल, 9096242452
Comments
Post a Comment