विक्रम वेताळ कथा: राजाचे आजारपण
आज पौर्णिमा असल्याने काहीही करून सिद्ध वडावरील वेतळाला पकडून स्मशानातील साधुच्या हवाली करायचेच असा चंग बांधून राजा विक्रम जंगलातील त्या वडाच्या झाडाकडे चालू लागला. शत्रूला नेहमीच शिंगावर घेण्यासाठी सळसळणारे त्याचे क्षत्रिय रक्त त्याला वेगाने जंगलाकडे घेऊन जात होते. 'वेताळाने कितीही प्रश्न विचारले तरी उत्तरच द्यायचे नाही', असे मनाशी ठरवूनही प्रत्येक वेळी आपण त्याच्या प्रश्नाला फसतो. याचा त्याला मनोमन राग येत होता. आज मात्र काहीही झाले तरी आपण संधी वाया घालवायची नाही, असे ठरवून तो जंगलाकडे तावातावाने निघाला.
त्याने सिद्ध वडाच्या झाडावर पाहिले पण नेहमी त्या वडाला उलटा लटकणारा वेताळ आज तेथे दिसत नव्हता. वेताळ आपल्याला आज घाबरलेला दिसतोय असा मनात विचार करत म्यानातून आपली तलवार बाहेर काढत तो इकडे तिकडे त्याला शोधू लागतो. तेवढ्यात अचानक वेताळ पाठीमागून येऊन त्याच्या मानगुटीवर बसला. विक्रमाला त्याला पकडणे शक्य झाले नाही हे पाहून वेताळ आपले कुरतडलेले दात दाखवत छद्मी हसत त्याला म्हणाला "विक्रमा मला कैद करण्याचा तुझा पहिला डाव तर फसला आहे. आता मी माझा डाव टाकणार आहे. नेहमीप्रमाणे मी तुला प्रश्न विचारणार आहे. मग विचारू का प्रश्न?
वेताळाने कितीही आग्रह केला तरी आपण बॊलायचे नाही असे ठरविलेला विक्रम त्याला मान होकारार्थी डोलवून प्रश्न विचारायला संमती देतो. मग विक्रमा मला एका प्रश्नाचे उत्तर दे. महाराष्ट्र देशाचा राजा अचानक आजारी कसा काय पडला? या प्रश्नाचे जर उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या मेंदूची अनेक शकले होतील आणि तू इथेच गतप्राण होशील.
मग ऐक वेताळा, महाराष्ट्र देशाचा राजा वयाने थकला असला तरी त्याचा मेंदू अत्यंत तल्लख आहे. राजा हुशार आणि धोरणी आहे. त्यामुळे शत्रूपासून आपला आणि आपल्या देशाचा बचाव कसा करायचा? हे त्याला चांगले ठाऊक आहे. त्या मुत्सद्देगिरीच्या आणि हुशारीच्या जोरावरच त्याने आर्यवर्तावर आपली सत्ता आणि दबदबा दीर्घकाळ टिकवून ठेवला होता. पण शारीरिक मर्यादेमुळे आता त्याची आर्यवर्तावरील सत्तेची पकड ढिली झाली असून तेथे आता शत्रूचे साम्राज्य आहे. तो शत्रू इतका हुशार नाही पण त्याच्याकडे पैसा,सत्ता, संपत्ती आणि सैन्याची मोठी ताकद आहे. आर्यवर्ताचा सम्राट स्वतःला जरी महाराष्ट्र देशाच्या राजाचा शिष्य मानत असला तरी त्याला नीतिमत्तेची चाड नाही. महाराष्ट्र देशाच्या शेजारील देशाची राणी या सम्राटामुळे संकटात सापडली असून त्याने आपली सैनिकी ताकद, आणि पैसा व संपत्तीचा वापर करून राणीच्या सैन्यात फंदफितुरी घडवून आणली आहे. त्याला तिचे राज्य हडप करायचे आहे. पण ती राणी मोठी धाडसी आणि धिराची असून तिने त्याला थेट आव्हान दिले आहे. तिला युद्ध जिंकायची खात्री असली तरी गाफील राहून चालणार नाही. म्हणून तिने महाराष्ट्र देशाच्या राजाकडे मदत मागितली होती. महाराष्ट्र देशाचा राजा त्याला तयारही झाला होता. पण आर्यवर्ताचा साम्राट त्यामुळे चिडला होता. त्यातच साथीच्या आजारामुळे आणि राज्यातील काही फितूरांमुळे राज्याची आर्थिक आणि सामाजिक घडी विस्कटली होती. या फितुरांनी राज्यात अनागोंदी आणि भ्रष्टाचार माजला आहे अशी आवई उठवून आर्यवर्ताच्या सम्राटाला महाराष्ट्र राज्यात नाक खुपसायची आयती संधी निर्माण करून दिली होती. राजा शेजारच्या देशातील राणीच्या मदतीला गेला असता तर या फितूरांमुळे राज्यावर संकट ओढवले असते. ही बाब समजण्याइतका महाराष्ट्र देशाचा राजा हुशार आहे. अश्या परिस्थितीत शेजारच्या देशाच्या राणीला नाराज न करता आर्यवर्ताच्या सम्राटाला वेशीबाहेर रोखुन धरणे आणि फितूरांचे डावपेच धुळीस मिळविणे आवश्यक होते. त्यामुळे महाराष्ट्र देशाचा राजा आजाराचे निमित्त करून दवापाणी घेण्यासाठी वैद्यबुवाकडे गेला आहे."
'विक्रमा तू तर फारच हुशार आहेस. पण तू हुशारी दाखविण्याच्या नादात तुझे न बोलण्याचे वचन मोडले आहेस. त्यामुळे तू मला घेऊन जाऊ शकत नाहीत', असे म्हणत वेताळ पुन्हा छद्मी हसत उडाला आणि सिद्ध वडाच्या झाडावर जाऊन उलटा लटकला.
पुढच्या वेळेस वेतळाला नक्की पकडायचे असे ठरवून विक्रम परत आपल्या महालात परतला.
©के. राहुल, 9096242452
Comments
Post a Comment