विक्रम वेताळ कथा: शाळा बंद का?
आज पौर्णिमा आहे हे लक्षात आल्यावर विक्रम गडबडीनेच उठला. कसेबसे आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी बोलण्याची चूक यावेळी करायची नाही अशी पक्की खूणगाठ मनाशी बांधून आज काहीही करून सिद्ध वडावरील वेताळाला पकडून स्मशानातील साधुच्या हवाली करायचेच, असा विचार करून राजा विक्रम जंगलाकडे निघाला. जंगलात आल्यावर एका झाडाला घोडा बांधून त्याने त्याला खरारा दिला आणि त्याच्या पाठीवर थाप मारून तो सिद्ध वडाच्या झाडाकडे चालू लागला.
वडाचे झाड जवळ आले की, त्याला उलटा लटकलेला वेताळ दिसला. त्याने पळत जाऊन वेताळाचे लांबलचक केस पकडायचा प्रयत्न केला पण वेताळाने विक्रमच्या डोळ्याचे पाते लावण्याच्या आत मोठी उडी घेतली आणि कमरेवर हात ठेवून दात विचकत झाडाच्या शेंड्यावर जाऊन उभा राहिला. पानांच्या गर्दीत विक्रमला वरचे काहीच दिसत नव्हते. याचा फायदा घेत वेताळ हळूच त्याच्या पाठीवर येऊन बसला आणि अचानक गंभीर झाला. नेहमीसारखे छद्मी हास्य त्याच्या चेहऱ्यावरून अचानक कसे काय गायब झाले? म्हणून विक्रमही थोडा साशंक झाला. पण आपण बोलायचे नाही हे त्याला पक्के ठाऊक होते. म्हणून तो गप्प बसून चालत राहिला. थोडे अंतर गेल्यावर वेताळ त्याला म्हणाला, "विक्रमा, आज मी नेहमीप्रमाणे आनंदी नाही त्याला कारणही तसेच आहे. भारत देशात कोरोनाची फार मोठी साथ आली आहे. त्यात कित्येक लोक मरण पावले. गेले वर्षभर कोरोनाच्या साथीने थैमान घातले होते. आता जरा कुठे कमी साथीचे प्रमाण कमी होत असतानाच पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना सगळे लोक बेफिकीर आहेत. सगळे नीट आणि राजरोस चालू असतानाच भारत देशातील शाळा आणि शिक्षण संस्था मात्र बंद आहेत. हे असे का? याचे कोडे मला अद्याप उलगडले नाही. तू मला त्याचे उत्तर दिले पाहिजेस. तू तुझे वचन मोडले तरी मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे पण मला याचे उत्तर मिळालेच पाहिजे".
"वेताळा, भारत देश हा अनेक वर्ष गुलामगिरीत होता. हा कालावधी साधारण १५०० वर्षे इतका आहे. पण इथली जनता इतकी भोळी आहे की त्यांना फक्त ब्रिटिश सत्तेची १५० वर्षेच माहिती आहेत. शाळेतही तेच शिकविले जाते. ब्रिटिश भारतातून गेल्यावर अगोदर ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्याकडेच पुन्हा सत्ता आली. एकदा अपवाद वगळता बाकी सगळे राजे,महाराजे,जमीनदार आणि सरदार यांच्याकडेच सत्तेची सूत्रे होती. त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात जनतेला गुलामाचीच वागणूक दिली. त्यांच्याच जाणीवपूर्वक जात, धर्म, लिंग, वंश आणि वर्णभेद रुजविला. त्यातून प्रत्येकाला आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटायला लागले आणि सगळे आपआपसात भांडायला लागले. आपण चांगले शिक्षण घेतले पाहिजे याची जाणीवच कोणाला झाली नाही. एखादा अपवाद वगळता इतर सत्ताधारी राजांनी आणि सरंजामी प्रवृत्तीच्या लोकांनी सामान्य जनतेला ही जाणीव मुद्दाम होऊ दिली नाही. कारण सामान्य जनता शिकली की साक्षर होते, साक्षर झाली की शिक्षित होते आणि शिक्षित झाली की सुशिक्षित होते. सामान्य माणूस सुशिक्षित झाला की त्याला आपल्या हक्क आणि अधिकारांची जाणीव होतो आणि सत्ताधा-यांना प्रश्न विचारायला लागतो. आपले हक्क मागायला लागतो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला लागतो, त्याचा स्वाभिमान जागा होतो आणि आपल्या हक्क आणि अधिकारासाठी संघर्ष करायला तयार होतो. त्यातून सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला हादरा बसतो. प्रसंगी क्रांतीही होते आणि सत्ताधारी जर शोषक असला तर त्याला आपली खुर्ची खाली करावी लागते. ब्रिटिश भारतात आल्यावर त्यांनी ही व्यवस्था बदलल्यावर सामान्य लोकांना शिक्षणाच्या संधी निर्माण करून दिल्या. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उभारली. त्यामुळे सामान्य जनता शिक्षण घ्यायला लागली. नंतर झालेल्या स्वातंत्र्य लढ्यामुळे ब्रिटीशांना भारतातून जावे लागले. काही सन्माननीय अपवाद वगळता प्रांतोप्रांती या सरंजामी प्रवृत्ती लोकशाही मार्गानेच पुन्हा सत्तेवर आल्या. पण अनेक समाजसुधारकांनी दिलेल्या लढ्यामुळे शिक्षण व्यवस्था बंद करणे शक्य होत नव्हते. त्याचा परिणाम म्हणून आता कुठे कानाकोपऱ्यात शाळा पोहचू लागल्या होत्या. चांगले शिक्षण अद्याप पोहचले नव्हते. ते जर पोहचले तर गोरगरीब, दलित,आदिवासी, मागासवर्गीय मुले आणि स्त्रिया चांगले शिक्षण घेतील, आपले अधिकार मागतील, नोकऱ्या मागतील, बेरोजगारीविरुद्ध आवाज उठवतील त्यातून आपल्या सत्तेला आणि खुर्चीला हादरे बसतील आणि आपली पिढ्यानपिढ्याची सत्ता जाऊन देशात पूर्ण लोकशाही नांदेल म्हणून सत्ताधाऱ्यांनी अगोदर शिक्षणाचे अवमूल्यन केले, नंतर शिक्षण व्यवस्था खिळखिळी केली, शिक्षक भरतीत भ्रष्टाचार वाढविला, गुणवत्तापूर्ण शिक्षकांना डावलून वशिलेबाजीला प्रोत्साहन दिले. साहजिकच त्याचा शिक्षकांच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम झाला. पर्यायाने शिकवण्याचा दर्जाही ढासळला. अभ्यासक्रम कालबाह्य आणि बदलत्या काळाशी विसंगत झाले. त्यामुळे त्यातून व्यवस्था बदलणारे, नाविन्याचा आविष्कार होईल असे काही निर्माण होईना झाले आणि नव्या पिढीची निर्णयक्षमता आणि विचारशक्ती त्यामुळे खुंटली. त्यातच इथे एकाच भारताचे नागरिक असलेल्या बहुतांश हिंदूंना मुस्लिम दुय्यम वाटतात, मुस्लिमांना हिंदू आपले शत्रू वाटतात, ब्राह्मणांना क्षत्रिय आपल्यापेक्षा दुय्यम वाटतात, क्षत्रियांना ब्राह्मण कट कारस्थानी वाटतात तर ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघांनाही आपल्याच धर्मातील दलित, आदिवासी आणि मागास समाजातील लोक अस्पृश्य वाटतात. आणि या सर्व जातीच्या लोकांना आपल्या जातीच्या आणि इतर जाती धर्माच्या स्त्रिया आणि मुली आपल्या गुलाम वाटतात. त्यामुळे इथे कोणालाच दुसऱ्या कोणीही शिक्षण घेऊ नये असे वाटते. मग शाळा आणि शिक्षण बंद राहील नाहीतर दुसरे काय होणार?
अस्वस्थ वेताळ विक्रमाचे उत्तर ऐकून आणखीच अस्वस्थ झाला. विक्रमाने न बोलण्याचे वचन मोडले म्हणून हसत निघून जाणारा वेताळ तसाच पाठीवर बसून आहे हे पाहून विक्रम त्याला म्हणाला, "वेताळा, मी माझे वचन मोडले आहे तरी तू तसाच बसून आहेस?". "विक्रमा, इतकी गंभीर परिस्थिती असलेल्या या देशाचे काही भले होईल असे मला वाटत नाही. आणखी काही वाईट ऐकण्यागोदर मला मुक्ती मिळालेली चांगली. म्हणून तू मला त्या स्मशानातील साधुकडे घेऊन चल. तू वचन मोडल्याचे मला काहीच सोयरसुतक नाही", वेताळ म्हणाला.
वेताळा तुझ्या जगात कदाचित असले काही नसेल पण मी नीतिमत्ता असलेला माणूस आहे. मी जर माझे वचन मोडले तर माझ्या राज्यात माझी बदनामी होईल आणि मी बदनाम झालो तर जिवंत असेपर्यंत मला सुख आणि समाधान लाभणार नाही. म्हणून तू परत जा, पुढच्या वेळेस मी तुला नक्की पकडेन. विक्रमाचे बोल ऐकून वेताळ जड अंतकरणाने उडाला आणि सिद्ध वडाच्या झाडाला पुन्हा उलटा लटकला.
© के. राहुल, 9096242452
Comments
Post a Comment