भाकरीची गोष्ट!
एक आई असते. तिला १०० मुले असतात. त्यातील काही खूप मोठी तर काही खुप लहान असतात. त्यातल्या त्यात पहिली १५-२० मुले वयाने, मानाने आणि ताकदीने खुप मोठी असतात. साहजिकच त्यांना जास्त खायला लागत असते. आई काबाडकष्ट करून कमवून आणलेल्या पैशातून रोज १०० भाकरी करत असे. ती बिचारी समतेची पाईक असल्याने प्रत्येक मुलाला एक भाकरी वाटून देत असे. पण जो पर्यत लहान आणि नकळती असलेली ही ८० मुले जास्त खात नव्हती तोपर्यंत त्यांच्या ताटातील शिल्लक भाकरी या मोठ्या १५-२० मुलांमध्ये वाटली जायची त्यामुळे या मुलांना भरपेट जेवण मिळायचे. साहजिकच या मुलांना आपल्या गरजेपेक्षा जास्त खायची सवय लागली आणि इतर मुलांचा मिळणारा जास्तीचा वाटा हा आपला हक्क आहे असे वाटायला लागले. त्या १५-२० मुलातील पहिली ३-४ मुले खूपच हुशार, चलाख आणि पाताळयंत्री होती. ती एकत्र येऊन या ८० मुलांचा वाटा तर बळकवायचीच पण आपल्या १५-२०मधील इतरांच्या वाट्यातील काही भाग फस्त करत असायची. पण ते इतर मुलांच्या लक्षात येत नसे.
कालांतराने लहान मुले मोठी होऊ लागली आणि त्यांचीही भूक वाढत गेली. अगोदर चतकोर-अर्ध्या भाकरीच्या ज्यांचे भागत होते ते आईला जास्त भाकरी मागू लागले. साहजिकच आई समोर अडचण निर्माण झाली. शेवटी आईच ती. सगळ्या मुलांवर तिचे सारखेच प्रेम होते. एके दिवशी तिने सगळ्या मुलांना एकत्र समोर बोलावले आणि सांगितले, "हे बघा मुलांनो, तुम्ही १०० जण माझीच मुले आहात आणि मला तुम्ही सगळे समान आहात. इतके दिवस लहान असलेले तुमचे भाऊ आता मोठे झालेत आणि त्यांची भूक आता वाढली आहे. त्यांना त्यांचा वाटा दिला नाही तर त्यांचे कुपोषण होईल तेव्हा आजपासून मी सगळ्यांना फक्त एक एक भाकरी द्यायचे ठरविले आहे. माझ्याकडील उत्पन्नातुन तुम्हांला एवढेच देणे मला शक्य आहे."
आईचे बोलणे ऐकून ही १५-२० मुले एकदम रागाला गेली. आईला भांडायला लागली आणि तिला दोष दयायला लागली. मग आई शांतपणे म्हणाली, "सगळ्यांना एक भाकरी हाच आपला मूळचा नियम आहे. इतके दिवस तुम्हांला जास्त मिळत होते कारण इतर लहान मुलांना आपल्या अधिकाराची जाणीव नव्हती. आता त्यांना आपले हक्क आणि अधिकार माहीत झालेत तेव्हा त्यांना त्यांचा वाटा देणे मला क्रमप्राप्त आहे. शिवाय इतके दिवस तुम्हांला जास्त मिळाल्याने तुमची भूक वाढली असली तरी तो तुमचा कायमचा अधिकार नाही. त्यामुळे तो परत दिलाच पाहिजे". हा सगळा गोंधळ चालू असताना त्यातील तीन मुले शांतपणे कोपऱ्यात उभा राहून हे पाहत होते. आई आपले ऐकणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्याबरोबर असलेल्या १५-२० जणांना खुणावले आणि बाहेर निघून गेले. पाठोपाठ इतरही त्यांच्यामागे निघून गेले. आईला इकडे चिंता वाटू लागली. ही तीन मुले आपलीच असली तरी हुशार, बेरकी आणि कुटील कारस्थाने करणारी आहेत. उद्या भावभावात यामुळे रक्तरंजित संघर्ष होऊ नये म्हणजे झाले!
इकडे या १५-२० भावांनी आपली वेगळी बैठक घेतली. आपण आई म्हणते असे वागलो तर इतर भाऊ शिरजोर होतील. आपण थोरले म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. उद्या हे सगळे एकत्र झाले तर आपल्या विरुद्ध उभे राहतील, आपल्याला आव्हान देतील आणि आपल्या या घरावर, घरातील संपत्तीवर आणि त्यांच्यावर असलेले वर्चस्व संपुष्टात येईल. शिवाय आपण त्यांना दुय्यम वागणूक दिली म्हणून कदाचित तेही आपल्याला तशीच वागणूक देऊ शकतात. तेव्हा हा दिवस येऊ द्यायचा नसेल तर आईशी जास्त न भांडता तह करून पदरात जितके जास्त पाडून घेता येईल तितके घेऊ म्हणजे संपत्तीची वाटणी झाली तर सत्ता आपल्याच हाती राहील. वेळप्रसंगी लहान भावांशी संघर्ष करावा लागला तरी आपल्यातील हे १०-१५ जण त्यांना तोंड द्यायला खंबीर आहेत.
दुसऱ्या दिवशी पुन्हा आईने सगळ्यांना एकत्र आणले. तेव्हा या १५-२० जणातील एक जण आईला म्हणाला, आमच्याकडे भाकरीचा वाटा जास्त असला तरी आम्ही जर समप्रमाणात वाटणी केली तर जास्त खायची सवय लागली तर आमचेही एकदम कुपोषण होईल तेव्हा आम्हांला असे वाटते की, एकदम सगळ्यांना एक एक भाकरी न देता इतर ८० जणांना ५० भाकरी वाटून द्याव्यात. हळूहळू आम्ही त्यांना त्यांचा वाटा द्यायचे वचन देतो. मुलांच्या स्वार्थी प्रवृतीपुढे हतबल झालेल्या आईला हा प्रस्ताव मंजूर नव्हता पण काहीच न मिळण्यापेक्षा थोडेतरी मिळतंय, शिवाय उद्या जर मुलांमध्ये संघर्ष होऊन घर फुटणार असेल तर सत्ता आणि संपत्तीचा उपयोग काय? लहान मुले आईच्या ऐकण्याबाहेर नव्हती. आई आपले वाईट करणार नाही याचीही त्यांना खात्री वाटत होती म्हणून आईच्या इच्छेखातर त्यांनी मोठ्या भावांचा प्रस्ताव मान्य केला. "८० जणांना ५० भाकरी आणि २० जणांना ५० भाकरी", अशी वाटणी करून आईने प्रश्न सोडविला.
©के.राहुल, 9096242452
Comments
Post a Comment