कविता- लोकशाही नावाचे जंगलामध्ये..
लोकशाही नावाच्या जंगलामध्ये एक नवीन सिंह राजा झाला,
"छपन्न इंच छाती माझी" असा त्याने गाजावाजा केला.
सत्तासूत्रे हाती घेताच त्याने नवीन घोषणा केली,
हुकूमशाहीलाच लोकशाही म्हणण्याची मग प्रथा सुरू केली.
लोकशाही नावाच्या जंगलामध्ये.......
गरीब बिचाऱ्या प्राण्यांवर अत्याचार सुरू झाले,
जो जो विरोध करील त्याला मग जंगलद्रोही ठरवले गेले.
सिंहाचा तो कावा बघून जंगल सारे हादरले,
'राजाला विरोध म्हणजेच राजद्रोह', संकट अनेकांवर गुदरले,
लोकशाही नावाच्या जंगलामध्ये.......
संधीसाधू कोल्हे - लांडगे सत्तेच्या वळचणीला गेले,
पाठोपाठ झेंड्यांचे जुलूस आले,
गेंड्यांचेही कळप आले.
झुंडशाहीच्या वणव्यामध्ये
कित्येकजण खाक झाले.
लोकशाही नावाच्या जंगलामध्ये.......
विविधतेने नटलेल्या जंगलात,
एकाच धर्माचे पेव फुटले.
विविध धर्माचे प्राणी सैरावैरा पळत सुटले,
लोकशाही नावाच्या जंगलामध्ये.......
राजाला विरोध म्हणजे विकासाला विरोध,
सूत्र नवे निश्चित झाले.
हुकूम राजाचा धुडकावणारे अनेकजण तुरुंगात गेले.
लोकशाही नावाच्या जंगलामध्ये.......
कोण काय खावे?
कोणी काय घ्यावे?
कोणी काय करावे?
कोणी काय धरावे?
राजाचे बगलबच्चे सांगू लागले.
जो कोणी ऐकणार नाही, त्याला उलटे टांगू लागले.
लोकशाही नावाच्या जंगलामध्ये.......
तरीही राजा गप्प होता,
विकास जंगलाचा ठप्प होता.
Comments
Post a Comment