विक्रम वेताळ कथा: सत्तापालट
पौर्णिमेच्या रात्री उजेडात वेताळाला पकडणे शक्य नाही, हे लक्षात घेऊन विक्रमने अमावस्येच्या रात्री अंधारात वेताळाला पकडायचे असे ठरविले. त्यात आजच अमावस्या आहे हे लक्षात आल्यावर काहीही करून वेताळ आजच आपल्या हातात आलाच पाहिजे असा निश्चय करून विक्रम गडबडीनेच उठला. कसेबसे आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी बोलण्याची चूक यावेळी करायची नाही असा विचार करून त्याने सिद्ध वडाच्या झाडाकडे कूच केले. रात्रीच्या गडद अंधारातही पांढऱ्या केसाचा वेताळ वडाच्या झाडाला उलटा लटकलेला त्याला दिसला. आज याला पाठीवर बसू द्यायचे नाही असा विचार करत असतानाच वेताळाने विक्रमच्या डोळ्याचे पाते लवण्याच्या आत चपळाईने त्यांच्या खांद्यावर बस्तान बसविले आणि दात विचकत त्याला म्हणाला, "विक्रमा, आज तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची हजार शकले होऊन तू इथेच गतप्राण होशील. वेताळाच्या काव्याला बळी पडायचे नाही हे मनोमन ठरवून आलेला विक्रम नाइलाजानेच त्याला म्हणाला, "विचार तुझा प्रश्न?". त्यावर वेताळ म्हणाला, "महाराष्ट्र देशात राजाच्या पदाचा उमेदवार अचानक प्रधान कसा काय झाला?"
त्याचा प्रश्न ऐकून विक्रम म्हणाला, "वेताळा महाराष्ट्र आर्यावर्ततील अनेक राज्यांपैकी एक मोठे आणि महत्वाचे राज्य आहे. या अश्या अनेक राज्यांचा प्रमुख राजा दिल्लीत आहे. तो अर्थातच धोरणी, हुशार आणि दूरदृष्टीचा आहे. ही आर्यावर्तातील ही सर्व राज्ये आपल्या ताब्यात ठेवायची असतील तर तिथला राजा आपल्या अंकित तर असला पाहिजे पण आपल्याला वरचढ होणार नाही याची पण खबरदारी दिल्लीचा राजा घेत असतो आणि त्याचा चाणाक्ष प्रधान त्याला त्यात मदत करत असतो. महाराष्ट्र देशाचा राजा पदासाठी उमेदवार त्यांच्या विश्वासातील असला तरी सत्तेला हपापलेला आहे आणि त्यातूनच त्याने अगोदरच्या राजाच्या दरबारात बंडाळी घडवून त्याची सत्ता उलथवून टाकली आहे. अर्थात त्याला नीतिमत्ता उरलेली नाही. त्याच्या आताच्या राजे पदाला मान्यता दिली तर उद्या तो आपल्यालाही आव्हान देऊ शकतो किंवा दिल्ली दरबारीही बंडाळी घडवून आणू शकतो. तेव्हा हे घडू द्यायचे नसेल आणि आपल्या सत्तेला कसले आव्हान भविष्यात निर्माण होऊ द्यायचे नसेल तर आताच त्याचे पंख कापले पाहिजेत, असा विचार करून दिल्लीच्या राजाने त्याला राज्यातच गुंतवून ठेवायचा पण सत्ता पूर्ण सुख मिळू द्यायचे नाही यासाठी विचारपूर्वक केलेली ही खेळी आहे".
"तुझे म्हणणे बरोबर आहे विक्रमा, पण महाराष्ट्र देशाचा चाणक्यही एकदा दिल्लीला जाऊन आला होता. त्याचा उल्लेख तू कुठेच केला नाहीस!", वेताळ दात विचकत म्हणाला.
'वेताळा, सगळ्याच गोष्टी जाहीर बोलायच्या नसतात. काही आपल्या आपण समजून घ्यायच्या असतात.'
'विक्रमा, छान उत्तर दिलेस पण तू तुझे न बोलण्याचे वचन मोडले आहे. तेव्हा मी तुझ्याबरोबर यायला बांधील नाही', असे म्हणत वेताळ छद्मी हसत सिद्ध वडाच्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला.
©के.राहुल, ९०९६२४२४५२.
Comments
Post a Comment