कविता - ऋतू
ऋतू बरवा कधी,
ऋतू मरवा कधी,
ऋतू पानापानातला रंग,
गर्द हिरवा कधी.
ऋतू चांदणं कधी,
ऋतू गोंदण कधी,
ऋतू लेकीला दिलेले,
बापाचं आंदण कधी.
ऋतू ऊन कधी,
ऋतू सावली कधी,
ऋतू लेकरांसाठी खस्ता खाणारी,
माऊली कधी.
ऋतू गंध कधी,
ऋतू छंद कधी,
ऋतू नाती जोडणारे,
अतूट बंध कधी.
ऋतू उनाड वारा कधी,
ऋतू पाऊसधारा कधी,
ऋतू वैशाख वणव्यातला,
शीतल झरा कधी.
ऋतू राधेच्या प्रीतीचा रंग कधी,
ऋतू प्रेमात दंग सावळा श्रीरंग कधी,
ऋतू कृष्णाच्या विरहातील,
राधेचा प्रेमभंग कधी.
ऋतू ज्याच्या त्यांच्या नजरेचा असतो भास,
ऋतू उद्याच्या सुखासाठी असतो आजचीच आस.
Comments
Post a Comment