गर्मी: लोकशाहीतील चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेचे प्रभावी चित्रण
भारतीय चित्रपट सृष्टीतील विशेषता हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आश्वासक नाव म्हणून तिगमांशू धुलिया या दिग्दर्शकाकडे पाहिले जाते. भारतीय समाजव्यवस्थेचे, समाजव्यवस्थेतील घटकांचे, व्यवस्थेचे चालक-मालक आणि त्या व्यवस्थेला बळी पडणारे यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या निर्माता दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार यांच्यामध्ये तिग्मांशू धुलिया हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते त्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतीमुळे! दिलसे या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पानसिंग तोमर, साहेब बीबी और गँगस्टर, हासिल, चरस, गॅग्ज ऑफ वासेपुर, शहीद, मांझी : द माउंटन मॅन यासारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटातून अत्यंत प्रभावीपणे आपल्यासमोर येतो. भारतीय चित्रपटसृष्टीची विशेषता हिंदी चित्रपटांची एक व्यवस्था असून या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचे चित्रपट बनवायचे याची एक मर्यादा घालून दिलेली आहे. त्यातही विशिष्ट विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांनी सत्तेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत हस्तक्षेप केल्याने चित्रपटांतून सत्य परिस्थीती मांडणे आणखीच कठीण होऊन बसले आहे. या अघोषित सेन्सॉरशिपच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे लोकशाहीबद्दल, बोलताना, लिहिताना आणि त्यावर एखादी कलाकृती बनविताना त्यांनी घालून दिलेल्या विशिष्ट चौकटीत वास्तव मांडणे जवळजवळ अशक्य झाले आहे. ओटिटी प्लॅटफॉर्मने या सेन्सॉरशिपवर मात करण्याची संधी निर्माण करून दिल्याने या मर्यादांवर यशस्वी मात करत अनेक गुणी निर्माता, दिग्दर्शक आणि कथा, पटकथा लेखक यांना सध्याच्या भारतीय समाज व्यवस्थेचे वास्तव चित्रण करणे सहज शक्य झाले आहे. "गर्मी" या वेबसिरिजच्या निमित्ताने तिग्मांशू धुलिया यांनी लोकशाहीच्या आणि सध्याच्या व्यवस्थेच्या मर्यादांवर मात करत भारतीय लोकशाहीच्या अडून राजरोसपणे सुरू असणाऱ्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर मोठे भाष्य केले असून शासन, प्रशासन, राजकारण शिक्षण आणि समाज यामध्ये सुरू असलेल्या अनेक घटनांवर अत्यंत परखडपणे भाष्य केल्याचे दिसून येते.
"गर्मी" ही वेबसिरीज एकूण आठ भागांमध्ये असून यामध्ये सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असलेल्या एका युवकाची कथा अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे कथेची सुरुवातच सवर्ण आणि दलित यांच्यातील दरीवर भाष्य करण्यापासून सुरू होते. जातिव्यवस्थेतील ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र अशी जातींची उतरंड प्रत्येक प्रसंगात व्यक्त अव्यक्तपणे अनुभवास येते. पात्रांच्या तोंडी असलेली भाषा, संवाद आणि ठिकाणे यावरून थेट उल्लेख नसला तरी वेबसिरिजमध्ये हिंदी पट्ट्यातील विशेषत: उत्तरप्रदेशातील राजकारणाचा पट मांडला असल्याचे सहज लक्षात येते. राजसत्तेतून सध्या बाहेर फेकला असला तरी धर्मसत्तेत वर्चस्व राखलेला ब्राह्मण गुरू राजसत्तेच्या शीर्षस्थानी आहे. त्याच्या आशीर्वादाने आणि निर्देशानुसार क्षत्रिय नेतृत्व काम करत असून त्यांच्या आजूबाजूला ओबीसी आणि वैश्य आपआपल्या क्षमतेप्रमाणे सत्तेत आपला वाटा मिळवायच्या किंवा मिळविलेला वाटा टिकवायचा प्रयत्नात आहेत. या तिन्ही वर्गांच्या सेवेत शूद्र जाती असून सत्तेतील या तिन्ही वर्गांच्या आदेशानुसार काम करणे एवढेच त्यांच्या हातात आहे. शूद्रांना बाबाजींच्या जवळ जाणे किंवा त्यांना स्पर्श करणे या निषिद्ध आहे. राजकिय सत्ता ब्राह्मणांच्या हातातून निसटून गेल्याची खंत आणि चीड बाबाजींच्या मनात असून गेली कित्येक वर्षे रक्तात गर्मी असलेला ब्राह्मण जन्माला आलेला नाही याची सल त्यांच्या मनात आहे. म्हणून नाईलाजाने त्यांनी क्षत्रिय नेतृत्वाला मान्यता दिलेली आहे. ही मान्यता देताना त्या नेत्यांकडे स्वतःची तर्कदृष्टी असता कामा नये. याची बाबाजीने खबरदारी घेतलेली आहे. त्यातूनच त्यांनी कोणतीही विचारधारा नसलेल्या आणि बंदुकीच्या जोरावर सत्ता मिळविण्याची क्षमता असलेल्या बिंदुसिंगवर त्याचा वरदहस्त आहे तर त्यांच्यापेक्षा हुशार असलेल्या गोविंद मौर्य याचे बाबाजी कडून जाणूनबुजून खच्चीकरण केले जाते आणि त्याला बिंदुसिंगच्या नेतृत्वाखाली काम करायला भाग पाडले जाते. जयस्वाल सारखे अनेक जण या सत्तेच्या वळचणीला राहून सरकारी कंत्राटे मिळवून आपले हित साध्य करण्यात गुंतलेले आहेत. या तिन्ही वर्गांच्या बाजूला चेहरा नसलेले अनेक शूद्र वावरत असून त्यांच्या हाती या व्यवस्थेने बंदुका दिल्या आहेत. त्यांनी सतत आपापसात होणाऱ्या टोळीयुद्धांमध्ये दोन्ही बाजूने आपलेच भाऊ बंद मारायचे. त्यामुळे त्यांचा विशेष असा कोणताच चेहरा नाही.
हे सगळे सुरू असतानाच या राजकारणात गरीब ब्राह्मण कुटुंबातील अत्यंत हुशार आणि होतकरू मुलगा असलेल्या अरविंद शुक्ला याचा अपघातानेच प्रवेश होतो. त्याला यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी बनायचे आहे आणि त्यासाठी लागणारी बौद्धिक क्षमता आणि गुण त्याच्याकडे आहेत परंतु त्याचबरोबर तो अत्यंत शीघ्रकोपी आणि तापट स्वभावाचा आहे. त्याला आपल्या गावातच राहून हे यश मिळवायचे आहे परंतु त्याच्या वडिलांना मात्र तो गावात राहिल्यास अपेक्षित ध्येय साध्य करणार नाही असे वाटत असून त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठांमध्ये जाऊन हे यश मिळवावे असे वाटते. आपल्या मुलाने अभ्यास करत असताना दुसरे कोणतेच उद्योग करू नयेत कारण ब्राह्मण कुटुंबातील असला तरी आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे आणि त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊन ध्येय अपूर्ण राहू शकते म्हणून त्याने फक्त अभ्यास एके अभ्यास करावा असे वडिलांना वाटते. त्यामुळे त्याला जबरदस्तीने जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पाठवले जाते. येथे येताच इतके दिवस सहज सामान्य आयुष्य जगणाऱ्या अरविंदच्या आयुष्यात सतत नवनवीन वादळे निर्माण होत राहतात. अभ्यास हे आपले प्रथम ध्येय आहे याची जाणीव असतानाही त्यांच्या मैत्रिणीशी गैरवर्तन केले म्हणून अरविंद बिंदुसिंगला त्यांच्या घरी जाऊन गोळी घालतो आणि याप्रकरणात थेट मुख्यमंत्र्यापासून, शासन , प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पोलीस यांचा सहभाग वाढतो. ब्राह्मणांनी फक्त आयएएस व्हायचे आणि क्षत्रियांनी फक्त आयपीएस व्हायचे अशी सत्तेची प्रशासकीय वाटणी झालेली असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्यात शाह-काटशहाचे राजकारण सुरू होते. बिंदू सिंगला अरविंदने गोळी मारली याचा कोणताही पुरावा नसताना पोलीस अधीक्षक मृत्युंजय सिंग त्याला अटक करतो आणि न्यायालयामार्फत त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली जाते. तेथून अरविंद बाहेर पडतो तो एक कुख्यात गुंड म्हणूनच. साहजिकच बाबाजीला अरविंद सर्वांना पुरून उरणारा आहे हे पाहून आनंद होतो. त्याला या राजकारणात पूर्णपणे गुरफटून टाकण्यासाठी बाबाजीच्या आदेशाने त्याच्यावर संकटे लादली जातात. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातात आणि त्याला शस्त्रेही पुरविली जातात. अरविंद पूर्ण राजकारणी झाला आहे याची खात्री पटली की बाबाजी बिंदू सिंग आणि गोविंद मौर्य या दोघांचेही पंख छाटायला सुरुवात करतो आणि त्यातून पोलीस, जिल्हाधिकारी, बिंदू सिंग, गोविंद मौर्य आणि अरविंद यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र आणि धारदार होत जातो.
अरविंदच्या या नव्या रूपाची दूर गावामध्ये राहणाऱ्या त्याच्या पालकांना आणि बहिणींना काहीच खबर नसते. कारण हे सगळे राजरोस सुरू असताना अरविंदचे अधूनमधून घरी येणे जाणे सुरू असते. वडील गरीब असले तरी स्वाभिमानी आहेत त्यांना आपल्या आयुष्यातील भानगडी कळणार नाहीत याची तो खबरदारी घेत असतो पण आजूबाजूला शत्रूही वाढलेले असतात. त्यामुळे त्याला बाबाजीने सुरक्षा पुरविली असून सुरक्षा रक्षक शूद्र आहे. पण अरविंदने राज्यघटना वाचलेली आहे. समतेबाबत त्याचे स्वत:चे वेगळे आकलन आहे. त्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तुत्वाचा आदर आहे. म्हणूनच सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांची मैत्रीही होती आणि त्याला तो आपल्या घरी आपला मित्र म्हणून घेऊन जातो. पण आई - वडील गरीब असले तरी त्यांना पण जातीचा अभिमान असून शूद्रांना दूर ठेवले पाहिजे या मताचे ते आहेत. साहजिकच बहिणींवर ही त्यांचाच प्रभाव आहे. म्हणून तो त्याचे नाव बदलून त्याला आपल्या घरी घेऊन जातो आणि तो क्षत्रिय असल्याचे सांगतो. अरविंदचे आई वडील त्याला आपल्या मुलासारखे वागतात. त्याचा आदर करतात. तो ही आपण शूद्र असल्याचे विसरून जातो आणि नकळत अरविंद ची बहीण त्याच्या प्रेमात पडते. साहजिकच ही बाब अरविंदच्या नजरेतून सुटत नाही. तेव्हा मात्र अरविंद चिडून बहिणीला आपला मित्र क्षत्रिय नसून शूद्र असल्याचे सांगतो. प्रेक्षक म्हणून अरविंदमधील हा क्षणिक बदल आपल्याला धक्का देतो. मित्रही नाराज होऊन निघून जातो. आणि त्यांचा फायदा घेऊन त्याने बनविलेले सगळे शत्रू अरविंदच्या दारात येऊन उभे ठाकतात. इथेच ही वेब सीरिज दुसऱ्या सिजन बाबतची उत्सुकता कायम ठेऊन संपते.
ओम यादव या नवख्या कलाकाराने साकारलेला अरविंद लाजवाब आहे. विनीत कुमार यांनी शांत डोक्याने सत्तेचा सारीपाट मांडणारा साकारलेला बाबाजीही तितकाच प्रभावी झाला आहे. जतिन गोस्वामी ने साकारलेला मृत्युंजय सिंग, अनुराग ठाकूरने साकारलेला गोविंद मौर्य, पूनित सिंग याने साकारलेला बिंदू सिंग ही पात्रे ही दमदार अभिनायाने वेब सिरीजला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यामुळे ही वेबसिरीज एकदा पहायलाच हवी
-------+---++++++++समाप्त+++++++----+--------
Comments
Post a Comment